सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ३२६ ते ३५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

326-11
तैसें या जगासि जाहलें । तूंतें देखोनि तळमळित ठेलें । यामाजीं पैल भले । ज्ञानशूरांचे मेळावे ॥326॥
त्याप्रमाणे या संपूर्ण त्रैलोक्याला झालें असून, तुला पाहून, ते अत्यंत तळमळत आहे. यामध्यें पलीकडे मोठमोठे ज्ञानियांचे मेळावेहि आहेत.
अमी हि त्वां सुरसंघा विशन्ति
केचिद्भीताः प्राञ्जलयो गृणन्ति ।
स्वस्तीत्युक्त्वा महर्षिसिद्धसङ्घाः
स्तुवन्ति त्वां सुतिभिः पुष्कलाभिः॥11.21

अर्थ हे देवांचे समुदाय तुझ्यामधे प्रवेश करीत आहेत, कोणी भयभीत होत्साते अंजलि करून तुझे स्तवन करत आहेत. महर्षी व सिद्ध यांचे समुदाय ‘स्वस्ति’ असे म्हणून दीर्घ स्तोत्रांनी तुझी स्तुती करत आहेत.॥11-21॥
327-11
हे तुझेनि आंगिकें तेजें । जाळूनि सर्व कर्मांचीं बीजें । मिळत तुज आंतु सहजें । सद्भावेसीं ॥327॥
हे देवांचे समुदाय, तुझ्या अंगाच्या तेजानें आपल्या सर्व कर्माची बीजें जळून आपल्या सद्भावाने तुझ्यांत मिळत आहेत.
(चैतन्य प्रकाशरूप परमेश्वराचे ठिकाणी, त्यावांचून कर्म म्हणून दुसरी वस्तुच नाही, या ज्ञानाने किंवा कर्मरूपानेहि परमेश्वरच भासतो, या ज्ञानाने भगवाज्ञा समजून भगवत्प्रित्यर्थ निष्काम कर्मयोगानुष्ठान करून आपलें कर्मकर्तृत्व निःशेष नाहीसे करतात.)
328-11
आणिक एक सावियाचि भयभीरु । सर्वस्वें धरूनि तुझी मोहरु । तुज प्रार्थिताति करु । जोडोनियां ॥328॥
आणि कित्येक खरोखरच भयभीत होऊन व सर्वस्वीं तुझ्याकडे दृष्टि देऊन, हात जोडून तुझी प्रार्थना करीत आहेत की,
329-11
देवा अविद्यार्णवीं पडिलों । जी विषयवागुरें आंतुडलों । स्वर्गसंसाराचिया सांकडलों । दोहीं भागीं ॥329॥
देवा!आम्ही तुला निःशेष विसरलों आहों व विषयसक्तिरूप जाळ्यांत सांपडलो आहों. त्यामुळें स्वर्गसुख व संसारसुख या दोहोंच्या कात्रींत अडकून पडलों आहो.
330-11
ऐसें आमुचें सोडवणें । तुजवांचोनि कीजेल कवणें? । तुज शरण गा सर्वप्राणें । म्हणत देवा ॥330॥
अशा आमची,येथून सुटका आतां तुझ्यावांचून कोण करणार? देवा! आम्ही तुलाच पंचप्राण समर्पण करून शरण आलों आहों, असे म्हणत आहे


331-11
आणि महर्षी अथवा सिद्ध । कां विद्याधरसमूह विविध । हे बोलत तुज स्वस्तिवाद । करिती स्तवन ॥331॥
आणि महर्षि अथवा सिध्द, तसेच नानाविध विद्याधरांचे समुदाय “तुझे कल्याण असो” असे म्हणून तुझें स्तवन करीत आहेत.
रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेऽश्विनौ मरुतश्चोश्मपाश्च । गन्धर्वयक्षासुरसिद्धसङ्घा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे॥22॥
अर्थ अकरा रुद्र, बारा आदित्य, अष्ट वसु, साध्य, विश्वेदेव, अश्विनीकुमार, वायु, पितर, गंधर्व, यक्ष, राक्षस यांचे समुदाय सर्व विस्मययुक्त झालेले तुझ्याकडे पहात आहेत.॥11-22॥
332-11
हे रुद्रादित्यांचे मेळावे । वसु हन साध्य आघवे । अश्विनौ देव विश्वेदेव विभवें । वायुही हे जी ॥332॥
अकरा रुद्रांचा समूह, बारा सूर्याचा समूह, आठ वसू, सर्वसाध्य, अश्विनुकुमार, वैभवाने युक्त असे विश्वदेव, तसेच वायु
333-11
अवधारा पितर हन गंधर्व । पैल यक्षरक्षोगण सर्व । जी महेंद्रमुख्य देव । कां सिद्धादिक ॥333॥
पहा!पितर, गंधर्व, पलीकडें असलेले यक्षराक्षसगण, इंद्रादिदेव आणि सिध्दादिक
334-11
हे आघवेचि आपुलालिया लोकीं । सोत्कंठित अवलोकीं । हे महामूर्ती दैविकी । पाहात आहाती ॥334॥
हे सर्वच आपआपल्या लोकांमध्ये अंत उत्कंठित होऊन तुझ्या या दैवी महामूर्तीकडे पाहात आहेत, हे पहा.
335-11
मग पाहात पाहात प्रतिक्षणीं । विस्मित होऊनि अंतःकरणीं । करित निजमुकटीं वोवाळणी । प्रभुजी तुज ॥335॥
मग पाहत पाहत क्षणोक्षणी अंतःकरणांत आश्चर्यचकित होऊन, आपल्या शिरावर असलेल्या मुकुटांची तुझ्यावरून ओवाळणी करीत आहेत.


336-11
ते जय जय घोष कलरवें । स्वर्ग गाजविताती आघवे । ठेवित ललाटावरी बरवे । करसंपुट ॥336॥
तें मंजुळ शब्दांनी तुझा जयघोष करून, संपूर्ण स्वर्ग दुमदुमून टाकीत आहेत आणि सुंदर जोडलेले हात ते मस्तकावर ठेवित आहेत.
337-11
तियेविनयद्रुमाचिये आरवीं । सुरवाडे सात्त्विकांची माधवी । म्हणौनि करसंपुटपल्लवीं । तूं होतासिफळ ॥337॥
त्या अत्यंत नम्रतारूप वृक्षाच्या अरण्यांत सात्विक गुणांच्या वसंतऋतूंचें ऐश्वर्य प्रगट झालें; म्हणून त्यांच्या जोडलेल्या हस्तरूपी पदरांत फळरूपाने तूं प्राप्त होतोस.
रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रं महाबाहो बहुबाहूरुपादम् ।
बहूदरं बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्तथाऽहम्॥11.23॥

अर्थ हे महाबाहो, अनंत मुखे व नेत्र असलेले अनंत बाहू, मांड्या व पाय असलेले, अनंत उदरे असलेले, अनंत दाढांच्या योगे भीषण असलेले तुझे प्रचंड रूप पाहून तसाच मी देखील व्याकुळ झालो आहे.॥11-23॥
338-11
जी लोचनां भाग्य उदेलें । मना सुखाचें सुयाणें पाहलें । जे अगाध तुझें देखिलें । विश्वरूप इहीं ॥338॥
अहो जी भगवंता ! मन व डोळे यांनी जें तुझें अगाध विश्वरूप पाहिलें, तें डोळ्यांचे भाग्य उदयाला आलें व मनाने सुखाचा सुकाळ पाहिला.
339-11
हें लोकत्रयव्यापक रूपडें । पाहतां देवांही वचक पडे । याचें सन्मुखपण जोडें । भलतयाकडुनी ॥339॥
हें तिन्ही लोकांना व्यापून असणारें तुझें विश्वरूप पाहतांना देवांनाहिं धाक उत्पन्न होतो आणि कोणालाहि तें सन्मुखच वाटतें.
340-11
ऐसें एकचि परी विचित्रें । आणि भयानकें वक्त्रें । बहुलोचन हे सशस्त्रें । अनंतभुजा ॥340॥
याप्रमाणे हें तुझें विश्वरूप एकच पण विचित्र आणि भयानक अशा भयानक अशा असंख्य मुखांनी नेत्रांनी व शस्रयुक्त अनंत भुजांनी युक्त आहे.


341-11
अनंत चारु बाहु चरण । बहूदर आणि नानावर्ण । कैसें प्रतिवदनीं मातलेपण । आवेशाचें ॥341॥
या विश्वरूपाचे ठिकाणी असंख्य उर, बाहू व चरण असून बहु उदरें आणि नाना वर्ण आहेत आणि प्रत्येक मुखाचे ठिकाणी खाण्याच्या आवेशाचा माज कसा दिसून येतो, पहा !
342-11
हो कां महाकल्पाचिया अंतीं । तवकलेनि यमें जेउततेउतीं । प्रळयाग्नीचीं उजितीं । आंबुखिलीं जैसीं भीम ॥342॥
जणुं काय महाकल्पाच्या शेवटीं क्रुध्द झालेल्या यमाने जिकडे तिकडे प्रलयकालच्या अग्नीच्या होळ्याच पहरल्या आहेत.
343-11
नातरी संहारत्रिपुरारीचीं यंत्रें । कीं प्रळयभैरवाचीं क्षेत्रें । नाना युगांतशक्तीचीं पात्रें । भूतखिचा वोढविलीं ॥343॥
किंवा सृष्टि संहार करणार्‍या शंकराची शस्रास्रेंच. की प्रलयकालच्या भैरवाचीं शरीरेंच आणि युगाचा अंत करणार्‍या शक्तीची सोंगे भूतांचा नाश करण्याकरितां प्राप्त झाली.
344-11
तैसीं जियेतियेकडे । तुझीं वक्त्रें जीं प्रचंडें । न समाती दरीमाजीं सिंव्हाडे । तैसे दशन दिसती रागीट ॥344॥
त्याप्रमाणे जिकडे तिकडे तुझीं असलेली भयंकर मुखे मावत नाहीत आणि तसेंच त्यांतील दांत दरीतील क्रुध्द सिंहाप्रमाणे रागीट दिसतात.
345-11
जैसें काळरात्रीचेनि अंधारें । उल्हासत निघतीं संहारखेंचरें । तैसिया वदनीं प्रळयरुधिरें । काटलिया दाढा ॥345॥
ज्याप्रमाणे प्रलयकाळाच्या गडद अंधाराचा आश्रय करून प्राण्यांचा नाश करणारी पिशाच्चें अत्यंत उल्हासाने वावरतात, त्याप्रमाणे तुमच्या मुखांतील दाढा, जणूं काय प्रलयकालीं संहार पावणार्‍या प्राण्यांच्या रक्ताने माखलेल्या आहेत.


346-11
हें असो काळें अवंतिलें रण । कां सर्व संहारें मातलें मरण । तैसें अतिभिंगुळवाणेंपण । वदनीं तुझिये ॥346॥
हे असो, काळानेच युध्दाला आमंत्रण दिल्याप्रमाणे किंवा सर्व प्राण्यांचा संहार करून मरणाने माजावें, त्याप्रमाणे तुझ्या या मुखांचा देखावा अत्यंत भयंकर दिसत आहे.
347-11
हे बापुडी लोकसृष्टी । मोटकीये विपाइली दिठी । आणि दुःखकालिंदीचिया तटीं । झाड होऊनि ठेली ॥347॥
ही बिचारी सृष्टि, तूं सहज दृष्टिने पाहिलीस आणि ती दुःखरूपी यमुनानदीच्या तीरावरील कालियासर्पाच्या विषाने करपलेल्या वृक्षाप्रमाणे होऊन राहिली आहे.
348-11
तुज महामृत्यूचिया सागरीं । आतां हे त्रैलोक्य जीविताची तरी । शोकदुर्वातलहरी आंदोळत असे ॥348॥
तुझ्या या महामृत्युच्या सागरांत, त्रैलोक्याच्या आयुष्याची नौका, दुःखरूपी वादळांतील लाटांनी हेलकावे खात आहे.
349-11
एथ कोपोनि जरी वैकुंठें । ऐसें हन म्हणिपैल अवचटें । जें तुज लोकांचें काई वाटे? । तूं ध्यानसुख हें भोगीं ॥349॥
या माझ्या म्हणण्याचा राग येऊन, भगवंता!आपण जर कदाचित असे म्हणाल की, तुलाया लोकांचे काय उगीच वाईट वाटत आहे!तूं माझ्या विश्वरूप ध्यानाचे सुख भोग.
350-11
तरी जी लोकांचें कीर साधारण । वायां आड सूतसे वोडण । केवीं सहसा म्हणे प्राण । माझेचि कांपती ॥350॥
पण खरोखरदेवा!भीतीने माझ्या जीवाचा थरकाप झाला आहे,असेमी एकदम कसें म्हणूं?म्हणूनच मी, व्यर्थ लोकांच्या दुःखांचे सामान्य निमित्त पुढें करीत आहे.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *