सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी ३२६ ते ३५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 14th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay ChaudavaSampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा संपूर्ण

326-14
हा संदेह जरी वाहसी । तरी सुखें पुसों लाहसी । परिस आतां तयासी । रूप करूं ॥326॥
हा संशय जर तुझ्या मनात असेल तर तुला तो प्रश्न सुखाने विचारता येईल. आता आम्ही त्याचे स्पष्ट उत्तर देतो, तरी तू ऐक.
327-14
(अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर गुणातीताची लक्षणे)
तरी रजाचेनि माजें । देहीं कर्माचें आणोजें । प्रवृत्ति जैं घेईजे । वेंटाळुनि ॥327॥
गुणातीत असणारा पुरुष रजोगुणाच्या उत्कर्षाने तो ज्यावेळेला प्रवृत्तीने वेढला जातो, त्या वेळी त्याच्या देहात कर्माचे अंकुर फुटतात.
328-14
तैं मीचि कां कर्मठ । ऐसा न ये श्रीमाठ । दरिद्रलिये बुद्धी वीट । तोही नाहीं ॥328॥
तेव्हा (त्या गुणातीत पुरुषाला) ‘मी एक कर्मठ आहे’ असा अभिमान चढत नाही अथवा कर्मे करण्याची राहिली तरी त्याच्या बुद्धीला खेद होत नाही.
329-14
अथवा सत्त्वेंचि अधिकें । जैं सर्वेंद्रियीं ज्ञान फांके । तैं सुविद्यता तोखें । उभजेही ना ॥329॥
अथवा सत्वगुणाच्या आधिक्याने जेव्हा सर्व इंद्रियात ज्ञान प्रकाशित होते त्यावेळी चांगल्या विद्वत्तेने (मी ज्ञानी आहे असा) हर्षभरित होत नाही. व मोह आणि भ्रम याकडुनही तो ग्रासला जात नाही (अथवा चांगली विद्वत्ता प्राप्त झाली नाही) तरी त्याला दुखःही होत नाही किंवा मानत नाही.
330-14
कां वाढिन्नलेनि तमें । न गिळिजेचि मोहभ्रमें । तैं अज्ञानत्वें न श्रमे । घेणेंही नाहीं ॥330॥
अथवा जेव्हा तमोगुण वाढतो तेव्हा तो गुणातीत पुरुष, मोह व भ्रम यांच्याकडून ग्रासला जात नाही, (त्याचप्रमाणे) तेव्हा तो अज्ञानामुळे कष्टी होत नाही, अथवा तो अज्ञानाचा स्वीकार देखिल करत नाही.

331-14
पैं मोहाच्या अवसरीं । ज्ञानाची चाड न धरी । ज्ञानें कर्में नादरी । होतां न दुःखी ॥331॥
मोहाच्या वेळी तो गुणातीत पुरुष ज्ञानाची इच्छा करत नाही आणि ज्ञानाने कर्माचा आरंभ करीत नाही व त्याच्या हातून सहज कर्म झाले तर त्याचा खेदही करत नाही.
332-14
सायंप्रतर्मध्यान्हा । या तिन्ही काळांची गणना । नाहीं जेवीं तपना । तैसा असे ॥332॥
ज्याप्रमाणे सूर्याला प्रात:काल, मध्याह्न काल व सायंकाल या तिन्ही काळांची गणना नाही, तसा तो गुणातीत पुरुष आतो. (म्हणजे त्याला तिन्ही गुणांची खबर नसते).
333-14
तया वेगळाचि काय प्रकाशें ज्ञानित्व यावें असें । कायि जळार्णव पाउसें । साजा होय? ॥333॥
त्याला काही वेगळ्याच (सत्वगुणाच्या शास्त्राचा वगैरे) प्रकाशाने ज्ञानपणा यावयाचा आहे काय तर नाही, तो ज्ञानाची मूर्तीच आहे.
334-14
ना प्रवर्तलेनि कर्में । कर्मठत्व तयां कां गमे । सांगें हिमवंतु हिमें । कांपे कायी? ॥334॥
अथवा त्या गुणातीत पुरुषाची कर्माकडे प्रवृत्ती झाली तर त्याला कर्मठत्व (मी यथासांग कर्म करणारा आहे असा अभिमान) वाटेल काय? अर्जुना, सांग पाहू. हिमालय पर्वत थंडीने थरथर कापेल काय?
335-14
नातरी मोह आलिया । काई पां ज्ञाना मुकिजैल तया । हो मा आगीतें उन्हाळेया । जाळवत असे? ॥335॥
अथवा (तमाधिक्याने) त्याच्यासमोर मोह आला असता त्या मोहामुळे तो ज्ञानाला मुकला जाईल काय? उन्हाळ्याकडून महाअग्नी जाळला जाईल काय?

336-14
उदासीनवदासीनो गुणैर्यो न विचाल्यते ।
गुणा वर्तन्त इत्येव यो~वतिष्ठति नेङ्गते ॥14.23॥

*श्लोकार्थ : उदासीनासारखा रहाणारा, जो गुणांच्या (गुणकार्य जे सुखदु:खादिक यांच्या) येण्याजाण्याने चलन पावत नाही, गुण आपापली कर्मे करीत आहेत (माझा त्यांच्याशी संबंध नाही) असे जाणून तटस्थ रहातो (जो गुणांच्या हालचालीबरोबर डोलत नाही,
गुणातीताची लक्षणे पुढे चालू
तैसे गुणागुणकार्य हें । आघवेंचि आपण आहे । म्हणौनि एकेका नोहे । तडातोडी ॥336॥
त्याप्रमाणे गुण व गुणांचे जे कार्य आहे हे तो सर्व आपणच आहे. म्हणून एक एका गुणाच्या उत्कर्षाने त्याचे चित्त विस्कळित होत नाही
337-14
येवढे गा प्रतीती । तो देहा आलासे वस्ती । वाटे जातां गुंती- । माजीं जैसा ॥337॥
वाटेने जाणारा वाटसरू संध्याकाळ वगैरे अडचणीत सापडल्यामुळे जसा वस्तीला (धर्मशाळेत वगैरे) रहातो, तसा तो गुणातीत पुरुष (प्रारब्धभोगाच्या अडचणीत सापडल्यामुळे) एवढ्या थोर अनुभावाने देहात उदासीनतेने वस्तीला आलेला असतो.
338-14
तो जिणता ना हरवी तैसा गुण नव्हे ना करवी । जैसी कां श्रोणवी । संग्रामींची ॥338॥
ज्याप्रमाणे युद्धाची भूमी (उदास) असते, (म्हणजे जशी रणभूमी ही जिंकणारी नसते अथवा पराभव पावणारी नसते), त्याप्रमाणे तो गुणांना जिंकणारा नसतो व गुणांकडून पराभव पावणारा नसतो व त्याचप्रमाणे तो गुण नसतो अथवा तो गुणांकडून करवीत नाही.
339-14
कां शरीरा आंतील प्राणु । घरीं आतिथ्याचा ब्राह्मणु । नाना चोहटांचा स्थाणु । उदासु जैसा ॥339॥
अथवा शरीरातील प्राण जसा उदास असतो किंवा घरी आलेला पांथस्थ ब्राह्मण जसा त्या घरसंबंधाने उदास असतो, अथवा चव्हाट्यावरील खांब जसा उदास असतो (त्याप्रमाणे जो देहादि गुणाकार्यावर उदास असतो.
340-14
आणि गुणाचा यावाजावा । ढळे चळे ना पांडवा । मृगजळाचा हेलावा । मेरु जैसा ॥340॥
आणि अर्जुना, मृगजळाच्या हेलकाव्याने जसा मेरुपर्वत यत्किंचिंतही हलत नाही, तसा तो गुणातीत पुरुष गुणांच्या येण्याजाण्याने गडबडत नाही,

341-14
हें बहुत कायि बोलिजे । व्योम वारेनि न वचिजे । कां सूर्य ना गिळिजे । अंधकारें? ॥341॥
याबद्दल फार बोलून काय करावयाचे आहे? आकाश वार्‍याकडुन कुठे घालवले जाते काय? अथवा सूर्य जसा अंधाराकडून गिळला जात नाही.
342-14
स्वप्न कां गा जियापरी । जगतयातें न सिंतरी । गुणीं तैसा अवधारीं । न बंधिजे तो ॥342॥
जागृत असलेल्या मनुष्यास स्वप्न जसे भ्रमात पाडत नाही, त्याप्रमानेच आत्मज्ञानी पुरुष तीन गुणांनी बांधला जात नाही. हे लक्षात ठेव.
343-14
गुणांसि कीर नातुडे । परी दुरूनि जैं पाहे कोडें । तैं गुणदोष सायिखडें । सभ्यु जैसा ॥343॥
गुणांच्या तडाख्यात तर तो निश्चय करुन आवळला जात नाही, परंतु तो जेव्हा गुणांचा कमीजास्तपणा पहातो, तेव्हा जसा एखादा सभ्य गृहस्थ (प्रेक्षक) हालणार्‍या लाकडी बाहुल्यांच्या खेळ दुरून पहातो, तसा गुणांचे कमीजास्तपण दुरून तटस्थ वृत्तीने व कौतुकाने (साक्षीरूपाने) पाहातो.
344-14
सत्कर्में सात्त्विकीं । रज तें रजोविषयकीं । तम मोहादिकीं । वर्तत असे ॥344॥
सत्वगुण हा सात्विक कर्माकडे,रजोगुण हा राजस भोगांकडे आणि तमोगुण हा मोह,प्रमाद,झोप, आणि आळस याकडे कशा प्रकारे प्रवृत्त होत असतो. परमात्मा सर्वकाही तो साक्षीरुपानेच पहात असतो.
345-14
परिस तयाचिया गा सत्ता । होती गुणक्रिया समस्ता । हें फुडें जाणे सविता । लौकिका जेवीं ॥345॥
अर्जुना ऐक. जशा लोकांच्या क्रिया सूर्याच्या सत्तेने चालतात, त्याप्रमाणे गुणांच्या सर्व क्रिया त्याच्या (गुणातीत पुरुषाच्या) सत्तेने चालतात, हे तू पक्के समज.

346-14
समुद्रचि भरती । सोमकांतचि द्रवती । कुमुदें विकासती । चंद्रु तो उगा ॥346॥
(चंद्रोदयाने) समुद्रांना भरती येते, सोमकांत मण्यांना पाझर फुटतो आणि चंद्रविकासी कमळे उमलतात पण चंद्र तर काही हालचाल करत नाही.
347-14
कां वाराचि वाजे विझे । गगनें निश्चळ असिजे । तैसा गुणाचिये गजबजे । डोलेना जो ॥347॥
वारा वहातो अथवा वहाण्याचा बंद होतो, परंतु आकाश माञ स्थिर असते.त्याप्रमानेच गुणांच्या हालचालीने जो गोंधळुन जात नाही.
348-14
अर्जुना येणें लक्षणें । तो गुणातीतु जाणणें । परिस आतां आचरणें । तयाचीं जीं ॥348॥
अर्जुना, या लक्षणांनी तो गुणातीत पुरुष ओळखावा. आता त्याचे आचरण कसे असते. ते सांगत आहे तरी त्याचे तु श्रवण सुखाचा आनंद घ्यावा.
349-14
समदुःखसुखः स्वस्थः समलोष्टाश्मकाञ्चनः ।
तुल्यप्रियाप्रियो धीरस्तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः॥14.24॥

श्लोकार्थ -: सुखदु:खाचे ठिकाणी समान (दृष्टी ठेवणारा) स्वस्वरूपी स्थित, माती, दगड व सोने ही सारखीच मानणारा, ज्याची आत्मबुद्धी अभंग आहे असा, स्वत:ची निंदा, स्तुती समान मानणारे असतात.
तरी वस्त्रासि पाठीं पोटीं । नाहीं सुतावांचूनि किरीटी । ऐसें सुये दिठी । चराचर मद्रूपें ॥349॥
तर अर्जुना, वस्त्राच्या आतबाहेर जसे सुताशिवाय दुसरे काही नसते, त्याप्रमाणेच चराचरात माझ्यावाचुन दुसरा कोणताही पदार्थ नाही, सर्व विश्व मद्रूप आहे असे तो मानतो.
350-14
म्हणौनि सुखदुःखासरिसें । कांटाळें आचरे ऐसें । रिपुभक्तां जैसें । हरीचें देणें ॥350॥
म्हणून ज्याप्रमाणे देवाचे देणे भक्तांना व शत्रूंना समान असते, त्याचप्रमाने सुख व दुःख मिळाले असता. त्याचे मन ताजव्याप्रमाने समतोल एकसारखे राहते,

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 14th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay ChaudavaSampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *