351-14
एऱ्हवीं तरी सहजें । सुखदुःख तैंचि सेविजे । देहजळीं होईजे । मासोळी जैं ॥351॥
सहज विचार करून पाहिले तर देहरूपी जलामधे जेव्हा मासोळी होऊन राहावे (पूर्ण देहतादात्म्य घ्यावे) तेव्हाच सुखदु:ख भोगावे लागते.
352-14
आतां तें तंव तेणें सांडिलें । आहे स्वस्वरूपेंसीचि मांडिलें । सस्यांतीं निवडिलें । बीज जैसें ॥352॥
ज्याप्रमाणे मळणी झाल्यावर दाणे हे कोंड्यापासून वेगळे काढावे, त्याप्रमाणे आता त्याने ते देहतादात्म्य टाकले आहे व तो आपल्या आत्मस्वरूपाने स्थिर राहिला आहे.
353-14
कां वोघ सांडूनि गांग । रिघोनि समुद्राचें आंग । निस्तरली लगबग । खळाळाची ॥353॥
अथवा गंगेच्या पात्राला सोडून आणि समुद्राच्या पात्रात प्रवेश करून आपली खळबळ वाहाण्याची लगबग नाहीशी केली.
354-14
तेवीं आपणपांचि जया । वस्ती जाली गा धनंजया । तया देहीं अपैसया । सुख तैसें दुःख ॥354॥
अर्जुना त्याप्रमाणे ज्याची वस्ती आपल्या ठिकाणी (आत्मस्वरूपी) झाली, त्याला सहजच देहामधे जसे सुख तसेच दु:ख असते.
355-14
रात्रि तैसें पाहलें । हें धारणा जेवीं एक जालें । आत्माराम देहीं आतलें । द्वंद्व तैसें ॥355॥
जशी रात्र तसेच उजाडणे, हे खांबाला जसे एकसारखे असते, त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी रममाण झालेल्या गुणातीतास देहाला व्यापून असणारी सुखदु:खादि द्वंद्वे आहेत.
356-14
पैं निद्रिताचेनि आंगेंशीं । सापु तैशी उर्वशी । तेवीं स्वरूपस्था सरिशीं । देहीं द्वंद्वें ॥356॥
ज्याप्रमाणे निजलेल्या पुरुषाच्या अंगावर जसा साप तशीच उर्वशी त्याप्रमाणे आत्मस्वरूपी ज्याची वस्ती झाली आहे, त्यास देहात द्वंद्वे सारखी आहेत.
357-14
म्हणौनि तयाच्या ठायीं । शेणा सोनया विशेष नाहीं । रत्ना गुंडेया कांहीं । नेणिजे भेदु ॥357॥
म्हणून त्याच्या ठिकाणी शेण व सोने यात कमीअधिकपणा नाही व रत्न व दगड यामधे त्यास काही फरक वाटत नाही.
358-14
घरा येवों पां स्वर्ग । कां वरिपडो वाघ । परी आत्मबुद्धीसि भंग । कदा नव्हे ॥358॥
घराला स्वर्ग येवो अथवा त्याच्या अंगावर वाघ उडी घालो, परंतु त्याच्या आत्मबुद्धीला केव्हाही भंग होत नाही.
359-14
निवटलें न उपवडे । जळीनलें न विरूढे । साम्यबुद्धी न मोडे । तयापरी ॥359॥
ज्याप्रमाणे मेलेला मनुष्य जागा होत नाही, अथवा जळलेल्या बीजाला अंकुर फुटत नाही, त्याप्रमाणे त्याची आत्मैक्यबुद्धी मोडत नाही.
360-14
हा ब्रह्मा ऐसेनि स्तविजो । कां नीच म्हणौनि निंदिजो । परी नेणें जळों विझों । राखोंडी जैसी ॥360॥
‘हा ब्रह्मदेव आहे’ असे म्हणून त्याची स्तुती केली अथवा ‘नीच’ म्हणून त्याची निंदा केली पण राख जशी जाळणे अथवा विझणे जाणत नाही.
361-14
तैसी निंदा आणि स्तुती । नये कोण्हेचि व्यक्ती । नाहीं अंधारें कां वाती । सूर्या घरीं ॥361॥
त्याप्रमाणे तो कोणाची निंदा व स्तुती करत नाही किंवा दुसर्यानी जरी निंदा व स्तुती केली तरीही त्यास आनंद व दुःख कोणत्याच रूपाने व्यक्त होत नाहीत. सूर्याच्या घरी अंधार वा उजेड नाही ज्याप्रमाने सूर्याच्या घरी अंधार वा उजेड या दोन्हीही कल्पना नाही, त्याचप्रमाने त्याच्या अंतकरनात सुखदु:खाची कल्पना ही नाही.
362-14
मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयोः ।
सर्वारम्भपरित्यागी गुणातीतः स उच्यते ॥14.25॥
श्लोकार्थ -: :- मान व अपमान समान मानणारा, मित्र व शत्रु दोन्ही समान बुद्धी ठेवणारा प्रकृती सर्व करते अशा बोधावर आल्यामुळे बर्यावाईट सर्व कर्मांचा आरंभ न करणे हे ज्याचे शील, असा जो असतो त्याला गुणातीत म्हणतात.
ईश्वर म्हणौनि पूजिला । कां चोरु म्हणौनि गांजिला । वृषगजीं वेढिला । केला रावो ॥362॥
तो ईश्वर आहे असे समजुन त्याची पूजा केली अथवा तो चोर आहे, म्हणून त्यास छळले, तो बैल व हत्ती यांनी वेढला गेला अथवा त्याला राजा केला.
363-14
कां सुहृद पासीं आले । अथवा वैरी वरपडे जाले । परी नेणें राती पाहालें । तेज जेवीं ॥14-363॥
अथवा मित्र जवळ आले अथवा शत्रू अंगावर धावुन आले, तरी पण तो मिञ असो अथवा शञु या दोघामध्येही समानता समजतो.किंवा कोणत्याही प्रकारचा भेद मानित नाही. ज्याप्रमाने सूर्याचे तेज राञ व दिवस जाणत नाही.
364-14
साहीं ऋतु येतां आकाशें । लिंपिजेचि ना जैसें । तेवीं वैषम्य मानसें । जाणिजेना ॥364॥
आकाशाच्या पोटात जरी सहा ऋतु येऊन गेले, तरी आकाश जसे त्यांच्याकडून लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तो राग आणि द्वेष भेदभाव जाणत नाही. त्याप्रमाने त्याच्या बुद्धिला विषमता ही माहीतच नसते.
365-14
आणीकही एकु पाहीं । आचारु तयाच्या ठायीं । तरी व्यापारासि नाहीं । जालें दिसे ॥365॥
आणखी एक आचार त्याच्या ठिकाणी आहे पहा. तो हाच की त्याच्या ठिकाणी कर्ममात्राचा अभाव झालेला दिसतो. कर्तृव्य, अहंकार व फळाच्या इच्छेचा त्याग करणे. हाच त्याचा आचार असतो.
366-14
सर्वांरंभा उटकलें । प्रवृत्तीचें तेथ मावळले । जळती गा कर्मफळें । ते तो आगी ॥366॥
ज्याप्रमाने त्याचे ऐहिक असणारे कर्म बंद पडते. पारलौकिक कर्म उदयास जाते. आणि त्याच्या ठिकानची कर्मफळे जळुन जातात. कारण तो त्याच क्षणी गुणातीत किंवा जणु ज्ञानाग्निरुप झालेला असतो.
367-14
दृष्टादृष्टाचेनि नांवें । भावचि जीवीं नुगवें । सेवी जें कां स्वभावें । पैठें होये ॥367॥
आपल्याला इहलोकीचे अथवा परलोकीचे भोग मिळावेत अशी इच्छाच त्याच्या अंत:करणात उत्पन्न होत नाही. प्रारब्धाने जे सहज प्राप्त होईल त्याचे तो सेवन करीत असतो.
368-14
सुखे ना शिणे । पाषाणु कां जेणें मानें । तैसी सांडीमांडी मनें । वर्जिली असे ॥368॥
ज्याप्रमाणे दगड कोणत्याही उपचाराने सुखावला जात नाही व दु:खही पावत नाही, त्याप्रमाने तो ज्ञानाग्निरुप झालेला पुरुष प्रिय अथवा अप्रिय भोगाने सुखावला जात नाही आणि त्याची इच्छाही मनात धरत नाही. त्याप्रमाने भोगाविषयाची कोणतीच विचारचक्र त्याच्या मनामध्ये घर करत नाही.
369-14
आतां किती हा विस्तारु । जाणें ऐसा आचारु । जयातें तोचि साचारु । गुणातीतु ॥369॥
आता ह्या बोलण्याचा किती विस्तार करावा? ज्या पुरुषाचे असे आचरण असेल तोच खरोखर ज्ञानाग्निरुप झाला आहे असे समज.
370-14
गुणांतें अतिक्रमणें । घडे उपायें जेणें । तो आतां आईक म्हणे । श्रीकृष्णनाथु ॥370॥
ज्या उपायांनी गुणांचे उल्लंघन करता येते तो प्रकार आता यापुढे सांगत आहे ते तु ऐक. असे भगवान श्रीकृष्ण म्हणाले.
371-14
मां च योऽव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते ।
स गुणान्समतीत्यैतान् ब्रह्मभूयाय कल्पते ॥14.26॥
क्ष्लोकार्थ अव्यभिचारी (अभेद) भक्तियोगाने जो माझी उपासना करतो, तो या गुणांच्या पूर्णपणे पलीकडे जाऊन त्यास ब्रह्मत्व प्राप्त होण्याची योग्यता येते.
गुणातीत कसे व्हावे? भक्तियोग
तरी व्यभिचाररहित चित्तें । भक्तियोगें मातें । सेवी तो गुणातें । जाकळूं शके ॥371॥
तर माझ्यावाचून दुसरीकडे कोठेही मन गुंतू न देता भजनरूप मार्गाच्या द्वारा जो माझी उपासना करतो, तो गुणांना ताब्यात ठेऊ शकतो.
372-14
तरी कोण मी कैसी भक्ती । अव्यभिचारा काय व्यक्ती । हे आघवीचि निरुती । होआवी लागे ॥372॥
तर मी कोण आहे, भक्ती ती कशी असते व एकनिष्ठतेचे स्पष्ट स्वरूप काय, हा सर्व निर्णय झाला पाहिजे.
373-14
तरी पार्था परियेसा । मी तंव येथ ऐसा । रत्नीं किळावो जैसा । रत्नचि कीं तो ॥373॥
या विश्वात मी कोण आहे हे तुला सांगतो. तर अर्जुना, ऐक. मी तर या विश्वात असा आहे की ज्याप्रमाणे रत्नाचे ठिकाणी असलेले तेज रत्नच आहे.
374-14
कां द्रवपणचि नीर । अवकाशचि अंबर । गोडी तेचि साखर । आन नाहीं ॥374॥
अथवा ओलेपणाच जसे पाणी आहे किंवा पोकळीच आकाश आहे अथवा गोडी तीच जशी साखर आहे, वेगळी नाही.
375-14
वन्हि तेचि ज्वाळ । दळाचि नांव कमळ । रूख तेंचि डाळ- । फळादिक ॥375॥
अग्नी तोच जसा जाळ आहे, पाकळ्यांचेच नाव जसे कमळ आहे, वृक्ष तोच जसे फांद्या, फळे वगैरे आहे,
Sartha Dnyaneshwari Chapter 14th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay ChaudavaSampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा संपूर्ण
