सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ६७६ ते ७०८ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

676-11
तरी विश्वात्मक रूपडें । जें दाविलें आम्ही तुजपुढें । तें शंभूही परि न जोडे । तपें करितां ॥676॥
पण आम्ही तुझ्यापुढे आपले जे विश्वव्यापकरूप दाखविले, ते कितीही तप करून शंकराला देखील प्राप्त होत नाही
677-11
आणि अष्टांगादिसंकटीं । योगी शिणताति किरीटी । परिअवसरु नाहींभेटी । जयाचिये ॥677॥
आणि अत्यंत श्रमदायक अशा योगाच्या यमनियमादि अष्टांगाचा अभ्यास करताना योगी शिणतात; पण त्यांनाही ज्या विश्वरूपाच्या भेटीचा योग येत नाही.
678-11
तें विश्वरूप एकादे वेळ । कैसेनि देखों अळुमाळ । ऐसें स्मरतां काळ । जातसे देवां ॥678॥
ते विश्वरूप एखादे वेळी एवढेसे तरी कसे दिसेल, असे चिंतन करिता करिताच देवांचेही आयुष्य जाते.
679-11
आशेचिये अंजुळी । ठेऊनि हृदयाचिया निडळीं । चातक निराळीं । लागले जैसे ॥679॥
जसे ह्रदयाच्या कपाळावर आशेची अंजुली ठेऊन, चातक पक्षी आकाशाकडे सारखी दृष्टी देऊन राहतात,
680-11
तैसे उत्कंठा निर्भर । होऊनियां सुरवर । घोकीत आठही पाहार । भेटी जयाची ॥680॥
त्याप्रमाणे अत्यंत उत्कंठतेने देव, ज्याची भेट व्हावी म्हणून आठही प्रहर चिंतन करीत असतात.


681-11
परि विश्वरूपासारिखें । स्वप्नींही कोण्ही न देखे । तें प्रत्यक्ष तुवां सुखें । देखिलें हें ॥681॥
पण विश्वरूपासारखे कोणाच्या स्वप्नातही पाहण्यात येत नाही. ते विश्वरूप तू अनायासे प्रत्यक्ष पाहिलेस.
नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्यया ।
शक्यं एवंविधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा ॥11-53॥

अर्थ ज्याप्रकारे तू मला पाहिलेस, त्या प्रकारे वेदपठनाने, तपाने, दानाने अथवा यज्ञाने देखील मी कोणाला दिसणे शक्य नाही
682-11
पैं उपायांसि वाटा । न वाहती एथ सुभटा । साहीसहित वोहटा । वाहिला वेदीं ॥682॥
हे उत्तम योद्ध्या ! येथे येण्याकरिता कर्मरूप साधनांना मार्ग नाही, सहाही शास्त्रांसह वेदांनी माघार घेतली.
683-11
मज विश्वरूपाचिया मोहरा । चालावया धनुर्धरा । तपांचियाही संभारा । नव्हेचि लागु ॥683॥
हे धनुर्धारी अर्जुना ! माझ्या विश्वरूपाकडे येण्याकरिता नानाप्रकारच्या तपांच्या समुदायांचाही लाग नाही.
684-11
आणि दानादि कीर कानडें । मी यज्ञींही तैसा न सांपडें । जैसेनि कां सुरवाडें । देखिला तुवां ॥684॥
आणि ज्याप्रमाणे तू विश्वरूपाला उत्तम रीतीने पाहिलेस, तसे ते विश्वरूप दानादिकांनी खरोखर प्राप्त होणे कठीण असून, तसा मी यज्ञादिकांनीही प्राप्त होत नाही.
685-11
तैसा मी एकीचि परि । आंतुडें गा अवधारीं । जरी भक्ति येऊनि वरी । चित्तातें गा ॥685॥
माझ्या प्रेमभक्तीने चित्ताला वरले – म्हणजे माझी प्रेमभक्ती चित्ताला उत्पन्न झाली – तर मात्र या एकाच गोष्टीने माझ्या या रूपाची प्राप्ती होते.
भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोऽर्जुन ।
ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप ॥11.54॥

अर्थ पण हे शत्रुनाशना अर्जुना, अशा स्वरूपाचा जो मी त्या मला अनन्य भक्तियोगाने जाणणे, पहाणे आणि मत्स्वरूपाने माझ्यामधे लीन होणे शक्य आहे.॥11-54


686-11
परि तेचि भक्ति ऐसी । पर्जन्याची सुटिका जैसी । धरावांचूनि अनारिसी । गतीचि नेणें ॥686॥
पण ती भक्ती अशी आहे, ज्याप्रमाणे पावसाच्या वर्षावाला पृथ्वीवाचून दुसरी गतीच ठाऊक नसते.
687-11
कां सकळ जळसंपत्ती । घेऊनि समुद्रातें गिंवसिती । गंगा जैसी अनन्यगती । मिळालीचि मिळे ॥687॥
ज्याप्रमाणे जलसंपत्ती घेऊन, गंगा अनन्यगतिक होऊन समुद्राला मिळते व मिळाल्यानंतरही मिळतच राहते.
688-11
तैसें सर्वभावसंभारें । न धरत प्रेम एकसरें । मजमाजीं संचरे । मीचि होऊनि ॥688॥
त्याप्रमाणे माझ्याशी ऐक्य पावून व सर्व प्रेमसंबंधाचा समुदाय घेऊन, खंड न पडता, माझे ठिकाणी एकसारखे प्रेम होत राहते.
689-11
आणि तेवींचि मी ऐसा । थडिये माझारीं सरिसा । क्षीराब्धि कां जैसा । क्षीराचाचि ॥689॥
आणि त्याचप्रमाणे मीही असा आहे की, जसा क्षीरसागर काठाशी व मध्ये एकसारखा दुधाचाच असतो.
690-11
तैसें मजलागुनि मुंगीवरी । किंबहुना चराचरीं । भजनासि कां दुसरी । परीचि नाहीं ॥690॥
तसेच मजपासून मुंगीपर्यंत किंबहुना संपूर्ण चराचर विश्वात, भजण्याकरिता – म्हणजे प्रेम करण्याकरिता माझ्यावाचून निराळी वस्तूच नाही.


691-11
तयाचि क्षणासवें । एवंविध मी जाणवें । जाणितला तरी स्वभावें । दृष्टही होय ॥691॥
ज्याक्षणी, असे माझे प्रेम जडते, त्याक्षणीच मी याप्रमाणे विश्वव्यापक आहे, असा जाणला जातो आणि जाणला गेलो की, सहजच विश्वरूपाने प्रत्यक्ष होतो.
692-11
मग इंधनीं अग्नि उद्दीपें । आणि इंधन हें भाष हारपे । तें अग्निचि होऊनि आरोपें । मूर्त जेवीं ॥692॥
मग लाकडाचे ठिकाणी अग्नी प्रगट झाला असता, ‘लाकूड’ हा शब्द नाहीसा होतो व ते लाकूड मूर्तिमंत अग्नीच होते.
693-11
कां उदय न कीजे तेजाकारें । तंव गगनचि होऊनि असे आंधारें । मग उदईलिया एकसरें । प्रकाशु होय ॥693॥
किंवा जोपर्यंत सूर्यच प्रकाशरूपाने आपला उदय करीत नाही, तोपर्यंत आकाशच काळोखरुप होऊन राहते आणि सूर्य प्रकाशल्याबरोबर, मग ते आकाश एकसारखे प्रकाशच होऊन राहते.
694-11
तैसें माझिये साक्षात्कारीं । सरे अहंकाराची वारी । अहंकारलोपीं अवधारीं । द्वैत जाय ॥694॥
त्याप्रमाणे (माझ्या प्रेमभक्तीने) माझ्या सगुण स्वरूपाचा साक्षात्कार झाला असता, अहंकारावर येणे समूळ नाहीसे होते आणि अहंकार नाहीसा झाला की, द्वैत मुळीच भासत नाही.
695-11
मग मी तो हें आघवें । एक मीचि आथी स्वभावें । किंबहुना सामावे । समरसें तो ॥695॥
मग ‘मी’ व ‘तो’ हे सर्व स्वभावतः मीच एक होऊन राहतो. इतकेच नव्हे तर, तो माझे ठिकाणी समरस ऐक्य पावतो.
मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्तः संगवर्जितः॥
निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव ॥11.55॥

अर्थ हे पांडवा, मत्प्रीत्यर्थ कर्म करणारा, मीच ज्याचे प्राप्तव्य आहे असा माझा भक्त संसारसंगररहित, सर्व भूतांचे ठिकाणी मित्रभाव असलेला, असा जो पुरुष असेल तो मजप्रत येतो.
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्वरूपदर्शनयोगो नामैकादशोऽध्यायः ॥11॥
अर्थ
ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील विश्वरूपदर्शनयोग नावाचा हा अकरावा अध्याय समाप्त झाला. ॥11॥


696-11
जो मजचि एकालागीं । कर्में वाहातसे आंगीं । जया मीवांचोनि जगीं । गोमटें नाहीं ॥696॥
जो केवळ एका माझ्याकरिताच शरीरादिकांनी होणारी कर्मे करीत असतो, ज्याला माझ्यावाचून जगात काहीच गोड वाटत नाही किंवा आवडत नाही.
697-11
दृष्टादृष्ट सकळ । जयाचें मीचि केवळ । जेणें जिणयाचें फळ । मजचि नाम ठेविलें ॥697॥
ज्याचे जिवंतपणीचे व मरणानंतरचे प्राप्तव्य केवळ मीच एक आहे आणि माझी प्राप्ती होणे, हेच ज्याला जीविताचे फळ आहे असे वाटते.]
698-11
मग भूतें हे भा ष विसरला । जे दिठी मीचि आहें सूदला । म्हणौनि निर्वैर जाहला । सर्वत्र भजे ॥698॥
अशा माझ्या प्रेमामुळे जो माझ्याहून दुसरे प्राणी आहेत ही भाषाच विसरला, आपल्या दृष्टीत ज्याने मलाच भरून ठेवले, म्हणून ज्याला कोणी वैरीच उरला नाही आणि जो सर्वत्र माझेच भजन करतो.
699-11
ऐसा जो भक्तु होये । तयाचें त्रिधातुक हें जैं जाये । तैं मीचि हौनि ठायें । पांडवा गा ॥699॥
असा जो माझा भक्त आहे, त्याचे हे वातपित्तकफात्मक शरीर नाहीसे झाले असता, बा अर्जुना ! तो मीच होऊन राहतो. (पंचभौतिक देह हा भ्रांतिजन्य असून, दृष्टिसृष्टिवादानुसार त्याचे ज्ञान होते तोपर्यंतच त्याचे अस्तित्व असते आणि त्याचा विसर पडला की त्याचे अस्तित्व नाहीसे होते. भगवंताच्या निःसीम प्रेमामुळे भक्तांना देहाचा विसर पडतो व ते भगवंताशी पूर्ण ऐक्य पावतात; पण अज्ञानी लोकांना त्यांचा देह दिसतो तोपर्यंत, त्यांच्या ठिकाणी देव व भक्त असा भेद दिसून येतो, तोही त्याचे शरीर पडल्यानंतर नाहीसा होऊन ते केवळ भगवत्स्वरूपच होऊन राहतात.)
700-11
ऐसें जगदुदरदोंदिलें । तेणें करुणारसरसाळें । संजयो म्हणे बोलिलें । श्रीकृष्णदेवें ॥700॥
जगत् साठविल्यामुळे पोट मोठे असलेले व करुणारसाने रसाळ असलेले श्रीकृष्णदेव याप्रमाणे बोलले, असे संजयाने धृतराष्ट्राला सांगितले.


701-11
ययावरी तो पंडुकुमरु । जाहला आनंदसंपदा थोरु । आणि कृष्णचरणचतुरु । एक तो जगीं ॥701॥
यानंतर तो पांडूचा कुमार अर्जुन आनंदसंपदेने संपन्न झाला व तोच एकटा जगामध्ये श्रीकृष्णचरणाची थोरवी जाणणारा चतुर होता. (जगाचे उत्पत्तिस्थितीलयरूप तटस्थलक्षणात्मक भगवान श्रीकृष्ण असून, ज्ञानरूप स्वरूपलक्षणात्मकही श्रीकृष्णरूपच आहे; म्हणून श्रीकृष्णाची दोन्ही रुपे पूर्णब्रह्मच आहेत आणि बीजवृक्षाप्रमाणे श्रीकृष्णस्वरूप व विश्वरूप यांचा संबंध असून, दोघांत, स्वरूपाचे दृष्टीने काही फरक नसला तरी, बाहेर स्वाभाविक व निःसीम आत्मप्रेमसुखाचा लाभ, एका श्रीकृष्ण स्वरूपाचे ठिकाणीच होतो; विश्वरूपाचे ठिकाणी होत नाही. अर्थात विश्वरूपापेक्षा तेच अधिक प्रिय होय, असा श्रीकृष्णाच्या चरणाचा महिमा, प्रत्यक्ष अनुभविण्याचे चातुर्य, अर्जुनाचे ठिकाणीच माऊलींना दिसले; म्हणून माऊलींनी अर्जुनाला “श्रीकृष्णचरणचतुर” हे विशेषण दिले.)
702-11
तेणें देवाचिया दोनही मूर्ती । निकिया न्याहाळिलिया चित्तीं । तंव विश्वरूपाहूनि कृष्णाकृतीं । देखिला लाभु ॥702॥
त्याने देवाच्या दोन्ही मूर्ती चित्तात चांगल्या न्याहाळून पाहिल्या तेव्हा त्याला विश्वरूपापेक्षा सगुण श्रीकृष्णमूर्तीचेच ठिकाणी सुखाचा विशेष लाभ दिसून आला.
703-11
परि तयाचिये जाणिवे । मानु न कीजेचि देवें । जें व्यापकाहूनि नव्हे । एकदेशी ॥703॥
पण व्यापक विश्वरूपाहून एकदेशी श्रीकृष्णस्वरूप अधिक लाभदायक किंवा श्रेष्ठ असू शकत नाही, असे म्हणून भगवंतांनी त्याच्या या अनुभवाला मान्यता दिली नाही.
704-11
हेंचि समर्थावयालागीं । एक दोन चांगी । उपपत्ती शारङ्गी । दाविता जाहला ॥704॥
आणि आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ भगवंतांनी एक दोन उपपत्ती किंवा दृष्टान्तही अर्जुनाला सांगितले.
705-11
तिया ऐकोनि सुभद्राकांतु । चित्तीं आहे म्हणतु । तरि होय बरवें दोन्हीं आंतु । तें पुढती पुसों ॥705॥
सुभद्रापती अर्जुन, त्या उपपत्ती ऐकून मनात म्हणू लागला की, दोन्ही मूर्तीमध्ये चांगली लाभदायक कोणती, हे आपण भगवंताला पुढे विचारू.


706-11
ऐसा आलोचु करूनि जीवीं । आतां पुसती वोज बरवी । आदरील ते परिसावी । पुढें कथा ॥706॥
असा मनात विचार करून आता तो श्रीगुरुला प्रश्न विचारण्याची जी सुंदर पध्दती स्विकारील, ती कथा पुढे ऐका.
707-11
प्रांजळ ओंवीप्रबंधें । गोष्टी सांगिजेल विनोदें । तें परिसा आनंदें । ज्ञानदेवो म्हणे ॥707॥
श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रीनिवृत्तिनाथांच्या चरणप्रसादाने, सरळ ओवीप्रबंधांत ती गोष्ट मी सहज लीलेने सांगणार आहे, ती ऐका.
708-11
भरोनि सद्भावाची अंजुळी । मियां वोंवियाफुलें मोकळीं । अर्पिलीं अंघ्रियुगुलीं । विश्वरूपाच्या ॥708॥
ओवीरूपी मोकळी फुले, मी प्रेमभावाच्या ओंजळीमध्ये भरून विश्वरूपाच्या दोन्ही पायावर अर्पण केली.
॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
विश्वरूपदर्शनयोगोनाम एकदशोऽध्यायः॥11॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :- 55 ॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 708

, ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading