सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा ओवी ३०१ ते ३२५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

301-10
पैं महोदधीचिया तरंगां । व्यवस्था धरूं नये जेवीं गा । तेवीं माझिया विशेष लिंगां । नाहीं मिती ॥301॥
परंतु महासमुद्राचे तरंगांची गणती ज्यापमाणे करतां येत नाही, त्याप्रमाणे माझ्या विशेषरूपचिन्ह असलेल्या विभूतींची संख्याच करतां यावयाची नाही.
302-10
ऐशियाही सातपांच प्रधाना । विभूती सांगितलिया तुज अर्जुना । तो हा उद्देशु जो गा मना । आहाच गमला ॥302॥
अशांतहि मुख्य मुख्य सातवर पांच म्हणजे पंच्याहत्तरं विभूति, अर्जुना ! तुला सांगितल्या, तो हा विचारण्यापुरता जो मी थोडा विभूतिविस्तार केला, तो मनाला वरवर झाला असेंच वाटते.
303-10
येरां विभूतिविस्तारांसि कांहीं । एथ सर्वथा लेख नाहीं । म्हणौनि परिससीं तूं काई । आम्हीं सांगों किती ॥303॥
बाकींच्या विभूतिविस्ताराची मर्यादा किंवा संख्याच करवत नाही; म्हणून तूं ऐकणार किती व आम्ही सांगणार तरी कोठवर?
304-10
यालागीं एकिहेळां तुज । दाऊं आतां वर्म निज । सर्वभूतांकुरें बीज । विरूढत असे तें मी ॥304॥
म्हणून एकदांचें तुला आपल्या विभूतीचें वर्म सांगून ठेवतों की जें बीज सर्व भूतरूप अंकुराने उगवत असतें ते मी आहे — म्हणजे मीच सृष्टिरूप झालों आहे.
305-10
म्हणोनि सानें थोर न म्हणावें । उंच नीच भाव सांडावे । एक मीचि ऐसें मानावें । वस्तुजातातें ॥305॥
म्हणून येथें लहानथोर, उंच- नीच असा भेदभाव करूं नये. संपूर्ण एक परमेश्वरच सर्व स्वरूपाने नटला आहे असें मानावें.ॅ

306-10
तरी यावरी साधारण । आईक पां आणिकही खूण । तरी अर्जुना तें तूं जाण । विभूति माझी ॥306॥
तर यावरहि मी विभूति ओळखण्याची आणखीहि साधारण खूण सांगतों, त्यावरून अर्जुना ! माझी विभूति जाणून घेत जा.
यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा ।
तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसंभवम्॥10.41॥
307-10
जेथ जेथ संपत्ति आणि दया । दोन्ही वसती आलिया असती ठाया । ते ते जाण धनंजया । विभूति माझी ॥307॥
संपत्ति व दया ह्या दोन्ही ज्या वस्तुचे ठिकाणीं एकत्र वसत असतील, ते ते अर्जुना ! माझे अंश होत असे जाण.
अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन ।
विरष्टभ्याहमिदं कृत्स्‍नमेकांशेन स्थितो जगत्॥10.42॥

ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः ॥10॥
अर्थ
ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील विभूतियोग नावाचा हा दहावा अध्याय समाप्त झाला. ॥10॥
308-10
अथवा एकलें एक बिंब गगनीं । तरी प्रभा फांके त्रिभुवनीं । तेवीं एकाकियाची सकळ जनीं । आज्ञा पाळिजे ॥308॥
अथवा ज्याप्रमाणे आकाशांत एकच सूर्यबिंब असतें आणि किरणांच्या द्वारें त्याचा प्रकाश त्रिभुवनांत पसरतो, त्याप्रमाणे सर्वत्र मी परिपूर्ण रूपानेच असल्यामुळे संपूर्ण जगांत विभूतीच्या द्वारे देखील माझीच आज्ञा पाळली जाते.
309-10
तयांतें एकलें झणीं म्हण । ते निर्धन या भाषा नेण । काय कामधेनूसवें सर्व साहान । चालत असे ॥309॥
म्हणून त्यांना ऐकलें — म्हणजे मर्यादित ऐश्वर्याने युक्त — असे कदाचित् म्हणशील (पण असे त्यांना म्हणू नकोस) त्यांना दरिद्री हे शब्द लावूं नकोस. कामधेनुबरोबर सर्व सामग्री चालत असते काय?
310-10
तियेतें जें जेधवां जो मागे । तें ते एकसरेंचि प्रसवों लागे । तेवीं विश्वविभव तया अंगें । होऊनि आहाति ॥310॥
त्या कामधेनूला जो जेव्हा जे कांही मागतो तेव्हा ती सर्व एकदम आपल्यापासून प्रगट करतै, त्याप्रमाणे तेहि स्वतः अंगाने, विश्वच ज्यांचे ऐश्वर्य आहे, असे भगवत्स्वरूपच असतात.

311-10
तयातें वोळखा वया हेचि संज्ञा । जे जगें नमस्कारिजे आज्ञा । ऐसें आथि तें जाण प्राज्ञा । अवतार माझे ॥311॥
त्यांना ओळखण्याची ही एक खूण आहे की सर्व जीव त्यांची आज्ञा शिरसा मान्य करतात. बुध्दिमान् अर्जुना ! हे असे जे असतील तें माझें अवतार होत हें जाण.
312-10
आतां सामान्य विशेष । हें जाणणें एथ महादोष । कां जे मीचि एक अशेष । विश्व आहे म्हणोनि ॥312॥
आणि मीच एक सर्व जगद्रूप झालो असून, मी सर्वत्र सारखा असल्यामुळें, सामान्य-विशेष पाहणें हा मोठा दोष आहे.
313-10
तरी आतां साधारण आणि चांगु । ऐसा कैसेनि पां कल्पावा विभागु । वायां आपुलियेचि मती वंगु । भेदाचा लावावा ॥313॥
म्हणून निर्विशेष आत्मस्वरूपाचे ठिकाणीं साधारण व चांगला असा विभाग कां कल्पावा व व्यर्थच आपल्या बुध्दीला भेदाचा डाग कां लावावा?
314-10
एऱ्हवीं तरी तूप कासया घुसळावें । अमृत कां रांधूनि अर्धें करावें । हां गा वायूसि काय पां डावें । उजवें अंग आहे ॥314॥
नाही तरी तूप व्यर्थच का घुसळायचे, अमृताला शिजवून व्यर्थच कां अर्धे करावें? अर्जुना ! वायुला डावे उजवे अंग आहे काय?
315-10
पैं सूर्यबिंबासि पोट पाठीं । पाहतां नासेल आपुली दिठी । तेवीं माझ्या स्वरूपीं गोठी । सामान्यविशेषाची नाहीं ॥315॥
तसेंच सूर्यबिंबाचे ठिकाणी पोट पाठ पहायला गेलो तर आपली दृष्टी नष्ट होईल, त्याप्रमाणें माझ्या स्वरूपाचे ठिकाणीं सामान्य-विशेष अशा भागाची मुळी गोष्टच नाही.

316-10
आणि सिनाना इहीं विभूतीं । मज अपारातें मविसील किती । म्हणोनि किंबहुना सुभद्रापती । असो हें जाणणें ॥316॥
या निरनिराळ्या विभूतींच्या द्वारे माझ्या अपार स्वरूपाची काय मोजणी होणार आहे? म्हणून सुभद्रापती अर्जुना ! हे विभूतीचे जाणणे पुरे !
317-10
आतां पैं माझेनि एकें अंशें । हें जग व्यापिलें असे । यालागीं भेदू सांडूनि सरिसें । साम्यें भज ॥317॥
आता माझ्या एक अंशाने हे जग व्यापले आहे, म्हणून भेद सोडून व एक समदृष्टी ठेवूनच माझे भजन कर. (सर्वत्र एक पूर्ण सच्चिदानंद परब्रह्मच पाहा, असा अर्थ.)
318-10
ऐसें विबुधवनवसंतें । तेणें विरक्तांचेनि एकांतें । बोलिलें जेथ श्रीमंतें । श्रीकृष्णदेवें ॥318॥
याप्रमाणे ज्ञानरूपी वनाला वसंताप्रमाणे प्रसन्न करणारा, विरक्त पुरुषाचा जो एकान्त म्हणजे विरक्त पुरुष सर्वसंगपरित्याग करून ज्या एकाचाच आश्रय करतात, असे षड्गुणैश्वर्यसंपन्न भगवान श्रीकृष्ण याप्रमाणे बोलले.
319-10
तेथ अर्जुन म्हणे स्वामी । येतुलें हें राभस्य बोलिलेती तुम्हीं । जे भेदु एक आणि आम्हीं । सांडावा एकीं ॥319॥
तेव्हा अर्जुन म्हणतो, प्रभो ! एक भेद आहे, असे पाहणारे जे आम्ही त्यांनी तो भेद टाकावा, असे जे तुम्ही म्हटले ते थोडा विचार न करता बोलले असे वाटते.
320-10
हां हो सूर्य म्हणे काय जगातें । अंधारें दवडा कां परौतें । तेवीं धसाळ म्हणों देवा तूंतें । तरी अधिक हा बोलु ॥320॥
का हो देवा ! (जेथे सूर्य उगवल्यावर अंधार आपोआप नाहीसा होतो तेथे) आता अंधार दूर करा असे सूर्य सांगतो काय? त्याप्रमाणे भेद टाकून दे, असे सांगणार्‍या तुम्हांला, देवा ! अविचारी म्हणावे, तर ते अमर्यादेचे बोलणे होते.

321-10
तुझें नांवचि एक कोण्ही वेळे । जयांचिये मुखासि कां कानां मिळे । तयांचिया हृदयातें सांडूनि पळे । भेदु जी साच ॥321॥
एक तुझे नामच जर एखादेवेळी ज्याच्या मुखांत आलें किंवा कानांत पडले, तर त्याच्या ह्रदयांतून खरोखर भेद निघून जातो.
322-10
तो तूं परब्रह्मचि असकें । मज दैवें दिधलासि हस्तोदकें । तरी आतां भेदु कायसा कें । देखावा कवणें ॥322॥
पूर्णब्रह्मच असलेला तों तूं, माझ्या सुदैवाने सर्वस्वी तूं माझ्या स्वाधीन झाला आहेस तेव्हा आता कशाचा, कोठे व कोणी भेद पहावा?
323-10
जी चंद्रबिंबाचा गाभारां । रिगालियावरीही उबारा । परी राणेपणें शारङ्गधरा । बोला हें तुम्हीं ॥323॥
देवा ! चंद्रबिंबाच्या गाभार्‍यामध्ये-म्हणजे मध्यभागी शिरल्यानंतरहि उकडू लागेल काय? पण देवा ! स्वामीपणाने नात्याने हे तुम्ही बोलत आहां.
324-10
तेथ सावियाचि परितोषोनि देवें । अर्जुनातें आलिंगिलें जीवें । मग म्हणे तुवां न कोपावें । आमुचिया बोला ॥324॥
अर्जुनाचे भाषण ऐकून भगवंताला खरोखर आनंद झाला व त्यांनी अर्जुनाला प्रेमाने अलिंगन दिलें. नंतर भगवान म्हणतात, अर्जुना ! माझ्या बोलण्याचा राग मानूं नकोस.
325-10
आम्हीं तुज भेदाचिया वाहाणीं । सांगितली जे विभूतींची कहाणी । ते अभेदें काय अंतःकरणीं । मानिली कीं न मनें ॥325॥
आम्ही भेदाला धरूनच तुला जो विभूतीचा विस्तार सांगितला, तो अभेदपूर्वक तुझ्या अंतःकरणांत ठसला की नाही.

, ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading