कृत्रिम शीतपेये व रोग

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

कृत्रिम शीतपेये व रोग

कृत्रिम शीतपेये पिताना अनेक घातक द्रव्ये पोटात जातात. या शीतपेयांमुळे शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. या शीतपेयांचे सातत्याने सेवन केल्यास मधुमेहासारखा गंभीर विकार जडू शकतो. त्यामुळे ही पेये पिण्याऐवजी देशी शीतपेये पिण्यास प्राधान्य द्यायला हवे.


मंडळी, उन्हाळा आला की घशाला कोरड पडते, तहान साध्या पाण्याने भागत नाही आणि मग तहान भागवण्यासाठी सर्वसामान्यांचा ओढा आपोआपच काहीतरी थंड पिण्याकडे जातो आणि कृत्रिम शीतपेयांचा आस्वाद घेऊन तो बहुतेक वेळा हुश्श.. करतो. पण मंडळी, या कृत्रिम शीतपेयांच्या सेवनाने कितीतरी घातक द्रव्ये आपण पोटात ढकलत असतो याचा आपल्याला विसर पडतो.


कृत्रिम शीतपेयांमध्ये प्रामुख्याने फॉस्फरिक अ‍ॅसिड, कॅफीन, घातक कृत्रिम रंग, कार्बन डायऑक्साईड, अ‍ॅल्युमिनियम आदींचा वापर प्रामुख्याने असतो. फॉस्फरिक अ‍ॅसिडमुळे शरीरातील पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांचे प्रमाण बिघडते. हाडातील कॅल्शियम रक्तात येऊन बाहेर जात असल्याने आर्थरायटिस, मूतखडा, रक्तवाहिन्या कठीण होणे आदी विकार जडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वारंवार व्यक्त केली आहे. याचबरोबर दात, मणके, कमरेची हाडे ठिसूळ होणे हे दुष्परिणाम तर होतातच.


शीतपेयांवर वारंवार झालेल्या संशोधनानुसार, व्यक्ती जर सातत्याने शीतपेयाचे सेवन करीत असेल तर त्यात असलेल्या साखरेच्या अतिप्रमाणामुळे मधुमेहासारखा गंभीर आजार जडू शकतो. कोणतेही ३५० मिलीलिटर (ज्यामध्ये ३१.५ ग्रॅम साखर असते. ) शीतपेय एकावेळी घेतल्यास Diabetes-2 प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता २०% बळावते. शीतपेय माणसाच्या यकृताला आणि मूत्रपिंडाला हानी पोहोचविते आणि कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला आमंत्रण देते. इम्पिरिअल कॉलेज ऑफ लंडनमधील प्रो. नीक वेअरहॅम यांच्या अभ्यासानुसार शीतपेयांच्या सततच्या सेवनाने वजन तर वाढतेच, पण शरीरातील इन्शुलिनचे कार्य कमी होते. अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथील प्रो. बेरी पॉपकीन यांनी तर आपल्या अन्नपदार्थातील साखर हा पदार्थ तंबाखूसारखा शरीरावर दुष्परिणाम करतो असे निष्कर्ष काढले आहेत.

भारतासारख्या विकसनशील देशात जाहिरातींचे प्राबल्य तर खूप जास्त प्रमाणात आहे आणि आरोग्यास हानिकारक अशा शीतपेयांच्या जाहिराती तर लोकप्रिय कलाकारांच्या अवास्तव स्टंटबाजीने पुरेपूर असतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत जीवघेणे साहस करून मग शीतपेयाची बाटली एका दमात रिचविली जाते आणि आमची तरुण पिढी आणि लहान मुले यांना हे पेय पिण्यास भुरळ पाडते.


देशातील ही सद्य परिस्थिती बदलण्यासाठी या लोकप्रिय कलाकारांच्या तोंडूनच आरोग्यास हानिकारक शीतपेयांची योग्य माहिती लोकांसमोर आणावयास हवी. लिंबू सरबत, कोकम सरबत, आवळा सरबत, शहाळ्याचे पाणी आदी नैसर्गिक पेयांचे महत्त्व वारंवार त्यांच्यासमोर आणले गेले पाहिजे. एकंदरीतच लोकांच्या हिताचे आणि आरोग्याचे रक्षण करण्याच्या दृष्टीने मोठय़ा प्रमाणावर आणि सातत्याने जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे.

आरोग्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *