भाग – २३.
आचार्यांनी मानेनंच संमती दिली. सोपान अभिवादन करुन नम्रपणे म्हणाले भूदेव!आमच्या आईवडीलांनी आम्हा भावंडांची नावे ठेवली,ती संगती सांगण्या चा प्रयत्न करतो.माझे जेष्ठ बंधु व गुरु निवृत्तीदादांना प्रणाम करुन सुरुवात करतो.निवृत्ती,ज्ञानदेव,सोपान,मुक्ता यांचा अर्थ असा आहे की,”भौतिक संसारातून निवृत्त होऊन पारमार्थिक ज्ञान प्राप्त केलं की,आध्यात्माचा सोपान चढुन गेल्यावर मनुष्यप्राणी मुक्त होतो.”अशी ही प्रतिनिधिक संज्ञा आमच्या नांवाची आहे.दहा वर्षाच्या सोपानानं केललं विश्लेषण ऐकुन सारी धर्मसभा थक्क झाली.पण कांही कट्टरवादी होतेच, त्यातल्या एकाने विचारलेच,या धर्मसभेनं तुमचा न्याय कां करावा?याचे कारण देऊं शकाल का? ज्ञानेश्वर पुढे होऊन म्हणाले, आचार्य! धर्म हा मानवकल्याणार्थ असुन तो ईश्वर सर्व चरांचरांत भरुन आहे,तसच तो मनुष्यप्राण्यांतही आहे.या मनुष्यस्थीत ईश्वराच्या अधिष्ठानासाठी आम्हाला न्याय हवा.ज्ञानदेवांचे संभाषण ऐकुन धर्मसभा विचाराधिन झाली.तरीही…
कांही विकृत विचारांचे धर्ममार्तंड तिथे होतेच.तिथुन एक पाणी वाहणारा, रेड्यावर पखाल बांधुन जात होता.त्याला हाकारुन रेड्याचे नांव विचारले.त्याने ‘ज्ञाना’ सांगतांच सगळी टवाळखोर कुत्सितपणे हसली.त्यांनी ज्ञानदेवाला डिवचले आणि त्यानंतर जे घडलं ते
न भूतो न भविष्यती!
त्यांच्यातील एका कर्मठ ब्राम्हणाने आसुड हिसकावुन रेड्याच्या पाठीवर मारायला लागला,तर वळ मात्र ज्ञानेशां च्या पाठीवर उठले.कर्मठांचे आव्हान स्विकारुन ज्ञानदेवांनी रेड्याच्या मस्तका वर हात ठेवताच,रेडा स्वच्छ उच्चारांत मनुष्यवाणीत वेद म्हणुं लागला.मग मात्र सर्वांची बोलती बंद झाली.धर्मसभेची मती गुंग झाली.सारं चित्रच बदलले.या घटनेने ज्ञानदेव आणि तीन भावंडांची योग्यता किती महान आहे हे सगळ्यांना कळुन चुकले.जी धर्मसभा या भावंडांची हेटाळणी करीत होती,तीच धर्मसभा या चौघांच्या पायांशी झुकली.धर्मसभेने अत्यंत भक्तीभावाने व आदराने शुध्दी पत्रक देण्याचे ठरविले.
दुसर्या दिवशी पैठणच्या धर्मसभेने पुज्य भावाने आचार्य बोपदेवांच्या नेतृत्वा खाली शुध्दीपत्र तयार करुन या चौघांच्या सुपुर्द केलं.यानंतर पैठण वासीयांच्या आग्रहास्तव तिथं ज्ञानदेवांनी प्रवचन, संकीर्तन केलं.
चौघांचा परतीचा प्रवास सुरु झाला.चौघांची विशेषतः ज्ञानदादांची कीर्ती सगळीकडे पसरल्यामुळे लोकांचे प्रेम,श्रध्दा,आग्रह,आदरतिथ्य याचा त्यांना पदोपदी प्रत्यय येत होता.वाटेतही एक दोन ठीकाणी अघटीत साक्षात्कार लोकांना दाखवावे लागले.नेवाश्याचे सच्चिदानंद कुळकर्णी या मृत व्यक्तीला जिवंत केल्यामुळे तर कीर्तीत आणखीन भर पडली.वेद म्हणणार्या रेड्याने वाटेत आळेगांवी प्राण सोडल्यावर त्याला मुक्ती दिली.
ज्ञानदेवांच्या योगसामर्थ्याची, ते घडवित असलेल्या साक्षात्कारीची कीर्ती चहुकडे पसरल्यामुळे,या भावंडांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोणच बदलला.समाज जसजसा त्यांच्याजवळ येऊ लागला तसे सोपान अंतर्मुख होत गेले.
स्वतःशीच अंतर्द्वंद सुरु झाले.ज्या आळंदीने त्यांचे आईबाबा हिरावुन घेतले, त्यांना अपमान,तिरस्कार,अवहेलना,घृणा दिली,त्याच आळंदीकरांनी त्यांचे भव्य स्वागत केले.आळंदीला आल्यावर त्यांचा पूर्वीचा दिनक्रम सुरु झाला.फक्त दोन गोष्टीत बदल झाला.एक म्हणजे त्यांची माधुकरीची झोळी सुटली व दुसरा बदल संध्याकाळी लोकांना प्रबोधन,कीर्तन, प्रवचनासाठी वेळ राखुन ठेवावा लागला. सोबतच त्यांची ज्ञानसाधनाही सुरु होती. लोकांचा भक्तीभाव,आदर वाढतच होता. आणि सोपान मात्र दिवसेंदिवस अंतःर्मुख होत होते.रेड्यामुखी वेद वदवणं म्हणजे अंतर्गत उर्जेला एकवटुन परकाया प्रवेश करायचा हे हटयोगाचं सामर्थ्य सोपानदेव जाणत होते.आताही सोपानांना तो प्रसंग जसाच्या तसा आठवला.
ज्ञानदादा रेड्यामुखी वेद म्हणवत होते आणि सोपानांना अश्रूपुर्ण नेत्राला काय दिसले,तो आभास नक्कीच नव्हता. धर्मसभेत रेड्याच्या मस्तकावर हात ठेवुन खरं तर ज्ञानदादा उभे होते,पण सोपानांना त्याजागी शंख,चक्र,गदा,पद्म धारण केलेले श्रीविष्णु,त्यांच्या हातातील सुदर्शन चक्र फिरत होतं.चेहर्यावर प्रसन्न हास्य डोळ्यात शांत,स्निग्ध भाव!सोपानांना कधी ज्ञानदादा,तर कधी विष्णु दिसत होते.
क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.
[…] चरित्र २१संत सोपानदेव चरित्र २२संत सोपानदेव चरित्र २३संत सोपानदेव चरित्र २४संत सोपानदेव […]
[…] चरित्र २१संत सोपानदेव चरित्र २२संत सोपानदेव चरित्र २३संत सोपानदेव चरित्र २४संत सोपानदेव […]