सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ५०१ ते ५२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

501-11
मग म्हणतसे देवा । तूं सूत्रीं विश्वलाघवा । जग आला मा आघवा । पूर्वस्थिति पुढती ॥501॥
तेव्हा मग अर्जुन म्हणू लागला, देवा! विश्वरूपी मायाखेळाचा तू सूत्रधार आहेस. पुनः हे जग पूर्वस्थितीत आले ना !
502-11
परी पडिलिया दुःखसागरीं । तूं काढिसी कां जयापरी । ते कीर्ति तुझी श्रीहरी । आठवित असे ॥502॥
परंतु दुःखसागरात पडलेल्या आपल्या भक्तांना तू बाहेर काढतोस, अशी जी तुझी कीर्ती आहे, त्या कीर्तीची माझ्या अंतःकरणात आठवण होत आहे.
503-11
कीर्ति आठवितां वेळोवेळां । भोगितसें महासुखाचा सोहळा । तेथ हर्षामृतकल्लोळा । वरी लोळत आहें ॥503॥
ती कीर्ती पुनः पुनः आठवतांना मी चित्तात अत्यंत सुखाचा सोहळाही भोगत आहे आणि तेथे त्या सुखातील हर्षरूपी अमृताच्या लाटांवर मी लोळत आहे.
504-11
देवा जियालेपणें जग । धरी तुझ्या ठायीं अनुराग । आणि दुष्टां तयां भंग । अधिकाधिक ॥504॥
देवा!तू दान दिल्यामुळे हे जग तुझ्या ठिकाणी प्रेम करीत आहे आणि दुष्टांचा अधिकाधिक जीव मनोभंग होत आहे.
505-11
पैं त्रिभुवनींचिया राक्षसां । महाभय तूं हृषीकेशा । म्हणौनि पळताती दाही दिशां । पैलीकडे ॥505॥
कारण त्रैलोक्याच्या सर्व राक्षसांना, भगवंता!तू महाभयरूप वाटतोस; म्हणून ते दाही दिशांच्या पलीकडे पळून जात आहेत.


506-11
येथ सुर नर सिद्ध किन्नर । किंबहुना चराचर । ते तुज देखोनि हर्षनिर्भर । नमस्कारित असती ॥506॥
बाकीचे देव, मनुष्य, सिध्द, किन्नर, किंबहुना सर्व प्राणी तुला अत्यंत आनंदित पाहून तुला नमस्कार करीत आहेत.
कस्माच्च ते न नमेरन्महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे ।
अनन्त देवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत्॥11.37॥

अर्थ हे महात्मन्, अत्यंत महान्, महद्ब्रह्माचा देखील आदिकर्ता जो तू, त्या त्या तुला राक्षस इत्यादि का नमस्कार करत नाहीत? हे अनंता, देवाधिदेवा, जगन्निवासा, तू अक्षर व सत् व असत् म्हणून जे आहे ते तू आहेस व त्याच्या अतीत जे आहे तेही तू आहेस॥37॥
507-11
एथ गा कवणा कारणा । राक्षस हे नारायणा । न लगतीचि चरणा । पळतेजाहले ॥507॥
हे नारायणा!येथे हे राक्षस कोणत्या कारणाने तुझ्या चरणाला नमस्कार न करतांच पळून जात आहेत?
508-11
आणि हें काय तूंतें पुसावें । येतुलें आम्हांसिही जाणवे । तरी सूर्योदयीं राहावें । कैसेनि तमें ॥508॥
आणि हे तुला कशाला विचारायला पाहिजे?एवढे आम्हालाहि कळते की, सूर्योदय झाल्यावर अंधाराने कसे राहावयाचे.
509-11
जी तूं प्रकाशाचा आगरु । आणि जाहला आम्हासि गोचरू । म्हणौनिया निशाचरां केरु । फिटला सहजें ॥509॥
देवा!तूच स्वयंप्रकाशाचे अमर्याद कोठार आहेस आणि तोच तूं आम्हाला प्रत्यक्ष दृष्टीस पडला आहेस; म्हणून संपूर्ण राक्षसरूपी केर कचरा सहजच नाहीसा झाला.
510-11
हें येतुले दिवस आम्हां । कांहीं नेणवेचि श्रीरामा । आतां देखतसों महिमा । गंभीर तुझा ॥510॥
इतकेदिवस हे भगवंता!आम्ही हे काहीच जाणत नव्हतो. आता तुझा आगाध महिमा आम्हांला कळून आला आहे.


511-11
जेथूनि नाना सृष्टींचिया वोळी । पसरती भूतग्रामाचिया वेली । तया महद्ब्रह्मातें व्याली । दैविकी इच्छा ॥511॥
जेथून अनंत सृष्टीच्या रांगा व चतुर्विध प्राण्यांच्या वेली पसरतात, त्या अव्यक्त मायेला तुच देवाच्या इच्छेने जन्म दिला.
512-11
देवो निःसीम तत्त्व सदोदितु । देवो निःसीम गुण अनंतु । देवो निःसीम साम्य सततु । नरेंद्र देवांचा ॥512॥
सदासर्वदा असणारी अमर्याद सत्ता देवा ! तूच आहेस. अनंत व अर्याद गुणस्वरूप तूंच आहेस. नित्य व अमर्याद अशी समब्रह्मस्थिती तूच आहेस. तू देवांचाही देव आहेस.
513-11
जी तूं त्रिजगतिये वोलावा । अक्षर तूं सदाशिवा । तूंचि सदसत् देवा । तयाही अतीत तें तूं ॥513॥
तू त्रैलोक्याचा जिव्हाळा असून, हे सदाशिवा!तू अविनाशी आहेस. कार्यकारणरूप जगत तूच झाला असून, त्यावेगळे जे आहे, तेही तूच आहेस.
त्वमादिदेवः पुरुषः पुराणस्त्वमस्य विश्वस्य परं निधानम् ।
वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनन्तरूप॥11.38॥

अर्थ तू आदिदेव, पुराणपुरुष आहेस. तू या विश्वाचे अखेरीचे स्थान आहेस. (म्हणजे प्रलयकाली विश्व तुझ्यामधे लीन होईल). तू सर्व जाणतोस. जाणण्याला अत्यंत योग्य तू आहेस. अत्यंत श्रेष्ठ असे आश्रयस्थान तू आहेस. हे अनंतरूपा तू हे विश्व विस्तारले आहेस.॥11-38॥
514-11
तूं प्रकृतिपुरुषांचिया आदी । जी महत्तत्वां तूंचि अवधी । स्वयें तूं अनादि । पुरातनु ॥514॥
देवा!तू या प्रकृतिपुरुषाचाही आदी म्हणजे कारण आहेस. जी भगवंता! महत्वाचे शेवटही तूच आहेस. स्वतः तू अनादी पुरातन आहेस.
515-11
तूं सकळ विश्वजीवन । जीवांसि तूंचि निधान । भूतभविष्याचें ज्ञान । तुझ्याचि हातीं ॥515॥
तू सर्व विश्वाचे जीवन असून, सर्व जीवांचे अधिष्ठान तूच आहेस आणि भूत भविष्यज्ञान तुझ्या स्वाधीन आहे.


516-11
जी श्रुतीचियां लोचनां । स्वरूपसुख तूंचि अभिन्ना । त्रिभुवनाचिया आयतना । आयतन तूं ॥516॥
तू वेदांचे डोळे आहेस.आत्मस्वरूपाशी तू अभिन्न आहेस आणि म्हणून आत्मस्वरूपाचे सुखही तूच आहेस. तूच संपूर्ण त्रिभुवनाला आधार असणार्‍या विश्वरूपालाही आधार आहेस.
517-11
म्हणौनि जी परम । तूंतें म्हणिजे महाधाम । कल्पांतीं महद्ब्रह्म । तुजमाजीं रिगे ॥517॥
म्हणून भगवंता!तुला सर्वश्रेष्ठ म्हणतात व सर्वाचे अंतिम वसतिस्थान तुलाच म्हणतात. कल्पाचे शेवटी ही माया तुझ्या ठिकाणीच लीन होते.
518-11
किंबहुना तुवां देवें । विश्व विस्तारिलें आहे आघवें । तरि अनंतरूपा वानावें । कवणें तूंतें ॥518॥
किंबहूना तूच संपूर्ण जगत्स्वरूपाने प्रगट झाला आहेस, तेव्हा हे विश्वरूपा! तुझे वर्णन करण्यास कोण समर्थ आहे?
वायुर्यमोग्निर्वरुणः शशाङ्कः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च ।
नमो नमस्तेऽस्तुसहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते॥11.39॥

नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व । अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः॥11.40॥
अर्थ वायु, यम, अग्नि, वरुण, चंद्र ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचाही पिता तू आहेस. तुला नमस्कार असो. सहस्रवधि नमस्कार असोत. पुन्हा पुन्हा तुला नमस्कार असो.॥11-39॥हे सर्वत्र असणार्‍या प्रभो, पुढून, मागून, सर्व बाजूंनी तुला नमस्कार असो. सामर्थ्याला अंत नसलेला व पराक्रमाला इयत्ता नसलेला तू आहेस. तू सर्व व्यापतोस, तस्मात् सर्व तूच आहेस.॥11-40॥
519-11
जी काय एक तूं नव्हसी । कवणे ठायीं नससी । हें असो जैसा आहासी । तैसिया नमो ॥519॥
देवा!तू काय नाहीस व कोणत्या ठिकाणी नाहीस? हे असो. जसा तू आहेस, तशाच तुला नमस्कार असो.


520-11
वायु तूं अनंता । यम तूं नियमिता । प्राणिगणीं वसता । अग्नि तो तूं ॥520॥
अनंता!तूच वायू असून,प्राण्यांना कर्माप्रमाणे शासन करणारा यम तूच आहेस. सर्व प्राणिमात्रांच्या जठरात राहणारा अग्नि तूच आहेस.
521-11
वरुण तूं सोम । स्रष्टा तूं ब्रह्म । पितामहाचाही परम । आदि जनक तूं ॥521॥
वरूण, सौम, सृष्टी उत्पन्न करणारा ब्रह्मदेव व ब्रह्माचाही उत्पन्नकर्ता असा परमकारण तूच आहेस.
522-11
आणिकही जें जें कांहीं । रूप आथि अथवा नाहीं । तया नमो तुज तैसयाही । जगन्नाथा ॥522॥
आणिकही रूप आहे किंवा रूप नाही जे जे काही आहे, ते तूच आहेस, देवा!तशा तुला नमस्कार असो.
523-11
ऐसें सानुरागें चित्तें । नमन केलें पंडुसुतें । मग पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥523॥
अशा रितीने प्रेमयुक्त चित्ताने भगवंताला अर्जुनाने नमन केले आणि पुनः भगवंता ! तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो, असेच म्हणूं लागला.
524-11
पाठीं तिये साद्यंते । न्याहाळी श्रीमूर्तीतें । आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥524॥
नंतर त्या संपूर्ण विश्वरूपाकडे पाहून पुनः भगवंता!तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो असेच म्हणू लागला.
525-11
पाहतां पाहतां प्रांतें । समाधान पावे चित्तें । आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥525॥
एका एका अवयवाकडे पाहात पाहात, मनांत परम संतोष मानून पुनः भगंवंता तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो असे म्हणू लागला

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *