सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ८२६ ते ८५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

826-13
आणि आत्मा गोचरु होये । ऐसी जे विद्या आहे । ते आइकोनि डौर वाहे । विद्वांसु जो ॥826॥
(अज्ञानाची लक्षणे अध्यात्मज्ञानाची नावड)
आणि आत्म्याचा साक्षात्कार होईल अशी जी विद्या ब्रह्मविद्या आहे ती ऐकून जो (अध्यात्मशास्त्राव्यतिरिक्त इतर पढलेला) विद्वान ज्या ब्रह्मविद्येची निंदा करतो.
827-13
उपनिषदांकडे न वचे । योगशास्त्र न रुचे । अध्यात्मज्ञानीं जयाचें । मनचि नाहीं ॥827॥
जो उपनिषदांकडे जात नाही, ज्याला योगशास्त्र आवडत नाही, आणि अध्यात्मज्ञानाचे ठिकाणी ज्याचे लक्षच लागत नाही.
828-13
आत्मचर्चा एकी आथी । ऐसिये बुद्धीची भिंती । पाडूनि जयाची मती । वोढाळ जाहली ॥828॥
आत्मनिरूपण म्हणून काही एक महत्वाची गोष्ट आहे, अशा समजुतीची भिंत (मर्यादा) पाडून ज्याची बुद्धि स्वैर भटकणारी झाली आहे,
829-13
कर्मकांड तरी जाणे । मुखोद्गत पुराणें । ज्योतिषीं तो म्हणे । तैसेंचि होय॥829॥
तो सर्व कर्मकांड जाणतो, पुराणे त्याला तोंडपाठ आहेत आणि जो ज्योतिषशास्त्रात इतका निष्णात आहे की तो भविष्य करेल तसे घडते.
830-13
शिल्पीं अति निपुण । सूपकर्मींही प्रवीण । विधि आथर्वण । हातीं आथी ॥830॥
कलाकौशल्याच्या कामात अति निपुण असतो, पाकक्रियेत अति प्रवीण असतो, व अथर्वन वेदाचे विधि (मंत्रशास्त्राचे जारण-मारण-उच्चाटान वगैरे विधी) त्याला हस्तगत झालेले असतात.

831-13
कोकीं नाहीं ठेलें । भारत करी म्हणितलें । आगम आफाविले । मूर्त होतीं ॥831॥
कामशास्त्रात त्याला काही जाणावयाचे शिल्लक राहिलेले नाही, भारत तर त्याला पाठ असते आणि मंत्रशास्त्रही मूर्तिमंत त्याच्या स्वाधीन झालेले असते.
832-13
नीतिजात सुझे । वैद्यकही बुझे । काव्यनाटकीं दुजें । चतुर नाहीं ॥832॥
नीतिसंबंधीची सर्व शास्त्रे त्यास अवगत असतात, वैद्यकशास्त्र जो जाणतो व काव्यात व नाटकात त्याहून दुसरा कोणी चतुर नाही.
833-13
स्मृतींची चर्चा । दंशु जाणे गारुडियाचा । निघंटु प्रज्ञेचा । पाइकी करी ॥833॥
स्मृतीचा विचार त्याला कळतो, इंद्रजाल विद्येचे मर्म त्याला कळते व वैदिक शब्दांच्या कोशाला तो आपल्या बुद्धीचा चाकर करतो.
834-13
पैं व्याकरणीं चोखडा । तर्कीं अतिगाढा । परी एक आत्मज्ञानीं फुडा । जात्यंधु जो ॥834॥
तो व्याकरणशास्त्रात अति प्रवीण, तर्कशास्त्रात फार पटाईत असतो. परंतु एक अध्यात्मशास्त्रात जो खरोखर जन्मांध आहे,
835-13
तें एकवांचूनि आघवां शास्त्रीं । सिद्धांत निर्माणधात्री । परी जळों तें मूळनक्षत्रीं । न पाहें गा ॥835॥
त्या एका अध्यात्म- ज्ञानावाचून इतर सर्व शास्त्रांच्या सिद्धांतास निर्माण होण्याची तो पृथ्वीच आहे, (असा जरी तो असला) तरी पण त्याच्या त्या सर्व ज्ञानाला आग लागो. मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाला आईबापांनी पाहू नये, तसे तू त्याच्याकडे पाहू नकोस.

836-13
मोराआंगीं अशेषें । पिसें असतीं डोळसें । परी एकली दृष्टि नसे । तैसें तें गा ॥836॥
मोराच्या अंगावर जशी डोळेवाली पिसे पुष्कळ असतात, परंतु मोर ज्या आपल्या दृष्टीने पहातो ती एकटी दृष्टि त्या मोरास जर नसली तर त्या पिसांवरील डोळ्यांचा जसा काही एक उपयोग नाही, त्याप्रमाणे अर्जुना, एका अध्यात्मज्ञानावाचून त्याच्या इतर ज्ञानाचा काही उपयोग नाही.
837-13
जरी परमाणूएवढें । संजीवनीमूळ जोडे । तरी बहु काय गाडे । भरणें येरें? ॥837॥
परमाणू एवढे जर संजीवनी वनस्पतीचे मूळ मिळाले तर इतर पुष्कळशा गाडे भरून असलेल्या वनस्पतीच्या मुळ्या काय करावयाच्या आहेत?
838-13
आयुष्येंवीण लक्षणें । सिसेंवीण अळंकरणें । वोहरेंवीण वाधावणें । तो विटंबु गा ॥838॥
ज्याप्रमाणे आयुष्याशिवाय इतर सर्व सामुद्रिक उत्तम चिन्हे आहेत अथवा शीर नसलेल्या केवळ धडास जसे अलंकार घालावेत अथवा नवरानवरिशिवाय जसा वर्धावा काढावा, ही जशी केवळ विटंबना आहे.
839-13
तैसें शास्त्रजात जाण । आघवेंचि अप्रमाण । अध्यात्मज्ञानेंविण । एकलेनी ॥839॥
त्याप्रमाणे एका अध्यात्मज्ञानावाचून ते इतर सर्व शास्त्रांचे ज्ञान पूर्णपणे अप्रमाण आहे असे समज.
840-13
यालागीं अर्जुना पाहीं । अध्यात्मज्ञानाच्या ठायीं । जया नित्यबोधु नाहीं । शास्त्रमूढा ॥840॥
याकरता अर्जुना, असे पहा की ज्या शास्त्रमूढाला अध्यात्मज्ञानाचे ठिकाणी नित्य जागृति नाही

841-13
तया शरीर जें जालें । तें अज्ञानाचें बीं विरुढलें । तयाचें व्युत्पत्तितत्व गेले । अज्ञानवेलीं ॥841॥
त्याला शरीर जे प्राप्त झाले, ते अज्ञानाच्या बीजाचा अंकूरच होय. आणि त्याची विद्वत्ता ही अज्ञानाचा वेल (विस्तार) आहे.
842-13
तो जें जें बोले । तें अज्ञानचि फुललें । तयाचें पुण्य जें फळलें । तें अज्ञान गा ॥842॥
तो जे जे बोलतो, ते फुललेले अज्ञानाचे झाडच आहे व, त्याची जी पुण्यकर्मे आहेत, ते अज्ञानच फळास आलेले आहे.
843-13
आणि अध्यात्मज्ञान कांहीं । जेणें मानिलेंचि नाहीं । तो ज्ञानार्थु न देखे काई । हें बोलावें असें ?॥843॥
आणि ज्याने अध्यात्मज्ञानाला कधीच मानले नाही तो ज्ञानाचा विषय जे ब्रह्म त्यास पहात नाही, हे सांगावयास पाहिजे काय?
844-13
ऐलीचि थडी न पवतां । पळे जो माघौता । तया पैलद्वीपींची वार्ता । काय होय? ॥844॥
नदीच्या अलीकडच्या काठाला आला नाही, तोच जो माघारी पळून जातो, त्याला नदीच्या पलीकडच्या बेटाची खबर काय ठाऊक असणार?
845-13
कां दारवंठाचि जयाचें । शीर रोंविलें खांचे । तो केवीं परिवरींचें । ठेविलें देखे? ॥845॥
अथवा घराच्या दाराच्या उंबर्‍यातच ज्याचे मस्तक कापून खाचेत पुरले आहे, तो घरात ठेवलेले पदार्थ कसे पाहील?

846-13
तेवीं अध्यात्मज्ञानीं जया । अनोळख धनंजया । तया ज्ञानार्थु देखावया । विषो काई? ॥846॥
त्याप्रमाणे अर्जुना अध्यात्मज्ञानाशी ज्याचा मुळीच परिचय नाही, त्याला ज्ञानाचा अर्थ जे ब्रह्म ते समजण्याला विषय होईल काय?
847-13
म्हणौनि आतां विशेषें । तो ज्ञानाचें तत्त्व न देखे । हें सांगावें आंखेंलेखें । न लगे तुज ॥847॥
म्हणून आता तो ज्ञानाचे तत्व पहात नाही, हे तुला आकडे मांडून लिहून विशेष सांगावयास नको.
848-13
जेव्हां सगर्भे वाढिलें । तेव्हांचि पोटींचें धालें । तैसें मागिलें पदें बोलिलें । तेंचि हो ॥848॥
अज्ञानाची लक्षणे = ज्ञानलक्षणांच्या उलट
जेव्हा गरोदर स्त्रीला जेवावयास वाढावे, तेव्हाच तिच्या पोटातले मूल तृप्त होते. त्या मुलास निराळे वाढणे नको.त्याप्रमाणे वरती ज्ञानाचे जे वर्णन केले गेले, त्यात अज्ञानाच्या लक्षणांचा अंतर्भाव होत आहे.
849-13
वांचूनियां वेगळें । रूप करणें हें न मिळे । जेवीं अवंतिलें आंधळें । तें दुजेनसीं ये ॥849॥
वास्तविक पाहिले तर मागे वर्णन केलेल्या पदाहून निराळे वर्णन करावयास नको. आंधळा मनुष्य जेवावयाला बोलावला असता तो दुसर्‍या डोळस वाटाड्याला बरोबर घेऊन यावयाचा तसेच हेही आहे असे समज.
850-13
एवं इये उपरतीं । ज्ञानचिन्हें मागुतीं । अमानित्वादि प्रभृती । वाखाणिलीं ॥850॥
याप्रमाणे ही अमानित्वादि ज्ञानाची चिन्हे पुन्हा उलट रीतीने सांगितली.

, , , , , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *