सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी २७६ ते ३०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

276-15
तेथही उपाधीचा वोथंबा । घेऊनि श्रुति उभविती जिभा । मग नामरूपाचा वडंबा । करिती वायां ॥276॥
त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देखील माया-उपाधीचा आश्रय घेऊन आत्मस्वरूपाचे वर्णन करण्यास तयार होतात आणि मग त्या ठिकाणी नामरूपाचा व्यर्थ गलबला करतात.
277-15
पैं भवस्वर्गा उबगले । मुमुक्षु योगज्ञाना वळघले । पुढती न यों इया निगाले । पैजा जेथ ॥277॥
संसार व स्वर्ग यांना कंटाळलेले व योग (अष्टांग योग) व ज्ञान यांचा आश्रय घेतलेले मुमुक्षु लोक पुन्हा स्वर्ग व संसार यांच्याकडे येणार नाही, अशा प्रतिज्ञेने ज्या आत्मस्वरूपाकडे जाण्य़ास निघाले.
278-15
संसाराचिया पायां पुढां । पळती वीतराग होडा । ओलांडोनि ब्रह्मपदाचा कर्मकडा । घालिती मागां ॥278॥
ते वैराग्यशील पुरुष (संसार त्यांचा पाठलाग करीत असतांना) त्या संसाराच्या पायापुढे प्रतिज्ञेने पळतात व कर्माचा शेवट जे ब्रह्मपद (सत्यलोक) हाच कोणी कडा त्या कड्याचे उल्लंघन करून त्यास मागे टाकतात,
279-15
अहंतादिभावां आपुलियां । झाडा देऊनि आघवेया । पत्र घेती ज्ञानिये जया । मूळघरासी ॥279॥
आपल्या अहंकारादि सर्व अनात्मवृत्तींचा झाडा देऊन ज्या मूळच्या आत्मस्वरूपी घरास जाण्याकरता ज्ञानी लोक दाखला घेतात.
280-15
पैं जेथुनी हे एवढी । विश्वपरंपरेची वेलांडी । वाढती आशा जैशी कोरडी । निदैवाची ॥280॥
ज्या वस्तूच्या अज्ञानाने, जगाचे विपरीत असलेले जबरदस्त मिथ्या ज्ञान उत्पन्न केले आणि ज्या वस्तूच्या अज्ञानाने नसलेले मीतूपण जगात प्रचारात आणले.

281-15
जिये कां वस्तूचें नेणणें । आणिलें थोर जगा जाणणें । नाहीं तें नांदविलें जेणें । मी तूं जगीं ॥281॥
ज्याप्रमाणे निर्दैवी पुरुषाची पोकळ आशा वाढत असते, त्याप्रमाणे ज्या स्वरूपापासून विश्वपरंपरेच्या विस्ताराची एवढी वाढ होते.
282-15
पार्था तें वस्तु पहिलें । आपणपें आपुलें । पाहिजे जैसें हिंवलें । हिंव हिंवें ॥282॥
अर्जुना, ती आपली पहिली वस्तू (आपले मूळ आत्मस्वरूप) आपण आपल्याच ठिकाणी पहावी. ती कशी तर जसे थंडीने थंडी व्हावी, त्याप्रमाणे (अभिप्राय असा की या हिंवाच्या (थंडीच्या) दृष्टांतात त्रिपुटी जशी एक आहे असे समजणे, हेच आपण आपल्या मूळ स्वरूपाला पहाणे होय).
283-15
आणीकही एक तया । वोळखण असे धनंजया । तरी जया कां भेटलिया । येणेंचि नाहीं ॥283॥
अर्जुना, त्याला (आत्मवस्तूला) ओळखण्याची आणखी एक खूण आहे, ती ही की ज्याच्याशी ऐक्य झाले असता पुनर्जन्मच प्राप्त होत नाही.
284-15
परी तया भेटती ऐसें । जे ज्ञानें सर्वत्र सरिसे । महाप्रळयांबूचे जैसें । भरलेपण ॥284॥
परंतु महाप्रळयकाळच्या पाण्याने जसे सर्वत्र सारखे भरलेपण असते, तसे ज्ञानाने ज्यांचा आत्मभाव सर्वत्र सारखा पसरलेला असतो. असे जे पुरुष ते त्या आत्मवस्तूला भेटतात.
निर्मानमोहा जितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः ।
द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् ॥15.5॥

क्ष्लोकार्थ :- मोहमानरहित, संगरूपी दोष जिंकलेले आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्यांची नित्य स्थिती आहे असे सर्व काम पूर्णपणे निवृत्त झालेले, सुख व दु:खनामक द्वंद्वापासून मुक्त झालेले असे ज्ञानी ते अच्युत पद पावतात.
(आत्मस्वरूपात कोण मिसळतात?
285-15
जया पुरुषांचें कां मन । सांडोनि गेलें मोह मान । वर्षांतीं जैसें घन । आकाशातें ॥285॥
वर्षा ऋतूच्या शेवटी ढग आकाशाला टाकून जातात, त्याप्रमाणे ज्या पुरुषांच्या मनाला मोह व मान आपण स्वत: टाकून गेले.

286-15
निकवड्या निष्ठुरा । उबगिजे जेवीं सोयरा । तैसें नागवती विकारां । वेटाळूं जे ॥286॥
ज्याप्रमाणे दरिद्री व निर्दय अशा पुरुषाला त्याचे नातलग कंटाळतात, त्याप्रमाणे जे पुरुष विकारांच्या तावडीत सापडत नाहीत.
287-15
फळली केळी उन्मूळे । तैसी आत्मलाभें प्रबळे । तयाची क्रिया ढाळेंढाळें । गळती आहे ॥287॥
ज्याप्रमाणे फळे आलेले केळीचे झाड आपोआप उपटून पडते, त्याप्रमाणे प्रबल आत्मलाभामुळे (आत्मानुभावामुळे ज्यांची प्रतिक्रिया हळू हळू (आपोआप) सुटत आहे.
288-15
आगी लगलिया रुखीं । देखोनि सैरा पळती पक्षी । तैसें सांडिलें अशेखीं । विकल्पीं जे ॥288॥
ज्याप्रमाणे वृक्षाला आग लागली असे पाहून (त्या वृक्षावर असलेले पक्षी) जिकडे रस्ता सापडेल तिकडे पळतात, त्याप्रमाणे सर्व विकल्पांनी ज्या पुरुषास टाकले.
289-15
आइकें सकळ दोषतृणीं । अंकुरिजती जिये मेदिनी । तिये भेदबुद्धीची काहाणी । नाहीं जयातें ॥289॥
अर्जुना, ऐक. ज्या भेदरूपी जमिनीवर सर्व प्रकारचे दोषरूपी गवत वाढते, त्या भेदबुद्धीची ज्यांच्या ठिकाणी वार्ताही नसते.
290-15
सूर्योदयासरिसी । रात्री पळोनि जाय अपैसी । गेली देहअहंता तैसी । अविद्येसवें ॥290॥
सूर्योदयाबरोबर ज्याप्रमाणे रात्र आपोआप पळून जाते, त्याप्रमाणे ज्या पुरुषापासून अविद्येसह देहाहंता पळून गेली.

291-15
पैं आयुष्यहीना जीवातें । शरीर सांडी जेवीं अवचितें । तेवीं निदसुरें द्वैतें । सांडिले जे ॥ 291 ॥
किंवा आयुष्य संपलेल्या जीवालां शरीर ज्याप्रमाणे अवचित सोडतो, त्याप्रमाणे अविद्यात्मक द्वैतानें ज्यांना एकदम सोडले आहे.
292-15
लोहाचें साम्कडें परिसा । न जोडे अंधारु रवि जैसा । द्वैतबुद्धीचा तैसा । सदा दुकाळ जया ॥ 292 ॥
परिसाला लोखंडाचा सदा दुष्काळ, सूर्याला जसे अंधाराचे दर्शन नाही, तसा ज्याच्या बुद्धींत द्वैताचा सदा दुष्काळ म्हणजे कधी उदयच नाहीं. 92
293-15
अगा सुखदुःखाकारें । द्वंद्वें देहीं जियें गोचरें । तियें जयां कां समोरें । होतीचिना ॥ 293 ॥
अर्जुना, देहाच्या ठायी अनुभवाला येणारी जी सुखदुःखादि द्वंद्वे तीं ज्याच्या समोर येतच नाहींत 93
294-15
स्वप्नींचें राज्य कां मरण । नोहे हर्षशोकांसि कारण । उपवढलिया जाण । जियापरी ॥ 294 ॥
स्वप्नांत मिळालेले राज्य किंवा आलेले मरण हे जसे जागृतींत हर्षशोकाला कारण होत नाही. 94
295-15
तैसे सुखदुःखरूपीं । द्वंद्वीं जे पुण्यपापीं । न घेपिजती सर्पीं । गरुड जैसें ॥ 295
गरुड जसे सर्पाकडून धरले जात नाहीत, त्याप्रमाणे, सुखदुःख व पापपुण्यादि द्वंद्वांकडून ज्यांना धक्का पोचू शकत नाही. 95 ॥


296-15
आणि अनात्मवर्गनीर । सांडूनि आत्मरसाचें क्षीर । चरताति जे सविचार । राजहंसु ॥ 296 ॥
आणि, (सत्य व अनृत ह्यांच्या मिश्रणाने उद्भवलेल्या जगद्व्यवहारातील) अनृत म्हणजे अनात्मवर्णरूप पाणी टाकून, जे विचारी ज्ञानी, राजहंसाप्रमाणे सत्य म्हणजे आत्मरसरूप दुग्ध सेवन करतात.96
297-15
जैसा वर्षोनि भूतळीं । आपला रसु अंशुमाळी । मागौता आणी रश्मिजाळीं । बिंबासीचि ॥ 297 ॥
सूर्य, आपला रस, म्हणजे तेजाचे कार्य जें पाणी, त्याचा पृथ्वीवर वर्षाव करून, पुन्हां ते पाणी किरणद्वारा आपल्या ठिकाणी जसे आकर्षण करून घेतो. 97
298-15
तैसें आत्मभ्रांतीसाठीं । वस्तु विखुरली बारावाटीं । ते एकवटिती ज्ञानदृष्टी । अखंड जे ॥ 298 ॥
त्याप्रमाणे, जें सर्वाधिष्ठान आत्मरूप, तद्विषयक भ्रांतीमुळे किंवा अनोळखी मुळे, अनेक अनात्मवस्तुरूपाने पसरलेले आहे ते, ज्यांची अखंड यथार्थ- ज्ञानदृष्टि आहे त्यांच्या दृष्टीनें एकरूपाला येते. (म्हणजे त्याच्या ठिकाणीं कल्पिलेले अनंतत्व जाऊन ” सर्व खल्विदं ब्रह्म ” असें अनुभवास येते.) 98
299-15
किंबहुना आत्मयाचा । निर्धारीं विवेकु जयांचा । बुडाला वोघु गंगेचा । सिंधूमाजीं जैसा ॥ 299 ॥
किंबहुना, गंगेचा ओघ सागरांत जसा सागररूप होतो, तसा आत्मनिर्धारविषयक ज्यांचा विवेकही आत्मरूपच होतो. 99
300-15
पैं आघवेंचि आपुलेंपणें । नुरेचि जया अभिलाषणें । जैसें येथूनि पऱ्हां जाणें । आकाशा नाहीं ॥ 300 ॥
आणि, सर्वव्यापक आकाशाला जसे अलीकडे किंवा पलीकडे जाणे संभवत नाही, त्याप्रमाणे, सर्वात्मभावामुळे त्याने अभिलाष (इच्छा ) धरावा अशी दुसरी वस्तूच उरत नाही. 300

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 15th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Pandharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *