सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ८५१ ते ८७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

851-13
जे ज्ञानपदें अठरा । केलियां येरी मोहरां । अज्ञान या आकारा । सहजें येती ॥851॥
कारण की ज्ञानाची अठरा पदे उलट फिरवली उदा. अमानित्वाच्या उलट मानित्व वगैरे असता अज्ञानाची लक्षणे सहजच सिद्ध होतात.
852-13
मागां श्लोकाचेनि अर्धार्धें । ऐसें सांगितलें श्रीमुकुंदें । ना उफराटीं इयें ज्ञानपदें । तेंचि अज्ञान ॥13-852॥
मागे (या अध्यायाच्या) अकराव्या श्लोकाच्या उत्तरार्धात दुसर्‍या अर्ध्यामधे श्रीमुकुंदाने (श्रीकृष्णाने) असे संगितले की ही ज्ञानपदे उलट केली की तेच अज्ञान होय.
853-13
म्हणौनि इया वाहणीं । केली म्यां उपलवणी । वांचूनि दुधा मेळऊनि पाणी । फार कीजे ?॥853॥
ज्ञानदेवांचा परिहार
म्हणून अशा रीतीने (अज्ञानं यदतोऽन्यथा या पदाचे) मी विस्तारपूर्वक वर्णन केले नाही, तर दुधात पाणी मिसळून जसे दूध वाढावयाचे.
854-13
तैसें जी न बडबडीं । पदाची कोर न सांडी परी । मूळध्वनींचिये वाढी । निमित्त जाहलों ॥854॥
महाराज, त्याप्रमाणे पाणी घालून दूध वाढवल्याप्रमाणे मी बडबडत नाही. श्लोकातील पदांची हद्द मी सोडीत नाही. परंतु मूळश्लोकात जे थोडक्यात सांगितले त्याचे विस्तारपूर्वक वर्णन करण्यास मी निमित्त झालो.
855-13
तंव श्रोते म्हणती राहें । कें परिहारा ठावो आहे? । बिहिसी कां वायें । कविपोषका? ॥855॥
श्रोतेकृत ज्ञानदेव स्तुती =
तेव्हा श्रवणास बसलेली संतमंडळी म्हणतात, थांब, परिहाराला जागा कोठे राहिली आहे? हे कविपोषका, तू व्यर्थ का भितोस?

856-13
तूतें श्रीमुरारी । म्हणितलें आम्ही प्रकट करीं । जें अभिप्राय गव्हरीं । झांकिले आम्हीं ॥856॥
जे अभिप्राय आम्ही गीतारूपी गुहेत गुप्त ठेवले होते ते तू प्रगट कर’ असे तुला श्रीमुरारींनी (श्रीकृष्णाने) सांगितले.
857-13
तें देवाचें मनोगत । दावित आहासी तूं मूर्त । हेंही म्हणतां चित्त । दाटैल तुझें ॥857॥
देवाचे गुप्त अभिप्राय तू प्रगट करावेस हे जे देवाचे मनोगत, ते तू आपल्या वक्तृत्वाने (अज्ञानाची लक्षणे सांगण्याने) स्पष्ट दाखवीत आहेस, असे म्हणण्याने देखील तुझे चित्त संतमंडळी माझी स्तुति करीत आहेत असे तुला वाटून त्या भाराने दडपून जाईल.
858-13
म्हणौनि असो हें न बोलों । परि साविया गा तोषलों । जे ज्ञानतरिये मेळविलों । श्रवण सुखाचिये ॥858॥
म्हणून हे राहू दे, आम्ही हे बोलत नाही, परंतु अरे, आम्हास सहज संतोष झाला आहे. कारण की श्रवणसुखाच्या ज्ञानरूपी नौकेचा (होडीचा) तू आम्हास योग करून दिला आहेस.
859-13
आतां इयावरी । जे तो श्रीहरी । बोलिला तें करीं । कथन वेगां ॥859॥
तर आता यानंतर तो श्रीहरी जे काही बोलला, ते लवकर सांग पटकन सांग.
860-13
इया संतवाक्यासरिसें । म्हणितलें निवृत्तिदासें । जी अवधारा तरी ऐसें । बोलिलें देवें ॥860॥
पुढील विषयाची प्रस्तावना =
असे संतांनी सांगितल्याबरोबर निवृत्तिदास (ज्ञानेश्वरमहाराज) म्हणाले की तर महाराज, ऐका, असे म्हणाले.

861-13
म्हणती तुवां पांडवा । हा चिन्हसमुच्चयो आघवा । आयकिला तो जाणावा । अज्ञानभागु ॥861॥
अर्जुना, हा जो तू सर्व लक्षणांचा समुदाय ऐकलास तो अज्ञानाचा भाग आहे असे समज.
862-13
इया अज्ञानविभागा । पाठी देऊनि पैं गा । ज्ञानविखीं चांगा । दृढा होईजे ॥862॥
अर्जुना, या अज्ञानभागाकडे पाठ करून म्हणजे या अज्ञानभागाचा त्याग करून ज्ञानाविषयी चांगला दृढ हो.
863-13
मग निर्वाळिलेनि ज्ञानें । ज्ञेय भेदैल मनें । तें जाणावया अर्जुनें । आस केली ॥863॥
मग या शुद्ध ज्ञानाच्या योगाने मनाचा ज्या ज्ञेयात (ब्रह्मवस्तूत) प्रवेश होईल ते ज्ञेयस्वरूप जाणण्याची अर्जुनाने इच्छा केली.
864-13
तंव सर्वज्ञांचा रावो । म्हणे जाणौनि तयाचा भावो । परिसें ज्ञेयाचा अभिप्रावो । सांगों आतां ॥864॥
तेव्हा सर्वज्ञांचे राजे, जे श्रीकृष्ण ते अर्जुनाचा अभिप्राय जाणून म्हणतात, आता ज्ञेयाचे स्वरूप तू ऐक, आम्ही तुला सांगतो.
ज्ञेयं यत्तत्प्रवक्ष्यामि यज्ञात्वा~मृतमश्नुते ।
अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते ॥13.12॥

भावार्थ ~> जे जाणले असता (मनुष्य) अमृतत्व पावतो, ते जे ज्ञेय, ते मी सांगतो ते हे की आदिरहित परब्रह्म होय ते सत् ही नाही व असत् ही नाही असे ज्ञाते म्हणतात.
865-13
तरि ज्ञेय ऐसें म्हणणें । वस्तूतें येणेंचि कारणें । जें ज्ञानेंवांचूनि कवणें । उपायें नये ॥865॥
परब्रह्म वर्णन तर ब्रम्हाला
ज्ञेय म्हणावयाचे, ते एवढ्याकरता की ते (ब्रह्म) ज्ञानावाचून दुसर्‍या कोणत्याही उपायांनी जाणले जात नाही.

866-13
आणि जाणितलेयावरौतें । कांहींच करणें नाहीं जेथें । जाणणेंचि तन्मयातें । आणी जयाचें ॥866॥
आणि जे ब्रह्म जाणल्यावर काहीच करावयाचे रहात नाही व ज्याचे ज्ञान जाणणाराला ज्ञेयस्वरूप करते.
867-13
जें जाणितलेयासाठीं । संसार काढूनियां कांठीं । जिरोनि जाइजे पोटीं । नित्यानंदाच्या ॥867॥
जे ज्ञेयस्वरूप जाणल्यामुळेच संसाराचे कुंपण काढून टाकून संसाराचा निरास करून नित्यानंदाच्या पोटात जिरून जावे म्हणजे नित्यानंदरूप व्हावे.
868-13
तें ज्ञेय गा ऐसें । आदि जया नसे । परब्रह्म आपैसें । नाम जया ॥868॥
अर्जुना, ते ज्ञेय असे आहे की ज्याला आरंभ नाही व ज्याला परब्रह्म असे स्वभावत:च नाव आहे.
869-13
जें नाहीं म्हणों जाइजे । तंव विश्वाकारें देखिजे । आणि विश्वचि ऐसें म्हणिजे । तरि हे माया ॥869॥
जे नाही म्हणायला जावे, तर जे विश्वाच्या आकाराने दिसते आणि जे ब्रह्म विश्वच आहे, असे म्हटले तर विश्व हा मिथ्याभास आहे.
870-13
रूप वर्ण व्यक्ती । नाहीं दृश्य दृष्टा स्थिती । तरी कोणें कैसें आथी । म्हणावें पां ॥870॥
त्या ब्रह्माच्या ठिकाणी रूप, रंग व आकार ही नाहीत व दृश्य (पहाण्याचा विषय) व द्रष्टा (पहाणारा) ही स्थिती नाही. असे असल्यामुळे ते आहे, हे कोणी व कसे म्हणावे?

871-13
आणि साचचि जरी नाहीं । तरी महदादि कोणें ठाईं । स्फुरत कैचें काई । तेणेंवीण असे? ॥871॥
आणि (असे आहे म्हणून) जर ते खरोखरच नाही असे म्हणावे, तर महतत्त्वादिक कोणाच्या ठिकाणी स्फुरतात? व त्याच्यावाचून कोठले काय आहे? त्याच्यावाचून दुसरे काहीच नाही).
872-13
म्हणौनि आथी नाथी हे बोली । जें देखोनि मुकी जाहली । विचारेंसीं मोडली । वाट जेथें ॥872॥
म्हणून जे ब्रह्म पाहून ‘आहे, नाही’ ही भाषा मुकी झाली, जे आहे म्हणता येत नाही व जे नाही म्हणता येत नाही व ज्या ब्रह्माच्या ठिकाणी विचाराची वाट मोडली आहे ज्याच्या संबंधाने काही विचार करता येत नाही.
873-13
जैसी भांडघटशरावीं । तदाकारें असे पृथ्वी । तैसें सर्व होऊनियां सर्वीं । असे जे वस्तु ॥873॥
डेरा, घागर व परळ यामधे माती जशी त्या त्या आकाराने असते, त्याप्रमाने जी वस्तु ब्रह्मवस्तु सर्व जगतात सर्व पदार्थ होऊन राहिली आहे.
सर्वतः पाणिपादं तत्सर्वतो~क्षिशिरोमुखम् ।
सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति ॥13.13॥

भावार्थ त्याचे हस्तपाद सर्वत्र आहेत (ते विश्वबाहू किंवा विश्वांघि आहे). त्याचे नेत्र-शिर-मुख सर्वत्र आहेत. त्याचे कान सर्वत्र आहेत, ते विश्वामधे सर्वाला व्यापून राहिले आहे आहे.
874-13
आघवांचि देशीं काळीं । नव्हतां देशकाळांवेगळी । जे क्रिया स्थूळास्थूळीं । तेचि हात जयाचे ॥874॥
परब्रह्म पुढे चालू)
ज्ञा – सर्व देशांमधे व सर्व कालांमधे देशकालाहून जी वस्तु वेगळी न होता, जी क्रिया स्थूल व सूक्ष्माकडून (देहाकडून व अंत:करणाकडून) होते तेच (ती क्रियाच) ज्याचे (ब्रह्माचे) हात आहेत.
875-13
तयातें याकारणें । विश्वबाहू ऐसें म्हणणें । जें सर्वचि सर्वपणें । सर्वदा करी ॥875॥
या कारणास्तव या वस्तूला विश्वबाहु असे म्हटलेले आहे. कारण की ती वस्तु सर्व होऊन सर्व काळ सर्वच करते.

, , , , , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *