सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी २६ ते ५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

26-9
सहजें तरी अवधारा । वक्तृत्वा अवधानाचा होय चारा । तरी दोंदें पेलती अक्षरां । प्रमेयाचीं ॥26॥
वक्तृत्वरूप पांखराला अवधानरूपी चारा मिळाल्यावर त्याच्या प्रत्येक अक्षररूपी अवयवाला अर्थरूपी पुष्टि येईल.
27-9
अर्थु बोलाची वाट पाहे । तेथ अभिप्रावो अभिप्रायातें विये । भावाचा फुलौरा होत जाये । मतिवरी ॥27॥
अर्थ हा शब्द बाहेर पडण्याची वाट पहात असतो, शब्द बाहेर पडल्यावर त्यांतून अर्थावर अर्थ निघतात आणि बुद्धीला नानाप्रकारचे श्लेष सुचू लागतात.
28-9
म्हणूनि संवादाचा सुवावो ढळे । तरी हृदयाकाश सारस्वतें वोळे । आणि श्रोता दुश्चिता तरि वितुळे । मांडला रसु ॥28॥
म्हणून,संवादरूपी अनुकूल वारा सुटला असता वक्त्याच्या ह्रदयाकाशांत ब्रह्मज्ञानाची वृष्टि होते; आणि जर ऐकणाराचे दुर्लक्ष असेल, तर वक्तृत्वाला आलेला रस वितळून जातो.
29-9
अहो चंद्रकांतु द्रवता कीर होये । परि ते हातवटी चंद्री कीं आहे । म्हणऊनि वक्ता तो वक्ताचि नव्हे । श्रोतेनि वीण ॥29॥
अहो, चंद्रकांत मण्याला पाझर सुटतो ही गोष्ट खरी आहे, परंतु ही शक्ति एका चंद्राचेच ठिकाणी आहे. म्हणून बोलणारास श्रोत्याशिवाय किंमत नाही;
30-9
परी आतां आमुतें गोड करावें । ऐसे तांदुळी कायसा विनवावे । साइखडियाने काइ प्रार्थावें । सूत्रधारातें ॥30॥
परंतु आम्हांस गोड करुन घ्या,अशी तांदुळांना विनंति करावी लागते का? तसेच, कळसूत्री बाहुल्यांना, ‘आम्हांला नाचवा ‘ म्हणून सुत्रधाराची विनंती करावी लागते का?


31-9
काय तो बाहुलियांचिया काजा नाचवी । कीं आपुलियें जाणिवेची कळा वाढवी । म्हणऊनि आम्हां या ठेवाठेवी । काय काज ॥31॥
तो सुत्रधार बाहुल्यांच्या कामाकरिता त्यांना नाचवीत नाही, तर आपली कुशलता दाखविण्याकरितां नाचवितो; म्हणून आम्हांला या उठाठेवी करण्याचे काय कारण आहे? त्या वेळीं श्रीगुरु निवृत्तिराज म्हणतात,
32-9
तंव गुरु म्हणती काइ जाहलें । हें समस्तही आम्हां पावलें । आतां सांगे जें निरोपिलें । नारायणें ॥32॥
तुला इतके उदास होण्याचे कारण काय झाले? तुझे सर्व बोलणे आम्हांला मान्य आहे; तर आतां श्रीकृष्णांनी जे अर्जुनास सांगीतले, ते सांग.”
33-9
येथ संतोषोनि निवृत्तिदासें । जी जी म्हणऊनि उल्हासें । अवधारां श्रीकृष्ण ऐसे । बोलते जाहले॥33॥
तेव्हां निवृत्तिदासास ज्ञानदेव संतोष पावून मोठ्या उल्हासाने म्हणाले :- होय महाराज, ऐका. श्रीकृष्ण असे म्हणाले :-
श्री भगवानुवाचः
इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ।
ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्षसेऽशुभात्॥9.1॥

34-9
नातरि अर्जुना हें बीज । पुढती सांगिजेल तुज । जें हें अंतःकरणींचे गुज । जीवचिये ॥34॥
अर्जुना, माझ्या अंतःकरणांतील अति गुह्य असे जे ज्ञानाचे आदिकारण, ते पुनः तुला सांगतो.
35-9
येणें मानें जीवाचें हियें फोडावें । मग तुज कां पां मज सांगावे । ऐसें काहीं स्वभावें । कल्पिशी जरी ॥35॥
आता अशा प्रकारे हे जीवीचे गुह्य फोडुन ते तुला मी कां सांगतो अशी जर तुझ्या मनांत सहज शंका येईल,


36-9
तरी परियेसीं प्राज्ञा । तूं आस्थेचीच संज्ञा । बोलिलिये गोष्टींची अवज्ञा । नेणसी करुं ॥36॥
तर बाबारे, ऐक, तू समजदार असून केवळ आस्थेची मूर्ति आहेस; आणि आम्ही जे तुला सांगतो, ते तूं मनापासून ऐकतोस; म्हणून,
37-9
म्हणोनि गूढपण आपुलें मोडो । वरि न बोलावेंही बोलावें घडो । परि आमुचिचे जीवींचें पडो । तुझां जीवीं ॥37॥
आमची गुह्य गोष्ट पडली तरी पडो, आणि न बोलावयाची गोष्ट बोलावी लागली तरी लागो, पण आमच्या ह्रदयांतील गुह्य गोष्ट तुझ्या ह्रदयांत पडो.
38-9
अगा थानीं कीर दूध गूढ । परि थानासीचि नव्हे कीं गोड । म्हणोनि सरो कां सेवितयाची चाड । जरी अनन्य मिळे ॥38॥
अरे, स्तनांत जरी दूध साठविलेले असले तरी त्याची गोडी स्तनाला नसते; म्हणून, जर एकनिष्ठ सेवन करणारा वत्स मिळाला, तर त्याची इच्छा पूर्ण होवो.
39-9
मुडाहूनि बीज काढिलें । मग निर्वाळलिये भूमी पेरिलें । तरी तें सांडीविखुरीं गेलें । म्हणों ये कायी ॥39॥
मुढ्यांतून पेरण्याचे बीं काढून ते तयार केलेल्या जमिनीत पेरले, तर ते सांडलवंडीवरी गेले असे म्हणतां येईल का?

40-9
यालागीं सुमनु आणि शुद्धमती । जो अनिंदकु अनन्यगती । पैं गा गौप्यही परि तयाप्रती । चावळिजें सुखें ॥40॥
याकरितां, प्रशस्त अंतःकरणाचा, शुद्ध बुद्धिचा, निंदा न करणारा व एकनिष्ठ असा जर भक्त असेल, तर त्याला आपली मनांतील गुप्त गोष्टही आनंदाने सांगावी.


41-9
तरि प्रस्तुत आतां गुणीं इहीं । तूं वांचूनि आणिक नाहीं । म्हणोनि गुज तरी तुझां ठायीं । लपवूं नये ॥41॥
तर ह्या गुणांनी संपन्न असा सांप्रत तुजवांचून कोणी नाहीं, म्हणून गुप्त अशी ही गोष्ट तुझ्यापासून चोरता येत नाही.
42-9
आतां किती नावानावा गुज । म्हणतां कानडें वाटेल तुज । तरि ज्ञान सांगेन सहज । विज्ञानेंसीं ॥42॥
आतां वारंवार गुप्त गुप्त म्हटल्यामुळे तुला कंटाळवाणे वाटेल; तर आतां तुला प्रापंचिक ज्ञानासह ब्रह्मज्ञान सांगतो.
43-9
परि तेंचि ऐसेनि निवाडें । जैसें भेसळलें खरें कुडें । मग काढिजे फाडोवाडें । पारखूनियां ॥43॥
परंतु खरे आणि खोटे नाणे एके ठिकाणीं मिसळल्यावर ज्याप्रमाणे फाडी लावून निराळे करतात, त्याप्रमाणे ज्ञान व विज्ञान निराळे करुन दाखवितो.
44-9
कां चांचूचेनि सांडसें । खांडिजे पय पाणी राजहंसें । तुज ज्ञान विज्ञान तैसें । वांटूनि देऊं ॥44॥
किंवा राजहंस आपल्या चोंचीची सांडस करून दूध व पाणी निरनिराळे करतो, त्याप्रमाणे हे ज्ञान-विज्ञान तुला स्पष्ट करून सांगतो.
45-9
मग वारयाचियां धारसां । पडिला कोंडा कां नुरेचि जैसा । आणि अन्नकणाचा आपैसा । राशि जोडे ॥45॥
म्हणजे मग कोंडा व धान्य उफणण्याकरितां वाऱ्यावर धरले असतां धान्याची खाली सहज रास होऊन कोंडा निराळा होतो.


46-9
तैसें जें जाणितलेयासाठीं । संसार संसाराचिये गांठी । लाऊनि बैसवी पाटीं । मोक्षश्रियेचां ॥46॥
त्याप्रमाणे तें जाणल्याबरोबर संसाराच्या पाठीमागेच संसार लावून साधकाला ते मोक्षश्रीच्या पाठीवर नेऊन बसविते!
राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् ।
प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्॥9.2॥

47-9
जें जाणणेयां सुविद्येच्या गांवीं । गुरुत्वाची आचार्यपदवी । जें सकळ गुह्यांचा गोसावी । पवित्रां रावो ॥47॥
ज्याला सर्व ज्ञानांच्या ठिकाणीं मुख्य असे आचार्याचें स्थान मिळते, जे सर्व गुह्यांचा स्वामी, पवित्र वस्तुंचा राजा,
48-9
आणि धर्माचें निजधाम । तेंविंचि उत्तमाचे उत्तम । पैं जया येतां नाहीं काम । जन्मांतराचें ॥48॥
आणि धर्माचे अधिष्ठान; तसेच उत्तमांत उत्तम, व ज्या ज्ञानाची प्राप्ति झाली असतां दुसरा जन्म घेण्याचे कारण रहात नाही;
49-9
मोटकें गुरुमुखें उदैजत दिसे । आणि हृदयीं स्वयंभचि असे । प्रत्यक्ष फावो लागे तैसें । आपैसयाचि ॥49॥
जे गुरूच्या मुखांतून थोडे बाहेर पडू लागले नाहीं तोच शिष्याच्या ह्रदयांत स्वयमेव असलेले (ब्रह्म) त्यास सहज प्राप्त होते;
50-9
तेविंचि पैं गा सुखाचां पाउटीं । चढतां येइजे जयाचिया भेटी । मग भेटल्या कीर मिठी । भोगणे याहि पडे ॥50॥
त्याचप्रमाणे, सुखाच्या पायरीने चढत गेले असतां ज्याची भेट होते; आणि मग भेट झाल्यावर, भेटीपासून, होणाऱ्या सुखाचा ज्याच्या ठिकाणीं लय होतो;

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *