दृष्टांत A01 पुण्यात्मा कोण, कुणाच्या पुण्याईने कोणाचे रक्षण.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

पुण्याई

यात्रेकरूंनी भरलेली एक बस यात्रा संपवून परतीच्या प्रवासाला लागलेली असते. वाटेत अवकाळी पाऊस हजेरी लावतो. विजांच्या कडकडाटामुळे सगळेच प्रवासी घाबरलेले, भेदरलेले असतात. जीव मुठीत घेऊन प्रवास सुरु असतो. अशात दोन तीनदा अपघाताचे प्रसंग येतात. पाऊस काही केल्या थांबायचे नाव घेत नाही पाहून, बसचालक बस थांबवण्याचा निर्णय घेतो. रात्र अधिक गडद होत जाते. पुढचा प्रवास लांबत जातो.

बसचालक म्हणतो, ‘आज आपल्यापैकी नक्कीच कोणाचा मृत्यू निश्चित आहे. त्या एकामुळे सर्वांवर काळ ओढावलाय. त्यामुळे तो जो कोणी आहे, त्याने बसमधून निघून जावं आणि बाकीच्यांचे प्राण वाचवावेत.

बसमध्ये सगळेच ज्येष्ठ! बसचालकाच्या या वाक्याने सगळेच संभ्रमित होतात. एकमेकांकडे संशयाने पाहतात. त्यातला एक जण म्हणतो, ‘पण मृत्यू कोणाचा येणारे हे कसे कळणार?’

बसचालक म्हणतो, ‘बस थांबली आहे, त्याच्या समोर काही अंतरावर एक झाड आहे. माझ्यासकट प्रत्येकाने जाऊन त्या झाडाला हात लावून यायचं. ज्याचा मृत्यू यायचा असेल तो जाईल बाकी वाचतील.’

सगळे जण भीत भीत तयार होतात. बसचालक स्वतः सुरुवात करून देतो. पाऊस, विजा, कडकडाट, वादळ, सोसाट्याचा वारा घोंगावत असतो. बसमधला प्रत्येक प्रवासी घाबरत घाबरत झाडाला हात लावून येतो.

उरतो, एक प्रवासी. सगळ्यांचे हात लावून झाले. मी एकटाच उरलो. याचा अर्थ माझा काळ आला आहे हे निश्चित! तो स्वतःशी पुटपुटतो. पण सर्वांचे प्राण वाचावेत, म्हणून एक एक पाऊल टाकत बस मधून उतरतो आणि झाडापर्यंत पोहोचतो. सगळे प्रवासी काचेतून त्याच्याकडे पाहत असतात. आता काय होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता असते, तेवढ्यात….

कडाड कडकड कडकड करत वीज कोसळते, ती थेट बसवर! क्षणार्धात ती बस सर्व प्रवाशांसकट बेचिराख होते…..

शेवटचा प्रवासी धास्तावतो. चक्रावतो. गोंधळून जातो…

याचा अर्थ, त्या शेवटच्या प्रवाशाचा काळ आलेला नसून बसमधील इतर प्रवाशांची वेळ वाईट असते आणि केवळ त्या एका प्रवाशामुळे इतका वेळ बसमधल्या प्रत्येकाचे संरक्षण झालेले असते.

तात्पर्य : आजच्या संकटकाळात आपणही जर बचावलो आहोत, तग धरून आहोत, याचा अर्थ आपल्या घरातला तो एक पुण्यात्मा आपल्या कुटुंबाभोवती सुरक्षेचे वलय निर्माण करून आहे. म्हणून प्रत्येकाचा आदर करा. तो पुण्यात्मा कोण असेल काय सांगावं? ज्याच्या ईशसेवेची, सत्कार्याची पुण्याई आपल्याला तारून नेत आहे….

जय जगदंब

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *