सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा ओवी १ ते २५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

॥ सार्थ ज्ञानेश्वरी: ॥ अथ दशमोऽध्यायः अध्याय दहावा ॥ विभूतियोग ॥
अध्याय दहावा

1-10
नमो विशदबोधविदग्धा । विद्यारविंदप्रबोधा । पराप्रमेयप्रमदा । विलासिया ॥1॥
स्पष्ट ब्रह्मबोध करून देण्यांत निपुण असणारे, ब्रह्मविद्यारूपी कमलाला विकसित करणारे, पराविद्येचे प्रमेय जें परब्रह्म- तीच कोणी स्री- तिच्याशीं विलास करणारे, अशा तुम्हांला, हे श्रीगुरो ! माझा नमस्कार असो.
2-10
नमो संसारतमसूर्या । अप्रतिमपरमवीर्या । तरुणतरतूर्या । लालनलीला ॥2॥
जे अज्ञानरूपी अंधःकाराचा नाश करणारे सूर्य आहेत, उपमा देता येणार नाही असे जे अगाध सामर्थ्यवान आहेत, तरूण म्हणजे उत्पत्तिनाशरहित व तरुणतर म्हणजे प्रयत्नावांचून अखंड कायम राहणार्‍या अशा तूर्यांवस्थेचें जे पालन करण्याची लीला करणारे आहेत, अशा श्रीगुरो ! तुम्हाला नमस्कार असो.
3-10
नमो जगदखिलपालना । मंगळमणिनिधाना । सज्जनवनचंदना । आराध्यलिंगा ॥3॥
जें संपूर्ण जगाचें पालन करणारे आहेत, जे संपूर्ण कल्याणरूपी रत्नांचा सांठा आहेत किंवा सर्व कल्याणांत श्रेष्ठ असे जे आत्मकल्याणाचा सांठा आहेत, जे सज्जनरूपी वनास चंदनासारखे सुगंधित करून सोडणारे आहेत, ब्रह्मादिकांना सेव्य हेच ज्यांचें चिन्ह आहे, हे श्रीगुरो ! अशा तुम्हाला माझा नमस्कार असो.
4-10
नमो चतुरचित्तचकोर चंद्रा । आत्मानुभवनरेंद्रा । श्रुतिसार समुद्रा । मन्मथमन्मथा ॥4॥
जे चतुरांच्या चित्तरूपी चकोराला चंद्राप्रमाणे आल्हादकारक आहेत, जे आत्मानुभवाचे राजे आहेत, श्रृतीचे सार जें ब्रह्मज्ञान, त्याचा जे समुद्र आहेत व जे कामालाहि मोहून घेणारे किंवा जिंकणारे आहेत, अशा श्रीगुरुराया ! तुम्हाला माझा नमस्कार असो.
5-10
नमोसुभावभजनभाजना । भवेभकुंभभंजना । विश्वोद्‍भवभुवना । श्रीगुरुराया ॥5॥
जे निष्काम प्रेमाने भजन करण्यास योग्य आहेत, जे संसाररूपी हत्तीचे गंडस्थल फोडणारे आहेत, जे सर्व जगताच्या उत्पत्तीला किंवा भासाला अधिष्ठानभूत आहेत, अशा श्रीगुरुनाथा ! तुम्हांला नमस्कार असो.


6-10
तुमचा अनुग्रहो गणेशु । जैं दे आपुला सौरसु । तैं सारस्वतीं प्रवेशु । बाळकाही आथी॥6॥
श्रीगुरुनाथा ! तुमची कृपा हीच गणेश देवता होय. तिने आपला प्रसाद केला असता, अज्ञ नेणता बालक देखील सर्वविद्यापारंगत होतो.
7-10
जी दैविकीं उदार वाचा । जैं उद्देशु दे नाभिकाराचा । तैं नवरससुधाब्धीचा । थावो लाभे॥7॥
अहो जी गुरुनाथा ! तुम्हा देवाच्या थोर औदर्याने संपन्न असलेल्या वाणीकडून “भिऊ नकोस” असे अभय वचन मिळाले असता, श्रृंगारादि नवरसरूपी अमृताच्या समुद्राचाही थांग घेता येतो.
8-10
जी आपुलिया स्‍नेहाची वागेश्वरी । जरी मुकेयातें अंगिकारी । तो वाचस्पतीशीं करी । प्रबंधुहोडा॥8॥
श्रीगुरुनाथा ! आपले प्रेम हीच कोणी सरस्वती होय. हिने जर मुक्याचा अंगीकार केला, तर तो बृहस्पतीशी देखील ग्रंथरचनेत पैज लावू शकेल.
9-10
हें असो दिठी जयावरी झळके । कीं हा पद्मकरु माथां पारुखे । तो जीवचि परि तुके । महेशेंसीं॥9॥
हे असो, श्रीगुरुराया ! तुमची कृपादृष्टी ज्याच्यावर आपला ज्ञानप्रकाश पाडील किंवा तुमचे हस्तकमल ज्याच्या डोक्यावरा जाईल, तो जीव जरी असला, तरी तो शंकरासमान होतो.
10-10
एवढें जिये महिमेचें करणें । तें वाचाबळें वानूं मी कवणें । कां सूर्याचिया आंगा उटणें । लागत असे?॥10॥
श्रीगुरुच्या महिम्याचे असे अगाध सामर्थ्य मी कोणत्या वाणीच्या बळाने वर्णन करू ! सूर्याच्या अंगाला उटणे लावून स्वच्छ करावे लागते काय?


11-10
केउता कल्पतरुवरी फुलौरा? । कायसेनि पाहुणेरु क्षीरसागरा? । कवणें वासीं कापुरा । सुवासु देवों?॥11॥
कामनापूर्तीकरिता नमरसाचा फुलवरा (नवसाप्रीत्यर्थ देवतेवर पात्या, करंज्या लावून फुलवरा बांधतात तो प्रकार) बांधायला पाहिजे काय? क्षीरसागराला कशाचा पाहुणचार करता येईल? कापराला कोणत्या सुवासाने सुवासित करता येईल?
12-10
चंदनातें कायसेनि चर्चावें । अमृतातें केउतें रांधावें । गगनावरी उभवावें । घडे केवीं?॥12॥
चंदनाला कशाची उटी लावावी? अमृताला शिजविण्याचे काय प्रयोजन आहे? आकाशापेक्षा उंच होणे कसे घडणार?
13-10
तैसें श्रीगुरूचें महिमान । आकळितें कें असे साधन? । हें जाणोनि मियां नमन । निवांत केलें॥13॥
त्याप्रमाणे श्रीगुरुचे महात्म्य आकलन करता येण्याजोगे कोणते साधन आहे? (कोणतेच नाही.) हे जाणून मी मुकाट्याने तुमच्या पायावर डोके ठेविले आहे.
14-10
जरी प्रज्ञेचेनि आथिलेपणें । श्रीगुरूसामर्थ्या रूप करूं म्हणे । तरि तें मोतियां भिंग देणें । तैसें होईल ॥14॥
जर बुध्दिच्या व्युत्पत्त्यादि सामर्थ्याने श्रीगुरुच्या सामर्थ्याचे वर्णन करीन, असे कोणी म्हणेल, तर ते त्याचे करणे, पाणीदार मोत्याला अभ्रकाचे पुट लावण्यासारखे होईल.
15-10
कां साडेपंधरया रजतवणी । तैशीं स्तुतींचीं बोलणीं । उगियाचि माथा ठेविजे चरणीं । हेंचि भलें॥15॥
किंवा श्रीगुरुची शब्दाने स्तुती करणे, हे शुध्द सोन्याला रूप्याचे पाणी देण्यासारखे होणार आहे, म्हणून मुकाट्याने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवणे हेच मी उत्तम समजतो.


16-10
मग म्हणितलें जी स्वामी । भलेनि ममत्वें देखिलें तुम्हीं । म्हणौनि कृष्णार्जुनसंगमीं । प्रयागवटु जाहलों॥16॥
नंतर श्रीज्ञानेश्वर महाराज श्रीगुरुनिवृत्तिनाथांना म्हणतात, अहो जी गुरुनाथा ! माझ्यावर तुम्ही अत्यंत ममता करीत आहा, म्हणूनच श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादरूपी संगमाच्या ठिकाणी मी, प्रयागातील (त्रिवेणी संगमावरील) वटवृक्षाप्रमाणे झालो.
17-10
मागां दूध दे म्हणतलियासाठीं । आघविया क्षीराब्धीची करूनि वाटी । उपमन्यूपुढें धूर्जटी । ठेविली जैसी॥17॥
मागे उपमन्युने दुध मागितले असतां क्षीरसागराचीच वाटी करून ज्याप्रमाणे शंकराने त्याच्या पुढे ठेवली,
18-10
ना तरी वैकुंठपीठनायकें । रुसला ध्रुव कवतिकें । बुझाविला देऊनि भातुकें । ध्रुवपदाचें॥18॥
किंवा वैकुंठलोकाचा स्वामी जो भगवान विष्णू, त्याने रूसलेल्या ध्रुवाला ध्रुवपदाचे भातुके देऊन त्याचे सहज सांत्वन केले,
19-10
तैसी जे ब्रह्मविद्यारावो । सकळ शास्त्रांचा विसंवता ठावो । ते भगवद्‍गीता वोंविये गावों । ऐसें केलें॥19॥
त्याप्रमाणे ब्रह्मविद्येचा राजा आणि सर्व शास्रांचे विश्रांतिस्थान अशी जी भगवद्गीता, ती माझ्याकडून ओवीरूप छंदात गाववून दाखविली.
20-10
जे बोलणियाचे रानीं हिंडतां । नायकिजे फळलिया अक्षराची वार्ता । परि ते वाचाचि केली कल्पलता । विवेकाची॥20॥
येथे वाणीने बोलल्या जाणार्‍या शब्दांच्या जंगलात हिंडत असतां, आत्मज्ञानरूप अर्थफळाने फळणार्‍या अक्षराची वार्ता देखील ऐकायला येत नाही, पण आपण माझी वाणी विवेक- ज्ञानरूप अर्थफळाने फळणारी कल्पलताच केली.


21-10
होती देहबुद्धी एकसरी । ते आनंद भांडारा केली वोवरी । मन गीतार्थ सागरीं । जळशयन जालें॥21॥
माझ्या ठिकाणी एकसारखी जी देहबुध्दी – म्हणजे मी देह आहे, अशी बुध्दी – होती, ती आपण आज ब्रम्हानंदाची भंडार साठविलेली खोली केली आणि म्हणूनच निरनिराळ्या पदार्थांचा संकल्प विकल्प करणार्‍या मनाचे – गीतेचा अर्थ जो ब्रह्मानंद, हाच कोणी सागर – त्या सागराच्या जलामध्ये निजणे झाले म्हणजे ते निमग्न झाले.
22-10
ऐसें एकेक देवांचें करणें । तें अपार बोलों केवीं मी जाणें । तऱ्ही अनुवादलों धीटपणें । ते उपसाहिजो जी॥22॥
ही आपली एक एक कृती अगाध सामर्थ्याने भरलेली आहे, ती मी शब्दाने कशी वर्णन करू? असे असूनही धीट होऊन, मी तिचा अनुवाद केला, तो माझा अपराध सहन करा.
23-10
आतां आपुलेनि कृपाप्रसादें । मियां भगवद्‍गीता वोंवीप्रबंधें । पूर्वखंड विनोदें । वाखाणिलें॥23॥
आतां आपल्या कृपाप्रसादाने मी ओवीबध्द छंदात गीतेच्या पूर्वखंडाचे सहज स्पष्टीकरण केले आहे.
24-10
प्रथमीं अर्जुनाचा विषादु । दुजीं बोलिला योगु विशदु । परि सांख्यबुद्धीसि भेदु । दाऊनियां॥24॥
पहिल्या आध्यायात अर्जुनाला झालेल्या विषादाचे वर्णन असून, दुसर्‍या अध्यायात सांख्य बुध्दी व योगबुध्दी यात काय भेद आहे हे बाखवून कर्मयोगाचे स्वरूप स्पष्ट केले आहे.
25-10
तिजीं केवळ कर्म प्रतिष्ठिलें । तेंचि चतुर्थीं ज्ञानेंशीं प्रगटिलें । पंचमीं गव्हरिलें । योगतत्त्व॥25॥
तिसर्‍या अध्यायात केवळ कर्ममार्गाचेच वर्णन केलेले असून, चौथ्या अध्यायात तेच कर्म ज्ञानपूर्वक कसे करावे हे सांगितले. पाचव्या अध्यायात योगतत्वाचे (म्हणजे परमेश्वराचे ठिकाणी स्थिर बुध्दी करण्याचे जे तत्व त्याचे) गूढपणाने निरूपण केले.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *