सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा ओवी २७६ ते ३०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

276-10
तरी नीच नवी जे कीर्ति । अर्जुना ते माझी मूर्ती । आणि औदार्येंसी जे संपत्ती । तेही मीचि जाणें ॥276॥
तरी नित्य नवी जी कीर्ति आहे ती, अर्जुना ! माझी विभूति होय आणि औदार्यासह जी संपत्ति तीहहि माझी विभूति होय, असें जाण.
277-10
आणि ते गा मी वाचा । जे सुखासनीं न्यायाचा । आरूढोनि विवेकाचा । मार्गीं चाले 277॥
आणि जी वाणी न्यायाला व विवेकाला धरून असते ती माझी विभूति होय.
278-10
देखिलेनि पदार्थें । जे आठवूनि दे मातें । ते स्मृतिही पैं एथें । त्रिशुद्धी मी॥278॥
पदार्थ पाहिल्याबरोबर माझी आठवण करून देणारी स्तुति, माझी विभूति होय हें त्रिवार सत्य जाण.
279-10
पैं स्वहिता अनुजायिनी । मेधा ते गा मी इये जनीं । धृती मी त्रिभुवनीं । क्षमा ते मी ॥279॥
आपल्या आत्महिताचा घात न करणारी धारणाशक्ति, ही माझी विभूति होय आणि आत्मप्राप्तिकरितां शमदमादिसाधनांचे दुःख, ज्या धैर्याने सहन केलें जातें, ते धैर्य व कोणी उपकार केला असतां, उलट त्याच्यावर अपकार करण्याची वृत्ति न उठणें, ही जी क्षमा, ती माझी विभूति होय.
280-10
एवं नारींमाझारीं । या सातही शक्ति मीचि अवधारीं । ऐसें संसारगजकेसरी । म्हणता जाहला ॥280॥
हे प्रियतम अर्जुना ! संपूर्ण वेदराशींत श्रेष्ठ असलेल्या सामवेदांत, बृहत्साम हें माझें स्वरूप आहे, असे रमेचे प्राणेश्वर भगवान श्रीकृष्ण म्हणतात.
बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम् ।
मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः॥10.35॥

281-10
वेदराशीचिया सामा- । आंत बृहत्साम जें प्रियोत्तमा । तें मी म्हणे रमा- । प्राणेश्वरु ॥281॥
हे प्रियतम अर्जुना ! संपूर्ण वेदराशींत श्रेष्ठ असलेल्या सामवेदांत, बृहत्साम हे माझे स्वरूप आहे, असे रमेचे प्राणेश्वर भगवान श्रीकृष्ण म्हणतात.
282-10
गायत्रीछंद जें म्हणिजे । तें सकळां छंदांमाजीं माझें । स्वरूप हें जाणिजे । निभ्रांत तुवां ॥282॥
ज्याला गायत्री छंद म्हणतात, तें सर्व छंदामध्ये माझे स्वरूप आहे, हें निःसंशय जाण.
283-10
मासांआंत मार्गशीरु । तो मी म्हणे शारङ्गधरु । ऋतूंमाजीं कुसुमाकरु । वसंतु तो मी ॥283॥
मासांमध्ये मार्गशीर्ष मास मी आहे व ऋतूंमध्ये वसंतऋतु मी आहे, असें श्रीकृष्ण म्हणाले.
द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ।
जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम्॥10.36॥
वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनंजयः ।
मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः॥10.37॥

284-10
छळितयां विंदाणा- । माजीं जूं तें मी विचक्षणा । म्हणोनि चोहटां चोरी परी कवणा । निवारूं न ये ॥284॥
हे सुज्ञ अर्जुनि ! छळणार्‍या प्रकारांत जुगार हें माझे स्वरूप होय. म्हणून द्यूत, उघड चव्हाट्यावर चोरी करणेच होय; पण कोणाला त्यापासून परावृत्त करू नये.
285-10
अगा अशेषांही तेजसां- । आंत तेज तें मी भरंवसा । विजयो मी कार्योद्देशां । सकळांमाजीं ॥285॥
अर्जुना ! संपूर्ण तेजस्वी पदार्थात तेज माझे स्वरूप होय, हे निश्चयाने जाण. कार्य करण्याचे जे विजयाचे उद्देश असतात, त्या सर्वांमध्ये माझी विभूति होय.

286-10
जेणें चोखाळत दिसे न्याय । तो व्यवसायांत व्यवसाय । माझें स्वरूप हें राय । सुरांचा म्हणे ॥286॥
सर्व उद्योगांमध्ये ज्या उद्योगांत न्याय स्पष्ट दिसतो तें माझे स्वरूप होय; असे देवाधिदेव श्रीकृष्ण म्हणतात.
287-10
सत्त्वाथिलियांआंतु । सत्त्व मी म्हणे अनंतु । यादवांमाजीं श्रीमंतु । तोचि तो मी ॥287॥
सात्विकांमध्ये राहणारे सत्व मी आहे. यादवांमध्ये जो श्रीमंत तोच मी आहे असे श्रीकृष्ण म्हणतात.
288-10
जो देवकी-वसुदेवास्तव जाहला । कुमारीसाठीं गोकुळीं गेला । तो मी प्राणासकट पियाला । पूतनेतें ॥288॥
जो देवकीवसुदेवाच्या तपामुळे प्रगट झाला, जो गोपकुमारीकरितां गोकुळांत गेला व ज्याने प्राणासकट पूतनेचे प्राशन केलें तोच मी होय.
289-10
नुघडतां बाळपणाची फुली । जेणें मियां अदानवीं सृष्टि केली । करीं गिरि धरूनि उमाणिली । महेंद्रमहिमा ॥289॥
बाळपणाची अवस्था संपण्यापूर्वी दैत्यरहित पृथ्वी केली आणि हातावर पर्वत पर्वत धरून इंद्राचा पराक्रम अजमाविला.
290-10
कालिंदीचें हृदयशल्य फेडिलें । जेणें मियां जळत गोकुळ राखिलें । वासरुवांसाठीं लाविलें । विरंचीस पिसें ॥290॥
यमुनेच्या ह्रदयांतील दुःख नाहीसे केलें, गोकुळ जळण्याची भीति प्राप्त झाली असतां, तेवढा अग्नी पिवून गोकुळाचें रक्षण केलें. वासरें चोरून नेणार्‍या ब्रह्मदेवास वेड लाविलें.

291-10
प्रथमदशेचिये पहांटे- । माजीं कंसा ऐशीं अचाटें । महाधेंडीं अवचटें । लीळाचि नासिलीं ॥291॥
कुमारदशेंतच कंसासारख्या अचाट पराक्रमी वीरांचा सहज लीलेनें नाश केला.
292-10
हें काय कितीएक सांगावें । तुवांही देखिलें ऐकिलें असे आघवें । तरि यादवांमाजीं जाणावें । हेंचि स्वरूप माझें ॥292॥
अर्जुना ! हें किती वर्णन करायचें? तूं देखील हे सर्व पाहिले ऐकिलें आहेस, तर यादवांमध्ये हेंच माझे स्वरूप होय.
293-10
आणि सोमवंशीं तुम्हां पांडवां- । माजीं अर्जुन तो मी जाणावा । म्हणोनि एकमेकांचिया प्रेमभावा । विघडु न पडे ॥293॥
आणि चंद्रवंशांत उत्पन्न झालेल्या तुम्हां पांडवांमध्ये मी अर्जुन आहे, म्हणूनच आपल्या परस्परांच्या प्रेमांत कशानेहि बिघाड होत नाही.
294-10
संन्यासी तुवां होऊनि जनीं । चोरूनि नेली माझी भगिनी । तऱ्ही विकल्पु नुपजे मनीं । मी तूं दोन्ही स्वरूप एक ॥294॥
लोकांत बाह्यतः संन्यासी होऊन तूं माझी बहीण चोरून नेलीस; पण मी व तूं एक स्वरूप असल्यामुळे माझ्या मनांत कांही विकल्प उठला नाही.
295-10
मुनीआंत व्यासदेवो । तो मी म्हणे यादवरावो । कवीश्वरांमाजीं धैर्या ठावो । उशनाचार्य तो मी ॥295॥
सर्व मुनीमध्ये व्यासदेव तो मी आहे आणि कवीश्वरामध्ये, सर्व धैर्याचें वसतें ठिकाण जो शुक्राचार्य तो मी आहे, असे यादवश्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण म्हणतात.
दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम् ।
मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम्॥10.38॥

296-10
अगा दमितयांमाझारीं । अनिवार दंडु तो मी अवधारीं । जो मुंगियेलागोनि ब्रह्मावेरीं । नियमित पावे ॥296॥
निग्रह करणार्‍यांमध्ये, अर्जुना ! मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत त्यांच्या कर्मानुसार कधी न चुकतां अवश्य दंड जो मिळतो, तो मी आहे.
297-10
पैं सारासार निर्धारितयां । धर्मज्ञानाचा पक्षु धरितयां । सकळ शास्त्रांमाजीं ययां । नीतिशास्त्र तें मी ॥297॥
सर्व शास्रांमध्ये सार काय, असार काय, यांचा निर्णय करणारे व धर्मज्ञान यांचा पक्ष धरणारें जें नीतिशास्र तें मी आहे.
298-10
आघवियाचि गूढां- । माजीं मौन तें मी सुहाडा । म्हणोनि न बोलतयां पुढां । स्त्रष्टाही नेण होय ॥298॥
संपूर्ण गुप्त ठेवणार्‍यामध्ये, सख्या अर्जुना ! मौन तें मी आहे. म्हणूनच बोलणार्‍यांच्या मनांतील, सृष्टि उत्पन्न करणारा ब्रह्मदेवहि जाणूं शकत नाही.
299-10
अगा ज्ञानियांचिया ठायीं । ज्ञान तें मी पाहीं । आतां असो हें ययां कांहीं । पार न देखों ॥299॥
अगा अर्जुना ! ज्ञानियांचे ठिकाणी जें ज्ञान असतें, तें मी आहे. आतां पुरें माझ्या विभूतींना मर्यादाच नाही.
यच्चाऽपि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन ।
न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम्॥10.39॥
नान्तोऽस्ति मम दिव्यांना विभूतीनां परंतप ।
एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया ॥10.40॥

300-10
पैं पर्जन्याचिया धारां । वरी लेख करवेल धनुर्धरा । कां पृथ्वीचिया तृणांकुरां । होईल ठी ॥300॥
अर्जुना ! एकदां पावसाच्या धारा मोजतां येतील किंवा पृथ्वीवरील गवताच्या संपूर्ण अंकुराचे ठिकाणीं देखील मर्यादेची दृष्टि होऊं शकेल.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *