सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी ३०१ ते ३२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

301-9
तरंग पाणियेंवीण सुकती । रश्मि वातीवीण न देखती । तैसे मीचि ते मी नव्हती । विस्मो देखे ॥301॥
ज्याप्रमाणे लाटा पाण्याशिवाय आटाव्या किंवा सुर्यकिरण दिव्याच्या उजेडाशिवाय दिंसू नयेत, त्याप्रमाणे सर्व जीव मीच बनलेला असून, ते मला ओळखत नाहीत, हे केवढे आश्चर्य आहे
302-9
हें आतबाहेर मियां कोंदलें । जग निखिल माझेंचि वोतिलें । कीं कैसें कर्म तयां आलें । जे मींचि नाही म्हणती 302॥
पहा. या सकल विश्वांत अंतर्बाह्य मीच भरलेला आहे, व हे जग मद्रूपच आहे; परंतु जीवांची कर्मे त्यांस कशी आड येतात पहा, की ते मलाच ‘ नाही ‘ असे म्हणतात.
303-9
परि अमृतकुहां पडिजे । कां आपणयातें कडिये काढिजे । ऐसें आथी काय कीजे । अप्राप्तासि ॥303॥
परंतु अमृताच्या कूपांत पडल्यावर ज्याप्रमाणे एखादा मनुष्य आपल्याला बाहेर काढा असे म्हणतो, तेव्हां अशा त्या अभाग्याला काय म्हणावे?
304-9
ग्रासा एका अन्नासाठीं । अंधु धांवताहे किरीटी । आडळला चिंतामणि पायें लोटी । आंधळेपणे ॥304॥
हे किरीटी, अन्नाकरितां धावणाऱ्या अंधळ्याला चिंतामणी सांपडला असता दृष्टि नसल्यामुळे तो जसा त्याला पायाने लोटून देतो,
305-9
तैसें ज्ञान जैं सांडुनि जाये । तैं ऐसी हे दशा आहे । म्हणोनि कीजे तें केलें नोहे । ज्ञानेंवीण ॥305॥
त्याप्रमाणे ज्ञानाचा त्याग केला म्हणजे अशी स्थिती होते; म्हणून ज्ञानाशिवाय जी जी कर्मे करावी तीं न केल्यासारखी आहेत.

306-9
आंधळेया गरुडाचे पांख आहाती । ते कवणा उपेगा जाती । तैसें सत्कर्माचे उपखे ठाती । ज्ञानेंवी ण ॥306॥
अंधळ्याला गरुडाचे पंख जरी मिळाले, तरी त्याला काय उपयोग होणार? त्याचप्रमाणे, ज्ञानाशिवाय सत्कर्माचे श्रम व्यर्थ आहेत.
त्रैविद्या मां सोमपा: पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते । ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकमश्नन्ति दिव्यान्दिवि देवभोगान्॥9.20॥
307-9
देख पां गा किरीटी । आश्रमधर्माचिया राहाटी । विधिमार्गा कसवटी । जे आपणचि होती ॥307॥
अरे अर्जुना, हे पहा, वर्णविहित धर्माचे आचरण करून जे आपणच विधिमार्गाची कसोटी बनतात, (वेदांत सागितल्याप्रमाणे यथाविधि आचरण करतात,)
308-9
यजन करितां कौतुकें । तिहीं वेदांचा माथा तुके । क्रिया फळेंसि उभी ठाके । पुढां जयां ॥308॥
ते यज्ञ करूं लागले म्हणजे तीन्ही वेद संतोष पावून मान डोलवितात, व त्यांच्यापुढे क्रियाही फलप्राप्तीसह उभी राहते.
309-9
ऐसे दीक्षित जे सोमप । जे आपणचि यज्ञाचें स्वरुप । तींहीं तया पुण्याचेनि नांवें पाप । जोडिलें देखें ॥309॥
याप्रमाणे यज्ञांतील सोमपान करणारे यज्ञकर्ते (दीक्षित) जे आपणच यज्ञरूप होतात, त्यांनी, नाव मात्र पुण्य परंतु खरोखर पापाचीच जोड केली असे समज
310-9
जे श्रुतित्रयांते जाणोनि । शतवरी यज्ञ करुनि । यजिलिया मातें चुकोनि । स्वर्गु वरिती ॥310॥
ते ऋक्, यजु व साम या तीन्ही वेदांस जाणून शंभर यज्ञांनी माझे यजन करतात; परंतु माझ्या प्राप्तीची इच्छा सोडून स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात.

311-9
जैसें कल्पतरुतळवटीं । बैसोनि झोळिये पाडी गांठी । मग निदैव निघे किरीटी । दैन्यचि करुं ॥311॥
अर्जुना, ज्याप्रमाणे एखादा हतभाग्य मनुष्य कल्पतरूचे खाली बसून झोळीच्या पदरास गांठी मारतो, आणि मग भिक्षा मागण्यास निंघतो
312-9
तैसे शतक्रतूं यजिलें मातें । कीं ईप्सिताति स्वर्गसुखांतें । आतां पुण्य कीं हें निरुतें । पाप नोहे ॥312॥
त्याप्रमाणे, शंभर यज्ञांनी माझे यजन करून ते स्वर्गसुखाची इच्छा करतात; तेव्हां हे पुण्य नसून खरोखर पाप नव्हे का?
312-9
म्हणोनि मजवीण पाविजे स्वर्गु । तो अज्ञानाचा पुण्यमार्गु । ज्ञानिये तयातें उपसर्गु । हानि म्हणती ॥313॥
म्हणून, माझ्या प्राप्तीची इच्छा सोडून जे स्वर्गाला जातात, त्यांना अज्ञानी लोक पुण्यमार्ग म्हणोत,परंतु ज्ञानी जे आहेत, ते, तो जन्ममरणरूप फेऱ्यांत पडून त्याची हानि झाली असे म्हणतात.
314-9
एऱ्हवीं तरी नरकींचें दुःख । पावोनि स्वर्गा नाम कीं सुख । वांचूनि नित्यानंद गा निर्दोष । तें स्वरुप माझें ॥314॥
एरव्ही नरकांतीलदुःखाच्या मानाने स्वर्गप्राप्तीला सुख म्हणतां येईल; परंतू या दोहोंशिवाय अखंड आनंददायक व निर्दोष असे जे सुख, ते माझे स्वरूप होय.
315-9
मज येतां पैं सुभटा । या द्विविधा गा अव्हांटा । स्वर्गु नरकु या वाटा । चोरांचिया॥315॥
हे महावीरा अर्जुना, माझ्याकडे येण्याला स्वर्ग व नरक हे दोन आडमार्ग असून चोरांच्या वाटा आहेत.

316-9
स्वर्गा पुण्यात्मकें पापें येईजे । पापात्मकें पापें नरका जाइजे । मग मातें जेणें पाविजे । तें शुद्ध पुण्य ॥316॥
स्वर्गप्राप्ति पुण्यात्मक पापाने होते, व नरकप्राप्ति पापात्मक पापाने होते,पण ज्या योगाने माझी प्राप्ति होते, ते शुद्ध पुण्य समज.
317-9

आणि मजचिमाजीं असतां । जेणें मी दूरी होय पांडुसुता । तें पुण्य ऐसें म्हणतां । जीभ न तुटे काई ॥317॥
हे पंडुसुता माझाच अंश असून ज्या कर्मामुळे मी अंतरतो, त्याला पुण्य असे जर म्हटले, तर जीभ तुटणार नाही काय?
318-9
परि हें असो आतां प्रस्तुत । ऐकें यापरि ते दीक्षित । यजुनि मातें याचित । स्वर्गभोगु ॥318॥
परंतु हे आता राहू दे. याप्रमाणे ते दीक्षित माझे यजन करून स्वर्गभोगाची इच्छा करतात.
319-9
मग मी न पविजे ऐसें । जें पापरुप पुण्य असे । तेणें लाधलेनि सौरसें । स्वर्गा येती ॥319॥
मग ज्या पुण्याने मी पावणार नाही असे पापरूप पुण्य प्राप्त करून हौसेने स्वर्गी जातात.
320-9
जेथ अमरत्व हेंचि सिंहासन । ऐरावतासारिखें वाहन । राजधानीभुवन । अमरावती ॥320॥
जेथे अमरत्व हेच सिंहासन ऐरावतासारखे वाहन, अमरावती हे राजधानीचे शहर;

321-9
जेथ महासिद्धींची भांडारें । अमृताचीं कोठारें । जियें गांवीं खिल्लारें । कामधेनूंचीं ॥321॥
जेथे अष्टमहासिद्धीचीभांडारे आहेत, अमृताची कोठारे आहेत, व ज्या गांवांत कामधेनूचे कळपच्या कळप आहेत;
322-9
जेथ वोळगे देव पाइका । सैघंचिंतामणीचिया भूमिका । विनोदवनवाटिका । सुरतरुंचिया ॥322॥
जेथे देवांच्या चाकरांना वागण्याकरितां चिंतामणीच्या वाटा आहेत व कल्पतरूंची उपवने आहेत;
323-9
गंधर्वगान गाणीं । जेथ रंभेऐशिया नाचणी । उर्वशी मुख्य विलासिनी । अंतौरिया ॥323॥
जेथे गंधर्व गायन करताहेत, रंभेसारख्या अप्सरा नृत्य करणाऱ्या आहेत, व जेथे उर्वशीप्रमुख स्त्रिया विलासाकरितां आहेत,
324-9
मदन वोळगे शेजारे । जेथ चंद्र शिंपे सांबरें । पवना ऐसें म्हणियारें । धांवणें जेथ ॥324॥
ज्या ठिकाणीं मदन सेजघरांत चाकरी करतो आहे, चंद्र सडा संमार्जन करतो आहे, व वायूसारखे धावनारे चाकर आहेत,
325-9
पैं बृहस्पति आपण । ऐसे स्वस्तीश्रियेचेब्राह्मण । ताटियेचे सुरगण । विकार जेथें ॥325॥
इंद्राला आशीर्वाद देणारांत बृहस्पतीसारखे मुख्य ब्राह्मण आहेत, व ज्यांच्या पंक्तीला देवमंडळी आहेत,

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *