सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ६२६ ते ६५० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

626-11
दैवें चिंतामणी लेईजे । कीं हें ओझें म्हणौनि सांडिजे? । कामधेनु दवडिजे । न पोसवे म्हणौनि? ॥626॥
सुदैवाने चिंतामणी अंगावर घातला गेला की, त्याचे ओझे होते म्हणून जसा टाकून द्यावा किंवा कामधेनू आपल्याच्याने पोसवत नाही, म्हणून तिला हाकून द्यावे?
627-11
चंद्रमा आलिया घरा । म्हणिजे निगे करितोसि उबारा । पडिसायि पाडितोसि दिनकरा । परता सर॥627॥
चंद्र घरी चालत आला असता, तुझ्यापासून आम्हाला उष्णता होते, म्हणून येथून जा असे म्हणावे किंवा सूर्य घरी आला असता, सावली पाडतोस, म्हणून दूर हो, असे म्हणावे काय?
628-11
तैसें ऐश्वर्य हें महातेज । आजि हातां आलें आहे सहज । कीं एथ तुज गजबज । होआवी कां?॥628॥
त्याप्रमाणे अत्यंत तेजात्मक असे हे माझे विश्वरूप ऐश्वर्य आज अनायासे तुझ्या हाती आले असताना, तुझा जीव एवढा व्याकूळ का व्हावा?
629-11
परि नेणसीच गांवढिया । काय कोपों आतां धनंजया । आंग सांडोनि छाया । आलिंगितोसि मा ॥629॥
हे गावंढळ अर्जुना!पण तू हे काही जाणत नाहीस. तुझ्यावर काय रागावू!तू शरीर सोडून शरीराच्या छायेला आलिंगन देऊ पाहतोस ना!
630-11
हें नव्हे जो मी साचें । एथ मन करूनियां काचें । प्रेम धरिसी अवगणियेचें । चतुर्भुज जें ॥630॥
हे विश्वरूप माझे खरे स्वरूप असताना तू खरे समजत नाहीस. येथे विश्वस्वरूपाचे विषयी मनात भीती बाळगतोस आणि माझे कनिष्ठ असे जे चतुर्भुज रूप, त्यावर प्रेम करतोस.


631-11
तरि अझुनिवरी पार्था । सांडीं सांडीं हे व्यवस्था । इयेविषयीं आस्था । करिसी झणें ॥631॥
अरे अर्जुना !अजून तरी माझ्या चतुर्भुजस्वरूपाची आस्था सोड आणि या विश्वरूपाची उपेक्षा करू नकोस.
632-11
हें रूप जरी घोर । विकृति आणि थोर । तरी कृतनिश्चयाचें घर । हेंचि करीं ॥632
हें माझे विश्वरूप भयंकर विक्राळ व अमर्याद असले, तरी भगवंताचे खरे स्वरूप हेच होय; असाच त्याविषयी निश्चय कर.
633-11
कृपण चित्तवृत्ति जैसी । रोंवोनि घालीं ठेवयापासीं । मग नुसधेनि देहेंसीं । आपण असे ॥633॥
घो️ कृपण पुरुष, ज्याप्रमाणे आपले चित्त धनापाशी रोवून ठेवतो व मग नुसत्या देहाने आपण बाहेर असतो.
634-11
कां अजातपक्षिया जवळा । जीव बैसवूनि अविसाळां । पक्षिणी अंतराळा- । माजीं जाय ॥634॥
किंवा पंख न फुटलेल्या व घरट्यात रहाणार्‍या पिलापाशी जीव ठेवून, जशी पक्षिणी बाहेर फिरते,
635-11
नाना गाय चरे डोंगरीं । परि चित्त बांधिलें वत्सें घरीं । प्रेम एथिंचें करीं । स्थानपती ॥635॥
किंवा गाय डोंगरावर चरत असते, पण तिचे चित्त घरी असलेल्या वत्साकडे लागलेले असते त्याप्रमाणे तू आपले प्रेम या एका विश्वरूपाच्या ठिकाणीच राहू दे.


636-11
येरें वरिचिलेनि चित्तें । बाह्य सख्य सुखापुरतें । भोगिजो कां श्रीमूर्तींतें । चतुर्भुज ॥636॥
बाकी वरवर चित्ताने, बाहेर सख्यभक्तीचे सुख भोगण्याकरिता, या माझ्या चतुर्भुज मूर्तीवर प्रेम कर.
637-11
परि पुढतपुढती पांडवा । हा एक बोलु न विसरावा । जे इये रूपींहूनि सद्भावा । नेदावें निघों ॥637॥
पण अर्जुना!वारंवार सांगायचे हे की, या माझ्या विश्वरूपावरून आपले प्रेम निघू देऊ नकोस, हे माझे विश्वरूप विसरू नकोस.
638-11
हें कहीं नव्हतेंचि देखिलें । म्हणौनि भय जें तुज उपजलें । तें सांडीं एथ संचलें । असों दे प्रेम ॥638॥
हे केव्हा पूर्वी पाहिलेच नव्हते, म्हणून ते पाहिल्याबरोबर तुला भीती उत्पन्न झाली. ते भय सोड आणि येथे प्रेम संचले राहू दे.
639-11
आतां करूं तुजयासारखें । ऐसें म्हणितलें विश्वतोमुखें । तरि मागील रूप सुखें । न्याहाळीं पां तूं ॥639॥
विश्वरूप भगवंतांनी ‘तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो. माझे मागील चतुर्भुजरूप आनंदाने पाहा.’ असे म्हटले.
संजय उवाच ।
इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः ।
आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्यवपुर्महात्मा ।।11.50।।

अर्थ संजय म्हणाला, असे वचन बोलून याप्रमाणे वासुदेवाने पुन्हा स्वत:चे (पूर्वीचे) रूप दाखवले. पुन: सौम्यस्वरूपधारी होऊन त्या महात्म्याने भयभीत अर्जुनाला धीर दिला.॥50॥
श्रीकृष्णरूप पाहून अर्जुन आश्वस्त झाला.
640-11
ऐसें वाक्य बोलतखेंवो । मागुता मनुष्य जाहला देवो । हें ना परि नवलावो । आवडीचा तिये ॥640॥
असे वाक्य तोंडातून निघाल्याबरोबर, भगवान मनुष्यासारखा देहधारी झाला, हे मोठेसे आश्चर्य नव्हे. पण भगवंताला अर्जुनाचे जे प्रेम होते, त्या प्रेमाचेच आश्चर्य वाटते.


641-11
श्रीकृष्णचि कैवल्य उघडें । वरि सर्वस्व विश्वरूपायेवढें । हातीं दिधलें कीं नावडे । अर्जुनासि ॥641॥
खरोखर पाहता, भगवान श्रीकृष्ण उघडे म्हणजे डोळ्यांनी पाहता येणारे, अद्वैत पूर्णब्रह्म होय. त्यातही आणखी भगवंतांनी आपले विश्वरूपासारखे सर्वस्व अर्जुनाच्या हातात दिले; पण अर्जुनाला ते आवडले नाही.
642-11
वस्तु घेऊनि वाळिजे । जैसें रत्नासि दूषण ठेविजे । नातरी कन्या पाहूनियां म्हणिजे । मना न ये हे ॥642॥
ज्याप्रमाणे एखादी वस्तू घेऊन ती टाकून द्यावी किंवा चांगल्या रत्नास दूषण ठेवावे अथवा मुलीला पाहून ‘ही पसंत नाही’ असे म्हणावे.
643-11
तया विश्वरूपायेवढी दशा । करितां प्रीतीचा वाढू कैसा । सेल दीधलीसे उपदेशा । किरीटीसिं देवें ॥643॥
(त्याप्रमाणे) आपल्या श्रीकृष्णस्वरूपाची विश्वरूपा एवढी व्यापकदशा करण्यात अर्जुनाविषयी भगवंताच्या ठिकाणी कशी प्रीतिची वाढ झाली पहा, भगवंतांनी अर्जुनाला केलेल्या उपदेशाचा शेवट – म्हणजे सर्वनामरूपासह पूर्ण ब्रह्मच आहे हा अनुभव आणून दिला.
644-11
मोडोनि भांगाराचा रवा । लेणें घडिलें आपलिया सवा । मग नावडे जरी जीवा । तरी आटिजे पुढती ॥644॥
सोन्याचा रवा वितळवून आपल्या आवडीप्रमाणे अलंकार केल्यावर, मनाला आवडला नाही, तर तो पुनः आटवून टाकावा.
645-11
तैसें शिष्याचिये प्रीती जाहलें । कृष्णत्व होतें तें विश्वरूप केलें । तें मना नयेचि मग आणिलें । कृष्णपण मागुतें ॥645॥
येथेहि शिष्याच्या प्रेमाप्रमाणे झाले. पूर्वी असलेल्या कृष्णस्वरूपाला भगवंतांनी विश्वरूप केले, पण ते अर्जुनाच्या मनाला आवडले नाही; म्हणून पुनः पूर्वीचेच श्रीकृष्णरूप धारण केले.


646-11
हा ठाववरी शिष्याची निकसी । सहातें गुरु आहाती कवणे देशीं? । परि नेणिजे आवडी कैशी । संजयो म्हणे ॥646॥
संजय म्हणतो, शिष्याने दिलेला त्रास येथपर्यंत सहन करणारे गुरु कोणत्या स्थळी आहेत? पण भगवंताला अर्जुनाविषयी कसे विलक्षण प्रेम आहे, हे सांगता येत नाही.
647-11
मग विश्वरूप व्यापुनि भोंवतें । जें दिव्य तेज प्रगटलें होतें । तेंचि सामावलें मागुतें । कृष्णरूपीं तये ॥647॥
मग संपूर्ण नामरूपात्मक जगताला व्यापून सभोवार जे दिव्य तेज पसरले होते, ते संपूर्ण पुनश्च श्रीकृष्णस्वरूपाचे ठिकाणी साठवले गेले.
(वर सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णस्वरूप व विश्वरूप या दोघांचा येथे बीजवृक्षाप्रमाणे संबंध दाखवून, बीज व वृक्ष दोन्हीही, ज्याप्रमाणे एकरूप व सत्य असतात, त्याप्रमाणे विश्वरूप व श्रीकृष्णरूप ही दोन्हीही एकरूप व सत्य म्हणजे अनध्यस्तविवर्तरूप किंवा मायारहितविवर्तरूप आहेत हेच येथे दाखविले आहे.)
648-11
जैसें त्वंपद हें आघवें । तत्पदीं सामावे । अथवा द्रुमाकारु सांठवे । बीजकणिके जेवीं ॥648॥
ज्याप्रमाणे त्वंपद तत्पदार्थाचे ठिकाणी ऐक्य पावते अथवा संपूर्ण वृक् छोट्याशा बीजात साठविला जातो,
649-11
नातरी स्वप्नसंभ्रमु जैसा । गिळी चेइली जीवदशा । श्रीकृष्णें योगु हा तैसा । संहारिला तो ॥649॥
किंवा ज्याप्रमाणे स्वप्नातील कल्पित पसारा, जीवाची जागृतदशा गिळून घेते, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी आपल्या स्वरूपाचे ठिकाणी आपल्या योग ऐश्वर्याचा उपसंहार केला.
650-11
जैसी प्रभा हारपली बिंबीं । कीं जळदसंपत्ती नभीं । नाना भरतें सिंधुगर्भीं । रिगालें राया ॥650॥
ज्याप्रमाणे सूर्यादिकांचें तेज, सूर्यादिक बिंबाचे ठिकाणीच लोप पावते किंवा पाण्याने भरलेले मेघ, आकाशांत नाहीसे होतात किंवा संपूर्ण भरती समुद्रातच नाहीशी होती.

, ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading