सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ९७६ ते १००० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, , , , , , ,

976-13
ऐसेनि संतासंतें । कर्में प्रकृतीस्तव होतें । तयापासोनि निर्वाळे ते । सुखदुःख गा ॥976॥
अरे, याप्रमाणे बरीवाईट कर्मे प्रकृतिपासून होतात. मग त्या कर्मापासून जे उत्पन्न होते ते सुखदु:ख होय.
977-13
असंतीं दुःख उपजे । सत्कर्मीं सुख निफजे । तया दोहींचा बोलिजे । भोगु पुरुषा ॥977॥
वाईट कर्मापासून दु:ख उत्पन्न होते व सत्कर्मापासून सुख उत्पन्न होते व त्या दोहींचा (सुखदु:खाचा) भोग पुरुषाला होतो असे म्हणतात.
978-13
सुखदुःखें जंववरी । निफजती साचोकारीं । तंव प्रकृति उद्यमु करी । पुरुषु भोगी ॥978॥
सुख दु:ख जोपर्यंत खरोखर उत्पन्न होतात, तोपर्यंत प्रकृति व्यापार करते व पुरुष भोगतो.
979-13
प्रकृतिपुरुषांची कुळवाडी । सांगतां असंगडी । जे अंबुली जोडी । आंबुला खाय ॥979॥
प्रकृतिपुरुषांचा व्यवहार सांगावयास लागले असता तो अघटित आहे. कारण की या व्यवहारात स्त्री मिळवते व नवरा आयते खातो.
980-13
आंबुला आंबुलिये । संगती ना सोये । कीं आंबुली जग विये । चोज ऐके ॥980॥
या प्रकृति-पुरुषरूप नवराबायकोचा संबंध नसतो व त्यांच्यात मेळही नसतो. परंतु बायको (प्रकृति) जग प्रसवते हे आश्चर्य नाही का?
पुरुषः प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान्गुणान् ।
कारणं गुण संगोऽस्य सदसद्योनिजन्मसु ॥13.21॥

भावार्थ प्रकृतीचे ठिकाणी स्थित असलेला (प्रकृतिपरतंत्र झालेला) पुरुष प्रकृतीच्या गुणांचा भोग घेतो व हा गुणसंयोगच त्याच्या चांगल्या वाईट जन्मांना कारण हो य ॥13-21॥
पुरुष वर्णन

981-13
जे अनंगु तो पेंधा । निकवडा नुसधा । जीर्णु अतिवृद्धा- । पासोनि वृद्धु ॥13-98॥
कारण की तो पुरुष अंगहीन (निराकार), पांगळा, द्रव्यहीन, एकटा, जुनापुराणा, अती म्हातार्‍यांपेक्षा म्हातारा आहे.
982-13
तया आडनांव पुरुषु । एऱ्हवीं स्त्री ना नपुंसकु । किंबहुना एकु । निश्चयो नाहीं ॥982॥
त्याला पुरुष हे आडनाव आहे. वास्तविक विचार करून पाहिले तर तो स्त्रीही नाही अथवा नंपुसकही नाही. फार काय सांगावे? अमूक एक तो आहे असा त्याच्याबद्दल काही एक निश्चय करता येत नाही.
983-13
तो अचक्षु अश्रवणु । अहस्तु अचरणु । रूप ना वर्णु । नाम आथी ॥983॥
त्याला डोळे, कान, हात, पाय, रूप, रंग व नाव हे काही नाही.
984-13
अर्जुना कांहींचि जेथ नाहीं । तो प्रकृतीचा भर्ता पाहीं । कीं भोगणें ऐसयाही । सुखदुःखांचें ॥984॥
अर्जुना, ज्याच्या ठिकाणी काहीच नाही, तो प्रकृतीचा नवरा आहे, असे समज. पण अशा नवर्‍यास (पुरुषासही) सुखदु:खे भोगावी लागतात.
985-13
तो तरी अकर्ता । उदासु अभोक्ता । परी इया पतिव्रता । भोगविजे ॥985॥
(प्रकृती वर्णन)
तो पुरुष तर अकर्ता, प्रीतिद्वेषशून्य व अभोक्ता आहे, परंतु ही प्रकृती त्याला भोगावयाला लावते.

986-13
जियेतें अळुमाळु । रूपागुणाचा चाळढाळु । ते भलतैसाही खेळु । लेखा आणी ॥986॥
ज्या स्त्रीला आपल्या रूपाची व गुणांची थोडीशी हालचाल करता येते, आपल्या रूपाने व गुणाने कोणत्याही पुरुषास मोहित करता येते, ती स्त्री वाटेल तो खेळ आकाराला आणते, म्हणजे न घडणार्‍या गोष्टी घडविते.
987-13
मा इये प्रकृती तंव । गुणमयी हेंचि नांव । किंबहुना सावेव । गुण तेचि हे ॥987॥
मग या प्रकृतीला तर गुणमयी हेच नाव आहे, फार काय सांगावे? प्रकृती म्हणजे मूर्तिमंत गुणच होत.
988-13
हे प्रतिक्षणीं नित्य नवी । रूपा गुणाचीच आघवी । जडातेंही माजवी । इयेचा माजु ॥988॥
ही प्रकृती क्षणोक्षणी नित्य नवे रूप धारण करणारी आहे व ही सर्व रूपानेच भरलेली आहे आणि हिचा उन्मत्तपणा जडालाही उन्मत्त करतो. (म्हणजे जडाला हालचाल करावयास लावतो).
989-13
नामें इयें प्रसिद्धें । स्नेहो इया स्निग्धें । इंद्रियें प्रबुद्धें । इयेचेनि ॥989॥
हिच्यामुळे नाममात्र प्रसिद्धीला आले व स्नेह हिच्यामुळे प्रेमळ आहे व हिच्यामुळे इंद्रिये आपापल्या कामात तरबेज आहेत.
990-13
कायि मन हें नपुंसक । कीं ते भोगवी तिन्ही लोक । ऐसें ऐसें अलौकिक । करणें इयेचें ॥990॥
मन हे नंपुसक नाही काय? पण ही प्रकृती त्याला सर्व त्रैलोक्यातील भोग भोगवते. याप्रमाणे या प्रकृतीची सर्वच कृती चमत्कारिक आहे.

991-13
हे भ्रमाचे महाद्वीप । व्याप्तीचें रूप । विकार उमप । इया केले ॥991॥
ही प्रकृती भ्रमाचे मोठे बेट आहे व मूर्तिमंत व्यापकपणाच आहे आणि हिनेच विकार असंख्य केले आहेत.
992-13
हे कामाची मांडवी । हे मोहवनींची माधवी । इये प्रसिद्धचि दैवी । माया हे नाम ॥992॥
ही प्रकृती कामरूपी वेलाचा मांडव (आधार) आहे व ही मोहरूपी वनातील वसंतऋतु आहे व हिला दैवीमाया हे नाव प्रसिद्धच आहे.
993-13
हे वाङ्मयाची वाढी । हे साकारपणाची जोडी । प्रपंचाची धाडी । अभंग हे ॥993॥
ही शब्दसृष्टीची वृद्धी आहे, ही साकारपणाची प्राप्ती आहे व ही प्रपंचाची न भंगणारी धाडी (हल्ला) आहे.
994-13
कळा एथुनि जालिया । विद्या इयेच्या केलिया । इच्छा ज्ञान क्रिया । वियाली हे ॥994॥
सर्व कला येथूनच झाल्या आहेत. विद्या हिनेच केल्या आहेत व हीच इच्छा, ज्ञान व क्रिया यास प्रसवली आहे.
995-13
हे नादाची टांकसाळ । हे चमत्काराचें वेळाउळ । किंबहुना सकळ । खेळु इयेचा ॥995॥
ही नादाची टांकसाळ आहे (म्हणजे शब्दमात्र हिच्यापासून उत्पन्न झाले आहे), ही चमत्काराचे घर आहे. फार काय सांगावे? सर्व खेळ हिचा आहे.

996-13
जे उत्पत्ति प्रलयो होत । ते इयेचे सायंप्रात । हें असो अद्भुत । मोहन हे ॥996॥
जे उत्पत्ती व प्रलय आहेत ते हिचेच. सकाळ, संध्याकाळ आहेत. हे असो, ही प्रकृती अद्भुत भुरळ आहे.
997-13
हे अद्वयाचें दुसरें । हे निःसंगाचें सोयरे । निराळेंसि घरें । नांदत असे ॥997॥
ही प्रकृती एकाकी असणार्‍या पुरुषाची जोडीदारीण आहे व संग नसणार्‍या पुरुषाची संबंधी आहे व ही प्रकृती निराकारी पुरुषासह संसार करून कालक्रमणा करीत आहे.
998-13
इयेतें येतुलावरी । सौभाग्यव्याप्तीची थोरी । म्हणौनि तया आवरी । अनावरातें ॥998॥
हिच्या सौभाग्याच्या विस्ताराचा मोठेपणा एवढा वाढला आहे म्हणून ही त्या अनावराला (पुरुषाला) आपल्या आटोक्यात आणते.
999-13
तयाच्या तंव ठायीं । निपटूनि कांहींचि नाहीं । कीं तया आघवेहीं । आपणचि होय ॥999॥
त्याच्या (पुरुषाच्या) ठिकाणी तर मुळीच काही नाही असे जरी आहे तरी ती आपणच त्या पुरुषाचे सर्व काही होते. (हेच पुढे सांगतात).
1000-13
तया स्वयंभाची संभूती । तया अमूर्ताची मूर्ती । आपण होय स्थिती । ठावो तया ॥1000॥
त्या स्वत:सिद्ध असणार्‍या पुरुषाची उत्पत्ती आपण होते व त्या निराकाराचा आकार आपण बनते. त्याचे रहाणे व रहाण्याचे ठिकाण आपणच होते.

, , , , , , ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading