सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११वा ओवी २६ ते ५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

26-11
बाप बाप ग्रंथ गीता । जो वेदीं प्रतिपाद्य देवता । तो श्रीकृष्ण वक्ता । जिये ग्रंथीं ॥26
धन्य धन्य हा गीता ग्रंथ ! कारण संपूर्ण वेदांनी ज्यांचे वर्णन केले; तोच भगवान श्रीकृष्ण साक्षात् हा ग्रंथ सांगत आहे.
27-11
तेथिंचे गौरव कैसें वानावें । जें श्रीशंभूचिये मती नागवे । तें आतां नमस्कारिजे जीवेंभावें । हेंचि भलें ॥27॥
ज्या गीताग्रंथाची थोरवी, साक्षात् श्रीशंकरालाहि कळलि नाही, त्याची थोरवी मी कशी वर्णन करणार? तेव्हा मनोभावे तिला नमस्कार करावा, हेंच उत्तम.
28-11
मग आइका तो किरीटी । घालूनि विश्वरूपीं दिठी । पहिली कैसी गोठी । करिता जाहला ॥28॥
मग विश्वरूपदर्शनाचे ठिकाणीं लक्ष ठेऊन, त्या अर्जुनाने भगवंताशीं बोलण्याला सुरुवात केली, ते ऐका.
29-11
हें सर्वही सर्वेश्वरु । ऐसा प्रतीतिगत जो पतिकरु । तो बाहेरी होआवा गोचरु । लोचनांसी ॥29॥
हें सर्व चराचर जग, भगवानच नटला आहे असा बुध्दिंत अनुभवाचा जो अविष्कार झाला, तो बाहेर डोळ्याला प्रत्यक्ष दिसावा
30-11
हे जिवाआंतुली चाड । परी देवासि सांगतां सांकड । कां जें विश्वरूप गूढ । कैसेनि पुसावें? ॥30॥
अशी त्याच्या अंतःकरणांत इच्छा उत्पन्न झाली; पण ही इच्छा देवाला सांगणें कठीन वाटलें कारण जे विश्वरूप, भगवान अत्यंत गुप्त ठेवतात, कोणाला दाखवत नाहीत, तें दाखवा म्हणून आपण कसें म्हणावें?


31-11
म्हणे मागां कवणीं कहीं । जें पढियंतेनें पुसिलें नाहीं । ते सहसा कैसें काई । सांगा म्हणों? ॥31॥
अर्जुन मनांत म्हणतो, पूर्वी कधी कोणी अत्यंत आवडत्या भक्तांनीहि जे विचारलें नाही, तें मला सांगा, असें एकदम कसें म्हणूं
32-11
मी जरी सलगीचा चांगु । तरी काय आइसीहूनी अंतरंगु । परी तेही हा प्रसंगु । बिहाली पुसों ॥32॥
मी जरी अत्यंत प्रेमांतील असलो, तरी आई लक्ष्मीपेक्षा जवळचा कसा होईन? पण तीहि विश्वरूपदर्शनाची गोष्ट काढण्यास भ्याली.
33-11
माझी आवडे तैसी सेवा जाहली । तरी काय होईल गरुडाचिया येतुली? । परी तोही हें बोली । करीचिना ॥33॥
मी वाटेल तशी भगवंताची सेवा केली असली, तरी ती गरूडाच्या सेवेची बरोबरी करील काय? पण त्यानेहि ही गोष्ट काढली नाही.
34-11
मी काय सनकादिकांहूनि जवळां । परी तयांही नागवेचि हा चाळा । मी आवडेन काय प्रेमळां । गोकुळींचिया ऐसा? ॥34॥
मी काय सनकादिकांपेक्षाहि जवळचा निकटवर्ती आहे? पण त्यांनाही ही इच्छा धरतां आली नाही. प्रेमळ गोकुळवासी जनांसारखा मी भगवंताला आवडतो काय?
35-11
तयांतेंही लेकुरपणें झकविलें । एकाचे गर्भवासही साहिले । परी विश्वरूप हें राहविलें । न दावीच कवणा ॥35॥
पण त्यांनाहि बाळपणाने, आपले सामर्थ्य झांकून टाकून फसविले. आपल्या अंबरीष भक्ताचे गर्भवास आपण सोसले, पण आपलें विश्वरूप गुप्तच ठेवलें, कोणासच दाखिवलें नाही.


36-11
हा ठायवरी गुज । याचिये अंतरीचें हें निज । केवीं उराउरी मज । पुसों ये पां? ॥36॥
इतकें हें अत्यंत गुप्त ठेवलेलें व भगवंतांनी अंतःकरणांत माझे मूळरूप होय असे ज्याला मानलें, तें हें विश्वरूप एकदम मला कसें विचारतां येईल?
37-11
आणि न पुसेंचि जरी म्हणे । तरी विश्वरूप देखिलियाविणें । सुख नोहेचि परी जिणें । तेंही विपायें ॥37॥
आणि जाऊ द्या, विचारूच नये ! असे म्हणून सोडून द्यावें, तर विश्वरूप पाहिल्यावांचून मनाची तळमळ जाऊन सुख होणार नाही. एवढेंच नाही, तर तळमळीमुळे वाचणेंहि कठीण आहे.
38-11
म्हणौनि आतां पुसों अळुमाळसें । मग करूं देवा आवडे तैसें । येणें प्रवर्तला साध्वसें । पार्थु बोलों ॥38॥
म्हणून सहजगत्या थोडेसे विचारून पाहावे; मग देव वाटेल ते करोत, असा विचार करून भीत भीत अर्जुनाने बोलायला सुरुवात केली.
39-11
परी तेंचि ऐसेनि भावें । जें एका दों उत्तरांसवें । दावी विश्वरूप आघवें । झाडा देउनी ॥39॥
पण तेच विचारणे अशा प्रेमभावाने केलें, की अर्जुनाचे मुखांतून एक दोन शब्द निघतात न निघतात, तोच भगवंतांनी आपलें झाडून संपूर्ण विश्वरूप दाखविले.
40-11
अहो वांसरूं देखिलियाचिसाठीं । धेनु खडबडोनि मोहें उठी । मग स्तनामुखाचिये भेटी । काय पान्हा धरे? ॥40॥
अहो ! वांसरूं पाहिल्या बरोबर गाय, प्रेमाने एकदम खडबडून उठते मग वांसराचे तोंड तिच्या स्तनाला लागल्यावर पान्हा धरवेल काय?


41-11
पाहा पां तया पांडवाचेनि नांवें । जो कृष्ण रानींही प्रतिपाळूं धावे । तयांतें अर्जुनें जंव पुसावें । तंव साहील काई 41॥
असे पहा की, ज्या पांडवांचे संरक्षण करण्यासाठी श्री कृष्ण भगवान रानावनांतही धावले, त्यांना अर्जुन जे विचारील ते सांगताना राहवेल का.
42-11
तो सहजेंचि स्नेहाचें अवतरण आणि येरु स्नेहा घातलें आहे माजवण । ऐसिये मिळवणी वेगळेपण । उरे हेंचि बहु ॥42॥
श्रीकृष्ण भगवान हे मूर्तीमंत स्नेहच होय त्यांना अर्जुन रुपी भक्ष्य मिळाल्याने या दोघांच्या ऐक्यभावात यांच्या दोन वेगळ्या मूर्ती दिसतात हाच चमत्कार होय.
43-11
म्हणौनि अर्जुनाचिया बोलासरिसा । देव विश्वरूप होईल आपैसा । तोचि पहिला प्रसंगु ऐसा । ऐकिजे तरी ॥43॥
म्हणून अर्जुनाने विचारल्यावर देव आपोआप विश्वरूप धारण करतील. तरी आता आरंभीचा तो प्रसंग ऐकावा
अर्जुन उवाच:
मदनुग्रहायपरमं गुह्यमध्यात्मसंज्ञितम्
यत्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयंविगतो मम ॥11.1॥

44-11
मग पार्थु देवातें म्हणे । जी तुम्ही मजकारणें । वाच्य केलें जें न बोलणें । कृपानिधे ॥44 । ।
मग पार्थ देवाला म्हणाला, “हे कृपानिधी, तुम्ही माझ्या करीतां शब्दातील जे गुह्य ते बोलून दाखवले.
45-11
जैं महाभूतें ब्रह्मीं आटती । जीव महदादींचे ठाव फिटती । तैं जें देव होऊनि ठाकती । तें विसवणें शेषींचें ॥45॥
जेंव्हा पंचमहाभूते ब्रम्हामध्ये लीन होतात आणि जीव व माया लय पावतात, त्यावेळेस परमात्मा जे रूप धारण करून राहतात, ते शेवटचे स्वरूप.


46-11
होतें हृदयाचिये परिवरीं । रोंविलें कृपणाचिये परी । शब्दब्रह्मासही चोरी । जयाची केली ॥46॥
कृपन मनुष्याप्रमाणे जें ह्रदयमंदिरांत लपवून ठेवलें होतें आणि शब्दब्रह्मापासून म्हणजे वेदापासून जें चोरून ठेवलें होतें – म्हणजे वेद देखील या स्वरूपाला जाणूं शकला नाही. (या स्वरूपाचा अनुभव नुसत्या ज्ञान्याला येत नाही. हा अनुभव भक्तांनाच येतो.)
47-11
तें तुम्हीं आजि आपुलें । मजपुढां हियें फोडिलें । जया अध्यात्मा वोवाळिलें । ऐश्वर्य हरें ॥47॥
तें तुम्ही आज माझ्यापुढें आपलें ह्रदय उघडें केलें, या अध्लात्मस्वरूपावरून शंकराने कैसासाचें राज्य ओवाळून टाकलें व स्मशानांत वास केला. (शुध्द आत्मस्वरूपाला धरून जेंवढें असतें, त्याला अध्यात्म म्हणतात, भगवंताचे निर्गुणस्वरूप स्वाभाविक असल्यामुळें जसें ते अध्यात्म म्हटले जातें, तसेच विश्वरूपहि स्वाभाविक असल्यामूळे, येथे त्यालाही अध्यात्म म्हटले आहे.)
48-11
ते वस्तु मज स्वामी । एकिहेळां दिधली तुम्ही । हें बोलों तरी आम्ही । तुज पावोनि कैंचे ॥48॥
ती अध्यात्मवस्तु, प्रभो ! मला एकदम तुम्ही दिली असें म्हणावें, तर आम्ही तुझ्यापासून निराळे आहो कोठे?
49-11
परी साचचि महामोहाचिये पुरीं । बुडालेया देखोनि सीसवरी । तुवां आपणपें घालोनि श्रीहरी । मग काढिलें मातें ॥49॥
पण खरोखरीच मी या संसाररूपी महामोहाच्या पुरांत डोक्यापर्यंत बुडालों आहे, हे पाहून देवा ! आपण स्वतः त्यांत उडी टाकून मला बाहेर काढलें.
50-11
एक तूंवांचूनि कांहीं । विश्वीं दुजियाची भाष नाहीं । कीं आमुचें कर्म पाहीं । जे आम्हीं आथी म्हणों ॥50
अद्वैतदृष्टिने पाहतां, तिन्ही काळीं एका तुझ्यावांचून या संपूर्ण विश्वांत दुसर्‍या वस्तुची गोष्ट देखील नाही; पण ‘आम्ही आहो’ असें म्हणतों, हें आमचें दुर्दैव पहा कसे आहे?

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *