सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा ओवी ५१ ते ७५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

51-10
घटीं थोडेसें उदक घालिजे । तेणें न गळे तरी वरिता भरिजे । ऐसा परिसौनि पाहिलासि तंव परिसविजे । ऐसेंचि होतसे ॥51॥
घागरीत थोडेसे पाणी भरावे व तेवढे पाणी तसेच राहिले. गळ्यापर्यंत भरले नाही, तर ती आणखी भरावी त्याप्रमाणे मी थोडे निरूपण केरून तुला श्रवण करवून पाहले, तेव्हा आणखी श्रवण करवावे असेच दिसून आले.
52-10
अवचितयावरी सर्वस्व सांडिजे । मग चोख तरी तोचि भांडारी कीजे । तैसा किरीटी तूं आतां माझें । निजधाम कीं ॥52॥
एखादे वेळी येणार्‍या माणसांवर प्रथम घरातील सर्व सोपवून पाहावे व त्याची सचोटी दिसून आली तर मग त्यास खजिनदार करावे. त्याप्रमाणे, अर्जुना ! माझे अखंड राहण्याचे ठिकाण जे परब्रह्म ते तू झाला.
53-10
ऐसें अर्जुना येउतें सर्वेश्वरें । पाहोनि बोलिलें अत्यादरें । गिरी देखोनि सुभरें । मेघु जैसा ॥53॥
अर्जुनाला अत्यंत एकाग्रतेने ऐकतांना पाहून, सर्व देवांचे देव भगवान श्रीकृष्ण, वर सांगितल्याप्रमाणे अत्यात आदराने बोलले आणि ज्याप्रमाणे पर्वताला पाहून पाण्याने भरलेले मेघ पर्वतावर वळून येतात,
54-10
तैसा कृपाळुवांचा रावो । म्हणे आइकें गा महाबाहो । सांगितलाचि अभिप्रावो । सांगेन पुढती ॥54॥
त्याप्रमाणे कृपाळुंचा राजा भगवान श्रीकृष्ण म्हणतात’ “महाबाहो अर्जुना ! सांगितलेला भावार्थच पुढे पुनः सांगणार आहे. ऐक.
55-10
पैं प्रतिवर्षीं क्षेत्र पेरिजे । पिकाची जंव जंव वाढी देखिजे । यालागीं नुबगिजे । वाहो करितां ॥55॥
कारण दरवर्षी शेत पेरावे व जसजशी पिकांची वाढ होत असलेली पाहावी, तसतशी त्या शेताची मशागत करण्याचा त्रास मानू नये.

56-10
पुढतपुढती पुटें देतां । जोडे वानियेची अधिकता । म्हणौनि सोनें पंडुसुता । शोधूंचि आवडे ॥56॥
वारंवार पुटें दिलीं असतां सोन्याचा कस वाढतो, म्हणून वारंवार सोनें शोधावेसेंच वाटते.
57-10
तैसें एथ पार्था । तुज आभार नाहीं सर्वथा । आम्ही आपुलियाचि स्वार्था । बोलों पुढती ॥57॥
त्याचप्रमाणे अर्जुना ! तुला वारंवार सांगण्यांत तुझ्यावर उपकार करतो असे नसून, मी आपल्या स्वार्थाकरितां पुनः बोलत आहे.
58-10
जैसें बाळका लेवविजे लेणें । तया शृंगारा बाळ काइ जाणे? । परि ते सुखाचे सोहळे भोगणें । माउलिये दिठी ॥58॥
ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाच्या अंगावर अलंकार घालते, पण त्या अलंकार घालण्याचा जो आनंद, तो बालक काय जाणत असतो? पण ते सुखाचे सोहळे, आईच आपल्या दृष्टीने भोगत असते.
59-10
तैसें तुझें हित आघवें । जंव जंव कां तुज फावे । तंव तंव आमुचें सुख दुणावे । ऐसें आहे ॥59॥
त्याप्रमाणे अर्जुना ! आमचें निरूपण ऐकून ब्रह्मबोध ठसल्यामुळे जसें जसें तुला आत्मसुख प्राप्त होईल, तसे तसे आमचेंहि सुख दुप्पट वाढत जाते.
60-10
आतां अर्जुना असो हे विकडी । मज उघड तुझी आवडी । म्हणौनि तृप्तीची सवडी । बोलतां न पडे ॥60॥
आतां अर्जुना ! हें अलंकारिक भाषण असो. मला तुझे अत्यंत प्रेम असल्यामुळेच तुझ्याशी बोलत असतांना तृप्तीचा अवसर लाभत नाही.

61-10
आम्हां येतुलियाचि कारणें । तेंचि तें तुजशीं बोलणें । परि असो हें अंतःकरणें । अवधान देईं ॥61॥
म्हणूनच आम्हाला तीच ती गोष्ट तुझ्याशी बोलावी लागते; तर आमच्या बोलण्याकडे अंतःकरणपूर्वक लक्ष दे.
62-10
तरी ऐकें गा सुवर्म । वाक्य माझें परम । जें अक्षरें लेऊनी परब्रह्म । तुज खेंवासि आलें ॥62॥
हे मार्मिक अर्जुना, अत्युत्तम असे जे वाक्य, ते ऐक ते वाक्य नसून अक्षर रूपाने प्रत्यक्ष परब्रह्मच तुला अलिंगन देण्यास आले आहे,
63-10
परी किरीटी तूं मातें । नेणसी ना निरुतें । तरि तो गा जो मी एथें । तें विश्वचि हें ॥63॥
परंतू हे किरीटी, तू खरोखर मला जाणत नाहीस ना? तर जो मी तुला इथे दिसतो आहे, तोच हे सर्व विश्व आहे.
न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः ।
अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः॥10.2॥

64-10
एथ वेद मुके जाहाले । मन पवन पांगुळले । रातीविण मावळले । रविशशी जेथ ॥64॥
हे माझे स्वरूप जाणण्या विषयी वेदांची वाणी कुंटीत झाली, मन व प्राण यांची गति थांबली व माझ्या तेजापुढे राञ झाल्या शिवाय सूर्य आणि चंद्र मावळले.
65-10
अगा उदरींचा गर्भु जैसा । न देखें आपुलिये मातेची वयसा । मी आघवेया देवां तैसा । नेणवे कांहीं ॥65॥
अरे, ज्याप्रमाणे उदरातील गर्भ आपल्या मातेचे वय जाणण्यास असमर्थ असतो; त्याप्रमाणे माझ्या पासून उत्पन्न झालेले देव ही मला जाणण्यास समर्थ नाहीत,

66-10
आणि जळचरां उदधीचें मान । मशका नोलांडवेचि गगन । तेवीं महर्षींचें ज्ञान । न देखेचि मातें ॥66॥
आणि समुद्रांतील प्राण्यांना समुद्राचा विस्तार कळत नाही किंवा मशकाला आकाश ओलांडून जाणें शक्य नाही, त्याप्रमाणेच महर्षींचे ज्ञान देखील या माझ्या शक्तिस्वरूपाचा ठाव घेऊं शकत नाही.
67-10
मी कवण पां केतुला । कवणाचा कैं जाहला । या निरुती करितां बोला । कल्प गेले ॥67॥
मी कोण आहे, केवढा आहे, कोणाचा आहे, केव्हा झालों इत्यादि गोष्टिंचा सत्य विचार करतां करतां कितीतरी कल्प लोटले.
68-10
कां जे महर्षीं आणि या देवां । येरां भूतजातां सर्वां । मी आदि म्हणौनि पांडवा । अवघड जाणतां ॥68॥
अर्जुना ! महर्षि असोत किंवा देव असोत, त्याचप्रमाणे सर्वभूतप्राणी असोत, या सर्वांचे कारण मीच असल्यामुळे किंवा सर्व पदार्थाची उत्पत्ति माझ्यापासून असल्यामुळे, त्यांना आपल्या बुध्दीने जाणणें दुरापास्त आहे.
69-10
उतरलें उदक पर्वत वळघे । जरी झाड वाढत मुळीं लागे । तरी मियां जालेनि जगें । जाणिजे मातें ॥69॥
पर्वतावरून खालीं उतरत पायथ्याशी येणारे पाणी जर पुनः पर्वतावर चढेल, वर वाढत असलेले झाड जर मुळाकडे वाढत जाईल, तरच माझ्यापासून उत्पन्न झालेल्या जगाला मला जाणतां येणें शक्य आहे.
70-10
कां गाभेवनें वटु गिंवसवे । जरी तरंगीं सागरू सांठवे । कां परमाणूमाजीं सामावे । भूगोलु हा ॥70॥
किंवा वटबीजाला अंकुर फुटल्यावर जर त्यांत संपूर्ण वटवृक्ष दृष्टुस पडेल, समुद्राच्या एका तरंगात जर संपूर्ण समुद्र साठविला जाईल किंवा एका परमाणुमध्ये ही संपूर्ण भूमी सांठविली जाईल.

71-10
तरी मियां जालिया जीवां । महर्षीं अथवा देवां । मातें जाणावया होआवा । अवकाशु गा ॥71॥
तरच माझ्यापासून झालेले महर्षि, देव, इत्यादि जीवांना मला जाणण्याला जागा राहील
72-10.
ऐसाही जरी विपायें । सांडूनि पुढीले पाये । सर्वेंद्रियांसि होये । पाठिमोरा जो ॥72॥
असे जरी आहे तरी कदाचित् बाह्य विषयांकडील धांव निःशेष सोडून देऊन जो इंद्रियांच्या प्रवृत्तीला पाठमोरा होतो.
73-10
प्रवर्तलाही वेगीं बहुडे । देह सांडूनि मागलीकडे । महाभूतांचिया चढे । माथयावरी ॥73॥
इंद्रियांबरोबर विषयाकडे प्रवृत्त झाला तरी एकदम जो मागें फिरतो व देहावरील अहंता सोडून जो मन अंतर्मुख करता करतां महाभूतांच्या माथ्यावर किंवा डोक्यावर चढतो — म्हणजे ज्या आत्मस्वरूपापासून भूतांची उत्पत्ति भासली त्या कारणरूप आत्मसवरूपाचे ठिकाणी जो जातो.
यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् ।
असंमूढः स मर्त्येषु सर्वपापैः प्रमुच्यते ॥10.3॥

74-10
तैसा राहोनि ठायठिके । स्वप्रकाशें चोखें । अजत्व माझें देखे । आपुलिया डोळां ॥74॥
महाभूतांच्या पलीकडे असणारें जें माझें स्वयंप्रकाशित स्वरूप, त्या ठिकाणी स्थिर राहून आपल्या स्वयंप्रकाशरूपाने तो आपल्या डोळ्याने माझे अजत्व पाहतो.
75-10
मी आदीसिं परु । सकळलोकमहेश्वरु । ऐसिया मातें जो नरु । यापरी जाणें ॥75॥
मी आदिसी पर म्हणजे उत्पत्तिरहित आहे, म्हणून मी सर्व ब्रह्मांडाचा नियंता आहे. असा मी असे जो मनुष्य मला जाणतो.

, ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading