सप्त चिरंजीव कोण ?…

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

सप्त चिरंजीव कोण ?…माहिती घेऊ.

श्लोक :
‘अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः।
कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः॥’

अर्थात् :
अश्वत्थामा, बलि, व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य व भगवान परशुराम
हे सप्त चिरंजीव म्हणून प्रसिद्ध आहेत. चिरंजीव अर्थात आज सुद्धा जिवंत आहेत.

१. अश्र्वत्थामा,
२. बलि,
३. व्यास,
४. हनुमान,
५. विभीषण,
६. कृप,
७. परशुराम.

१) बली
बली एक पौराणिक असुर राजा व सप्तचिरंजीवांपैकी एक आहे. हा विरोचनाचा पुत्र व भक्त प्रल्हादाचा नातू होय. भक्त प्रल्हादाचे हा आपल्या आजोबाप्रमाणे विष्णूचा भक्त होता. हा अतिशय दानी होता. ह्याच्या पित्याचा इंद्राने कपटाने वध केला. त्याचा सूड म्हणून ह्याने इंद्राशी युद्ध करून त्याला स्वर्गातून हाकलून लावले. पुढे इं‍द्राने विष्णूकडे बलीच्या वधासाठी विनंती केली. विष्णूने वामनावतार घेतला व बलीकडून स्वर्ग आणि पृथ्वीचे राज्य दानाच्या रूपात परत घेऊन बलीचा वध न क‍रता त्याला पाताळात ढकलून दिले. तिथे तो लोकाचा राजा झाला.

पुढील श्लोकातील एक ओळ बलीच्या दानशूरतेबद्दल आहे
श्लोक असा :-
अतिरूपात् हृता सीता | अतिदर्पाच्च रावणः |
अतिदानात् बलिर्बद्धः | अति सर्वत्र वर्जयेत् ||

*२) परशुराम…
परशुराम हे भगवान विष्णूंचा सहावा अवतार समजले जातात. जमदग्नी व रेणुकामाता यांच्या पोटी यांचा जन्म वैशाख शुक्ल तृतीयेला झाला. तयांनी धारिणीशी विवाह केला. ब्राह्मण असून क्षत्रियांचे सर्व गुण यांच्यात होते, म्हणूनच त्यांना “शरादपि शापादपि” असे म्हणतात. भगवान शंकरांकडून त्यांनी परशू हे शस्त्र घेतले आणि अनेक विद्या आत्मसात केल्या. त्याच विद्यांच्या जोरावर त्यांनी दुष्ट आणि प्रजेला जाच करणाऱ्या राजांचा बंदोबस्त केला. त्याच वेळी त्यांनी सहस्रार्जुनाला ठार केले. पुढे राजांना जिंकून ताब्यात घेतलेली जमीन त्यांनी ऋषिकुलाला देऊन ते महेन्द्र पर्वतावर तप करण्यासाठी निघून गेले.


कार्तवीर्याशी लढणार्‍या परशुरामाचा उल्लेख, रामायणात सीता स्वयंवरात येतो. तेथे त्यांनी शिवधनुष्य तोडणार्‍या रामाला आव्हान दिले. मात्र राग शांत झाल्यावर त्यांनी रामाला आपल्याकडील धनुष्य भेट दिले व विद्या दिली. त्यांनी महाभारत काळी, भीष्मांना त्या सगळ्या विद्या दिल्या. नंतर अंबेच्या याचनेवरून त्यांनी भीष्मांशी युद्ध केले. भीष्म हरले पण तरीही त्यांनी अंबेशी लग्न करण्यास नकार दिला.

अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः ।
इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।
अर्थः
चार वेद मुखोद्गत आहेत (संपूर्ण ज्ञान) आणि पाठीवर बाणासह धनुष्य आहे (शौर्य) – म्हणजेच ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज दोन्ही असल्याने शाप अणि शस्त्र अशा दोन्ही गोष्टींचा उपयोग जो जाणतो तो परशुराम.

परशुरामाच्या अवतार कार्य संपल्याचे कोणत्याही ग्रंथात उल्लेख आला नसल्याने परशुराम हे सात चिरंजीव मधील एक आहे समजले जातात.

३) हनुमान
हनुमान रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून तो रामाचा महान भक्त, दास, दूत मानला जातो. त्याचा जन्म अंजनी या वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला होता. तो पवनपुत्र व महाबली होता व त्याला अनेक शक्ती जन्मतःच प्राप्त होत्या. लहानपणी त्याला सूर्याला पकडण्याची इच्छा झाली. म्हणून त्याने सूर्याच्या दिशेने झेप घेतली. ते बघून इंद्रासहित सर्व देवांना काळजी वाटू लागली. सूर्याला व पृथ्वीला वाचविण्यासाठी इंद्राने आपले वज्र हनुमानाच्या दिशेने फेकले. त्या प्रहाराने हनुमान मूर्च्छित झाला. नंतर देवांनी त्याला ‘तुला आपल्या सर्व शक्तींचा विसर पडेल’ असा शाप दिला.



पुढे श्री राम वनवासात असताना त्याची व हनुमानाची भेट झाली व तो रामाचा निस्सीम भक्त बनला. रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा हनुमानाने उड्डाण करून लंका गाठली आणि रामाचा निरोप सीतेकडे पोचवला. रावणाच्या सैनिकांनी त्याला पकडून रावणासमोर उभे केले व त्याच्या शेपटीला आग लावली. तेव्हा त्याने आपल्या शेपटीने पूर्ण लंकेला आग लावली आणि परत जाऊन सीतेचे वर्तमान रामास कळवले. रामाने आपली वानरसेना लंकेला नेली आणि रावणाशी युद्ध केले. या युद्धात हनुमानाने रामाला मोठी मदत केली. जेव्हा लक्ष्मण बाण लागून बेशुद्ध पडला होता, तेव्हा त्याच्या उपचारांसाठी हनुमानाने हिमालयात झेप घेतली आणि द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. त्या पर्वतावर आढळणाऱ्या संजीवनी नावाच्या वनौषधीने लक्ष्मण परत शुद्धीवर आला व त्याचे प्राण वाचले. हनुमान हे चिरंजीव आहेत म्हणजे ते अजूनही जिवंत आहेत, अशी मान्यता आहे. जगात ज्या ज्या ठिकाणी, जेव्हा जेव्हा रामाचे नाव घेतले जाते तेथे मारुती हजर असतो, असे म्हणतात.

मारुतीचा उल्लेख महाभारतात देखील येतो. तो महाभारत युद्धदरम्यान अर्जुनाच्या ध्वजावर बसून होता.

जन्मतिथी

चैत्र पौर्णिमेला मारुतीचा जन्म झाला असे महाराष्ट्रात मानले जाते, त्यामुळे त्यादिवशी हनुमान जयंती साजरी हॊतॆ.
हनुमानाचा जन्म नरक चतुर्दशीच्या दिवशी झाला असे उत्तर भारतात समजले जाते. या दिवशी महाराष्ट्रात आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि उत्तर भारतात कार्तिक कृष्ण चतुर्दशी असते.

४) विभीषण

विभीषण (बिभीषण) हा लंकापती रावणाचा धाकटा भाऊ होता. त्याने अधर्म नीतीच्या विरोधात सुरू असलेल्या राम-रावण युद्धामध्ये रामाला मदत केली. बिभीषणाच्या मृुत्यूचा कोणत्याही ग्रंथात उल्लेख न आल्याने बिभीषण चिरंजीव (अमर) समजला जातो.

५) पाराशर व्यास

पराशर ऋषींचे पुत्र महर्षी व्यास यांनी महाभारत या महाकाव्याची रचना केली. त्यांना कृष्णद्वैपायन व्यास असेही म्हणतात, आणि ते सप्तचिरंजीवांतील एक असल्याचे मानले जाते.

६) कृपाचार्य

कृपाचार्य हे महाभारतातील हस्तिनापूर राज्याचे कुलगुरू होते. त्यामुळे ते कौरव-पांडवांचे अाद्य गुरू होते. नंतरचे गुरू द्रोणाचार्य. कृपाचार्यांच्या मृत्यूचा उल्लेख कोणत्याही ग्रंथात न आल्याने त्यांना चिरंजीव (अमर) समजले जाते.

७) अश्वत्थामा

अश्वत्थामा हा कौरव-पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांचा पुत्र. याच्या कपाळावर जन्मापासूनच एक मणी होता. अश्वत्थामा हाही द्रोणाचार्यांचा शिष्य असल्याने तो अर्जुनाप्रमाणेच शस्त्र आणि अस्त्र विद्येत पारंगत असून तेजस्वी आणि दिव्य शक्तींचा उपयोग करण्यात निपुण होता.



कौरव-पांडवांच्या युद्धात द्रोणाचार्यांनी कौरवांचे सेनापतीपद स्वीकारल्यानंतर पांडवसेनेवर त्यांनी तिखट हल्ला चालू केला. पांडवांची बाजू मार खाऊ लागली. द्रोणाचार्य यांचा आपल्या मुलात अतिशय जीव आहे हे श्रीकृष्णाला ठाऊक असते. अश्वत्थामा मेला असे जर द्रोणाचार्यांना पटवून देता आले तर ते दिङ्‌मूढ होतील आणि युद्ध करण्याची इच्छा त्यांना राहणार नाही असा श्रीकृष्णाचा तर्क होता. द्रोणाचार्यांना शस्त्र खाली ठेवायला लावायचा हाच एक उपाय आहे हे कृष्णाने युधिष्ठिराला पटवून दिले. तेंव्हा भीमाद्वारे अश्वत्थामा नावाच्या एका हत्तीचा वध घडवून कृष्णाने ‘अश्वत्थामा मेला’ अशी आवई उठवली. रणधुमाळीत सत्य कोण सांगेल असा प्रश्न द्रोणाचार्यांना पडला. तेंव्हा सर्वात विश्वसनीय सत्यवादी मनुष्य म्हणून त्यांनी युधिष्ठिराला विचारले की खरेच अश्वत्थामा मेला काय? परंतु कृष्णाच्या सांगण्यावरून युधिष्ठिराने स्पष्ट काही न सांगता “अश्वत्थामा मेला खरा, पण ‘नरो वा कुंजरो वा'” असे उत्तर दिले. त्या वाक्यातला ’अश्वत्थामा मेला’ एवढेच शब्द ऐकून, मानसिक धक्का बसलेले द्रोणाचार्य यांनी शस्त्र खाली ठेवले. दृष्टद्युम्नाने याचा फायदा उचलत त्यांचा वध केला.

पुढे अश्वत्थाम्यानेही दृष्टद्युम्नाचा वध करून आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतला.



अश्वत्थाम्याने महाभारत युद्धात कौरवांचा शेवटचा सेनापती म्हणून काम पहिले. युद्ध संपल्यावर आणि दुर्योधन मृत्यू पंथास लागला असतांना अश्वत्थाम्याने त्याला “पांडवांची शिरे कापून आणतो” असे आश्वासन दिले. परंतु अंधार असल्याने त्याला पाच पांडवपुत्रांचीच मुंडकी आणणे शक्य झाले. आपला निर्वंश झाला हे पाहून संतप्त पांडव अश्वत्थाम्याला त्याला शोधत आले. अर्जुन व अश्वत्थामा दोघे एकमेकांवर ब्रह्मास्त्र फेकतात. यामुळे सृष्टीचा विनाश होऊ नये म्हणून कृष्ण दोघांना आपापले ब्रह्मास्त्र परत घ्यायला सांगतो. परंतु अश्वत्थाम्याला अस्त्र परत घेण्याची कला माहीत नसल्यामुळे तो अभिमन्यूची पत्‍नी उत्तरेच्या गर्भात ते सोडतो. यावर क्रोधित होऊन कृष्ण त्याच्या कपाळावरचा दिव्य मणी काढून घेतो आणि त्याला शाप देतो की कल्पकल्पांतापर्यंत ही जखम कपाळी घेऊन, तू जखमेवर लावण्यासाठी तेल मागत दारोदार फिरशील. आणि कपाळी जखम घेऊन आजही तो तेल मागत वणवण फिरतो असे मानले जाते.

अश्वत्थामा हा अमर झाल्यामुळे तो सप्तचिरंजीवांमध्ये गणला जातो.
🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
सौजन्य :- श्री अवधूत उंडे
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *