सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा ओवी ७६ ते १०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

76-7
उदोअस्ताचे लोंढे । पाडीत जन्ममृत्यूचे चोंढे । जेथ पांचभौतिक बुडबुडे । होती जाती ॥76॥
उदय आणि अस्त यांच्या लोंढ्यांनी जन्ममरणांचे धोंडे पडुन त्या ठिकाणी पंचमहाभुतात्मक शरीररुप बुडबुडे उत्पन्न होतात व लय पावतात.
77-7
सम्मोह विभ्रम मासे । गिळिताती धैर्याचीं आविषें । तेथ देव्हडे भोंवत वळसे । अज्ञानाचे ॥77॥
जिच्यांत मोह व भ्रांती हे मासे धैर्यरूप मांस गिळून टाकतात; त्या ठिकाणी अज्ञानरूपी मोठे भोवरे भोवती फिरत असतात;
78-7
भ्रांतीचेनि खडुळें । रेवलें आस्थेचें अवगाळें । रजोगुणाचेनि खळाळें । स्वर्गु गाजे ॥78॥
भ्रांतिरूप गढूळ पाण्याने आस्थारूप गाळांत रुतून तमोरुपी खळखळाटाने स्वर्गप्राप्तीची गर्जना होत असते;
79-7
तमाचे धारसे वाड । सत्त्वाचें स्थिरपण जाड । किंबहुना हे दुवाड । मायानदी ॥79॥
(असा हा) तमोरुपी प्रवाह तरुन जाण्यास अवघड आहे; (येथे) सत्वरुपी स्थिर पाण्याचा मोठा डोह आहे; किंबहुना ही मायानदी दुस्तर आहे.
80-7
पैं पुनरावृत्तीचेनि उभडें । झळंबती सत्यलोकींचे हुडे । घायें गडबडती धोंडे । ब्रह्मगोळकाचे ॥80॥
खरोखर हीमधील जन्ममृत्युच्या पुराच्या लोंढ्यांत सत्यलोकाचे किल्ले वाहून जातात, आणि ब्रह्मांडगोलाचे धोंडे तेव्हाच गडबडत जातात.


81-7
तया पाणियाचेनि वहिलेपणें । अझुनी न धरती वोेभाणें । ऐसा मायापूर हा कवणें । तरिजेल गा ॥81॥
त्या पुराच्या प्रवाहांत अजुन कोणाचे पाय लागत नाहीत! अरे, असा हा मायापूर कोणाच्याने तरून जाववेल
82-7
येथ एक नवलावो । जो जो कीजे तरणोपावो । तो तो अपावो । होय तें ऐक ॥82॥
आणखी येथे एक मोठेच नवल आहे; ही नदी तरून जाण्याला जे जे उपाय करावे, ते ते अपायकारकच होतात!
83-7
एक स्वयंबुद्धीचां बाहीं । रिगाले तयांची शुद्धीचि नाहीं । एक जाणिवेचां डोहीं । गर्वेंचि गिळिले ॥83॥
कोणी आपल्या बुद्धीच्या बळावर (हीमधून तरून जावे म्हणून) हिजमध्ये उडी टाकली, त्यांचा पत्ताच नाही; कोणाला ज्ञानरुपी डोहांत गर्वाने पार गिळून टाकले;
84-7
एकीं वेदत्रयाचिया सांगडी । घेतलिया अहंभावाचिया धोंडी । ते मदमीनाचां तोंडीं । सगळेचि गेले ॥84॥
कोणी वेदत्रयीच्या सांगडीवर बसून तिच्याखाली मीपनाचे धोंडे बांधून या मायारुप नदीतुन तरून जाण्यास निघाले. ते मदरूपी माशाच्या तोंडात सबंधच नाहीतसे झाले,
85-7
एकीं वयसेचें जाड बांधलें । मग मन्मथाचिये कांसे लागले । ते विषयमगरीं सांडिले । चघळूनियां ॥85॥
कोणी तारुण्याच्या बळाने कमर कसुन मदनाच्या कासेला लागले, तो त्यांना विषयरूप सुसरीनेच चघळुन टाकिले.


86-7
आतां वृद्धाप्याचिया तरंगा- । माजीं मतिभ्रंशाचा जरंगा । तेणें कवळिजताति पैं गा । चहूंकडे ॥86 ।
मग ते वार्धक्यरुप लाटांमध्ये तरंगत जात असतां मतिभ्रंशरूप जाळ्यांत सांपडतात, व त्यायोगे चहुंकडून जखडले जाऊन शोकरूप कड्यावर आदळतात,
87-7
आणि शोकाचां कडा उपडत । क्रोधाचां आवर्तीं दाटत । आपदागिधीं चुंबिजत । उधवला ठायीं ॥87 ॥
पुढे क्रोधरूपी भोंवऱ्यांत सांपडले असतां कोठे वर डोके करावयास लागले, की आपत्तिरूप गिधाडें त्यांस टोचटोचुन खाऊ लागतात;
88-7
मग दु:खाचेनि बरबटें बोंबले । पाठीं मरणाचे रेवें रेवले । ऐसेकामाचिये कांसे लागले । ते गेले वायां ॥88॥
आणि मग ते दुःखरूप चिखलात फसुन मरणरूप वाळुंत रुतले जातात! अशाप्रकारे जे विषयाच्या मागे लागले ते फुकट जातात. (त्यांचे जिणे व्यर्थ होते)
89-7
एकीं यजनक्रियेची पेटी । बांधोनि घातली पोटीं । तें स्वर्गसुखाचां कपाटीं । शिरकोनि ठेले ॥89॥
कोणी यज्ञादिक क्रियारुपी पेटी बांधूंन पोटाखाली घेतात; ते स्वर्गसुखरूपी कपारींत अडकुन राहतात.
90-7
एकीं मोक्षीं लागावयाचिया आशा । केला कर्मबाह्यांचा भरंवसा । परी ते पडिले वळसां । विधिनिषेधांचां ॥90॥
कोणी मोक्षप्राप्तीच्या आशेने कर्मरुप बाहुबलावर भरंवसा ठेवतात; परंतु कर्तव्याकर्तव्यांच्या वळणांत पडतात.

91-7
जेथ वैराग्याची नाव न रिगे । विवेकाचा तागा नलगे । वरी कांही तरों ये योगें । तरी विपाये तो ॥91॥
त्या नदीमध्ये वैराग्यरूप नाव चालत नाही, व विवेकरूप काठी टेंकत नाही. तथापि योगाने तरतां येईल. परंतु असे क्वचित् घडून येते.
92-7
ऐसें जीवाचिये आंगवणें । इये मायानदीचें उतरणें । हें कासयासारिखें बोलणें । म्हणावें पां ॥92॥
अशाप्रकारे, जीवाच्या अंगबळाने ह्या मायारुप नदीतून तरून जातां येते हे म्हणणे कशासारखे आहे म्हणावे, ते सांगतो.
93-7
जरी अपथ्यशीळा व्याधी । कळे साधूसि दुर्जनाची बुद्धी । कीं रागी सांडी रिद्धी । आली सांती ॥93॥
जर पथ्य न करणाराची व्याधि टळेल, साधूला दुर्जनाची बुद्धि कळेल, किंवा विषयासक्त पुरुष सिद्धि प्राप्त झाली असता तिला सोडील;
94-7
जरी चोरा सभा दाटे । अथवा मीना गळु घोटे । ना तरी भेडा उलटे । विवसी जरी ॥94॥
जर चोरांची सभा भरेल, अथवा माशाला गळ गिळितां येईल, किंवा भित्र्याला भिऊन पिशाच माघारे फिरेल.
95-7
पाडस वागुर करांडी । जरी मुंगी मेरु वोलांडी । तरी मायेची पैलथडी । देखती जीव ॥95॥
जर हरणाचे पाडस जाळे कुरतुडील, किंवा मुंगी मेरु पर्वत ओलांडील, तरच जीवांना (आपल्या स्वतःच्या शहाणपणाने) मायानदी तरुन पलीकडल्या तीरी जाता येईल!


96-7
म्हणऊन गा पंडुसता । जैसी सकामा न जिणवेचि वनिता । तैसी मायामय हे सरिता । न तरवे जीवां ॥96॥
म्हणून, हे पंडुसुता, ज्याप्रमाणे विषयी पुरुषाला स्त्री जिंकवत नाही, त्याप्रमाणे ही मायारुप नदी जीवाला तरवत नाही.
97-4
येथ एकचि लीला तरले । जे सर्वभावें मज भजले । तयां ऐलीच थडीये सरलें । मायाजळ ॥97॥
येथे जे मला अनन्यभावाने शरण येतात, ते फक्त ह्या दुस्तर नदीतून सहज तरून जातात. इतकेच नव्हे, तर ते अलीकडच्या कांठी असतांनाच मायारुप जल पार नाहींसे होते.
98-7
जयां सद्गुरु तारूं पुढे । जे अनुभवाचे कासे गाढे । जयां आत्मनिवेदनतरांडें । आकळलें ॥98॥
ज्यांना सद्गुरू हाच नावाडी असुन ज्यांनी ब्रह्माची कांस बळकट धरली आहे, व ज्यांना आत्मनिवेदन हेंच तारूं सापडले आहे;
99-7
जे अहंभावाचें ओझें सांडूनि । विकल्पाचिया झुळका चुकाऊनि । अनुरागाचा निरुता होऊनि । पाणिढाळु ॥99॥
जे अहंभावाचे ओझे टाकुन, विकल्परूपी वारा चुकवून, आणि बायकामुलांच्यावरील अनुरागरूपी पाण्याची धार टाळून,
100-7
जया ऐक्याचिया उतारा । बोधाचा जोडला तारा । मग निवृत्तीचिया पैलतीरा । झेंपावले जे ॥100॥
ते जीवात्म्यांचे ऐक्य हाच उतार त्या उताराने बोधरूपी सांगडीच्या आश्रयाने निवृत्तीच्या पलीकडील कांठाला जाऊन पोहोचतात,

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *