सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी ३२६ ते ३५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

326-9
लोकपाळरांगेचे । राउत जिये पदीचे । उचैःश्रवा खांचे । खोलणिये ॥326॥
ज्यांच्या सभोवती लोकपालांसारखे राजे चालत असुन, जय मिळविलेले पदवीधर सरदार आहेत, व उच्चैःश्रवा नामक खाजगी कोतवालघोडा आहे.
327-9
हें बहु असो जे ऐसे । भोग इंद्रसुखासरिसे । ते भोगिजती जंव असे । पुण्यलेशु ॥327॥
हे असो; याप्रमाणे तोपर्यंत पुण्याचा अंश आहे, तोपर्यंत ते इंद्राच्या सुखासारखे पुष्कळ भोग भोगतात
ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति ।
एवंत्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते॥9.21॥

328-9
मग तया पुण्याची पाउटी सरे । सवेंचि इंद्रपणाची उटी उतरे । आणि येऊं लागती माघारें । मृत्युलोका ॥328॥
मग त्यांच्या पुण्याची पुंजी संपताक्षणीक इंद्रपणाचा अभिमान लोपून ते मृत्युलोकी माघारे येतात.
329-9
जैसा वेश्याभोगीं कवडा वेंचे । मग दारही चेपूं न ये तियेचें । तैसें लाजिरवाणें दीक्षितांचें । काय सांगो ॥329॥
ज्याप्रमाणे वेश्येच्या पायी एखाद्यानें आपले सर्व द्रव्य खर्च केल्यानंतर त्याला तिच्या दाराला देखील बोट लावण्याची सत्ता नसते, त्याप्रमाणे या यज्ञकर्त्याची स्थिति फार लाजिरवाणी होते, ती तुला काय सांगूं?
330-9
एवं थितिया मातें चुकले । जीहीं पुण्यें स्वर्ग कामिले । तयां अमरपण तें वावों जालें । अंती मृत्युलोकु ॥330॥
याप्रमाणे, ज्या वेळेस जपावयाचे, त्या वेळेस मला चुकून ज्यांनी पुण्यमार्गाच्याआचरणाने स्वर्गप्राप्ति करुन घेतली, त्यांचे अमरत्व वाया जाऊन शेवटी ते मृत्युलोकी परत येतात.

331-9
मातेचिया उदरकुहरीं । पचूनि विष्ठेचां दाथरीं । उकडूनि नवमासवरी । जन्म जन्मोनि मरती ॥331॥
नंतर मातेच्या उदररूप गुहेत विष्ठेच्या थरांत नऊ महिनेपर्यंत उकडून पक्क दशेत येतात, आणि जन्माला येऊन मरण पावतात.
332-9
अगा स्वप्नीं निधान फावे । परि चेइलिया हारपे आघवें । तैसें स्वर्गसुख जाणावें । वेदज्ञाचें ॥332॥
अरे, स्वप्नांत प्राप्त झालेला ठेवा जसा जागृत झाल्यावर सर्व नाहींसा होतो, त्याप्रमाणे यज्ञकर्त्यांचे सुख आहे असे समज.
333-9
अर्जुना वेदविद जऱ्ही जाहला । तरी मातें नेणतां वायां गेला । कणु सांडूनि उपणिला । कोंडा जैसा ॥333॥
समज.अर्जुना, ज्याप्रमाणे धान्य काढून घेतलेला कोंडा उफनला असतां व्यर्थ होतो, त्याप्रमाणे, वेदार्थज्ञानी जरी झाला, तरी मला जाणल्याशिवाय त्याचा जन्म व्यर्थ होय.
334-9
म्हणऊनि मज एकेंविण । हे त्रयीधर्म अकारण । आतां मातें जाणोनि कांहीं नेण । तूं सुखिया होसी ॥334॥
म्हणून माझ्या एकट्याशिवाय हे तीन्ही वेदोक्त धर्म व्यर्थ आहेत; तेव्हां आता मलाच जाण, दुसरे मनांत आणूं नको, म्हणजे सुखी होशील.
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्॥9.22॥

335-9
पैं सर्वभावेंसी उखितें । जे वोपिले मज चित्तें । जैसा गर्भगोळु उद्यमातें । कोणाही नेणे ॥335॥
हे पहा, ज्यांनी आपले चित्त सर्वभावेकरून माझ्याच ठिकाणी उक्ते विकले आहे; ज्याप्रमाणे गर्भातील गोळा कोणताही उद्योग करावयाचे जाणत नाही,

336-9
तैसा मीवाचूनि कांही । आणिक गोमटेंचि नाहीं । मजचि नाम पाहीं । जिणेया ठेविलें ॥336॥
त्याप्रमाणे ज्यांना माझ्या वांचून दुसरे कांहीच चांगले दिसत नाही, व ज्यांनी माझ्याचकरिता आपला जीव ठेवला आहे,
337-9
ऐसे अनन्यगतिकें चित्तें । चिंतितसांते मातें । जे उपासिती तयांतें । मीचि सेवीं ॥337॥
अशा प्रकारे एकनिष्ठ अंतःकरणाने जे माझे चिंतन करुन माझी सेवा करतात, त्यांची सेवा मीच करतो.
338-9
ते एकवटूनि जिये क्षणीं । अनुसरले गा माझिये वाहणी । तेव्हांचि तयांची चिंतवणी । मजचि पडली ॥338॥
ते ऐक्यतेस पावून ज्या वेळेस माझ्याच भजनी लागले, त्याच वेळी त्यांचीचिंता मला पडली.
339-9
मग तीहीं जें जें करावे । तें मजचि पडिलें आघवें । जैशी अजातपक्षांचेनि जीवें । पक्षिणी जिये ॥339॥
मग जें जें काही करण्याचे ते मनांत आणतात; ते सर्व मला करावे लागते. ज्याप्रमाणे पंख न फुटलेल्या पक्ष्यांच्या जीवनाकरितां पक्षिणीच सारखी खटपट करीत असते,
340-9
आपुली तहानभूक नेणे । तान्हया निकें तें माउलीसीचि करणें । तैसे अनुसरले जे मज प्राणें । तयांचेन काइसेनिहि न लजें मी ॥340॥
कींवा, आपली तहानभूक न जाणतां, आपल्या तान्ह्या लेंकरास जे सुखकारक तेंच आईला करावे लागते, त्याचप्रमाणे, ज्यांनी मनापासून सर्व भार मजवर टाकला आहे,

341-9
तया माझिया सायुज्याची चाड । तरि तेंचि पुरवीं कोड । कां सेवा म्हणती तरी आड । प्रेम सुयें ॥341॥
त्यांचे सर्व इच्छित मीच पूर्ण करतो. त्यांना माझ्या ऐक्याची इच्छा झाली, तर मी त्यांचे कौतुक पुरवितो; किंवा माझी सेवाच करावी असे ते म्हणतील, तर त्यांच्या व माझ्यामध्ये प्रेमभाव उत्पन्न करतो.
342-9
ऐसा मनीं जो जो भावो । तो तो पुढां पुढां लागें तयां देवों । आणि दिधलियाचा निर्वाहो । तोहि मीचि करीं ॥342॥
याप्रमाणे ते आपल्या मनांत जी जी इच्छा करतात, ती ती वारंवार मला पुरवावी लागते; आणि जें त्यांना दिलेले असते, त्याचें रक्षणही मीच करतो.
343-9
हा योगक्षेमु आघवा । तयांचा मजचि पडिला पांडवा । जयांचियां सर्वभावां । आश्रयो मी ॥343॥
हे पांडवा, ज्यांचा सर्व भाव मजवरच असतो, त्यांचा योगक्षेम मजवरच पडतो
येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता: ।
तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम्॥29.3॥

344-9
आतां आणिकही संप्रदायें । परि मातें नेणती समवायें । जे अग्नि-इंद्र-सूर्य-सोमाये । म्हणऊनि यजिती ॥344॥
आतां मी सर्वव्यापकरूपाने आहे असे न जाणून प्रत्येक सांप्रदायिक लोक अग्नि, इंद्र, सुर्य, चंद्र यांना मीच जाणून भजतात;
345-9
तेंही कीर मातेंचि होये । कां जे हें आघवें मीचि आहें । परि ते भजती उजरी नव्हे । विषम पडे ॥345॥
ते त्यांचे पूजन खरोखर माझेच होते, कारण या सर्व जगांत मीच भरून राहिलो आहे, परंतु तें त्यांचे भजन पद्धतशीर नसून चुकलेले असते

346-9.
पाहे पां शाखा पल्लव वृक्षाचे । हे काय नव्हती एकाचि बीजाचे । परि पाणी घेणें मुळाचें । तें मुळींचि घापे ॥346॥
हे पहा, वृक्षांच्या शाखा, पाने वगैरे एकाच बीजापासून उत्पन्न झालेली नव्हत का? परंतु पाणी जे घालावयाचे, ते मुळाशीच घातले पाहिजे;
347-9
कां दहाहीं इंद्रियें आहाती । इयें जरी एकेचि देहींचीं होती । आणि इहीं सेविले विषयो जाती । एकाचि ठाया ॥347॥
किंवा दहा ईंद्रिये जरी एकाच देहाची आहेत, आणि त्यांनी सेवन केलेले विषय जरी एकाच ठिकाणीं जातात,
348-9
तरि करोनि रससोय बरवी । कानीं केविं भरावी । फुलें आणोनि बांधावीं । डोळां केविं ॥348॥
तरी उत्तम स्वयंपाक करून तो कानांत कसा घालावा? आणि फुले आणून डोळ्यांनी कशी हुंगावी?
349-9
तो रसु तो मुखेंचि सेवावा । परिमळु तो घ्राणेंचि घ्यावा । तैसा मी तो यजावा । मीचि म्हणोनि ॥349॥
तर अन्न हे तोंडानेंच सेवन केले पाहीजे, आणि सुवास हा नाकानेच घेतला पाहिजे, त्याचप्रमाणे माझी पुजा करणे ती मीच समजून केली पाहिजे.
350-9
येर मातें नेणोनि भजन । तें वायांचि गा आनेंआन । म्हणोनि कर्माचे डोळे ज्ञान । तें निर्दोष होआवें ॥350॥
एरव्ही, मला न जाणतां जे भजन ते, करणे कांही तरी असून व्यर्थ होय. म्हणून, कर्म आचरण्यास ज्ञान ही दृष्टि आहे; तर ते ज्ञान निर्दोष असे झाले पाहिजे.
अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च ।
न तु मामभिजानंति तत्वेनातश्च्यवंति ते ।9. 24 ।

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *