सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ५०१ ते ५२५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, , , , , ,

501-13
हें स्थैर्य निधडें । जेथ आंगें जीवें जोडे । तें ज्ञानाचें उघडें । निधान साचें ॥501॥
हे न ढळणारे स्थैर्य ज्या पुरुषात शरीराच्या व मनाच्या ठिकाणी प्राप्त झाले आहे, तो पुरुष ज्ञानाचा खरा उघडा ठेवा आहे.
502-13
आणि इसाळु जैसा घरा । कां दं”दिया हतियेरा । न विसंबे भांडारा । बद्धकु जैसा ॥502॥
9) आत्मविनिग्रह
आणि ब्रह्मराक्षस अथवा अस्सल सर्प जसा (आपले धन असलेल्या) घराला विसरत नाही किंवा योद्धा जसा हत्याराला विसरत नाही अथवा लोभी पुरुष जसा आपल्या खजिन्याला विसरत नाही.
503-13
कां एकलौतिया बाळका- । वरि पडौनि ठाके अंबिका । मधुविषीं मधुमक्षिका । लोभिणी जैसी ॥503॥
एकुलत्या एका मुलावर जशी आई पडून रहाते (म्हणजे त्याला कधी विसंबत नाही) अथवा जशी मधमाशी मधाला लोभी असते.
504-13
अर्जुना जो यापरी । अंतःकरण जतन करी । नेदी उभें ठाकों द्वारीं । इंद्रियांच्या ॥504॥
अर्जुना, याप्रमाणे जो आपल्या अंत:करणाला जपतो व इंद्रियांच्या द्वारात अंत:करणाला उभे राहू देत नाही.
505-13
म्हणे काम बागुल ऐकेल । हे आशा सियारी देखैल । तरि जीवा टेंकैल । म्हणौनि बिहे ॥505॥
तो म्हणतो की माझे अंत:करण जर इंद्रियाच्या द्वारात गेल्याचे, त्या इंद्रियांच्या ठिकाणी असलेल्या कामाने ऐकले, तर तो कामरूपी बागुलबुवा त्या अंत:करणाला झपाटील व मग त्या कामाच्या तडाख्यातून सुटणे कठीण. तसेच इंद्रियांच्या ठिकाणी असणारी आशारूपी डाकीण, ही अंत:करणाला इंद्रियांच्या द्वारी पाहिल्याबरोबर त्याला झपाटील. मग जीवावरच येऊन बेतेल, म्हणून तो पुरुष भितो.

506-13
बाहेरी धीट जैसी । दाटुगा पति कळासी । करी टेहणी तैसी । प्रवृत्तीसीं ॥506॥
ज्याप्रमाणे घराबाहेर ढालगजपणाने वागणार्‍या स्त्रीला तिचा दांडगा नवरा (ती बिघडण्याचा संभव असतो म्हणून) बाहेर फिरकू न देता तिला घरात कोंडून ठेवतो, त्याप्रमाणे आपली मनोवृत्ती बाहेर इंद्रियांकडे जाऊ नये म्हणून तिच्यावर जो पहारा करतो.
507-13
सचेतनीं वाणेपणें । देहासकट आटणें । संयमावरीं करणें । बुझूनि घाली ॥507॥
चित्ताचा संकोच होण्याकरता देहसुद्धा झिजतो. व इंद्रियांची समजूत घालून त्यांना चुचकारून निग्रहावर आणून ठेवतो.
508-13
मनाच्या महाद्वारीं । प्रत्याहाराचिया ठाणांतरीं । जो यम दम शरीरीं । जागवी उभे ॥508॥
या शरीरात मनरूपी महाद्वारात, अंतर्मुखतेच्या पहार्‍याच्या जागेत जो यम व दम यास उभे जागे ठेवतो.
509-13
आधारीं नाभीं कंठीं । बंधत्रयाचीं घरटीं । चंद्रसूर्य संपुटीं । सुये चित्त ॥509॥
गुद व मेढ्र यांच्या मध्यभागी आधारचक्राचे ठिकाणी मूळबंधाची व नाभीमधे मणिपूर चक्राचे ठिकाणी ओडियाणा बंधाची व कंठामधे विशुद्ध चक्राचे ठिकाणी जालंदर बंधाची याप्रमाणे तीन बंधांची गस्त घालतो (अथवा घर करतो). आणि इडा व पिंगळा यांच्या संगमस्थानी म्हणजे सुषुम्नेत चित्त घालतो.
510-13
समाधीचे शेजेपासीं । बांधोनि घाली ध्यानासी । चित्त चैतन्य समरसीं । आंतु रते ॥510॥
समाधिरूपी शय्येजवळ ध्यानाला बांधून टाकतो (म्हणजे समाधी लागेपर्यंत ध्यान दृढ करतो) व चित्त आणि चैतन्य यांचे समरसतेने अंतर्मुखतेत रममाण होतो.

511-13
अगा अंतःकरणनिग्रहो जो । तो हा हें जाणिजो । हा आथी तेथ विजयो । ज्ञानाचा पैं ॥511॥
अर्जुना अंत:करण-निग्रह जो म्हणतात तो हा, हे समज. व जेथे हा (अंत:करण-निग्रह) आहे तेथेच ज्ञानाचा विजय आहे.
512-13
जयाची आज्ञा आपण । शिरीं वाहे अंतःकरण । मनुष्याकारें जाण । ज्ञानचि तो ॥512॥
ज्याची आज्ञा अंत:करणाला शिरसावंद्य असते, तो मनुष्यरूपाने साक्षात ज्ञानच आहे असे समज.
इंद्रियार्थेषु वैराग्यमनहङ्कार एव च ।
जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम् ॥13-8॥

अर्थ इंद्रियांच्या ठिकाणी वैराग्य, (कर्माचे विषयी) अहंकाराचा अभाव, जन्म-मृत्यू -जरा, व्याधी यांच्या ठिकाणी दु:खाचे व दोषाचे अनिदर्शन
513-13
आणि विषयांविखीं । वैराग्याची निकी । पुरवणी मानसीं कीं । जिती आथी ॥513॥
इंद्रियांच्या ठिकाणी वैराग्य आणि विषयाच्या संबंधाने ज्याच्या मनात वैराग्याचा चांगला जिवंत पुरवठा असतो,
514-13
वमिलेया अन्ना । लाळ न घोंटी जेवीं रसना । कांआंग न सूये आलिंगना । प्रेताचिया ॥514॥
ओकलेल्या अन्नाला पाहून ज्याप्रमाणे जीभ लाळ घोटत नाही अथवा प्रेतास आलिंगन देण्याकरता कोणीही अंग पुढे करत नाही.
515-13
विष खाणें नागवे । जळत घरीं न रिगवे । व्याघ्रविवरां न वचवे । वस्ती जेवीं ॥515॥
जसे (कोणालाही) विष खाववत नाही, जळत असलेल्या घरात प्रवेश करवत नाही व वाघाच्या दरीमधे वस्ती करण्यास जाववत नाही.

516-13
धडाडीत लोहरसीं । उडी न घालवे जैसी । न करवे उशी । अजगराची ॥516॥
रसरशीत तापलेल्या लोखंडाच्या रसामधे जशी उडी घालवत नाही किंवा अजगराची उशी करवत नाही,
517-13
अर्जुना तेणें पाडें । जयासी विषयवार्ता नावडे । नेदी इंद्रियांचेनि तोंडें । कांहींच जावों ॥517॥
अर्जुना तितक्या मानाने ज्याला विषयांची गोष्ट आवडत नाही व जो इंद्रियांच्या द्वाराने (मनाकडे) कोणत्याच विषयाला जाऊ देत नाही.
518-13
जयाचे मनीं आलस्य । देही अतिकार्श्य । शमदमीं सौरस्य । जयासि गा ॥518॥
ज्याच्या मनात विषयवासनेचा कंटाळा असतो, देहाच्या ठिकाणी रोडपणा असतो व यमदमाच्या ठिकाणी जो समरस झालेला असतो (म्हणजे ते करण्यात ज्याला आनंद वाटतो).
519-13
तपोव्रतांचा मेळावा । जयाच्या ठायीं पांडवा । युगांत जया गांवा- । आंतु येतां ॥519॥
अर्जुना, ज्याच्या ठिकाणी तपांची व व्रतांची गर्दी असते व ज्याला गावात येताना प्रलयकालाप्रमाणे संकट वाटते.
520-13
बहु योगाभ्यासीं हांव । विजनाकडे धांव । न साहे जो नांव । संघाताचें ॥520॥
योगाभ्यासाविषयी ज्याची अती उत्कट इच्छा असते व एकांतात रहाण्यासंबंधाने ज्याच्या मनाची ओढ असते, व जनसमुदायाचे ज्याला नावही सहन होत नाही.

521-13
नाराचांचीं आंथुरणें । पूयपंकीं लोळणें । तैसें लेखी भोगणें । ऐहिकींचें ॥521॥
बाणांच्या शय्येवर जसे निजणे अथवा पुवाच्या चिखलात जसे लोळणे तसे तो इहलोकीचे भोग भोगणे मानतो.
522-13
आणि स्वर्गातें मानसें । ऐकोनि मानी ऐसें । कुहिलें पिशित जैसें । श्वानाचें कां ॥522॥
स्वर्गाचे भोग ऐकून मनाने असे मानतो की ते जसे कुत्र्याचे मांस आहेत.
523-13
तें हें विषयवैराग्य । जें आत्मलाभाचें सभाग्य । येणें ब्रह्मानंदा योग्य । जीव होती ॥523॥
वर सांगितलेले विषयांविषयीचे वैराग्य हे आत्मप्राप्तीचे दैवच आहे. याच्यामुळे साधक ब्रह्माच्या आनंदाचा उपभोग घेण्यास लायक होतात.
524-13
ऐसा उभयभोगीं त्रासु । देखसी जेथ बहुवसु । तेथ जाण रहिवासु । ज्ञानाचा तूं ॥524॥
जेथे असा ऐहिक व पारत्रिक भोगासंबंधाने अत्यंत कंटाळा तुला दिसेल तेथे ज्ञानाची वस्ती आहे असे समज.
525-13
आणि सचाडाचिये परी । इष्टापूर्तें करी । परी केलेंपण शरीरीं । वसों नेदी ॥525॥
11) अनहंकार
आणि सकाम पुरुषांप्रमाणे इष्टापूर्त कर्मे करतो, परंतु ती केल्याचा फुंज शरीरात राहू देत नाही.

, , , , , ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading