श्रीमद् भागवत पुराण श्रीमद्‌भागवतमाहात्म्यम् पञ्चमोऽध्यायः धुन्धुकारिणो दुर्मृत्युनिमित्तक प्रेतत्वप्राप्तिवर्णनं ततो गोकर्णानुग्रहेणोद्धारश्च – धुंधुकारीचा प्रेतयोनीत जन्म आणि तीतून उद्धार –

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अध्याय ५ वा

धुंधुकारीचा प्रेतयोनीत जन्म आणि तीतून उद्धार –

सूत म्हणाले-शौनका, वडिलांच्या मृत्यूनंतर एक दिवस धुंधुकारीने आपल्या आईस पुष्कळ मारले व विचारले, “बोल. धन कुठे ठेवले आहेस ते ! नाहीतर तुला लाथांनी तुडवीन.” मुलाच्या या धमकीला भिऊन आणि त्याच्या उपद्रवाने दुःखी होऊन एक दिवस रात्री तिने विहिरीत उडी टाकली व ती मरण पावली. योगनिष्ठ गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेला. या घटनांचे त्याला सुख किंवा दुःख झाले नाही. कारण त्याला ना कोणी मित्र होता ना कोणी शत्रू. (१-३)

धुंधुकारी पाच वेश्यांसह घरात राहू लागला. त्यांच्यासाठी भोगसामग्री मिळविण्याच्या चिंतेने त्याची सद्‌बुद्धी नष्ट झाली आणि तो अत्यंत क्रूर कर्मे करू लागला. एक दिवस त्या वेश्यांनी त्याच्याकडे पुष्कळसे दागिने मागितले. कामांध झालेल्या त्याला मृत्यूचे विस्मरण झाले होते. दागिने मिळविण्यासाठी तो घराच्या बाहेर पडला. इकडून तिकडून चोरी करून धन घेऊन तो घरी आला आणि त्याने त्यांना किंमती वस्त्रे आणि पुष्कळ दागिने आणून दिले. चोरीचा पुष्कळ माल बघितल्यावर रात्रीच्या वेळी वेश्यांनी विचार केला की, हा नेहमीच चोरी करतो. तेव्हा एखादे दिवशी त्याला राजा निश्चितपणे पकडेल. राजा निश्चितच याचे धन जप्त करून याला मृत्यूदंडाची शिक्षा देईल. तर मग आपणच धनाचे रक्षण करण्यासाठी गुप्तरूपाने याला का मारू नये ? याला मारून, याची मालमत्ता घेऊन आपण कुठेतरी निघून जाऊ. असा निश्चय करून त्यांनी झोपी गेलेल्या धुंधुकारीला दोरीने बांधले, गळ्याला दोरीचा फास लावून त्याला मारण्याचा प्रयत्‍न केला, तरी तो लवकर मरेना, हे पाहून त्यांना काळजी वाटू लागली. तेव्हा त्यांनी त्याच्या तोंडावर पुष्कळ जळते निखारे टाकले. त्यामुळे अग्निज्वाळांनी भाजून तो तडफडून मृत्युमुखी पडला. त्यांनी ते शरीर एका खड्ड्यात पुरून टाकले. बहुधा स्त्रिया धाडसी असतात ! त्यांच्या या गुप्त कृत्याचा कोणालाही पत्ता लागला नाही. लोकांनी विचारल्यावर त्या सांगत की, “आमचा प्रियकर पैशाच्या लोभाने यावेळी परदेशी गेला आहे. वर्षभरात तो परत येईल.” शहाण्या पुरुषांनी दुष्ट स्वभावाच्या स्त्रियांवर कधीही विश्वास ठेवू नये. जो मूर्ख त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्याला शेवटी दुःखी व्हावे लागते. ज्या स्त्रियांची अमृताप्रमाणे वाणी कामी पुरुषांच्या हृदयांत प्रेम निर्माण करते, त्यांचे हृदय धारदार सुरीप्रमाणे तीक्ष्ण असते. अहो ! या स्त्रियांना कोण प्रिय आहे ? (४-१५)

धुंधुकारीची सर्व संपत्ती घेऊन अनेक पुरुषांकडे जाणार्‍या त्या वेश्या दुसरीकडे निघून गेल्या. आपल्या कुकर्मांमुळे धुंधुकारी भूतयोनीत गेला. तो वावटळीच्या रूपाने दाही दिशांना भटकू लागला. थंडी, उष्णता, तहान भूक यांनी व्याकूळ होऊन तो “हाय दैवा ! हाय दैवा ” असे ओरडत असे. परंतु त्याला कोठेही आश्रय मिळाला नाही. काही कालानंतर धुंधुकारीच्या मृत्यूचा समाचार लोकांमार्फत गोकर्णाच्या कानी गेला. तेव्हा धुंधुकारीला अनाथ समजून गोकर्णाने त्याचे गयाक्षेत्री श्राद्ध केले आणि ज्या ज्या तीर्थक्षेत्रात तो जात असे, तेथे त्याचे श्राद्धअवश्य करीत असे. (१६-१९)

याप्रकारे फिरत फिरत गोकर्ण आपल्या नगरात परतला आणि रात्रीच्या वेळी कोणाच्याही दृष्टीस न पडता सरळ आपल्या घरच्या अंगणात झोपण्यासाठी गेला. आपल्या भावाला झोपलेला पाहून मध्यरात्रीच्या वेळी धुंधुकारीने आपले भयंकर रूप त्याला दाखविले. तो कधी बोकड, कधी हत्ती, कधी रेडा, कधी इंद्र तर कधी अग्नीचे रूप धारण करू लागला. शेवटी तो मनुष्याच्या रूपात प्रकट झाला. त्याच्या या वेगवेगळ्या अवस्था पाहून गोकर्णाने निश्चय केला की, हा कोणी तरी दुर्गती प्राप्त झालेला जीव आहे. तेव्हा त्याने धैर्यपूर्वक त्याला विचारले. (२०-२३)

गोकर्ण म्हणाला-तू कोण आहेस ? रात्रीच्या वेळी अशी भयानक रूपे का दाखवीत आहेस ? तुझी अशी दशा कशी झाली ? तू प्रेत आहेस, पिशाच्च आहेस का कोणी राक्षस आहेस ? हे मला सांग तर खरे ! (२४)

सूत म्हणाले-गोकर्णाने असे विचारल्यावर तो एकसारखा जोरजोराने रडू लागला. त्याला बोलता येत नव्हते, म्हणून त्याने केवळ खुणा केल्या. तेव्हा गोकर्णाने ओंजळीत पाणी घेऊन ते अभिमंत्रित करून त्याच्यावर शिंपडले. त्यामुळे त्याच्या पापांचे काहीसे परिमार्जन झाले आणि तो बोलू लागला. (२५-२६)

प्रेत म्हणाले-मी तुझा भाऊ आहे. माझे नाव धुंधुकारी. मी आपल्याच दोषाने माझे ब्राह्मणत्व नष्ट केले. माझ्या कुकर्मांची गणतीच नाही. मी मोठ्या अज्ञानातच वावरत होतो. म्हणूनच मी लोकांना पीडा दिली. शेवटी वेश्यांनी मला हालहाल करून मारले. म्हणूनच मी प्रेतयोनीत येऊन ही दुर्दशा भोगीत आहे. आता दैववशात माझ्य कर्मांचे फळ म्हणून केवळ वायुभक्षण करून जगत आहे. बंधो, तू दयेचा सागर आहेस. म्हणून काहीही करून लवकरात लवकर मला या योनीतून सोडव. गोकर्णाने धुंधुकारीचे सर्व बोलणे ऐकले आणि तो त्यास म्हणाला. (२७-३०)

गोकर्ण म्हणाला-बंधो ! मी तुझ्यासाठी विधिपूर्वक गयाक्षेत्रात पिंडदान केले. तरीसुद्धा तुझी प्रेतयोनीतून मुक्तता कशी झाली नाही, याचेच मला मोठे आश्चर्य वाटते. गयाश्राद्धामुळेही तुझी मुक्ती झाली नसेल, तर आता दुसरा कोणताही उपाय नाही. तू आता मला सविस्तरपणे सांग की, मी आता काय करावे ? (३१-३२)

प्रेत म्हणाले-शेकडो गयाश्राद्धे करूनही माझी मुक्ती होऊ शकणार नाही. तू आता यासाठी दुसरा कोणतातरी उपाय शोधून काढ. (३३)

प्रेताचे हे म्हणणे ऐकून गोकर्णाला मोठे आश्चर्य वाटले. तो म्हणाला, जर शेकडो गयाश्राद्धे करूनही तुझी मुक्ती होणार नसेल, तर मग तुझी मुक्ती केवळ अशक्य आहे. हे प्रेता ! आता तू निर्भर होऊन आपल्या स्थानावर जा. मी विचार करून तुझ्या मुक्तीचा दुसरा काहीतरी उपाय करीन. (३४-३५)

गोकर्णाची आज्ञा घेऊन धुंधुकारी तेथून आपल्या स्थानाकडे निघून गेला. इकडे गोकर्णाने रात्रभर विचार केला, परंतु त्याला काहीही उपाय सुचला नाही. सकाळ झाल्यावर तो आल्याचे पाहून लोक त्याला प्रेमाने भेटण्यासाठी म्हणून आले. तेव्हा गोकर्णाने रात्री जो प्रकार जसा झाला, तसा तो सर्व त्यांना सांगितला. त्यांपैकी जे लोक विद्वान, योगनिष्ठ, ज्ञानी आणि वेदपारंगत होते, त्यांनी अनेक शस्त्रे धुंडाळून पाहिली, तरीसुद्धा त्यांना प्रेताच्या मुक्तीचा उपाय सापडला नाही. तेव्हा सर्वांनी असा निश्चय केला की, याविषयी सूर्यनारायण जी आज्ञा करतील, तिचेच पालन केले पाहिजे. म्हणून गोकर्णाने आपल्या तपोबलाने सूर्याची गती थांबविली. त्याने सूर्याची स्तुति केली. भगवन, आपण सर्व जगाचे साक्षी आहात. आपणांस नमस्कार अशो. कृपा करून धुंधुकारीच्या मुक्तीचा उपाय आपण मला सांगावा. गोकर्णाची प्रार्थना ऐकून सूर्यदेव लांबूनच स्पष्ट शब्दात म्हणाले की, श्रीमद्‌भागवताने मुक्ती होऊ शकते. म्हणून त्याचे तू सप्ताहपारायण कर. सूर्याचे हे धर्ममय वचन तेथे सर्वांनी ऐकले. तेव्हा सर्वजण म्हणाले की, प्रयत्‍न करून हेच साधन करा. शिवाय हे साधन अतिशय सोपे आहे. म्हणून गोकर्णानेही त्याप्रमाणे निश्चय करून कथा सप्ताहवाचनासाठी तो तयार झाला. (३६-४२)

शेजारच्या प्रांतातून आणि खेड्यापाड्यांतून अनेक लोक कथा ऐकण्यासाठी तेथे आले. पुष्कळसे लुळे-पांगळे, अंध, म्हातारे, आणि मंदबुद्धी लोकही आपल्या पापांची निवृत्ती व्हावी, या उद्देशाने तेथे येऊन पोहोचले. अशा प्रकारे तेथे गर्दी झालेली पाहून देवांनाही आश्चर्य वाटले. जेव्हा गोकर्ण व्यासपीठावर बसून कथा सांगू लागला, तेव्हा ते प्रेतही तेथे आले आणि बसण्यासाठी इकडे तिकडे जागा शोधू लागले. इतक्यात सात गाठी असलेल्या एका उंच वेळूवर त्याची दृष्टी गेली. त्या वेळूच्या सर्वांत खालच्या गाठीच्या छिद्रात घुसून ते प्रेत तेथे बसून राहिले. वायुरूप असल्याकारणाने ते कुठे बाहेर बसू शकत नव्हते. म्हणून वेळूत घुसले. (४३-४६)

गोकर्णाने एका वैष्णव ब्राह्मणाला मुख्य श्रोता बनविले आणि पहिल्या स्कंधापासून स्पष्ट शब्दांत कथा सांगण्यास प्रारंभ केला. सायंकाळी जेव्हा कथा संपली तेव्हा एक विचित्र घटना घडली. सर्वांच्या देखत त्या वेळूची एक गाठ तडतड करीत फुटली. त्याचप्रमाणे दुसर्‍या दिवशी सायंकाळी दुसरी गाठ फुटली आणि तिसरे दिवशी त्याच वेळी तिसरी गाठ फुटली. अशा प्रकारे सात दिवसात सात गाठी फुटून बारा स्कंध ऐकल्यानंतर धुंधुकारी पवित्र होऊन प्रेतयोनीतून मुक्त झाला आणि दिव्य शरीर धारण करून सर्वांसमोर प्रगट झाला. त्याचे शरीर मेघाप्रमाणे श्याम वर्णाचे, पीतांबर नेसलेले, गळ्यात तुळसीमाळांनी सुशोभित असे होते. मस्तकावर सुंदर मुकुट आणि कानांमध्ये कुंडले झळकत होती. त्याने ताबडतोब आपला भाऊ गोकर्णाला नमस्कार केला आणि तो म्हणाला, बंधो, तू दयाळूपणाने माझी प्रेतयोनीच्या यातनांपासून सुटका केलीस. प्रेतपीडेचा नाश करणारी ही श्रीमद्‌भागवताची कथा धन्य होय. श्रीकृष्णधामाची प्राप्ती करून देणारे हे सप्ताह पारायणही धन्य होय ! जेव्हा एखाद्याला सप्ताह श्रवाणाचा योग येतो तेव्हा त्याच्या पापांचा थरकाप उडतो. कारण भागवताची कथा आपला लगेच नाश करील, असे त्यांना वाटते. ज्याप्रमाणे अग्नी ओले-सुके, लहान-मोठे असे सर्व प्रकारचे लाकूड भस्मसात करतो. त्याप्रमाणे हे सप्ताहश्रवण मन, वाणी आणि क्रियांद्वारा केलेली नवी-जुनी, लहान-मोठी, सर्व पापे भस्मसात करते. (४७-५५)

विद्वानांनी देवतांच्या सभेत म्हटले आहे की, या भारतवर्षात जो श्रीमद्‌भागवताची कथा ऐकत नाही, त्याचा जन्म व्यर्थ होय. (५६)

बरे ! या नाश पावणार्‍या शरीराचे मोहपूर्वक लालनपालन करून त्याला धष्टपुष्ट आणि बलवान बनविले आणि जर श्रीमद्‌भागवताची कथा ऐकली नाही, तर त्याचा काय उपयोग ? हाडे या शरीराचे आधारस्तंभ आहेत, नाडीरूपी दोर्‍यांनी याला बांधले आहे, त्यावर मांस आणि रक्त यांचा लेप देऊन कातड्याने याला मढविले आहे. हे मलमूत्राचे भांडेच असल्याने यातील प्रत्येक अंगाला दुर्गंधी येत आहे. वृद्धावस्था आणि शोक यांमुळे परिणामतः हे दुःखमय असून रोगांचे घरच आहे. कोणत्या ना कोणत्या इच्छेने हे व्याकूळ असते, याची कधी तृप्तीच होत नाही. याला धारण करणे हेही एक ओझेच आहे. याच्या रोमरोमात दोष भरलेले आहेत आणि नष्ट होण्याला याला एक क्षणही लागत नाही. शेवटी याला पुरले तर त्यांतून किडे उत्पन्न होतात. पशूंनी खाल्ले तर विष्टेत रूपांतर होते आणि अग्नीत जाळले तर राखेचा ढीग तयार होतो. असा तीनच प्रकारांनी याचा शेवट होतो. अशा विनाशी शरीराकडून मनुष्य अविनाशी फळ देणारे काम का करून घेत नाही ? जे अन्न सकाळी शिजविले जाते, ते संध्याकाळपर्यंत खराब होऊन जाते. तर मग त्यांतील रसामुळे पुष्ट झालेले शरीर नित्य कसे राहील. (५७-६१)

या जगात सप्ताहश्रवण केल्याने भगवंतांची तत्काळ प्राप्ती होऊ शकते. म्हणून सर्व प्रकारचे दोष नाहीसे होण्यासाठी हेच एकमेव साधन आहे. जे लोक भागवतकथा श्रवण करीत नाहीत, ते पाण्यावरील बुडबुडे आणि डास यांच्याप्रमाणे केवळ नाहीसे होण्यासाठीच जन्माला येतात. ज्याच्या प्रभावामुळे निर्जीव आणि वाळलेल्या बांबूच्या गाठी तुटतात, त्या भागवतकथेच्या श्रवणाने चित्ताची अज्ञानरूप गाठ सुटते, त्याचे सर्व संशय नाहीसे होतात आणि सर्व कर्में क्षीण होतात. हे भागवतरूपी तीर्थ संसारातील पापरूप चिखल धु‍ऊन काधण्यात पटाईत आहे. विद्वानांचे म्हणणे आहे की, जेव्हा हे कथातीर्थ हृदयात स्थिर होते, तेव्हा मनुष्याची मुक्ति होते, हे निश्चित समजावे. (६२-६६)

ज्यावेळी धुंधुकारी हे सर्व सांगत होता, त्याचवेळी वैकुंठातील पार्षदांसह एक तेजस्वी विमान तेथे उतरले. सर्व लोकांच्या समक्ष धुंधुकारी त्या विमानात चढून बसला. तेव्हा विमानातून आलेल्या पार्षदांना गोकर्ण म्हणाला-(६७-६८)

गोकर्णाने विचारले-भगवंतांच्या प्रिय पार्षदांनो ! येथे तर शुद्ध अंतःकरणाचे अनेक श्रोते आहेत. त्या सर्वांसाठी आपण आपल्याबरोबर आणखी विमाने का आणली नाहीत ? आम्हांला तर असे दिसते की, इथे सर्वांनी सारख्याच भावनेने कथा ऐकली आहे. तर मग फलप्राप्तीत असा भेद का, हे आपण सांगावे. (६९-७०)

हरिदास म्हणाले-फलप्राप्तीच्या भेदाचे कारण श्रवणातील भेद हे आहे. श्रवण सर्वांनी सारखेच केले हे म्हणणे बरोबर आहे. परंतु याच्यासारखे सर्वांनी मनन केलेले नाही. म्हणूनच सर्वांनी एकाच वेळी श्रवण केल्यानंतरही फळात फरक पडला. या प्रेताने सात दिवस उपवास करून श्रवण केले होते. तसेच ऐकलेल्या विषयाचे स्थिरचित्ताने खूप मनन आणि निदिध्यासनही ते करीत होते. जे ज्ञान चित्तात दृढ होत नाही, ते व्यर्थ होय. त्याचप्रमाणे लक्ष न देता केलेले श्रवण, संशयी मनाने केलेले मंत्रपठण आणि मन इकडे तिकडे भटकत असताना केलेला जप काहीही फल देत नाही. वैष्णव नसलेला देश, अपात्र व्यक्तीला दिलेले श्राद्धाचे भोजन, अवैदिकाला दिलेले दान आणि सदाचारहीन कूळ, हे सर्व व्यर्थ होय. गुरुवचनावर विश्वास, अंतःकरणात नम्रता, मनातील विकारांवर विजय आणि कथा ऐकताना चित्ताची एकाग्रता आदी नियमांचे पालन केले गेले, तर श्रवणाचे फळ मिळते आणि अशा रीतीने श्रोत्यांनी पुन्हा श्रीमद्‌भागवताची कथा ऐकली तर त्यांना निश्चितच वैकुंठप्राप्ती होईल. हे गोकर्णा, आपल्याला तर भगवंत स्वतः येऊन गोलोकधामाला घेऊन जातील, असे म्हणून ते सर्व पार्षद हरिकीर्तन करीत वैकुंठलोकी निघून गेले. (१७-७७)

गोकर्णाने श्रावण महिन्यात पुन्हा त्याच प्रकारे सप्ताह करून कथा सांगितली आणि त्याच श्रोत्यांनी ती पुन्हा ऐकली. हे नारदमुनी ! या कथेच्या समाप्तीनंतर काय झाले ते ऐका. भगवंत आपल्या भक्तांनी भरलेल्या विमानांसह तेथे प्रगट झाले. त्यावेळी सगळीकडे नमस्कार आणि जयजयकाराचा घोष होऊ लागला. भगवंतांनी अत्यंत आनंदाने आपल्या पांचजन्य शंखाचा नाद केला आणि गोकर्णाला आपल्या हृदयाशी कवटाळून त्याला आपल्यासारखे रूप दिले. भगवंतांनी क्षणातच अन्य सर्व श्रोत्यांनाही मेघासारखे श्यामवर्ण, रेशमी पीतांबरधारी, किरीट आणि कुंडले यांनी विभूषित केले. गोकर्णाच्या कृपेने त्या गावातील कुत्र्यापासून चांडाळापर्यंत जेवढे जीव होते, त्या सर्वांना विमानात बसविण्यात आले. जेथे योगीजन जातात त्या भगवद्‌धामात त्या सर्वांना पाठविण्यात आले. अशा रीतीने कथाश्रवणाने प्रसन्न होऊन भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण गोकर्णाला बरोबर घेऊन गोपगोपींच्या प्रिय गोलोकधामाला गेले. पूर्वी ज्याप्रमाणे भगवान श्रीराम अयोध्या-वासीयांना घेऊन आपल्या धामाला गेले होते, त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण त्या सर्वांना घेऊन योग्यांना सुद्धा दुर्लभ असणार्‍या गोलोकाला गेले. ज्या लोकात सूर्य, चंद्र आणि सिद्ध हे सुद्धा जाऊ शकत नाहीत, तेथे ते श्रीमद्‌भागवत श्रवण केल्यामुळे गेले. (७८-८६)

सप्ताह-यज्ञ कथा श्रवण केल्याने जे उज्ज्वल फल साठते, त्याविषयी आम्ही आपल्याला काय सांगावे ? अहो ! ज्यांनी आपल्या कर्णपुटांद्वारे गोकर्णाने सांगितलेल्या कथेचे एक अक्षरसुद्धा ऐकले, ते पुन्हा गर्भवासी झाले नाहीत. ज्या गतीला सप्ताहश्रवणाने भक्त सहजगत्या प्राप्त करून घेतात, त्या गतीला मनुष्य वारा, पाणी किंवा पाने खाऊन शरीर सुकवून पुष्कळ काळपर्यंत घोर तपस्या करून आणि योगाभ्यास करूनही प्राप्त करू शकत नाही. या परम पवित्र इतिहासाचे पारायण चिय्रकूट पर्वतावर विराजमान असलेले मुनीश्वर शांडिल्यसुद्धा ब्रह्मानंदात मग्न होऊन करीत असतात. ही कथा मोठी पवित्र आहे. एक वेळ श्रवण केल्यानेही सर्व पापांचे भस्म होते. श्राद्धाचे वेळी याचा पाठ केला, तर त्यामुळे पितृगणांची तृप्ती होते आणि नित्य पाठ केल्याने मोक्षाची प्राप्ती होते. (८७-९०)

अध्याय पाचवा समाप्त

भागवत महापूराण संपूर्ण माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

No comments yet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *