सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी १ ते २५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

सार्थ ज्ञानेश्वरी: ॥ अथ नवमोऽध्यायःअध्याय नववा ॥ राजविद्याराजगुह्ययोग ॥
अध्याय नववा

1-9
तरि अवधान एकवेळें दीजे । मग सर्व सुखासि पात्र होईजे । हें प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका ॥1॥
श्री ज्ञानेश्वर म्हणतात, ” श्रोतेहो, ऐका. मी प्रतिज्ञापुर्वक हे स्पष्ट सांगतो की, तुम्ही एक लक्ष इकडे दिले तर सर्व सुखाला पात्र व्हाल.
2-9
परि प्रौढी न बोलें हो जी । तुम्हां सर्वज्ञांचां समाजीं । देयावें अवधान हे माझी । विनवणी सलगीची ॥2॥
पण तुम्हा सर्वज्ञांच्या सभेपुढे मी हे आढ्यतेने बोलत नाही हो! ‘तुम्ही लक्ष द्या ‘ ही माझी तुम्हांला लडिवाळपणाची विनंती आहे.
3-9
कां जे लळेयांचे लळें सरती । मनोरथाचे मनौरे पुरती । जरी माहेरें श्रीमंतें होती । तुम्हा ऐसी ॥3॥
कारण, तुम्हांसारखी संपन्न माहेरघरे असल्यावर, आवड म्हणुन जी एक वृत्ति आहे तिची देखील आवड पुर्ण होते, आणि मनोरथाची देखील इच्छा तृप्त होते!
4-9
तुमचेया दिठिवेचिया वोले । सासिन्नले प्रसन्नतेचे मळे । ते साऊली देखोनि लोळें । श्रांतु जी मी ॥4॥
तुमच्या कृपादृष्टीच्या ओलाव्याने भरांत आलेल्या प्रसन्नतेच्या मळ्याची थंडगार सावली पाहून, श्रमलेला असा जो मी, तो त्या ठिकाणी विश्रांति घेतो.
5-9
प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो । म्हणोनि आम्ही आपुलिया स्वेच्छावोलावों लाहों । येथ जरी सलगी करू बिहों । तरी निवो कें पां ॥5॥
महाराज, तुम्ही सुखामृताचे डोहच आहां, म्हणुन आम्ही आपले इच्छेप्रमाणे त्यांत बागडावे असे म्हणतो. येथेही जर तसे करून घेण्यास तुमच्याशी सलगी करण्यास भिऊ लागलो, तर आम्ही तृप्त तरी व्हावे कोठे?


6-9
नातरी बालक बोबडां बोलीं । कां वाकुडां विचुकां पाऊलीं । तें चोज करूनि माऊली । रिझे जेवीं ॥6॥
किंवा बालकाच्या बोबड्या बोलांनी व वेड्यावाकड्या चालण्याने ज्याप्रमाणे कौतुक मानून आई आनंद पावते,त्याप्रमाणे
7-9
तेवी तुम्हा संतांचा पढियावो । कैसेनि तरि आम्हांवरी हो । या बहुवा आळुकिया जी आहों । सलगी करीत ॥7॥
तुम्हां संतजनांची प्रीति कोणत्या तरी रितीने मजवर व्हावी, या पुर्ण इच्छेनें मी तुमच्याशी सलगी करीत आहे.
8-9
वांचूनि माझिये बोलतीये योग्यते । सर्वज्ञ भवादृश श्रोते । काय धड्यावरी सारस्वतें । पढों सिकिजे ॥8॥
याशिवाय तुमच्यासारख्या सर्वज्ञ श्रोत्यांची माझ्या बोलण्याच्या नुसत्या योग्यतेवर प्रिती बसनार नाही. सरस्वतीपुत्राला धडे पाठ करून विद्या संपादन करावी लागते काय?
9-9
अवधारां आवडे तेसणां धुंधुरु । परि महातेजीं न मिरवे काय करूं । अमृताच्या ताटी वोगरूं । ऐसी रससोय कैंची ॥9॥
पहा की, पाहीजे तेवढा मोठा जरी काजवा असला तरी सूर्यप्रकाशापुढे त्याचे तेज पडेल काय? तसेच अमृतरूप ताटांत वाढण्याजोगी पाकनिष्यत्ति कोणती आहे?
10-9
अहो हिमकरासी विंजणे । की नादापुढे आइकवणे । लेणियासी लेणें । हें कहीं आथी ॥10॥
अहो, ज्याचे थंड किरण आहे अशा चंद्राला पंख्याने वारा घालणे किंवा सुस्वराला गायन ऐकविणे, तसेच दागिन्याला अलंकार घालने असे कोठे होईल का?


11-9
सांगा परिमळें काय तुरंबावें । सागरें कवणे ठायीं नाहावें । हें गगनचि आडें आघवें । ऐसा पवाडु कैंचा ॥11॥
परिमळाने कशाचा वास घ्यावा? समुद्राने कशांत न्हावे? आणि हे आकाश ज्यांत मावेल अशी मोठी वस्तु कोणती आहे सांगा बरे!
12-9
तैसें तुमचें अवधान धाये । आणि तुम्ही म्हणा हें होये । ऐसें वक्तृत्व कवणा आहे । जेणे रिझा तुम्ही ॥12॥
त्याचप्रमाणे, तुमचे अवधान तृप्त होईल, आणि तुम्ही असे म्हणाल की, ‘ ही गोष्ट खरी ‘, असे तुम्हांला तृप्त करण्याजोगे वक्तृत्व कोणाचे आहे?
13-9
तरि विश्वप्रगटतिया गभस्ती । हातिवेनि न कीजे आरती । कां चुळोदकें अपांपती । अर्घ्यु नेदिजे ॥13॥

म्हणुन, सर्व जग प्रकाशमय करणाऱ्या सुर्याला काडवातीने आरती करूं नये कीं काय? किंवा समुद्राला चुळकाभर पाण्याने अर्ध्य देऊं नये का?
14-9
प्रभु तुम्ही महेशाचिया मूर्ती । आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती । म्हणोनि बेल जऱ्ही गंगावती । तऱ्ही स्वीकाराल की ॥14॥

महाराज, तुम्ही केवळ शंकराची मुर्ति आहां, आणि मी गरीब तुमची भक्तीने पूजा करीत आहे. म्हणून बोलाच्या ऐवजी माझ्या बोलरूपी निर्गुडीचा तुम्ही स्वीकार करणार नाही का?
15-9
बाळक बापाचिये ताटीं रिगे । रिगौनि बापातेंच जेवऊं लागे । की तो संतोषलेनि वेगें । मुखचि वोडवी ॥15॥
लहान मुल बापाच्या ताटात जेवायला बसुन बापालाच जेवू घालतें, तेव्हां तो संतोषभराने आपले तोंड घांस घेण्याकरीता पुढे करतोच;


16-9
तैसा मी तुम्हांप्रती । चावटी करितसे बाळमती । तरी तुम्हीं संतोषिजे ऐसी जाती । प्रेमाची या ॥16॥
त्याचप्रमाणे, मी जरी तुमच्याशी बालकाप्रमाणे विनोदाने वर्तन करितो, तरी तुम्हांला त्या माझ्या वर्तनापासून आनंदच झाला पाहीजे, असा प्रेमाचा गुण आहे;
17-9
आणि तेणे आपुलेपणाचेनि मोहें । तुम्ही संत घेतले असा बहुवे । म्हणोनि केलिये सलगीचा नोहे । आभारु तुम्हां 17
आणि त्या आपलेपणाच्या अभिमानाने तुम्ही संतजनांनी बहूत प्रकारांनी मला ‘ आपला ‘ असे म्हटले आहे; म्हणून माझ्या या सलगीचा आपणांस विषाद होणार नाही.
18-9
अहो तान्हेयाची लागता झटे । तरी अधिकचि पान्हा फुटे । रोषें प्रेम दुणवटे । पढियंतयाचेनि ॥18॥
अहो, वासराने दुशी दिल्यावर गाईला ज्याप्रमाणे अधिकच पान्हा फुटतो, त्याप्रमाणे अत्यंत प्रिय जो मनुष्य असतो त्याच्या रागावण्याने प्रेम दुप्पट होते.
19-9
म्हणऊनि मज लेंकुरवाचेनि बोलें । तुमचें कृपाळूपण निदैले । ते चेइलें हें जी जाणवलें । यालागीं बोलिलों मी ॥19॥
म्हणून, मज लेकराच्या बोबड्या बोलांनी तुमचे निजलेले कृपाळूपण जागे झाले, असे जाणून मी बोललो.
20-9
एऱ्हवीं चांदणे पिकविजत आहे चेपणी । कीं वारया धापत आहे वाहणी । हां हो गगनासी गंवसणी । घालिजे केवी ॥20॥
येऱ्हवी चंद्राचे चांदणे कोणी आठीत घालून पिकविले आहे काय? किंवा वाऱ्याला वाहण्याकरीता कोणी गति दिली आहे का? तसेच आकाशाला कोणी गवसणी घातली आहे का?


21-9
आइकां पाणी वोथिजावे न लगे । नवनीतीं माथुला न रिगे । तेविं लाजिलें व्याख्यान न निगे । देखोनि जयांते ॥21॥
ऐका : पाण्याला पातळ करावे लागत नाही; आणि लोणी तयार झाल्यावर ते रवीने कोणी घुसळीत नाही, त्याचप्रमाणे, ज्याला पाहून माझे व्याख्यान लाजल्यामुळे माघारी येते.
22-9
हें असो शब्दब्रह्म जिये बाजे । शब्द मावळलेया निवांतु निजे । तो गीतार्थु मऱ्हाटिया बोलिजे । हा पाडु काई ॥22॥
हे असो, ज्यापुढे वेदांचे शब्द कुंठित झाल्यामुळे तेही ज्याच्या शय्येवर गाढ निद्रा घेतात, (ज्यापुढे वेदांची मति कुंठित झाल्यामुळे तेही स्तब्ध राहातात,) तो गीतार्थ मी मराठी भाषेत वर्णन करावा असा माझा अधिकार आहे का?
23-9
परि ऐसियाही मज धिंवसा । तो पुढतियाचि येकी आशा । जे धिटींवा करूनि भवादृश्यां । पढियंता होआवें ॥23॥
परंतु अशी स्थिति असतांही मला पुढच्या आशेवर इच्छा उत्पन्न झाली, ती ही की, मन धीट करून तुमच्यासारख्यांची प्रीति संपादन करावी.
24-9
परि आतां चंद्रापासोनि निवविते । जें अमृताहूनि जीववितें । तेणें अवधान कीजो वाढतें । मनोरथा माझिया ॥24॥
तर आता चंद्रापेक्षाही थंड करणाऱ्या व अमृताहूनही जीवन देणाऱ्या अशा अवधानाने माझ्या मनोरथाला पुष्टि द्या.
25-9
कां जैं दिठिवा तुमचा वरुषे । तैं सकळार्थसिद्धि मती पिके । एऱ्हवी कोंभेला उन्मेषु सुके । जरी उदास तुम्ही ॥25॥
कारण, जर तुमची कृपादृष्टीरूप वृष्टि मजवर पूर्ण होईल, तर माझ्या बुद्धिरूप भूमींत सकलार्थरूप धान्य पिकेल. येरव्ही जर तुम्ही उदास असाल, तर अंकुर आलेलें ज्ञान सुकून जाईल.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *