सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी २२६ ते २५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

226-9
अखंड अगर्वता होऊनि असती । तयांतें विनयो हेचि संपत्ती । जे जयजयमंत्रें अर्पिती । माझांचि ठायीं ॥226॥
ते नेहमीं गर्वरहित असतात व नम्रता हीच त्यांची संपत्ति असते; व ते जयजयमंत्राने माझ्या ठिकाणीं आपली सर्व कर्मे अर्पण करतात.
227-9
नमितां मानापमान गळाले । म्हणोनि अवचितें ते मीचि जहाले । ऐसे निरंतर मिसळले । उपासिती ॥227॥
नम्र होतां होतां त्यांना मानापमानाचा विचार राहात नाही, म्हणून ते मीच होऊन राहतात; व अशा प्रकारे मद्रूप होऊनही निरंतर माझीच उपासना करतात.
228-9
अर्जुना हे गुरुवी भक्ती । सांगितली तुजप्रती । आतां ज्ञानयज्ञें यजिती । ते भक्त आइकें ॥228॥
अर्जुना, अशा प्रकारे ही श्रेष्ठ भक्ति तुला सांगितली. आता जे माझी ज्ञानयज्ञाने भक्ति करतात, ते कोणते भक्त ते ऐक.
229-9
परि भजन करिती हातवटी । तूं जाणत आहासि किरीटी । जे मागां इया गोष्टी । केलिया आम्हीं ॥229॥
परंतू हे किरीटी, त्यांची भजन करण्याची शैली तुला माहीत आहेच, व त्याबद्दल आम्ही पूर्वी (अ.4 श्लो 33-42) वर्णन केलेच आहे.
230-9
तंव आथि जी अर्जुन म्हणे । तें दैविकिया प्रसादाचें करणें । तरि काय अमृताचें आरोगणें । पुरे म्हणावे? 230॥
तेव्हां अर्जुन म्हणाला, ” होय, हा ईश्वरी प्रसादच आहे. तथापि अमृताचे सेवन करणाराच्याने कधी पुरे म्हणवते का? “

231-9
या बोला श्रीअनंतें । लागटा देखिलें तयातें । कीं सुखावलेनि चित्तें । डोलतु असे ॥231॥
तेव्हां अर्जुनाचे हे बोलणे ऐकुन, हा कार्यसाधु आहे असे पाहून श्रीअनंत चित्तांत संतोष मानून डोलूं लागले.
232-9
म्हणे भलें केलें पार्था । एऱ्हवीं हा अनवसरु सर्वथा । परि बोलवीतसे आस्था । तुझी मातें ॥232॥
आणि म्हणाले, “पार्था शाबास! बाकी सांगितलेली गोष्ट पुनः सांगणे हे अप्रासंगिकच, पण तुझी ऐकण्याची उत्कंठा पाहून मला सांगणे भाग पडते.
233-9
तंव अर्जुन म्हणे हें कायी । चकोरेंवीण चांदिणेंचि नाहीं । जग निवविजे हा तयाचां ठायीं । स्वभावो कीं जी ॥233॥
तेव्हां अर्जुन म्हणाला, ” तुम्हीं म्हणता अशी गोष्ट नाही. पहा की, चकोर पक्ष्याची तहान भागविण्याशिवाय चंद्राला इतर काही कर्तव्य नाहीं की काय? जगाला शांत करणे हा त्याचा स्वभावच आहे;
234-9
येरें चकोरें तियें आपुलिये चाडे । चांचु करिती चंद्राकडे । तेविं आम्ही विनवुं तें थोकडे । देवो कृपासिंधु ॥234॥
एरव्ही, चकोर पक्ष्याने आपल्या गरजेकरता ज्याप्रमाणे चंद्राकडे चोच करावी, त्याप्रमाणे आम्ही आपली जेवढी विनंति करावी तेवढी थोडीच आहे. कारण, देवा आपण दयेचे सागर आहांत.

235-9
जी मेघ आपुलिये प्रौढी । जगाची आर्ति दवडी । वांचूनि चातकाची ताहान केवढी । तो वर्षावो पाहुनी ॥235॥
मेघ आपल्या थोरपणाने जगाचे दुःख निवारण करतो, त्या त्याच्या मोठ्या वर्षावाच्या मानाने पाहिले असतां चातकाची तहान ती केवढी असणार!


236-9
परि चुळा एकाचिया चाडे । जेविं गंगेतेंचि ठाकावें पडे । तेंविं आर्त का बहु कां थोडें । तरि सांगावें देवा ॥236॥
परंतु एकच चूळ भरण्याची इच्छा झाली तरी ज्याप्रमाणे गंगेतच जावे लागते, त्याप्रमाणे, आम्हांला ऐकण्याची इच्छा थोडी किंवा बहुत असली, तरी देवा, आतां सांगण्यास सुरवात करावी.
237-9
तेथें देवें म्हणितलें राहें । जो संतोषु आम्हां जाहला आहे । तयावरी स्तुति साहे । ऐसें उरलें नाही ॥237॥
त्या वेळेस देव म्हणाले :- अर्जुना, आतां तुझे बोलणे राहूं दे. आम्हांला जो संतोष झाला आहे, त्यापेक्षा तूं स्तुति करुन तो वाढेल असे नाही;
238-9
पैं परिसतु आम्हासि निकियापरी । तेंचि वक्तृत्वा वऱ्हाडीक करी । ऐसें पुरस्करोनि श्रीहरी । आदरिलें बोलों ॥238॥
परंतु तूं ज्याप्रमाणे लक्ष देऊन एवढा वेळ ऐकलेस, तसेच लक्ष देऊन आमच्या बोलण्यास मेजवानी कर (व पुढेही तसेच ऐक). अशा रीतीने श्रीहरिंनी अर्जुनास मान देऊन बोलण्यास सुरवात केली.
ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते ।
एकत्वेन पृथक्त्वेन बहुदा विश्वतोमुखम्॥9.15॥
239-9
तरी ज्ञानयज्ञु तो एवंरुपु । तेथ आदिसंकल्पु हा यूपु । महाभूतें मंडपु । भेदु तो पशु ॥239॥
ज्ञानयज्ञाचे लक्षण कोणते म्हणशील, तर ज्या ठिकाणीं ‘ ब्रह्माचे बहुत प्रकारचे होणे ‘ म्हणजे आदिसंकल्प हाच पशु;
240-9
मग पांचांचे जे विशेष गुण । अथवा इंद्रियें आणि प्राण । हेचि यज्ञोपचारभरण । अज्ञान धृत ॥240॥
मग पंचमहाभूतांचे जे विशेष गुण ते, अथवा पांच इंद्रिये आणि पंचप्राण हेच यज्ञाचे साहीत्य, व ब्रह्माविषयीं जे अज्ञान तेच घृत.

241-9
तेथ मनबुद्धीचिया कुंडा- । आंतु ज्ञानाग्नि धडफुडा । साम्य तेचि सुहाडा । वेदि जाणें ॥241॥
हे बलाढ्य अर्जुना, त्या यज्ञांत मन व बुद्धि ही दोन कुंडे असुन या दोन कुंडांत ज्ञानरूप अग्नि प्रदीप्त केला जातो; सुख व दुःख यांचे ठिकाणीं जी समता तीच वेदिका म्हणजे यज्ञकुंडाच्या सभोवती असलेला परिघ होय;
242-9
सविवेकमतिपाटव । तेचि मंत्रविद्यागौरव । शांति स्त्रुकस्त्रुव । जीव यज्वा ॥242॥
आत्मानात्मविचार करण्याविषयी जी बुद्धीची कुशलता, तेच यज्ञांतील मंत्र होत; शांति हीच स्त्रुक व स्त्रुवा नांवाची हवनपात्रे व जीव हा यज्ञ करणारा होय.
243-9
तो प्रतीतीचेनि पात्रें । विवेकमहामंत्रें । ज्ञानाग्निहोत्रें । भेदु नाशी ॥243॥
तो यज्ञ करणारा जीव अनुभवरूप पात्रांनी, ब्रह्माच्या विचाररूप महामंत्रांनी, ज्ञानरूप अग्निहोस्त्र कर्माने, जीव व ईश्वर यांच्या भिन्नपणाची आहुति देऊन तो भेद नाहीसां करतो,
244-9
तेथ अज्ञान सरोनि जाये । आणि यजिता यजन हें ठाये । आत्मसमरसीं न्हाये । अवभृथीं जेव्हां ॥244॥
त्या वेळेस अज्ञान नाहीसे होऊन यज्ञ करणारा व यज्ञक्रिया ही जागचे जागीच राहतात. नंतर आत्मानंदरसात जीव यजमानाचे अवभृथस्नान होते.
245-9
तेव्हां भूतें विषय करणें । हें वेगळालें काहीं न म्हणे । आघवें एकचि ऐसें जाणे । आत्मबुद्धी ॥245॥
तेव्हां पंचमहाभूतें, शब्द, स्पर्श इत्यादि विषय व इंद्रिये ही वेगळाली आहेत असे म्हणत नाही व ब्रह्माशी तादात्म्य झाल्यामुळे सर्व एक आहे असे तो जाणतो.

246-9
जैसा चेइला तो अर्जुना । म्हणे स्वप्नींची हें विचित्र सेना । मीचि जाहालों होतों ना । निद्रावशें ॥246॥
अर्जुना, ज्याप्रमाणे झोपेतून जागा झालेला मनुष्य म्हणतो की, ‘ स्वप्नांत पाहिलेली चित्रविचित्र सेना झोप लागल्यामुळे मीच झालो होतो ना
274-9
आतां सेना ते सेना नव्हे । हें मीच एक आघवें । ऐसें एकत्वें मानवे । विश्व तया ॥247॥
आतां जी सेना पाहिली होती, ती सेना नव्हती; ती मीच झालो होतो; ‘ अर्जुना, अशा प्रकारे त्या पुरुषाला जग एकरूप भासते.
248-9
मग तो जीवु हे भाष सरे । आब्रह्म परमात्मबोधें भरे । ऐसे भजती ज्ञानाध्वरें । एकत्वें येणें ॥248॥
मग तो जीव ‘मी आहे ‘ अशी आठवण विसरतो, व ब्रह्मदेवापासून तृणापर्यंत आत्माच भरलेला आहे असे मानतो. अशा प्रकारे ज्ञानयज्ञाने ऐक्य पावून कितीएक मला भजतात.
249-9
अथवा अनादि हें अनेक । जे आनासारिखें एका एक । आणि नामरुपादिक । तेंही विषम ॥249॥
दुसरा, माझे भजन करणारा असे समजतो की, जगांतील जे सर्व पदार्थ दिसतात, ते अनादि आहेत. एकासारखे एक असुनही निराळे आहेत, आणी त्यांची नांवे व रूपे ही निराळी आहेत, म्हणून, जग हे जरी भिन्न वस्तूंनी भरलेले आहे,
250-9
म्हणोनि विश्व भिन्न । परि न भेदे तयांचें ज्ञान । जैसे अवयव तरी आन आन । परि एकेचि देहींचे ॥250॥
तरी त्या वस्तुचें जे अधिष्ठान त्याच्या ज्ञानाबद्दल त्यांचे मनांत भेद नसतो. ज्याप्रमाणे, अवयव जरी निरनिराळे आहेत, तरी ते एकाच देहाचे आहेत.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *