सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी १७६ ते २०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

176-16
नाना चांडाळ मंदिराशीं । अवचटें आलिया संन्याशी । मग लाज होय जैसी । उत्तमा तया ॥ 176 ॥
किंवा एखादा संन्यासी आकस्मिकपणे चांडाळगृह आला असतां या श्रेष्ठ पुरुषाला जशी लज्जा उत्पन्न होते. 76
177-16
क्षत्रिया रणीं पळोनि जाणें । तें कोण साहे लाजिरवाणें । कां वैधव्यें पाचारणें । महासतियेतें ॥ 177 ॥
रणांतून पळून जाणें ही लाजिरवाणी गोष्ट कोणता जातिवंत क्षत्रिय सहन करील? किंवा महापतिव्रतेला वैधव्यबोधक शब्द लावणे कोणास आवडेल? 77
178-16
रूपसा उदयलें कुष्ट । संभावितां कुटीचें बोट । तया लाजा प्राणसंकट । होय जैसें ॥ 178 ॥
देखण्या व्यक्तीला अंगावर कोड उठावें, किंवा एखाद्या सन्माननीय गृहस्थावर वेडावांकडा आळ यावा हे जसें प्राणसंकटासारखें होतें. 78
179-16
तैसें औटहातपणें । जें शव होऊनि जिणें । उपजों उपजों मरणें । नावानावा ॥ 179 ॥
त्याप्रमाणे साडेतीन हात प्रेतरूप शरीर त्याच्या आधारावर स्वतःचे जगणे अथवा आस्तित्व मानून पुनःपुन्हा जन्माला यावें व मरावे. 79
180-16
तियें गर्भमेदमुसें । रक्तमूत्ररसें । वोंतीव होऊनि असे । तें लाजिरवाणें ॥ 180 ॥
व त्या गर्भाशयरूप मुशीत (सांच्यांत) रक्तमूत्रादि रसांची ओतीव मूर्ति होऊन राहणे हा जो लाजिरवाणा भोग. 180

181-16
हें बहु असो देहपणें । नामरूपासि येणें । नाहीं गा लाजिरवाणें । तयाहूनी ॥ 181 ॥
फार काय सांगावें ! देहपणानें नामरूपाला येऊन मिरवणे ह्यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट नाहीं. 81
182-16
ऐसैसिया अवकळा । घेपे शरीराचा कंटाळा । ते लाज पैं निर्मळा । निसुगा गोड ॥ 182 ॥
स्वतःला अशा हीन दशेला आणणान्या शरीराचें धारण करण्याचा भोग वांटयास यावा ह्याची साधुपुरुषांना लाज व खंती वाटते; परंतु निर्लज्जाला तेंच गोड वाटतें. 82
183-16
आतां सूत्रतंतु तुटलिया । चेष्टाचि ठाके सायखडिया । तैसें प्राणजयें कर्मेंद्रियां । खुंटे गती ॥ 183 ॥
आतां चलन देणारी दोरी तुटल्यावर कळसूत्री बाहुल्यांच्या सर्व चेष्टा जशा बंद पडतात, त्याप्रमाणे प्राणांचा जय (योग) केला असतां सर्व कमेंद्रियांच्या चेष्टा बंद पडतात. 83
184-16
कीं मावळलिया दिनकरु । सरे किरणांचा प्रसरु । तैसा मनोजयें प्रकारु । ज्ञानेंद्रियांचा ॥ 184 ॥
किंवा सूर्यास्ताबरोबर सर्व किरणांचा पसारा जसा संपतो त्याप्रमाणे मनोजय केला असतां ज्ञानेंद्रियांचे व्यापार बंद होतात. 84
185-16
एवं मनपवननियमें । होती दाही इंद्रियें अक्षमें । तें अचापल्य वर्में । येणें होय ॥ 185 ॥
ह्याप्रमाणे प्राणजय व मनोजय केल्याने दशेंद्रियांच्या सर्व चेष्टा थांबून ती स्तब्ध होतात त्यालाच “अचापल्य” असे म्हणतात. 85
तेजः क्षमा धृतिः शौचमद्रोहो नातिमानिता ।
भवन्ति संपदं दैवीमभिजातस्य भारत ॥ 16.3॥

186-16
आतां ईश्वरप्राप्तीलागीं । प्रवर्ततां ज्ञानमार्गीं । धिंवसेयाचि आंगी । उणीव नोहे ॥ 186 ॥
आतां ईश्वरप्राप्तीसाठीं ज्ञानमार्गाकडे प्रवृत्ति झाली असतां धैर्याची उणीव भासत नाही. 86
187-16
वोखटें मरणा{ऐ}सें । तेंही आलें अग्निप्रवेशें । परी प्राणेश्वरोद्देशें । न गणीचि सती ॥ 187 ॥
मरणासारखा अत्यंत अप्रिय प्रसंग, व तोही जिवंतपणीं अग्निप्रवेश करून येणार; पण, प्राणपतीच्या उद्देशानें तो ओढवून घेतांना पतिव्रता सतीला त्याचें कांहींच वाटत नाही. 87
188-16
तैसें आत्मनाथाचिया आधी । लाऊनि विषयविषाची बाधी । धांवों आवडे पाणधी । शून्याचिये ॥ 188 ॥
त्याप्रमाणे ज्याला आत्मप्राप्तीची तळमळ लागली आहे, तो, विषयांचा विषवत् त्याग करून, आवश्यक तर, प्राणनिरोधनाने शून्यसमाधीसारखे कठीण साधनही करण्यास तयार होतो. 88
189-16
न ठाके निषेधु आड । न पडे विधीची भीड । नुपजेचि जीवीं कोड । महासिद्धीचें ॥ 189 ॥
विधिनिषेधाचे भान रहात नाही किंवा महासिद्धीसारखी प्राप्ति झाली असतांही त्याला तिचे कौतुक वाटत नाही. 89
190-16
ऐसें ईश्वराकडे निज । धांवे आपसया सहज । तया नांव तेज । आध्यात्मिक तें ॥ 190 ॥
ज्याच्या वृत्तीचा स्वाभाविक ईश्वर प्राप्तीकडे असा ओढा असतो, त्याला अध्यात्मिक (शारीरिक) तेज असे म्हणतात. 190

191-16
आतां सर्वही साहातिया गरिमा । गर्वा न ये तेचि क्षमा । जैसें देह वाहोनि रोमा । वाहणें नेणें ॥ 191 ॥
आतां येईल तो घोर किंवा थोर प्रसंग सहन करूनही ज्याला, देहाला आपण अनंत रोम धारण केले आहेत ह्याचे जसे भानही नसते त्याप्रमाणे, मुळींच गर्व अगर स्वतःच्या सहनशीलतेचे भानही नसतें ती “ क्षमा” होय.91
192-16
आणि मातलिया इंद्रियांचे वेग । कां प्राचीनें खवळले रोग । अथवा योगवियोग । प्रियाप्रियांचे ॥ 192 ॥
आणि इंद्रियांच्या वृत्ति अनावर झाल्या असतां, किंवा अदृष्टानें रोगादि भोग उभे राहिले असतां, अथवा प्रिय किंवा अप्रिय वस्तूंचा योग किंवा वियोग घडला असतां. 92
193-16
यया आघवियांचाचि थोरु । एके वेळे आलिया पूरु । तरी अगस्त्य कां होऊनि धीरु । उभा ठाके ॥ 193 ॥
किंवा हे प्रसंग पृथक् पणे न येतां एकाच वेळ ह्या सर्वांचा पूर आला तरी जो अगस्ति ऋषीप्रमाणे ह्या सर्वांचा एकदम ग्रास करून टाकतो व अकंप असतो. 93
194-16
आकाशीं धूमाची रेखा । उठिली बहुवा आगळिका । ते गिळी येकी झुळुका । वारा जेवीं ॥ 194 ॥
आकाशांत धुराचा केवढाही स्तंभ उंच गेला असला तरी, वाऱ्याची एकच झळूक तो जसा मोडून टाकते. 94
195-16
तैसें अधिभूताधिदैवां । अध्यात्मादि उपद्रवां । पातलेयां पांडवा । गिळुनि घाली ॥ 195 ॥
त्याप्रमाणे अर्जुना, आध्यात्मिक, आधिभौतिक अथवा आधिदैविक वगैरे पीडा उत्पन्न झाल्या असतां, त्या सर्व जो गिळून जातो. 95

196-16
ऐसें चित्तक्षोभाच्या अवसरीं । उचलूनि धैर्या जें चांगावें करी । धृति म्हणिपे अवधारीं । तियेतें गा ॥ 196 ॥
अशा चित्तक्षोभाच्या प्रसंगांत ज्याचे धैर्य टिकून राहते त्याला धृति म्हणतात, हे लक्षांत असूदे. 96
197-16
आतां निर्वाळूनि कनकें । भरिला गांगें पीयूखें । तया कलशाचियासारिखें । शौच असें ॥ 197 ॥
आतां सुवर्णकलश स्वच्छ करून आंत शुद्ध गंगोदक भरावें, त्याप्रमाणे ” शौच ” म्हणजे शुद्धतेचे स्वरूप आहे. 97
198-16
जे आंगीं निष्काम आचारु । जीवीं विवेकु साचारु । तो सबाह्य घडला आकारु । शुचित्वाचाचि ॥ 198 ॥
ज्याचे आचरण निष्काम असून, चित्तांत विवेक नित्य जागा असतो, तो सबाह्य शुचित्वाची मूर्तीच होय असे समज. 98
199-16
कां फेडित पाप ताप । पोखीत तीरींचे पादप । समुद्रा जाय आप । गंगेचें जैसें ॥ 199 ॥
समुद्राकडे वाहणारें गंगोदक जसें स्नान करणान्यांच्या पापाचा व तापाचा नाश करून तीरावर असलेल्या वृक्षांचे सहज पोषण करितें. 99
200-16
कां जगाचें आंध्य फेडितु । श्रियेचीं राउळें उघडितु । निघे जैसा भास्वतु । प्रदक्षिणे ॥ 200 ॥
किंवा सूर्य नित्याच्या फेरीला निघाला असतां जगांतील अंधकाराचा नाश करून सर्व व्यवहार व्यापार प्रकट करितो. 200

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 16th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Solava Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 16 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *