सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ५२६ ते ५५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

526-11
इये चराचरीं जीं भूतें । सर्वत्र देखे तयांतें । आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥526॥
ही स्थावर जंगम जी भूते आहेत, ती सर्वत्र पाहू लागला व पुनः पुनः भगवंता ! तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो, असेच म्हणू लागला.
527-11
ऐसीं रूपें तियें अद्भुतें । आश्चर्यें स्फुरती अनंतें । तंव तंव नमस्ते । नमस्तेचि म्हणे ॥527॥
भगवंताची अद्भूत आश्चर्यानेयुक्त अशी असंख्य रूपे जो जो पाहू लागला, तो तो तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो, असेच म्हणू लागला.
528-11
आणिक स्तुतिही नाठवे । आणि निवांतुही न बैसवे । नेणें कैसा प्रेमभावें । गाजोंचि लागे ॥528॥
आणखी काय स्तुती करावी, हे त्याला आठवत नव्हते आणि मौनही धरून राहवेना. प्रेमभावाने तो कसा नमस्ते नमस्ते असा घोष करू लागला, हे मला समजत नाही.
529-11
किंबहुना इयापरी । नमन केलें सहस्रवरी । कीं पुढती म्हणे श्रीहरी । तुज सन्मुखा नमो ॥529॥
किंबहुना याप्रमाणे हजारो वेळा त्याने नमन केले व पुनः हे श्रीहरी ! माझ्या समोर असणार्‍या तुला नमस्कार असो, असे म्हणू लागला.
530-11
देवासि पाठी पोट आथि कीं नाहीं । येणें उपयोगु आम्हां काई । तरि तुज पाठिमोरेयाही । नमो स्वामी ॥530॥
देवाला पाठ व पोट आहे किंवा नाही, या विचाराचा आम्हांला काय उपयोग?तरी पाठीमागे असणार्‍या तुला, भगवंता!नमस्कार असो!


531-11
उभा माझिये पाठीसीं । म्हणौनि पाठीमोरें म्हणावें तुम्हांसी । सन्मुख विन्मुख जगेंसीं । न घडें तुज ॥531॥
माझ्या पाठीशी उभा आहेस, म्हणून तुला पाठमोरे म्हणायचे, एरव्ही तू जगाच्या सन्मुख किंवा विन्मुख होऊ शकत नाहीस.
532-11
आतां वेगळालिया अवयवां । नेणें रूप करूं देवा । म्हणौनि नमो तुज सर्वा । सर्वात्मका ॥532॥
आता तुझ्या वेगवेगळ्या अवयवांचे वर्णन मी करू शकत नाही; म्हणून सर्वरूप व सर्वात्मक असलेल्या तुला नमस्कार असो.
533-11
जी अनंतबळसंभ्रमा । तुज नमो अमित विक्रमा । सकळकाळीं समा । सर्वरूपा ॥533॥
अगाध सामर्थ्य संपन्न व अगाध पराक्रम असणार्‍या, सर्वकाळी, सर्व देशात एकरूप, एकसारखा असणार्‍या तुला, भगवंता!नमस्कार असो.
534-11
आघविया आकाशीं जैसें । अवकाशचि होऊनि आकाश असे । तूं सर्वपणें तैसें । पातलासि सर्व ॥534॥
ज्याप्रमाणे सर्व आकाशात पोकळीच आकाशरूप होऊन आहे, त्याप्रमाणे सर्व नामरूपाने तू सर्व झाला आहेस.
535-11
किंबहुना केवळ । सर्व हें तूंचि निखिळ । परी क्षीरार्णवीं कल्लोळ । पयाचे जैसे ॥535॥
पण क्षीरसमुद्रावर जसे दुधाचे तरंग उठावेत, त्याप्रमाणे हे सर्व तूच केवळ नटला आहेस.


536-11
म्हणौनिया देवा । तूं वेगळा नव्हसी सर्वां । हें आलें मज सद्भावा । आतां तूंचि सर्व ॥536॥
म्हणून देवा!या सर्व नामरूपाहून तू वेगळा नाहीस. आता सर्व तूच आहेस, हे माझ्या पूर्ण प्रत्ययाला आले.
सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति ।
अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात्प्रणयेन वापि ।11. 41 ।

अर्थ तुझा हा महिमा न जाणणार्‍या मी प्रमादामुळे अथवा प्रेमामुळे मित्र समजून तुच्छतापूर्वक अरे कृष्णा, अरे यादवा, अरे सख्या, इत्यादी जे तुला बोललो॥11-41॥
537-11
परि ऐसिया तूतें स्वामी । कहींच नेणों जी आम्ही । म्हणौनि सोयरे संबंधधर्मीं । राहाटलों तुजसीं ॥537॥
पण, महाराज!सर्व नामरूपाने तूच नटला आहेस, असे आम्ही पूर्वी कधी जाणत नव्हतो, म्हणूनच तुझ्याशी सोयरेपणाच्या नात्याने वागलो.
538-11
अहा थोर वाउर जाहलें । अमृतें संमार्जन म्यां केलें । वारिकें घेऊनि दिधलें । कामधेनूतें ॥538॥
हाय हाय ! माझे फार अनुचित वर्तन झाले, मी अमृताने सडा संमार्जन केले. कामधेनूला देऊन तिच्याबद्दल मी शिंगरू घेतले.
539-11
परिसाचा खडवाचि जोडला । कीं फोडोनि आम्ही गाडोरा घातला । कल्पतरू तोडोनि केला । कूंप शेता ॥539॥
प्रत्यक्ष परिसाचा खडक प्राप्त झाला असतांना, आम्ही तो फोडून घराच्या पायर्‍यांत घातला आणि कल्पतरूच्या डाहाळ्या तोडून शेताला कुंपण केले.
540-11
चिंतामणीची खाणी लागली । तेणें करें वोढाळें वोल्हांडिली । तैसी तुझी जवळिक धाडिली । सांगातीपणें ॥540
चिंतामणीची खाण लागली असता, ओळखता न आल्यामुळे तिची उपेक्षा केली जावी, त्याप्रमाणे तुमच्याशी अति सलगीने वागून तुमची प्राप्ती व्यर्थ दवडली.


541-11
हें आजिचेंचि पाहें पां रोकडें । कवण झुंज हें केवढें । एथ परब्रह्म तूं उघडें । सारथी केलासी ॥541॥
प्रत्यक्ष आजचीच गोष्ट पहा. हे युध्द काय आहे आणि कितीसे आहे; पण तू स्पष्ट परब्रह्म असूनही तुला मी सारथी केला.
542-11
यया कौरवांचिया घरा । शिष्टाई धाडिलासि दातारा । ऐसा वणिजेसाठीं जागेश्वरा । विकलासि आम्हीं ॥542॥
आणि जगन्नाथा ! या कौरवांच्या घरी तडजोड करण्याकरीता आम्ही तुला पाठविले. या प्रमाणे आम्ही आपले शुल्लक व्यवहार देखील तुझ्याकडून करविले.
543-11
तूं योगियांचें समाधिसुख । कैसा जाणेचिना मी मूर्ख । उपरोधु जी सन्मुख । तुजसीं करूं ॥543॥
योगी लोक तुझ्याच ठिकाणी समाधी लावून सुख भोगतात; पण मी मूर्ख, हे कसे म्हणून जाणत नव्हतो आणि तुझ्या तोंडावर तुझी थट्टा करीत असे.
यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु ।
एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं तत्क्षामये त्वामहमप्रमेयम्॥11.42॥

अर्थ आणि क्रीडा, शयन, आसन, (मंडाळीमध्ये बसणे), भोजन इत्यादी प्रसंगी तू एकटा असतांना किंवा (लोकांच्या) देखत तुझा उपहास करण्याकरता जो तुझा अपमान केला त्याबद्दल हे अप्रमेया (ज्याच्या प्रभावाचे अथवा स्वरूपाचे प्रमाण करता येत नाही) अच्युता मला क्षमा कर.॥11-42॥
544-11
तूं या विश्वाची अनादि आदी । बैससी जिये सभासदीं । तेथें सोयरीकीचिया संबंधीं । रळीं बोलों ॥544॥
तू या विश्वाचा आदिकारण असतांना, तु ज्या सभासदांमध्ये बसत होतास, त्या सभासदांच्या समोर सोयरिकीच्याच नात्याने तुझ्याशी चेष्टा करीत होतो.
545-11
विपायें राउळा येवों । तरि तुझेनि अंगें मानु पावों । न मानिसी तरी जावों । रुसोनि सलगी ॥545॥
कदाचित तुमच्या मंदिरात मी आलो तर, तुमच्याकडून सत्कार करून घेत असे. जर मानाने तसे वागविले नाही, तर अत्यंत सलगीमुळे मी तुमच्यावर रुसूनही जात होतो.


546-11
पायां लागोनि बुझावणी । तुझ्या ठायीं शारङ्गपाणी । पाहिजे ऐशी करणी । बहु केली आम्हीं ॥546॥
हे शार्ङ्गपाणि भगवंता ! खरोखर तुझ्या पाया पडून व क्षेमकरितां तुझी याचना करून, तुझे सांत्वन केले पाहिजे, अशा प्रकारची वागणूक माझ्याकडून फार झाली.
547-11
सजणपणाचिया वाटा । तुजपुढें बैसें उफराटा । हा पाडु काय वैकुंठा? । परि चुकलों आम्हीं ॥547॥
सोयरेपणाच्या नात्याने तुझ्याकडे पाठ करून बसत असे, भगवंता ! हे योग्य होते काय?पण आम्ही चुकलों.
548-11
देवेंसि कोलकाठी धरूं । आखाडा झोंबीलोंबी करूं । सारी खेळतां आविष्करूं । निकरेंही भांडों ॥548॥
देवा!तुमच्याबरोबर दांडपट्टा खेळलों, आखाड्यात तुमच्याशी झोंबाझोंबी केली. सोंगट्या खेळतांना खोटे दान देत असूं आणि हातघाईवर येऊन, तुमच्याशी भांडतही असूं.
549-11
चांग तें उराउरीं मागों । देवासि कीं बुद्धि सांगों । तेवींचि म्हणों काय लागों । तुझें आम्ही ॥549॥
जी चांगली वस्तु असेल, ती बळजबरीने मागत असू. सर्वज्ञ अशा तुला शहाणपण सांगत असू त्याचप्रमाणे केव्हा ‘आम्ही तुझे काय लागतो’ असेहि म्हणत असूं.
550-11
ऐसा अपराधु हा आहे । जो त्रिभुवनीं न समाये । जी नेणतांचि कीं पाये । शिवतिले तुझे ॥550॥
असे त्रैलोक्यांत मावणार नाही इतके अपराध माझ्याकडून झाले आहेत; पण देवा ! हे सर्व अज्ञानामुळे घडले आहेत, हे तुझ्या पायाला स्पर्श करून सांगतो.

, , , , , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *