सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ५७६ ते ५९९ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

576-15
म्हणौनि जगीं गीता । मियां आत्मेनि पतिव्रता । जे हे प्रस्तुत तुवां आतां । आकर्णिली ॥ 576 ॥
म्हणून प्रस्तुत तुला जिचे श्रवण घडले ती ही गीता, मला आत्मारामाला वरिल्यामुळे सर्व जगामध्ये पतिव्रता आहे. 76
577-15
साचचि बोलाचें नव्हे हें शास्त्र । पैं संसारु जिणतें हें शस्त्र । आत्मा अवतरविते मंत्र । अक्षरें इयें ॥ 577 ॥
अर्जुना, खरें सांगतों; नुसत्या वाक्पांडित्यासठ हे गीताशास्त्र निर्माण झाले नाही, तर संसारशत्रुचा नाश करणारें हे शस्त्र आहे, अथवा, हीं गीताक्षरे म्हणजे निर्गुण आत्म्याला मूर्त रूपाने अवतरित व्हावयास लावणारे जणु मंत्र आहेत. 77
578-15
परी तुजपुढां सांगितलें । तें अर्जुना ऐसें जालें । जें गौप्यधन काढिलें । माझें आजि ॥ 578 ॥
जवळचा गुप्त ठेवा बाहेर काढावा, तशासारखेच, आज तुला गीता ऐकविली, हे झालं. 78
579-15
मज चैतन्यशंभूचा माथां । जो निक्षेपु होता पार्था । तया गौतमु जालासि आस्था- । निधी तूं गा ॥ 579 ॥
शंकराच्या जटेत गुप्त असलेल्या गंगेचे गौतमाच्या तपाने जसे अवतरण झाले त्याप्रमाणे चैतन्यशंभु जो मी, त्या माझ्या अंतःकरणांत गुप्त असलेली जी ज्ञानगंगा, तिला मुखवाटे शब्दरूप प्रवाहाने अवतरविणारा तू दुसरा आस्थावान् गौतमच भेटलास म्हणावयाचा ! 79
580-15
चोखटिवा आपुलिया । पुढिला उगाणा घेयावया । तया दर्पणाचीचि परी धनंजया । केली आम्हां ॥ 580 ॥
आपल्या स्वच्छपणामुळे आरसा जसा पुढील वस्तूचे प्रतिबिंब आपल्यांत आणतो त्याप्रमाणे धनंजया, तू आमच्या समोरील आरसाच झाला आहेस. 580

581-15
कां भरलें चंद्रतारांगणीं । नभ सिंधू आपणयामाजीं आणी । तैसा गीतेसीं मी अंतःकरणीं । सूदला तुवां ॥ 581 ॥
किंवा चंद्रतारांगणांनी भरलेले आकाश, सिंधु जसे आपल्यांत प्रतिबिंबित करून घेतो, त्याप्रमाणे गीते सह तुं मला आपल्या हृदयांत प्रतिबिंबित करून घेतलेंस. 81
582-15
जे त्रिविधमळिकटा । तूं सांडिलासि सुभटा । म्हणौनि गीतेसीं मज वसौटा । जालासि गा ॥ 582 ॥
अर्जुना, तुझ्या चित्तातील तिन्ही सळ (सत्वरजतम) नाहीसे झाले आहेत म्हणून गीतेचे व माझे तू निवासस्थान झाला आहेस. 82
583-15
परी हें बोलों काय गीता । जे हे माझी उन्मेषलता । जाणे तो समस्ता । मोहा मुके ॥ 583 ॥
ह्या गीतेची थोरवी काय बोलावी ! ही माझी ज्ञानवल्लीच होय. तियें ज्याला समग्र आकलन झालें तो सर्व मोहांपासून मुक्त होतो 83
584-15
सेविली अमृतसरिता । रोगु दवडूनि पंडुसुता । अमरपण उचितां । देऊनि घाली ॥ 584 ॥
अमृतगंगेचे पान केल्यावर रोग दवडून वर ती योग्य असे अमरत्व देतें 84
585-15
तैसी गीता हे जाणितलिया । काय विस्मयो मोह जावया । परी आत्मज्ञानें आपणापयां । मिळिजे येथ ॥ 585 ॥
त्याप्रमाणे गीता जाणल्यावर मोहमुक्त होईल ह्यांत आश्चर्य हें काय? पण आत्मज्ञानाने आपली आपल्याला भेट होणे (अपरोक्षज्ञान होणे) हें तियें जाणणें होय. 85

586-15
जया आत्मज्ञानाच्या ठायीं । कर्म आपुलेया जीविता पाहीं । होऊनियां उतराई । लया जाय ॥ 586 ॥
आजवरच्या आपल्या श्रमायै चीज झाले म्हणून कर्म, आत्मज्ञानप्राप्तीचे उतराई होऊन लय पावतें
587-15
हरपलें दाऊनि जैसा । मागु सरे वीरविलासा । ज्ञानचि कळस वळघे तैसा । कर्मप्रासादाचा ॥ 587 ॥
हरवलेली जिन्नस शोधण्यासाठी ज्या खाणाखुणा अवश्य असतात त्यांची वस्तुप्राप्तीनंतर जशी गरज नसते त्याप्रमाणे कर्मरूप देवळाचा ज्ञान रूप कळस हाच शेवट होय. 87
588-15
म्हणौनि ज्ञानिया पुरुषा । कृत्य करूं सरलें देखा । ऐसा अनाथांचा सखा । बोलिला तो ॥ 588 ॥
म्हणून ज्ञानवानाचे विधिकिंकरत्व ( कर्तव्यबुद्धीनें कर्म करणे ) संपलें असें अनाथाचे नाथ (रमा रंग) म्हणाले. 88
589-15
तें श्रीकृष्णवचनामृत । पार्थीं भरोनि असे वोसंडत । मग व्यासकृपा प्राप्त । संजयासी ॥ 589 ॥
तें श्री कृष्णवचनरूपीं अमृत पार्थाच्या चित्तांत भरून वर उचंबळू लागले. तेंच व्यासांच्या कृपेने संजयास प्राप्त झाले.89
590-15
तो धृतराष्ट्र राया । सूतसे पान करावया । म्हणौनि जीवितांतु तया । नोहेचि भारी ॥ 590 ॥
ते अमृत, संजयाने राया धृतराष्ट्रास पाजिले. म्हणून त्याला (धृतराष्ट्राला) अंत समय कठिण गेला नाही. 590

591-15
एऱ्हवीं गीताश्रवण अवसरीं । आवडों लागतां अनधिकारी । परि सेखीं तेचि उजरी । पातला भली ॥ 591 ॥
पाहू गेले तर गीताश्रवणाच्या वेळीं, धृतराष्ट्र हा श्रवणाचा अधिकारी नाही असे वाटत असे; परंतु अंती तो उपदेश त्याला कामाला आला. 91
592-15
जेव्हां द्राक्षीं दूध घातलें । तेव्हां वायां गेलें गमलें । परी फळपाकीं दुणावलें । देखिजे जेवीं ॥ 592 ॥
द्राक्षाच्या वेलास खत म्हणून दूध घालतात तेव्हा तें व्यर्थ गेलें असे वाटले, तरी त्याचा परिपाक होऊन उत्तम पीक आले म्हणजे दुप्पट फायदा झाला असे जसे अनुभवास येते. 92
593-15
तैसी श्रीहरीवक्त्रींचीं अक्षरें । संजयें सांगितलीं आदरें । तिहीं अंधु तोही अवसरें । सुखिया जाला ॥ 593 ॥
त्याप्रमाणे, श्रीहरीच्या मुखांतील अक्षरें (उपदेश) संजयानं धृतराष्ट्रास सांगितलीं त्यानें तो अंध धृतराष्ट्रही अंती सुखी झाला. 93
594-15
तेंचि मऱ्हाटेनि विन्यासें । मियां उन्मेषें ठसेंठोंबसें । जी जाणें नेणें तैसें । निरोपिलें ॥ 594 ॥
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तीच अक्षरे मराठी भाषेत माझ्या सामर्थ्याप्रमाणे मला समजली तशी ओबडधोबडपणे निरूपिली आहेत. 94
595-15
सेवंतीये अरिसि कांहीं । आंग पाहतां विशेषु नाहीं । परी सौरभ्य नेलें तिहीं । भ्रमरीं जाणिजे ॥ 595 ॥
शेवंतीच्या झाडाकडे पाहिले असतां अरसिकला त्यांत कांहीं वैशिष्टय असेल असे वाटत नाही पण तें सुगंध सेवनाचे खरे अधिकारी जे भ्रमर त्यांनाच कळतें 95

596-15
तैसें घडतें प्रमेय घेइजे । उणें तें मज देइजे । जें नेणणें हेंचि सहजें । रूप कीं बाळा ॥ 596 ॥
त्याप्रमाणे आपण धड म्हणजे सिद्धांताशौं पटणारे प्रमेय स्वीकारावें, प्रमाद घडले असतील ते माझे पदरांत टाकावे; कारण, मुलें सहजच अजाण असावीं हेंच त्यांचे बालपण होय. 96
597-15
तरी नेणतें जऱ्ही होये । तऱ्ही देखोनि बाप कीं माये । हर्ष केंहि न समाये । चोज करिती ॥ 597 ॥
पण नेणत्या मुलाला पाहूनही आई व बाप ह्यांना अति हर्षे होऊन ते त्याचे कौतुक करितात. 97
598-15
तैसें संत माहेर माझें । तुम्ही मिनलिया मी लाडैजें । तेंचि ग्रंथाचेनि व्याजें । जाणिजो जी ॥ 598 ॥
तसे संत हे माझे माहेर (आईबाप ) होय. तुमची भेट झाल्यावर मी लाडांत येतों ( हर्ष होतो ). ह्या हर्षातीलच ही कृति ( ग्रंथरचना ) असे समजावें. 98
599-15
आतां विश्वात्मकु हा माझा । स्वामी श्रीनिवृत्तिराजा । तो अवधारू वा{क्} पूजा । ज्ञानदेवो म्हणे ॥ 599 ॥
अध्याय समाप्तीला महाराज म्हणतात, विश्वात्मक असे माझे स्वामी श्रीनिवृत्तिराज ते माझी वाक्पूजा स्वीकारोत. 599
॥ इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां पुरुषोत्तमयोगोनाम पञ्चदशोऽध्यायः॥15॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :- 20 ॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 599 ॥

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 15th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Pandharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *