सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा ओवी २०१ ते २२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

201-10
आतां हें सुख कायिसयासारिखें । कांहीं निर्वचेना मज परितोखें । तरि येतुलें जाणें जे येणें मुखें । पुनरुक्तही हो ॥201॥
आतां हें होणारें सुख कशासारखें आहे, हें मला झालेल्या आनंदामुळे शब्दाने कांही सांगतां येत नाही. पण एवढें मात्र मला सांगतां येतें की तुमच्या मुखाने तेंच सांगितलें गेलें, तरी तें गोडच लागतें.
202-10
हां गा सूर्य काय शिळा? । अग्नि म्हणों येत आहे वोंविळा । कां नित्य वाहातया गंगाजळा । पारसेपण असे ॥202॥
भगवंता ! सूर्य शिळा होतो काय? अग्नीला ओवळा म्हणता येते काय? नित्य वाहणार्‍या गंगाजळाला पारोसेपण असतें काय?
203-10
तुंवा स्वमुखें जें बोलिलें । हें आम्हीं नादासि रूप देखिलें । आजि चंदनतरूचीं फुलें । तुरंबीत आहों मां ॥203॥
तुम्ही जे स्वमुखाने सांगितलें, तें ऐकून आम्ही मूर्तीमंत नादब्रह्मच पाहिला किंवा आज सुवासिक अशा चंदनाच्या झाडाच्या फुलांचा सुवास घेत आहों असें वाटलें.
204-10
या पार्थाचिया बोला । सर्वांगें कृष्ण डोलला । म्हणे भक्तिज्ञानासि जाहला । आगरु हा ॥204॥
असे अर्जुनाचे बोलणें ऐकून श्रीकृष्ण सर्वांगाने डोलूं लागले व खरोखर, अर्जुन हा भक्तिज्ञानाचे कोठार झाला, असे मनांत म्हणाले.
205-10
ऐसा पतिकराचिया तोषा आंतु । प्रेमाचा वेगु उचंबळतु । सायासें सांवरूनि अनंतु । काय बोले ॥205॥
याप्रमाणे अर्जुनाच्या ठिकाणीं भक्तिज्ञानाचा अविष्कार पाहून, भगवंताला झालेल्या संतोषाने, भगवंताच्या अंतःकरणांत प्रेम उचंबळून लागलें. पण मोठ्या प्रयत्नाने तो प्रेमाचा अवेग आवरून देव पुढें बोलू लागलें.
श्रीभगवानुवाच
। हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः
। प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे ॥10.19॥

206-10
मी पितामहाचा पिता । हें आठवितांही नाठवे चित्ता । कीं म्हणतसे बा पंडुसुता । भलें केलें ॥206॥
मी ब्रह्मदेवाचाहि पिता आहे याची आठवणं करतांहि भगवंताला आठवण होऊ शकत नव्हती, म्हणून भगवंतांनी अर्जुनाला, “बापा अर्जुना!” बरें केलेंस असे म्हटलें.
207-10
अर्जुनातें बा म्हणे एथ कांहीं । आम्हां विस्मो करावया कारण नाहीं । आंगें तो लेंकरूं काई । नव्हेचि नंदाचें ॥207॥
येथें भगवंतांनी अर्जुनाला “बापा अर्जुना” म्हटलें याचें आपणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. भगवान स्वतः नंदाचें लेकरूं झालें नाही काय?
208-10
परि प्रस्तुत ऐसें असो । हें करवी आवडीचा अतिसो । मग म्हणे आइकें सांगतसों । धनुर्धरा ॥208॥
पण सध्यां हे बाजूला ठेवू. मनांत असलेलें अतिशय प्रेमच असा प्रकार करवित असतें. मग भगवान म्हणतात, धनुर्धरा ! सांगतों ते ऐक.
209-10
तरी तुवां पुसलिया विभूती । तयांचें अपारपण सुभद्रापती । ज्या माझियाचि परि माझिये मती । आकळती ना ॥209॥
तू माझ्या विभूति विचारल्यास, पण अर्जुना ! त्यांना मर्यादाच नाही. कारण मलाच माझ्या विभूतींची संख्या करवत नाही.
210-10
आंगींचिया रोमा किती । जयाचिया तयासि न गणवती । तैसिया माझिया विभूती । असंख्य मज ॥210॥
अंगावर रोम किती आहेत, हें ज्याचे त्यालाच मोजून सांगतां येत नाही, त्याप्रमाणे माझ्या विभूती मलाच मोजतां येण्याजोग्या नाहीत.

211-10
एऱ्हवीं तरी मी कैसा केवढा । म्हणोनि आपणपयांही नव्हेचि फुडा । यालागीं प्रधाना जिया रूढा । तिया विभूती आइकें ॥211॥
एरवीं मी कसा व केवढा आहे, हें मलाच स्पष्ट कळत नाही, म्हणून मुख्य मुख्य विभूती ज्या प्रसिध्द आहेत त्या सांगतों, ऐक.
212-10
जिया जाणतलियासाठीं । आघवीया जाणितलिया होती किरीटी । जैसें बीज आलिया मुठीं । तरूचि आला हो य ॥212॥
ज्याप्रमाणे बीज हातीं आलें असतां वृक्षच हातात आल्यासारखा होतो, त्याप्रमाणे ज्या माझ्या मुख्य मुख्य विभूती जाणल्या असतां, संपूर्ण विभूती जाणल्या जातील.
213-10
कां उद्यान हाता चढिलें । तरी आपैसीं सांपडलीं फळें फुलें । तेवीं देखिलिया जिया देखवलें । विश्व सकळ ॥213॥
किंवा बगीचा हातांत आला असतां, त्यांतील फुलें, फळेंहि अनायासें हातांत येतात, याप्रमाणे ज्या विभूती समजल्याबरोबर सर्व विश्वच विभूतीमय दिसू लागेल.
214-10
एऱ्हवीं साचचि गा धनुर्धरा । नाहीं शेवटु माझिया विस्तारा । पैं गगना ऐशिया अपारा । मजमाजीं लपणें ॥214॥
वस्तुतः धनुर्धरा ! माझ्या विस्ताराला खरोखर अंत नाही, कारण ज्याला आपण अमर्याद म्हणतो असे आकाशहि माझ्या ठिकाणींच असतें.
अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः ।
अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च॥10.20॥
215-10
आइकें कुटिलालकमस्तका । धनुर्वेदत्र्यंबका । मी आत्मा असें एकैका । भूतमात्राचां ठायीं ॥215॥
काळें कुरळें केस मस्तकावर धारण करणार्‍या, धनुर्विद्येत दुसरा शंकर असलेल्या अशा अर्जुना! ऐक, मी प्रत्येक भूताचे ठिकाणी आत्मरूपाने आहे.

216-10
आंतुलीकडे मीचि यांचा अंतःकरणीं । भूतांबाहेरी माझीच गंवसणी । आदि मी निर्वाणीं । मध्यही मीचि ॥216॥
या भूतांच्या आंत अंतःकरणांत – मीच असून, बाहेरून सर्व भूतांना माझीच खोळ घातलेली आहे व भूतांच्या आदी, अंती व मध्येहि मीच आहे.
217-10
जैसें मेघां या तळीं वरी । एक आकाशचि आंत बाहेरी । आणि आकाशींचि जाले अवधारीं । असणेंही आकाशीं ॥217॥
ज्याप्रमाणे मेघाला खाली-वर, आंत -बाहेर एक आकाशच असतें. आकाशांतच मेघ उत्पन्न होतात व आकाशांतच राहतात.
218-10
पाठीं लया जे वेळीं जाती । ते वेळीं आकाशचि होऊनि ठाती । तेवीं आदि स्थिती अंतगती । भूतांसि मी ॥218॥
शेवटीं जेव्हा ते नाहीसे होतात, तेव्हा आकाशरूपच होऊन जातात, त्याप्रमाणे सर्व भूतांचे उत्पत्ति, स्थिति, लय मीच आहे.
219-10
ऐसें बहुवस आणि व्यापकपण । माझें विभूतियोगें जाण । तरी जीवचि करूनि श्रवण । आइकोनि आइ क ॥219॥
असे माझें नानाविध व व्यापक होणें हें माझ्या विभूति व योगामुळे होत असतें असें समज. तर आतां आपल्या जीवाचे व श्रवणेंद्रियाचे ऐक्य करून श्रवणेंद्रियांच्या द्वारा ऐक- म्हणजे अत्यंत एकाग्र चित्ताने ऐक.
220-10
याहीवरी त्या विभूती । सांगणें ठेलें तुजप्रति । सांगेन म्हणितलें तुज प्रीती । त्या प्रधाना आइकें ॥220॥
मी सर्वत्र निमरूपांत व्यापून असल्यामूळें, विभूति सांगणें खरोखर संपले; पण अर्जुना ! तुला विभूति सांगतों असें म्हटलें, म्हणून माझ्या मुख्य मुख्य विभूति ऐक.
आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान ।
मरीचिर्मरुतानामस्मि नक्षत्राणामहं शशी॥10.21॥

221-10
हें बोलोनि तो कृपावंतु । म्हणे विष्णु मी आदित्यांआंतु । रवी मी रश्मिवंतु । सुप्रभांमाजीं ॥221॥
असें म्हणून तो कृपाळु भगवान म्हणाला, आदित्यांत मी विष्णु आहे. चांगल्या प्रकाशवान् पदार्थामध्ये किरणयुक्त असणारा सूर्य मी आहे.
222-10
मरूद्‍गणांच्या वर्गीं । मरीचि म्हणे मी शारङ्गी । चंद्र मी गगनरंगीं । तारांमाजीं ॥222॥
मरुद्गणांच्या समुदायात, भगवान म्हणाले मी मरीचि आहे. आकाशमंडळांतील नक्षत्रांमध्ये चंद्र मी आहे.
वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः ।
इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना ॥10. 22॥
223-10
वेदांआंतु सामवेदु । तो मी म्हणे गोविंदु । देवांमाजी मरुद्‍बंधु । महेंद्र तो मी ॥223॥
भगवान म्हणतात, वेदांत सामवेद तो मी आहे. देवांमध्ये मरुतांचा भाऊ इंद्र तो मी आहे.
224-10
इंद्रियांआंतु अकरावें । मन तें मी हें जाणावें । भूतांमाजी स्वभावें । चेतना ते मी ॥224॥
इंद्रियांमध्ये अकरावें जे मन, तें मी आहे असे जाण. भूतमात्रामध्ये सर्वांच्या ठिकाणी स्वाभाविक असणारें चैतन्य, तें मी आहे.
रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम् ।
वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम्॥10.23॥
225-10
अशेषांही रुद्रांमाझारीं । शंकर जो मदनारी । तो मी येथ न धरीं । भ्रांति कांहीं ॥225॥
सर्व रुद्रांमध्ये मदनाचा नाश करणारा जो शंकर तो मी आहे, या विषयीं शंका घेऊं नकोस.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *