वैकुंठ चतुर्दशीचे हरिहरांचे मीलन

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

कार्तिक शु. १४ हा दिवस वैकुंठ चतुर्दशी या नांवानें प्रसिद्ध आहे. या दिवशीं श्रीविष्णु आणि श्रीशंकर यांची भेट झाल्याचें पुराणग्रंथांत नमूद आहे. सनत्कुमार खंडितेत अशी कथा आहे कीं, वैकुंठाहून श्रीविष्णु काशीक्षेत्रीं आला, आणि मणिकर्णिकेत स्नान करुन त्यानें काशीविश्वेश्वरास हजार कमलें वाहण्याचा संकल्प केला; पूजा सुरु असतां शंकरानें एक कमल दूर लोटून दिलें तेव्हां संकल्प पुरा करण्यासाठीं विष्णूनें त्या फुलाऐवजीं आपले नेत्रकमलच अर्पण केले ! विष्णुच्या भक्तीनें शंकर प्रसन्न झाला.

या कथेंतील मर्म ध्यानीं धरणें आवश्यक आहे. भारतांत ऐतिहासिक कालापासून शिव आणि विष्णु या दैवतांच्या उपासकांमध्ये मतभेद निर्माण होऊन द्वेष, मत्सर, आदि दोघांची पुटें त्यावरुन चढूं लागलीं. नंतरच्या काळांत तर वीरशैव वीरवैष्णव, लिंगायत, गाणपत्य, नाथपंथी, महानुभाव, जैन, रामदासी, कापाळी, गोसावी, रामानंदी इत्यादि अनेक संप्रदाय निर्माण होऊन सर्वांच्या मुळाशी असलेला भारतीय संस्कृतीचा धागा लोक विसरुन जात होते. या सर्वं पंथांचें स्वरुप बाह्य दृष्टीनें भिन्न असलें तरी एकजिनसी असणार्या आपल्याच संस्कृतीची ही भिन्न अंगे आहेत, असें पटवून देण्याचे जे कांही उपक्रम झाले, त्यांत वैकुंठ-चतुर्दशीचे स्थान मोठें आहे.

हरि-हरांत फक्त एका वेलांटीचा फरक आहे असाच उपदेश तुकोबांचा आहे. उत्तरेंत वा दक्षिणेंत शैव व वैष्णव यांची भांडणें असलीं तरी महाराष्ट्रांत मात्र त्यांचे नांवहि दिसून येत नाहीं. याचें श्रेय येथें रुढ झालेल्या भागवत धर्मास द्यावयास पाहिजे. या भागवत धर्मानें वारकरी सांप्रदायानें सर्व मतभेद मिटावेले, आणि ‘ज्ञानेश्वर,नामदेव, एकनाथ,तुकाराम’ सांगतात त्याप्रमाणें एकाच विठोबाला शिव. आणि विष्णु यांच्या स्वरुपांत पाहण्यास जनतेस शिकविलें.

त्रिपुरारी पौर्णिमेचा आधी येणारी कार्तिक चतुर्दशी ‘वैकुंठ चतुर्दशी’ म्हणून साजरी केली जाते.या दिवशी रात्री शंकराची १००८ नावे घेऊन आणि विष्णूची सहस्र नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून पूजा केली जाते. या दिवशी विष्णूंची सहस्त्र कमळांनी पूजा करणार्‍याला कुटुंबाला वैकुंठ प्राप्ती होते असे म्हणतात.
महाभारत काळात श्रीकृष्णाने युद्धात ज्यांचा मृत्यू झाला होता त्यांचे श्राद्ध वैकुंठ चतुदर्शीला केले होते. म्हणूनच या दिवशी तर्पण आणि श्राध्द करणे श्रेष्ठ असल्याचे मानले जातं. सद्धगुणी, दिव्य पुरुष आणि सतकर्म करणार्‍यांना वैकुंठ प्राप्ती होते. तरी श्रद्धापूर्वक वैकुंठ चतुर्दशी केल्यास वैकुंठात स्थान मिळण्याची शक्यता वाढते.
वैकुंठ चतुर्दशी महत्त्व –
पौराणिक कथेनुसार, एकदा भगवान विष्णु यांनी काशी येथे महादेवाला एक हजार कमळ वाहण्याचा संकल्प केला होता. यावेळी महादेवाने विष्णुची परिक्षा घेण्यासाठी या कमळातून एक कमळ कमी केले. यावर भगवान विष्णु यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला. विष्णुची ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णुला वर दिला की, कार्तिक मासात येणारी चतुर्दशी ‘वैकुंठ चतुर्दशी’ म्हणून ओळखली जाईल. जो कोणी हे व्रत करील त्याला वैकुंठ प्राप्ती होईल.


या दिवशी भगवान विष्णुची पुजा केली जाते. विष्णुला चंदन, फुलं, दुध, दही या सर्वांनी अंघोळ घातली जाते आणि भगवान विष्णुचा अभिषेक केला जातो. या दिवशी विष्णु नामस्मरण केलं जातं. विष्णुला गोड नैवद्य दाखवला जातो आणि त्यानंतर उपवास सोडला जातो. तसेच या दिवशी विष्णुंसह शिवाची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते.
पुराणानुसार या दिवशी शिवाने प्रभू विष्णुंना सुदर्शन चक्र दिले होते. या दिवशी शिव-विष्णु एकाएक रुपात असतात.


शुभ मुहूर्त
यंदा १८ नोव्हेंबर रोजी वैकुंठ चतुर्दशी आहे.
तिथी आरंभ- १७ नोव्हेंबर सकाळी ९.५० पासून
तिथी समाप्ती- १८ नोव्हेंबर दुपारी १२ वाजेपर्यंत
निशिथ काल आज- रात्री ११ वाजून ५८ मिनिटापासून ते १२ वाजून ४९ मिनिटापर्यंत

कार्तिक शुक्ल चतुर्दशी ही तिथी वैकुंठ चतुर्दशी या नावेही ओळखली जाते. यंदा १८ नोव्हेंबर रोजी वैकुंठ चतुर्दशी आहे. असे म्हणतात, की या तिथीला ब्रह्ममुहूर्तावर भगवान महाविष्णूंनी वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर स्नान केले होते आणि भगवान शंकरांची प्रार्थना केली होती. त्या पूजेने भोलेनाथ एवढे प्रसन्न झाले, की त्यांनी प्रत्यक्ष हरीची भेट घेतली आणि प्रसन्न होऊन वर दिला, की यादिवशी जे विष्णू भक्त किंवा शिव भक्त मनोभावे भगवंताची आळवणी करतील, त्यांना वैकुंठप्राप्त होईल.


मृत्यूनंतर नरकात जावे, असे कोणाला वाटेल? आयुष्यभर हालअपेष्टा सहन केल्यानंतर मृत्यूपश्चात तरी आत्म्याला सद्गती मिळावी, असे प्रत्येकाला वाटते. ती वाट सुकर व्हावी, म्हणून आपण आयुष्यभर चांगले आचरण करतो आणि त्याला आध्यात्मिक जोड मिळावी, म्हणून व्रत-वैकल्य करतो. वैकुंठ चतुर्दशीचे व्रत ही त्यापैकीच एक!
वैकुंठ चतुर्दशीलाच काशी विश्वनाथ स्थापना दिवस असेही म्हणतात. यादिवशी भगवान विष्णू आणि महादेव यांची प्रार्थना केली जाते व षोडशोपचार पूजा करून स्तोत्रपठण केले जाते.
आषाढी एकादशीला भगवान महाविष्णू झोपतात, ते थेट कार्तिकी एकादशीला उठतात, असे म्हटले जाते. विष्णूंच्या अनुपस्थितीत त्यांची वैश्विक जबाबदारी भगवान शंकर सांभाळतात. याबद्दल कृतज्ञता म्हणून विष्णू महादेवाला फळे, फुले आणि बेल वाहतात, तर महादेवदेखील विष्णूंना प्रिय असलेली तुळशी वाहून जागे करतात. हे हरी हर ऐक्य, प्रेम, सद्भावना, एकमेकांप्रती आदर या भेटीतून दिसून येतो. तो आदर्श आपणही डोळ्यासमोर ठेवून आपण दोहोंची उपासना करावी, हा वैकुंठ चर्तुदशी मागील हेतू आहे.


वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरी-हर स्तोत्र म्हणतात. अन्यथा विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात. इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो, परंतु या भेटीचे आगळे वेगळे महत्त्व म्हणून अशी पूजा केली जाते.
देवाधिदेव महादेवांना प्रसन्न केले असता, आपसुक माता पार्वतीदेखील प्रसन्न होते आणि भगवान विष्णूंचे ध्यान केले असता, त्यांच्यासह लक्ष्मी मातेचीही कृपादृष्टी लाभते. त्यामुळे घरातील दु:ख, दारिद्रय नाहीसे होऊन, आयुष्यातील नरक यातना मिटतात आणि जिवंतपणीच वैकुंठप्राप्तीचा आनंद अनुभवता येतो.


स्वर्ग म्हणजे तरी नेमके काय, स्व म्हणजे स्वत: आणि ग म्हणजे सभोवतालचा परिसर. आपण निर्माण केलेले विश्व आणि आपल्या विश्वातील आनंददायी क्षण म्हणजे स्वर्ग. तसेच नरक म्हणजे नराने निर्माण केलेला, तो नरक! वाईट गोष्टी पेरल्या तर फळही वाईटच येते. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले परंतु मानवाने आपल्या हातांनी बरेच काही गमावले. त्यामुळे जी स्थिती निर्माण झाली, तो नरक!
मनुष्यासमोर चांगला आदर्श, चांगले विचार, चांगले आचार असले, की तो ठरवूनही मनात वाईट विचार आणू शकत नाही. यासाठीच चांगल्या कथा-कहाण्यांचे पारायण केले जाते. त्यातून प्रेरणा घेतली जाते. आपण आपले शुल्लक काम दुसऱ्याच्या अंगावर ढकलून मोकळे होतो. इथे तर चार महिन्यांचा ओव्हर टाईम करूनही महादेवांनी कुठलीही तक्रार केली नाही
………..आहे ना कौतुकास्पद?
हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही वैकुंठ चतुर्दशी साजरी करूया….. 🙏🏼

त्रिपुरारी पौर्णिमा

कार्तिक पौर्णिमा हा दिव्यांचा, प्रकाशाचा उत्सव आहे. या पौर्णिमेला देव-दिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा सुद्धा म्हणतात. संपूर्ण भारतात कार्तिकोत्सव कुठे एक दिवस, कुठे ५ दिवस तर कुठे १० दिवस साजरा केला जातो. कार्तिक पौर्णिमेची एक गोष्ट सांगितली जाते, ती अशी –

एकदा ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण अशी चर्चा चालू होती. तेंव्हा शंकराने आपले ज्योती-रूप प्रकट केले. त्याने ब्रह्मा व विष्णूला त्या ज्योतीचा आदी आणि अंत शोधायला पाठवले. ब्रह्मा ज्योतीच्या आकाशाकडचे टोक शोधायला निघाला, तर विष्णू पाताळाकडचे. फार काळ, फार अंतर पार केल्यावर, ब्रह्माला त्या प्रकाशामध्ये तरंगणारे फुल दिसले. ते शिवाच्या जटेतील ३०,००० वर्षांपूर्वी वाहिलेले फुले होते. तेंव्हा ब्रह्माने तोच आरंभ आहे असे मानले. परत येऊन त्याने शंकराला खोटेच सांगितले, की मी तुझ्या ज्योती-रूपाचा आरंभ पहिला! इतक्यात विष्णू पण परत आला. विष्णूने हात जोडून, सत्य सांगितले, “मला काही तुझा अंत लागत नाही!” शंकराने प्रसन्न होऊन विष्णूला वर दिला, “भूलोकी तुझी अनेक मंदिरे बांधून, तुझी पूजा केली जाईल!” आणि ब्रह्माला मात्र शाप दिला, “तुझे मंदिर कोणी बांधणार नाही!” कार्तिक पौर्णिमा त्या अनादी, अनंत ज्योतीचा हा उत्सव आहे.

त्रिपुरी पौर्णिमेला शंकराला शेकडो वातींचा दिवा लावायची प्रथा आहे. तर शिवालायांमधून आज रुद्राभिषेक केला जातो. कार्तिक पौर्णिमेसाठी दिव्यांनी सजलेले तामिळनाडूचे अरुणाचलेश्वर शिव मंदिर. इथे कार्तिक पौर्णिमेचा उत्सव सौर कॅलेंडर प्रमाणे साजरा केला जातो. या उत्सवाला कार्थिकै दिपम् किंवा कार्थिकै ब्रह्मोत्सव सुद्धा म्हणतात.

कार्तिक पौर्णिमेची अजून एक गोष्ट अशी आहे – तारकासुर नावाच्या असुराची. त्याला तीन मुले होती – ताराक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली. त्या तिघांनी एक एक नगरी अर्थात ‘पूर’ वसवले होते. देवासुरांच्या युद्धात शंकराने या असुरांना त्यांच्या तीन पुरांसकट नष्ट केले. तो दिवस होता कार्तिक पौर्णिमेचा. शंकरची म्हणजे ‘तीन पुरांच्या अरीची’ ही ‘त्रिपुरारी’ पौर्णिमा. असुरांच्या जाचातून सुटल्याने आनंदलेल्या देवांनी दिवे लावून दिवाळी साजरी केली! या तारकासुराने ब्रह्माकडून ‘अमर’ होण्याचा वर मागितला होता. ब्रह्मा म्हणाला, “असे काही मी देऊ शकत नाही. तू दुसरे काहीतरी माग.” तेंव्हा त्याने, “मला शिवाच्यापुत्राकडून मृत्यू येवो.” असे मागितले. त्यावेळी सतीने यज्ञकुंडात उडी घेऊन आत्मदहन केले होते. आणि शंकर अत्यंत दु:खी होऊन कित्येक वर्ष समाधी लावून बसले होते. या वराने तारकासुर जवळ जवळ अमर झाल्यासारखाच होता. पुढे पार्वतीची तपश्चर्या, शिव-पार्वती विवाह आणि कार्तिकेयचा जन्म झाला. आणि तारकासुराचा वध कार्तिकेयने केला.

कार्तिकी पौर्णिमेला कार्तिकेयाचे दर्शन घेण्याची पद्धत आहे. राजस्थान मधील पुष्कर येथे एक ब्रह्ममंदिर आहे. या ब्रह्ममंदिरात त्रिपुरी पौर्णिमेला फार मोठा मेळा भरतो. उंट, शेळ्या, मेंढ्या, गायी यांची या मेळ्यात खरेदी-विक्री केली जाते. कार्तिक पौर्णिमेला, पुष्कर सरोवरात दीपदान करायची पद्धत आहे. वाराणसीला गंगेच्या घाटावर हजारो दिवे लावून देव दिवाळी साजरी केली जाते.

देव दिवाळी, गंगा घाट, वाराणसी
शिवाय शिप्रा, नर्मदा, गोमती व इतर अनेक नद्यांमध्ये दीपदान केले जाते. दीपदान करावयाचे दिवे – शास्त्राप्रमाणे गव्हाच्या पिठाचे किंवा मातीचे असावेत. त्यामध्ये तेलाचा नाहीतर तुपाचा दिवा लावावा. असे दिवे नदी प्रदूषित करत नाहीत.
कार्तिकी पौर्णिमेला, महाराष्ट्र, गोवा येथील मंदिरांमधून शेकडो दिवे लावून दीपमाळा प्रज्वलित केली जाते.
ही कार्तिक पौर्णिमा आपले जीवन ज्ञानाच्या, समृद्धीच्या आणि आणि आणंदाच्या प्रकाशाने ऊजळू दे.

कार्तिकस्नान, त्रिपुरारी पौर्णिमा, हरिहर मिलन महात्म्य विधी फळ


संकलन :- अशोककाका कुलकर्णी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *