सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी ३०१ ते ३२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

301-14
किंबहुना पंडुसुता । ऐसी तो माझी सत्ता । पावे जैसी सरिता । सिंधुत्व गा ॥301॥
फार काय सांगावे? अर्जुना, ज्याप्रमाने नदी समुद्राला प्राप्त होत असते. त्याप्रमाणे असा तो द्रष्टा पुरुष माझ्या स्वरुपाला प्राप्त होतो.
302-14
नळिकेवरूनि उठिला । जैसा शुक शाखे बैसला । तैसा मूळ अहंतें वेढिला । तो मी म्हणौनि॥302॥
जसा राघू नळिकेवरून उठून (मोकळेपणे) झाडाच्या दुसर्‍या फांदीवर बसावा, तसा तो देहाहंता सोडून स्वरूप (ब्रह्म) हेच मी आहे. म्हणून तो स्वरूप-अहंतेने वेष्टिला गेला.
303-14
अगा अज्ञानाचिया निदा । जो घोरत होत बदबदा । तो स्वस्वरूपीं प्रबुद्धा । चेइला कीं ॥303॥
हे ज्ञानसागर अर्जुना ! अज्ञानरूपी निद्रेने मीच देह आहे आणि स्ञी, पुञ, ही धन संपत्ती सर्व माझी आहे. असे म्हणत जो घोरत पडला होता. तो ब्रम्हस्वरुपाच्या अवस्थेत मी ब्रम्हच आहे; याच ज्ञानाने जागा झाला.
304-14
पैं बुद्धिभेदाचा आरिसा । तया हातोनि पडिला वीरेशा । म्हणौनि प्रतिमुखाभासा । मुकला तो ॥304॥
अर्जुना भेदप्रतीती निर्मान करनारा हाच कोणी एक बुद्धिरुपी आरसा, तो त्याच्या हातून पडून फुटल्यामुळे तो ज्ञानाने बाधित होऊन तो जिवरुपी प्रतिबिंबाला मुकला आहे.
305-14
देहाभिमानाचा वारा । आतां वाजो ठेला वीरा । तैं ऐक्य वीचिसागरां । जीवेशां हें ॥305॥
हे वीरा अर्जुना ! देह तादात्म्याचा वारा वाहणे ज्या वेळस बंद होते.तेव्हा लाटांचे सागराशी ऐक्य असते. ह्या पुरुषाच्या ठिकाणी जीवाचे जसे ब्रम्हाशी ऐक्य होते.

306-14
म्हणौनि मद्भावेंसी । प्राप्ति पाविजे तेणेंसरिसी । वर्षांतीं आकाशीं । घनजात जेवीं ॥306॥
म्हणून त्या आत्मज्ञानी पुरुषाला लागलीच माझ्या स्वरुपाची प्राप्ती होते. ज्याप्रमाणे ढग हे पावसाळा संपल्यानंतर शेवटी ते आकाशरूप होऊन रहातात.
307-14
तेवीं मी होऊनि निरुता । मग देहींचि इये असतां । नागवे देहसंभूतां । गुणांसि तो ॥307॥
असा ज्ञानी असणारा भक्त मद्रुप झाल्यावर जरी देहात असले काही आणि नसले काय तरीसुद्धा त्याप्रमाणे वस्तुत: मद्रूप झाल्यावर मग जरी तो या देहात असला तरी तो देहाला उत्पन्न करणार्‍या गुणांच्या तावडीत सापडत नाही.
308-14
जैसा भिंगाचेनि घरें । दीपप्रकाशु नावरे । कां न विझेचि सागरें । वडवानळु ॥14-308॥
ज्याप्रमाणे काचेचा कंदिल-दिवा भिंगाच्या घरात ठेवला म्हणजे त्या दिव्यातुन येणारा प्रकाश त्या घराकडुन ज्याप्रमाने कोंडुन ठेवला जाऊ शकत नाही, परंतु तो देहात असुनही. सागराकडुन विझला जात नाही.,
309-14
तैसा आला गेला गुणांचा । बोधु न मैळे तयाचा । तो देहीं जैसा व्योमींचा । चंद्र जळीं ॥309॥
त्याप्रमाणे गुणांच्या येण्या-जाण्याने त्या ज्ञानी असणार्‍या भक्ताचा आत्मबोध मलिन होत नाही. जसा आकाशातील चंद्राची सावली जरी पाण्यात पडली असता, तरी जसा तो ओला होत नाही, त्याप्रमाने तो देहात असुनसुद्धा गुणांनी बांधला जाऊ शकत नाही.
310-14
तिन्ही गुण आपुलालिये प्रौढी । देहीं नाचविती बागडीं । तो पाहोंही न धाडी । अहंतेतें ॥310॥
तिन्ही गुण आपापल्या सामर्थ्याने देहामधे विविध प्रकारचे प्रयत्न करतात, परंतु तो आपल्या अहंतेला ते प्रयत्न पहाण्यासही पाठवत नाही.

311-14
हा ठायवरी । नेहटोनि ठेला अंतरीं । आतां काय वर्ते शरीरीं । हेंहीं नेणे ॥311॥
अशा परिस्थितीत तो ज्ञानी मनुष्य अंतकरणामध्ये अत्यंत बळकट असा निश्चय करुन एका जागेवर स्थिर राहण्यातच आपले हीत जाणत असतो. वर्तमान काळात शरीराच्या ठिकानी काय काय घडते, याचा तो किंचितही विचार करत नाही.
312-14
सांडुनि आंगींची खोळी । सर्प रिगालिया पाताळीं । ते त्वचा कोण सांभाळी । तैसें जालें ॥312॥
आपल्या अंगावरची कात टाकून सर्पाने बिळात प्रवेश केल्यानंतर त्या कातेचे काय होईल याची व्यर्थ काळजी करत बसत नाही. त्याप्रमाने तो ज्ञानी मनुष्य तो आपल्या देहाविषयी व्यर्थ चिंता करण्यात आपला बहुमुल्य वेळ घालवित बसत नाही.
313-14
कां सौरभ्य जीर्णु जैसा । आमोदु मिळोनि जाय आकाशा । माघारा कमळकोशा । नयेचि तो ॥313॥
अथ?थवा कमळातील सुगंध पुर्णपणे विकसित झाल्यावर जसा त्याचा सुवास आकाशात मिसळून जातो व तो पुन्हा कमळाच्या फुलाकडे माघारी येत नाही,
314-14
पैं स्वरूपसमरसें । ऐक्य गा जालें तैसें । तेथ किं धर्म हें कैसे । नेणें देह ॥314॥
अर्जुना, ब्रह्मतत्वाशी ऐक्य पावल्यामुळे त्या ज्ञानी पुरुषाची स्थिती तशीच झालेली असते. अशा अवस्थेत? देहाचे धर्म काय आहेत? व देह कसा आहे, हे तो जाणत नाही.
315-14
म्हणौनि जन्मजरामरण । इत्यादि जे साही गुण । ते देहींचि ठेले कारण । नाहीं तया ॥315॥
म्हणून जन्म, अस्तित्व, वर्धन, विपरिणाम व मरण,म्हातारपणा व विनाश इत्यादि देहाचे जे सहा विकार आहेत, ते त्याच्या देहाच्या ठिकाणीच राहिलले असतात.

316-14
अशा त्या ज्ञानी मनुष्याचा या सहा विकाराशी काडीमाञ संबध नसतो.
घटाचिया खापरिया । घटभंगीं फेडिलिया । महदाकाश आपैसया । जालेंचि असे ॥316॥
घट फुटल्यावर व घटाच्या खापर्‍या दुर फेकून दिल्यावर ते घटातील आकाश जसे आपोआपच महाकाश झालेले असते.
317-14
तैसी देहबुद्धी जाये जें आपणपां आठवू होय । तैं आन कांहीं आहे । तेंवांचुनी? ॥317॥
त्याप्रमाणे देहबुद्धी गेल्यावर ज्यावेळी आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचे अखंड अनुसंधान घडते. किंवा स्मरण होते, तेव्हा आत्मस्वरूपावाचून दुसर्‍या कशाची आठवण राहते काय?
318-14
येणें थोर बोधलेपणें । तयासि गा देहीं असणें । म्हणूनि तो मी म्हणें । गुणातीत ॥318॥
ज्याच्या अंतकरणामध्ये झालेला असा हा महान बोध तो देहधारी असला तरी तो गुणातीत झाला आहे. असे भगवान सांगतात.
319-14
यया देवाचिया बोला । पार्थु अति सुखावला । मेघें संबोखिला । मोरु जैसा ॥319॥
जसा काही मेघांच्या गर्जनेने हाक दिलेला मोर जसा सुखावतो, त्याप्रमाणे या देवाच्या संवादाने,बोलण्याने अर्जुन अतिशय आनंदित झाला.
320-14
अर्जुन उवाच ।
कैर्लिंगैस्त्रीन्गुणात्नेतानतीतो भवति प्रभो ।
किमाचारः कथंचैतांस्त्रीन्गुणानतिवर्तते ॥14.21॥

*श्लोकार्थ -: अर्जुन म्हणाला, हे प्रभो, या तीन गुणांच्या पलीकडे जो जातो तो कोणत्या लक्षणांनी ओळखावा? त्याचे आचरण कसे असते? तो कोणत्या उपायाच्या आधारे या तीनही गुणांना ओलांडुन पलीकडे तो कशाप्रकारे जातो.?
त्याचे आचरण कोणत्या प्रकारचे असेल.?
तेणें तोषें वीर पुसे । जी कोण्ही चिन्हीं तो दिसे । जयामाजीं वसे । ऐसा बोधु ॥320॥
त्या संतोषाने वीर अर्जुन विचारू लागला की महाराज, ज्याच्या अंतकरणामध्ये असा बोध झाला आहे, तो पुरुष कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो? किंवा काय लक्षणे असु शकतील.

321-14
तो निर्गुण काय आचरे । कैसेनि गुण निस्तरे । हें सांगिजो माहेरें । कृपेचेनि ॥321॥
तो गुणातीत पुरुष कसा आचरण करतो? व तो गुणांचें कसे उल्लघंन किंवा निवारण कसे करतो? आपण तर कृपेचे माहेरघर आहात, आपण हे आम्हाला सांगावे.
322-14
यया अर्जुनाचिया प्रश्ना । तो षड्गुणांचा राणा । परिहारु आकर्णा । बोलतु असे ॥322॥
ह्या अर्जुनाच्या प्रश्नावर तो ऐश्वर्यादी सहा गुण ऐश्वर्यसंपन्न राजा (श्रीकृष्ण) काय उत्तर देत आहे त्याचे श्रवण करा.
323-14
श्रीभगवानुवाच ।
प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पाण्डव ।
न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति ॥14.22॥

*श्लोकार्थ -: श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, सत्वगुणाचे कार्यरुप प्रकाश, रजोगुणाचे कार्य प्रवृत्ती आणि तमोगुणाचे कार्यरुप मोह ही प्राप्त झाली असता दुःख बुद्धिने झालेला मनुष्य त्यांचा तिरस्कार करत नाही व प्राप्त झाली नसताना तो सुखबुद्धिने त्याची आकांक्षा करत नाही.
(अर्जुनाच्या प्रश्न विचारण्यातील चूक)
म्हणे पार्था तुझी नवाई । हें येतुलेंचि पुससी काई । तें नामचि तया पाहीं । सत्य लटिकें ॥323॥
परमात्मा म्हणाले, हे पार्था ! तुझी प्रश्न करण्याची पद्धत अपूर्वच आहे. तो गुणातीत काय कर्मे करतो व गु्णातीत कसा तरून जातो हे एवढेच असंबंद्ध काय विचारतोस? हे तुझे विचारणे ‘खरे हे कसे खोटे आहे?’ असे विचारण्यासारखे विसगंत आहे.
324-14
गुणातीत जया नांवें । तो गुणाधीन तरी नव्हे । ना होय तरी नांगवे । गुणां यया ॥324॥
अर्जुनाचा प्रश्न विसंगत कसा आहे हे भगवान या ओवीत सांगतात). गुणातीत ज्याला म्हणतात, तो गुणांच्या स्वाधीन तर नसतोच अथवा तो जरी गुणात असला तरी तो त्या गुणांच्या स्वाधीन होत नाही.
325-14
परी अधीन कां नांगवें । हेंचि कैसेनि जाणावें । गुणांचिये रवरवे- । माजीं असतां ॥325॥
या ओवीत अर्जुनाच्या प्रश्नंची दुरुस्ती करतात) पण तो गुणातीत पुरुष गुणांच्या गुंताड्यात असताना तो गुणांच्या आधीन आहे किंवा तो गुणांच्या आधीन नाही हे कसे ओळखावे?

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 14th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay ChaudavaSampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *