सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी २७६ ते ३०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , ,

276-16
तरी वाद्येंवीण नादु । नेदी कवणाही सादु । कां अपुष्पीं मकरंदु । न लभे जैसा ॥ 276 ॥
अरे, वाद्यादि साधनांशिवाय नाद जसा श्रवणाचा विषय होऊ शकत नाही, किंवा जेथे पुष्पादि पदार्थ नाहीत, तेथे जसा सुगंध येत नाही. 76
277-16
तैसी प्रकृति हे आसुर । एकली नोहे गोचर । जंव एकाधें शरीर । माल्हातीना ॥ 277 ॥
तशी ही आसुरी संपत्ति, एखाद्या शरीराचा आश्रय केल्याशिवाय स्वतंत्रतया दृष्टिगोचर होण्यासारखी नाहीं. 77
278-16
मग आविष्कारला लांकुडें । पावकु जैसा जोडे । तैसी प्राणिदेहीं सांपडे । आटोपली हे ॥ 278 ॥
काष्ठाचा आश्रय केलेला अग्नि जसा स्पष्टपणे दिसतो, त्याप्रमाणे, प्राणिदेहाच्या आश्रयाने राहणारी ही आसुरी संपत्ति नजरेस येते. 78
279-16
ते वेळीं जे वाढी ऊंसा । तेचि आंतुला रसा । देहाकारु होय तैसा । प्राणियांचा ॥ 279 ॥
उसाच्या वाढीबरोबर जशी त्यांतील रसाचीही वाढ होत असते, त्याप्रमाणे, प्राण्यांच्या देहाच्या वाढीबरोबर त्याच्या आश्रयाने असणाच्या ह्या आसुरी संपत्तीचीही वाढ होत असते. 79
280-16
आतां तयाचि प्राणियां । रूप करूं धनंजया । घडले जे आसुरीया । दोषवृंदीं ॥ 280 ॥
आतां अर्जुना, अशा ह्या दोषयुक्त आसुरी संपत्तीने घडलेले जे प्राणी आहेत, त्यांचेच वर्णन करू. 280
प्रवृत्तिं च निवृत्तिं च जना न विदुरासुराः ।
न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते ॥ 16.7॥

281-16
तरी पुण्यालागीं प्रवृत्ती । कां पापाविषयीं निवृत्ती । या जाणणेयाची राती । तयांचें मन ॥ 281 ॥
तरी पुण्याचरणाविषयीं प्रवृत्ति असावी व पापमार्गापासून निवृत्त व्हावें ह्या जाणीवेचा ज्याच्या मनांत पूर्ण अंधार आहे. 81
282-16
निगणेया आणि प्रवेशा । चित्त नेदीतु आवेशा । कोशकिटु जैसा । जाचिन्नला पैं ॥ 282 ॥
निर्गमन व प्रवेश करण्याला द्वार आहे की नाही ह्याचा विचार न करतां आवेशाने घरटे बांधणारा कोशकीटक जसा आंत कोंडून जाऊन संकटांत पडतो. 82
283-16
कां दिधलें मागुती येईल । कीं न ये हें पुढील । न पाहातां दे भांडवल । मूर्ख चोरां ॥ 283 ॥
किंवा दिलेले पुढे येईल की नाही हा विचार न करतां जो मूर्ख चोरांना भांडवल देतो. 83
284-16
तैसिया प्रवृत्ति निवृत्ति दोनी । नेणिजती आसुरीं जनीं । आणि शौच ते स्वप्नीं । देखती ना ते ॥ 284 ॥
त्याप्रमाणे, आसुरी संपत्तीच्या लोकांना प्रवृत्ति किंवा निवृत्ति ह्या दोन्ही गोष्टींचा गंधही नसतो व शुद्धतेचे तर त्यांना कधीं स्वप्नही पडत नाही. 84
285-16
काळिमा सांडील कोळसा । वरी चोखी होईल वायसा । राक्षसही मांसा । विटों शके ॥ 285 ॥
कदाचित् कोळसाही आपली काळिमा टाकील, कावळाही कदाचित् शुभ्र होईल, किंवा राक्षसांनाही कदाचित् मांसाचा वीट येईल ! 85

286-16
परी आसुरां प्राणियां । शौच नाहीं धनंजया । पवित्रत्व जेवीं भांडिया । मद्याचिया ॥ 286 ॥
परंतु मद्याने भरलेले भांडे जसे केव्हांही पवित्र म्हणण्याची सोय नाही, त्याप्रमाणे, अर्जुना, आसुरी संपत्तीचे प्राणी कधीही शुद्ध असण्याची गोष्टच नको ! 86
287-16
वाढविती विधीची आस । कां पाहाती वडिलांची वास । आचाराची भाष । नेणतीचि ते ॥ 287 ॥
कारण, विधीचे पालन करणे, वाडवडिलांची चालरीत पहाणे, शुद्धाचाराची चाड राखणे वगैरे भाषाही त्यांचे गांवीं नसते. 87
288-16
जैसें चरणें शेळियेचें । कां धावणें वारियाचें । जाळणें आगीचें । भलतेउतें ॥ 288 ॥
शेळीच्या चरण्यांत जशी वगळावगळ नसते, वारा जसा कोठेही वाहतो कि वा आग जशी सांपडेल तो भाग जाळीत सुटते 88
289-16
तैसें पुढां सूनि स्वैर । आचरती ते गा आसुर । सत्येंसि कीर वैर । सदाचि तयां ॥ 289 ॥
त्याप्रमाणे,आसुरी संपत्तीचे लोक इच्छेला प्राधान्य देऊन स्वैराचार करतात व सत्याचे व त्यांचे हटकून नित्य वैर असते 89
290-16
जरी नांगिया आपुलिया । विंचू करी गुदगुलिया । तरी साचा बोली बोलिया । बोलती ते ॥ 290 ॥
आपल्या नांगीने लोकांना विंचू गुदगुल्या करितो हे जितकें खरें. तितकीच ते सत्य बोलतात हे खरें समजवे ! 290

291-16
आपानाचेनि तोंडें । जरी सुगंधा येणें घडे । तरी सत्य तयां जोडे । आसुरांतें ॥ 291 ॥
अपानवायु ( गुदद्वारचा ) सुगंधी असतो असे कधीं घडलें. असेल तर तो कधीतरी सत्य बोलला असेल ही तितकेच शक्य आहे.91
292-16
ऐसें ते न करितां कांहीं । आंगेंचि वोखटे पाहीं । आतां बोलती ते नवाई । सांगिजैल ॥ 292 ॥
अरे, त्यांनी कांहीही क्रिया केली नाही तरी ते स्वभावतः किंवा आंगानेच टाकाऊ असतात; आतां त्यांच्या बोलण्याचा चमत्कार तुला सांगतों.92
293-16
एऱ्हवीं करेयाच्या ठायीं चांग । तें तयासि कैचें नीट आंग । तैसा आसुरांचा प्रसंग । प्रसंगें परीस ॥ 293 ॥
उंटाच्या शरीराचा कोणता भाग असा आहे की, तो सरळ आहे असे म्हणतां येईल? असुरांची गोष्ट तशीच आहे. त्यांचे काय चांगले आहे असे म्हणावें? पण प्रसंगाने सांगतों; श्रवण कर. 93
294-16
उधवणीचें जेवीं तोंड । उभळी धुंवाचे उभड । हें जाणिजे तेवीं उघड । सांगों ते बोल ॥ 294 ॥
यांच्या बोलाचे उघड वर्णन करणे म्हणजे, धुराडाच्या तोंडांतून धुराच्या लोटाशिवाय दुसरें काय निघणार आहे? तसेच ते ठरेल हे लक्षांत असू दे. 94
असत्यमप्रतिष्ठं ते जगदाहुरनीश्वरम् ।
अपरस्परसंभूतं किमन्यत् कामहैतुकम् ॥16. 8॥

295-16
तरी विश्व हा अनादि ठावो । येथ नियंता ईश्वररावो । चावडिये न्यावो अन्यावो । निवडी वेदु ॥ 295 ॥
तरी विश्व हें अनादि असून त्याचा सर्वाधीश ईश्वर नियंता आहे व त्याच्या दरबारात धर्म्यक अधर्म्य ( न्याय कीं अन्याय ) हा निवाडा वेदनिर्णयावर अवलंबून असतो. 95

296-16
वेदीं अन्यायीं पडे । तो निरयभोगें दंडे । सन्यायी तो सुरवाडें । स्वर्गीं जिये ॥ 296 ॥
वेदाज्ञेप्रमाणे जो अन्यायी असेल, त्याला नरकादि भोगांचा दंड भोगणें पडेल व न्यायी असेल त्याला सुखानें स्वर्गप्राप्ति होईल. 96
297-16
ऐसी हे विश्वव्यवस्था । अनादि जे पार्था । इयेतें म्हणती ते वृथा । अवघेंचि हें ॥ 297 ॥
अशी ही जी विश्वाची अनादि व्यवस्था अथवा घडी आहे, ती अर्जुना, हे सर्व लोक झुट किंवा व्यर्थ आहे असे म्हणतात. 97
298-16
यज्ञमूढ ठकिले यागीं । देवपिसें प्रतिमालिंगीं । नागविले भगवे योगी । समाधिभ्रमें ॥ 298 ॥
यज्ञाच्या व्यसनाने वेडे झालेले यागाने ठकले, देवाचे वेड लागलेले प्रतिमादिकांनी ठकले, व समाधिभ्रमाने अणवी वस्त्रे परिधान केलेल्या योग्यांना नागविलें. 98
299-16
येथ आपुलेनि बळें । भोगिजे जें जें वेंटाळें । हें वांचोनि वेगळें । पुण्य आहे? ॥ 299 ॥
ह्या जगांत आपल्या सामर्थ्यावर जें जें भोगतां येण्यासारखे असेल तें तें भोगण्यावांचून दुसरें कसले पुण्य आहे? 99
300-16
ना अशक्तपणें आंगिकें । वेगळवेंटाळीं न टकें । ऐसा गादिजेवीण विषयसुखें । तेंचि पाप ॥ 300 ॥
किंवा अंगच्या नेभळे पणामुळे विषयसुख साधने एकत्र करता न येऊन किंवा भोगता न येऊन जो दुःख भोगतो तेच पाप होय. 300

, , , , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *