सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ४७६ ते ५०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

476-13
म्हणौनि सद्भाव जीवगत । बाहेरी दिसती फांकत । जे स्फटिकगृहींचे डोलत । दीप जैसे ॥476॥
म्हणून स्फटिकाच्या तावदानात ठेवलेले दिवे मंद मंद हालतांना जसे बाहेरून दिसतात, तशा अंत:करणातील चांगल्या मनोवृत्ती बाहेर (इंद्रियांद्वारा) प्रगट झालेल्या दिसतात.
477-13
विकल्प जेणें उपजे । नाथिली विकृति निपजे । अप्रवृत्तीचीं बीजें । अंकुर घेती ॥477॥
ज्या ज्या योगाने संशय उत्पन्न होतो, ज्या योगाने वाईट मनोविकार उत्पन्न होतात व ज्या योगाने कुकर्मांची बीजे अंकुर घेतात (ज्या योगाने निषिद्ध कर्मांकडे प्रवृत्ती होते).
478-13
तें आइके देखे अथवा भेटे । परी मनीं कांहींचि नुमटे । मेघरंगें न कांटे । व्योम जैसें ॥478॥
अशा ज्या गोष्टी, त्या ऐकल्या, पाहिल्या किंवा भेटल्या तरी त्या योगाने ज्याप्रमाणे मेघांच्या रंगांचे डाग आकाशावर पडत नाहीत, त्याप्रमाणे मनामधे काही विकार उत्पन्न होत नाहीत.
479-13
एऱ्हवीं इंद्रियांचेनि मेळें । विषयांवरी तरी लोळे । परी विकाराचेनि विटाळें । लिंपिजेना ॥479॥
एरवी इंद्रियांच्या संगतीने विषयांचा संबंध त्याला जरी घडला तरी तो विकाराच्या विटाळाने लिप्त होत नाही.
480-13
भेटलिया वाटेवरी । चोखी आणि माहारी । तेथ नातळें तियापरी । राहाटों जाणें ॥480॥
वाटेवरून ब्राह्मण स्त्री अथवा महाराची स्त्री या दोघी गेल्या असता ती वाट एकीच्या स्पर्शाने पवित्र होत नाही वा दुसरीच्या संगतीने ती अपवित्र होत नाही, तर ती वाट दोहोंपासून अलिप्त असते, त्याप्रमाणे अलिप्तपणाने व्यवहारात वागण्याची त्यास माहिती असते.

481-13
कां पतिपुत्रांतें आलिंगी । एकचि ते तरुणांगी । तेथ पुत्रभावाच्या आंगीं । न रिगे कामु ॥481॥
एकच तरुण स्त्री पतीला व पुत्राला आलिंगन देते. परंतु पुत्राला आलिंगन देतेवेळी तिच्या मनात जे पुत्राविषयी प्रेम असते त्या प्रेमात कामाचा स्पर्श नसतो.
482-13
तैसें हृदय चोख । संकल्पविकल्पीं सनोळख । कृत्याकृत्य विशेख फुडें जाणें ॥482॥
त्याप्रमाणे त्याचे हृदय शुद्ध असते. संकल्प व विकल्प या दोहोंची त्या अंत:करणास ओळख असते, विशेषत: कृत्य व अकृत्य काय आहे हे ते अंत:करण पक्के जाणते.
483-13
पाणियें हिरा न भिजे । आधणीं हरळु न शिजे । तैसी विकल्पजातें न लिंपिजे । मनोवृत्ती ॥483॥
जसा हिरा पाण्याने भिजत नाही व आधणात खडा शिजत नाही, त्याप्रमाणे कोणत्याही मनोविकाराने त्याची वृत्ती लिप्त होत नाही.
484-13
तया नांव शुचिपण । पार्था गा संपूर्ण । हें देखसी तेथ जाण । ज्ञान असे॥484॥
अर्जुना, यास पुरे शुचित्व असे म्हणतात. ही वर सांगितलेली शुचित्वाची लक्षणे तू जेथे पहाशील तेथे ज्ञान आहे असे समज.
485-13
आणि स्थिरता साचें । घर रिगाली जयाचें । तो पुरुष ज्ञानाचें । आयुष्य गा ॥485॥
8) स्थैर्य
आणि ज्या पुरुषाच्या घरात स्थिरतेने खरोखर प्रवेश केला आहे तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य आहे.

486-13
देह तरी वरिचिलीकडे । आपुलिया परी हिंडे । परी बैसका न मोडे । मानसींची ॥486॥
त्या पुरुषाचा देह वरच्या दृष्टीने पाहिले असता आपल्या स्वभावानुसार हिंडत असतो परंतु मनातील स्थिरता विस्कटतत नाही.
487-13
वत्सावरूनि धेनूचें । स्नेह राना न वचे । नव्हती भोग सतियेचे । प्रेमभोग ॥487॥
गाय जरी रानात गेली तरी तिचे वासरावरील प्रेम रानात जात नाही (वासरावरून हलत नाही), सती जाणार्‍या स्त्रीचे भोग म्हणजे वस्त्रालंकारादि उपचार ते प्रेमाचे भोग नसतात कारण तिचे लक्ष पतीकडे लागलेले असते, ते भोगांकडे येत नाही.
488-13
कां लोभिया दूर जाये । परी जीव ठेविलाचि ठाये । तैसा देहो चाळितां नव्हे । चळु चित्ता ॥488॥
अथवा लोभी पुरुष दूर जातो, परंतु त्याचा जीव ठेव्यापाशी रहातो. त्याप्रमाणे त्या स्थिर चित्त पुरुषाचा देह जरी फिरत असला तरी त्याच्या चित्ताला चंचलता नसते.
489-13
जातया अभ्रासवें । जैसें आकाश न धांवे । भ्रमणचक्रीं न भंवे । ध्रुव जैसा ॥489॥
इकडून तिकडे फिरणार्‍या मेघाबरोबर आकाश धावत नाही, अथवा गती असलेल्या ग्रहांच्या चक्राबरोबर जसा ध्रुवाचा तारा फिरत नाही,
490-13
पांथिकाचिया येरझारा । सवें पंथु न वचे धनुर्धरा । कां नाहीं जेवीं तरुवरा । येणें जाणें ॥490॥
अर्जुना, वाटसरूंच्या येण्या-जाण्याबरोबर जसा रस्ता चालत नाही अथवा ज्याप्रमाणे वृक्षास जाणे येणे नाही,

491-13
तैसा चळणवळणात्मकीं । असोनि ये पांचभौतिकीं । भूतोर्मी एकी । चळिजेना ॥491॥
त्याप्रमाणे चलन वलन करणार्‍या या पंचमहाभूतात्मक देहात तो स्थिरचित्त पुरुष असूनही प्राणिमात्रांच्या ठिकाणी असणार्‍या क्षुधादि षडूर्मींपैकी एकीनेही त्याच्या चित्ताची गडबड होत नाही.
492-13
वाहुटळीचेनि बळें । पृथ्वी जैसी न ढळे । तैसा उपद्रव उमाळें । न लोटे जो ॥492॥
वावटळीच्या बळाने पृथ्वी जशी हलत नाही त्याप्रमाणे उपद्रवांच्या लोंढ्यांनी तो वाहवला जात नाही.
493-13
दैन्यदुःखीं न तपे । भवशोकीं न कंपे । देहमृत्यु न वासिपे । पातलेनी॥493॥
दारिद्र्यापासून होणार्‍या त्रासामुळे दु:खी होत नाही व भय व शोक यांनी कापत नाही. शरीराला मृत्यू आला तरी भयाने त्याची गाळण उडत नाही.
494-13
अर्ति आशा पडिभरें । वय व्याधी गजरें । उजू असतां पाठिमोरें । नव्हे चित्त ॥494॥
कोणती एखादी मानसिक पीडा आणि आशा यांचे भाराने व म्हातारपण आणि रोग यांच्या गडबडीने त्याचे चित्त जे नीट आत्मसन्मुख झालेले असते ते पुन्हा बहिर्मुख होत नाही.
495-13
निंदा निस्तेज दंडी । कामलोभा वरपडी । परी रोमा नव्हे वांकुडी । मानसाची ॥495॥
निंदा व अपमान यांचे तडाखे बसले अथवा काम व लोभ हे जरी त्याच्या अंगावर येऊन आदळले तरी त्याच्या मनाचा एक बाल वाकडा होत नाही.

496-13
आकाश हें वोसरो । पृथ्वी वरि विरो । परि नेणे मोहरों । चित्तवृत्ती॥496॥
आकाश नाहीसे होवो आथवा पृथ्वी विरघळून जावो, परंतु त्याच्या मनोवृत्तीला आत्म्यास सोडून परत फिरण्याचे माहीत नसते.
497-13
हाती हाला फुलीं । पासवणा जेवीं न घाली । तैसा न लोटे दुर्वाक्यशेलीं । शेलिला सांता ॥497॥
हत्तीला फुलांनी मारले असता तो ज्याप्रमाणे माघारी फिरत नाही, त्याप्रमाणे त्याच्यावर शेलक्या अपशब्दांचा मारा केला असता जो निस्तेज होत नाही.
498-13
क्षीरार्णवाचिया कल्लोळीं । कंपु नाहीं मंदराचळीं । कां आकाश न जळे जाळीं । वणवियाच्या ॥498॥
क्षीरसमुद्राच्या लाटांनी जसा मंदर पर्वत कापत नाही अथवा आकाश जसे वणव्याच्या जाळाने जळत नाही.
499-13
तैशा आल्या गेल्या ऊर्मी । नव्हे गजबज मनोधर्मीं । किंबहुना धैर्य क्षमी । कल्पांतींही ॥499॥
त्याप्रमाणे शोकमोहादि षडूर्मींच्या लाटा आल्या गेल्या तरी त्याच्या मनोधर्मामधे (चित्तस्थिरतेमधे) गडबड उडत नाही. फार काय सांगावे? कल्पांतसमय आला तरी तो धैर्यवान सहनशील असतो.
500-13
परी स्थैर्य ऐसी भाष । बोलिजे जे सविशेष । ते हे दशा गा देख । देखणया ॥500॥
हे डोळस अर्जुना, स्थैर्य या नावाने जिचे विशेष वर्णन केले जाते ती हीच अवस्था होय असे समज.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *