सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी ३५१ ते ३७५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

351-9
एऱ्हवीं पाहें पां पंडुसुता । या यज्ञोपहारां समस्तां । मीवांचूनि भोक्ता । कवणु आहे॥351॥
अर्जुना, एरव्ही असे पहा की, या सर्व यज्ञोपचारांचा माझ्यावांचून दुसरा कोण भोक्ता आहे?
352-9
मी सकळां यज्ञांचा आदि । आणि यजना या मीचि अवधि । कीं मातें चुकोनि दुर्बुद्धि । देवां भजले ॥352॥
मी सकळां यज्ञांचा आदि । आणि मी सर्व यज्ञांचा आदि आहे, व यजनाचा शेवटही मीच आहे; परंतु दुर्बुद्धि जे असतात, ते मला सोडून इंद्रादि देवांसभजतात.
353-9
गंगेचे उदक गंगे जैसें । अर्पिंजे देवपित्तरोद्देशें । माझे मज देती तैसें । परि आनानीं भावीं ॥353॥
ज्याप्रमाणे गंगेचे पाणी देव व पितर यांच्या नांवाने गंगेतच अर्पण करतात, त्याप्रमाणे ते माझे मलाच देतात
354-9
म्हणऊनि ते पार्था । मातें न पवतीचि सर्वथा । मग मनीं वाहिली जे आस्था । तेथ आले ॥354॥
पण निराळ्या भावानें! म्हणून पार्था, ते कधीही मला पावत नाहींत; मग मनांत जी इच्छा धारण करतात, त्या ठिकाणीं ते जातात.
यान्ति देवव्रता देवान्पितॄन्यान्ति पितृव्रता: ।
भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्॥9.25॥

355-9
मनें वाचा करणीं । जयांचीं भजनें देवांचिया वाहणी । ते शरीर जातियेक्षणीं । देवचि जाले ॥355॥
मन, वाचा व इंद्रिये यांच्या योगाने जे इंद्रादि देवांचे भजन करतात, ते, शरीर जाताक्षणीच देवरूप होतात.

356-9
अथवा पितरांचीं व्रतें । वाहती जयांचीं चित्तें । जीवित सरलिया तयांतें । पितृत्व वरी ॥356॥
अथवा, ज्यांच्या मनाने पितरांची व्रते करण्याचे घेतले आहे, त्यांना प्राणांती पितृलोक प्राप्त होतो;.
357-9
कां क्षुद्रदेवतादि भूतें । तियेंचि जयांचीं परमदैवतें । जींहीं अभिचारिकीं तयांतें । उपासिलें ॥357॥
किंवा वेताळादि पिशाच व शुद्र देव ही ज्यांची परम दैवते आहेत, व ज्यांनी घातक अशा जारणमारण कर्मांनी त्यांची उपासना केली आहे,
358-9
तयां देहांची जवनिक फिटली । आणि भूतत्वाची प्राप्ती जाहली । एवं संकल्पवशें फळलीं । कर्में तयां ॥358॥
त्यांना देहाचा पडदा पडतांच पिशाचयोनीची प्राप्ति होते.अशा प्रकारे त्यांच्या संकल्पाप्रमाणे त्यांची कर्मे त्यांना फळतात!
359-9
मग मीचि डोळां देखिला । जींहीं कानीं मीचि ऐकिला । मनीं मी भाविला । वानिला वाचा ॥359॥
मग जे दृष्टीनें मलाच पाहतात, कानांनी माझ्याच नांवाचे श्रवण करतात, मनाने माझेच ध्यान करतात, व माझेच वर्णन करतात,
360-9
सर्वांगीं सर्वाठायीं । मीचि नमस्कारिला जिहीं । दानपुण्यादिकें जें कांहीं । तें माझियाचि मोहरा ॥360॥
सर्वांगाने व सर्व ठिकाणीं मलाच नमस्कार करतात, दानें, पुण्य वगैरे सर्व काही माझ्याच उद्देशाने करतात,

361-9
जिहीं मातेंचि अध्ययन केलें । जे आंतबाहेर मियांचि धाले । जयांचे जीवित्व जोडलें । मजचिलागीं ॥361॥
ज्यांनी माझ्या नामस्मरणाचेंच अध्ययन केले आहे, जे माझ्याच योगाने अंतर्बाह्य तृप्त झाले आहेत, ज्यांनी आपले आयुष्य माझ्याकडेच खर्च केले आहे,
362-9
जे अहंकारु वाहत आंगीं । आम्ही हरीचे भूषावयालागीं । जे लोभिये एकचि जगीं । माझेनि लोभें ॥362॥
ज्यांना माझ्याशिवाय दुसऱ्या कसल्याही प्राप्तीची इच्छा नाही; आम्ही हरिची कीर्ती वाढविणारे आहो असा जे अहंकार बाळगतात,
363-9
जे माझेनि कामें सकाम । जे माझेनि प्रेमें सप्रेम । जे माझिया भुली सभ्रम । नेणती लोक ॥363॥
माझीच इच्छा करून ज्यांची इच्छा पूर्ण होते, जे मजवरच प्रेम ठेवून आनंदित होतात, जे माझ्याच मुळे वेडावून जाऊन लोकांची पर्वा करीतनासे होतात,
364-9
जयांचीं जाणती मज शास्त्रें । मी जोडें जयाचेनि मंत्रें । ऐसे जे चेष्टामात्रें । भजले मज ॥364॥
मलाच जाणणे हींच ज्यांची शास्त्रे आहेत, आणि ज्यांच्या गुरुमंत्राने इतरांना माझीप्राप्ति होते, व अशा प्रकारे जे सर्व व्यवहारांत माझ्याशिवाय इतर कोणाचेंच भजन करीत नाही,
365-9
ते मरणाऐलीचकडे । मज मिळोनि गेले फुडे । मग मरणीं आणिकीकडे । जातील केविं ॥365॥
ते मरणाच्या अगोदरच मद्रूप होऊन जातात; मग मरणानंतर माझ्याशिवाय दुसरीकडे कसे जातील?

366-9
म्हणोनि मद्याजी जे जाहाले । ते माझिया सायुज्या आले । जिहीं उपचारमिषें दिधलें । आपणपें मज । 366 ।
म्हणून, माझे यजन करणारे जे होतात, ते माझ्यांत मिसळतात; कारण त्यांनी सेवेच्या मिषाने आपलेपणा मला अर्पण केला आहे.
367-9
पैं अर्जुना माझां ठायीं । आपणपेवीण सौरसु नाहीं । मी उपचारीं कवणाही । नाकळें गा ॥367॥
अर्जुना, माझ्या ठिकाणीं आत्मत्व समर्पण केल्याशिवाय माझ्यावर त्यांचे खरे प्रेम उत्पन्न होत नाही. म्हणून दुसऱ्या कोणत्याही उपायाने मी प्राप्त होत नाही
368-9
एथ जाणिव करी तोचि नेणे । आथिलेंपण मिरवी तेंचि उणें । आम्ही जाहलों ऐसें जो म्हणे । तो कांहींचि नव्हे l368l
मजविषयी ज्ञान झाले असे जो म्हणतो, त्याला खरोखर माझे ज्ञान होत नाही. मी कृतार्थ झालो असे जो दाखवितो,तो कृतार्थ होत नाही.
369-9
अथवा यज्ञदानादि किरीटी । कां तपें हन जे हुटहुटी । ते तृणा एकासाठीं । न सरे एथ ॥369॥
अथवा, हे किरीटी, आम्ही यज्ञ केले; आम्ही धर्म केला, किंवा आम्ही तप केले, अशी जी घमेंड बाळगतात, त्यांना माझ्या प्राप्तीच्या मानाने पाहिले असतां काडीइतकीही योग्यता नसते.
370-9
पाहें पां जाणिवेचेनि बळें । कोण्ही वेदापासूनि असे आगळें । कीं शेषाहूनि तोंडागळें । बोलकें आथी ॥370॥
हे पहा, ज्ञानबलात वेदाहून कोणी अधिक जाणता आहे काय? किंवा शेषापेक्षा बोलण्यांत किंवा मुखांनी कोणी अधिक आहे काय?

371-9
तोही आंथरुणातळवटी दडे । येरु नेति नेति म्हणोनि बहुडे । एथ सनकादिक वेडे । पिसे जाहले ॥371॥
पण तो शेषही ज्याच्या अंथरूणाखाली दडतो, वेदही ” नेति नेति ” म्हणून मागे सरतो, तसेच सनकादिक पूर्ण ब्रह्मज्ञानीही ज्याच्याविषयी वेडे झाले आहेत;
372-9
करितां तापसांची कडसणी । कवणु जवळां ठेविजे शूळपाणी । तोहि अभिमानु सांडूनि पायवणी । माथां वाहे ॥372॥
तपस्व्यांची गणती करू लागले तर महादेवाच्या योग्यतेला दुसरा कोण लागेल? परंतु त्यानेही अभिमान सोडून ज्याचे पादोदक म्हणजे भागीरथी आपले मस्तकावर धारण केली आहे;
373-9
नातरी आथिलेपणें सरिसी । कवणी आहे लक्ष्मियेऐसी । श्रियेसारिखिया दासी । घरीं जियेतें ॥373॥
किंवा संपन्नपणांत लक्ष्मीपेक्षा कोणी अधिक आहे का? तिच्या घरी सिद्धीसारख्या दासी आहेत.,
374-9
तियां खेळतां करिती घरकुली । तयां नामें अमरपुरें जरि ठेविलीं । तरि न होती काय बाहुलीं । इंद्रादिक तयांचीं? ॥374
त्या दासी आपल्या खेळांत जी घरकुली करतात, त्यांचे नाव जर अमरपुरी ठेविले, तर इंद्रादिक देव हे त्यांच्या घरकुल्यातील बाहुली होणार नाहींत काय?
375-9
तयां नावडोनि जेव्हां मोडती । तेव्हां महेंद्राचे रंक होती । तिया जेउते झाडां पाहती । ते कल्पवृक्ष ॥375॥
पुढे त्या दासींना ती घरकुली न आवडून जेंव्हा ती मोडतात, तेंव्हा इंद्राचे रंक बनतात व त्या ज्या झाडाकडे पाहतात, ती झाडे कल्पवृक्ष होतात;

, ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading