सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा ओवी ७६ ते १०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

76-12
कर्मेंद्रियें सुखें । करिती कर्में अशेखें । जियें कां वर्णविशेखें । भागा आलीं ॥76
भगवंतांनी निरनिराळ्या वर्णाश्रमाला धरून जी कर्मे विहित केली असतील, ती सर्व कर्मे फक्त, भगवंताची आज्ञा समजून कर्मेंद्रियाच्या द्वारा, प्रेमाने करीत असतात.
77-12
विधीतें पाळित । निषेधातें गाळित । मज देऊनि जाळित । कर्मफळें ॥77॥
जे करावे म्हणून सांगितले असेल, तेच भक्त करतात व जे करू नये म्हणून सांगितले असेल; ते कधी करत नाहीत. अशा रीतीने मला कर्म समर्पण करून संपूर्ण कर्माचे फळ ते उत्पन्न होऊ देत नाहीत.
78-12
ययापरी पाहीं । अर्जुना माझें ठाईं । संन्यासूनि नाहीं । करिती कर्में ॥78॥
याप्रमाणे, अर्जुना ! माझे ठिकाणी सर्व कर्माचा संन्यास करून कर्मे नाहीशी करतात, पहा.
79-12
आणीकही जे जे सर्व । कायिक वाचिक मानसिक भाव । तयां मीवांचूनि धांव । आनौती नाहीं ॥79॥
आणखीही शरीर, वाणी, मन, यांच्याकडून होणार्‍या सर्व कर्मांची एक माझ्यावाचून दुसरीकडे प्रवृत्तीच नसते – म्हणजे भक्तांचे संपूर्ण व्यापार केवळ एका भगवंताला विषय करूनच होतात.
80-12
ऐसे जे मत्पर । उपासिती निरंतर । ध्यानमिषें घर । माझें झालें ॥80॥
असे अनन्य व मत्परायण झालेले भक्त, माझी अखंड उपासना करतात व त्या अखंड उपासनेने माझे ध्यान होऊन त्यांचे चित्त, माझे राहण्याचे घर होऊन बसते.


81-12
जयांचिये आवडी । केली मजशीं कुळवाडी । भोग मोक्ष बापुडीं । त्यजिलीं कुळें ॥81॥
ज्यांच्या आवडीने एका माझ्याशीच संपूर्ण व्यवहार केला व माझ्या प्रेमसुखाच्या दृष्टीने तुच्छ भासणारे विषयसुख व मोक्षसुख या दोन्ही कुळांचा त्याग केला.
82-12
ऐसे अनन्ययोगें । विकले जीवें मनें आंगें । तयांचे कायि एक सांगें । जें सर्व मी करीं ॥82॥
अशा रीतीने अनन्य होऊन ज्यांनी आपले शरीर, मन व जीवभाव मला समर्पण केले, त्यांचे सर्व काम मीच करीत असल्यामुळे कोणते एखादेच काम करतो, सांग बरे!
तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् ।
भवामि न चिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम् ॥12.7॥

अर्थ त्या माझ्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी ज्यांनी चित्त ठेवले आहे अशांना मी अल्पकाळात मृत्यु व जन्मरूपी संसारसागरातून वर काढतो॥12-7॥
83-12
किंबहुना धनुर्धरा । जो मातेचिया ये उदरा । तो मातेचा सोयरा । केतुला पां ॥83॥
किंबहुना अर्जुना ! जो मातेच्या उदरी येतो, तो मातेचा कितपत सोयरा असतो, बरे.
84-12
तेवीं मी तयां । जैसे असती तैसियां । कळिकाळ नोकोनियां । घेतला पट्टा ॥84॥
त्याप्रमाणेच माझे भक्त जशा स्थितीत असतील तशा स्थितीत मी त्यांच्यावर, प्रेम करून व त्यांच्या कळिकाळांचे निर्दाळन करून, त्यांना आपल्या पदरात घेतले आहे.
85-12
एऱ्हवीं तरी माझियां भक्तां । आणि संसाराची चिंता । काय समर्थाची कांता । कोरान्न मागे ॥85॥
माझ्या भक्ताला संसाराची कधी चिंता नसते. समर्थाच्या स्त्रियेला कोरान्न (म्हणजे कोरडी भिक्षा) मागण्याचा प्रसंग येतो काय?


86-12
तैसे ते माझें । कलत्र हें जाणिजे । कायिसेनिही न लजें । तयांचेनि मी ॥86॥
याचप्रमाणे माझे भक्त माझ्या कुटुंबापैकीच आहेत असे मी समजतो, मग त्यांना कोणतीही आपत्ती आली तर तिची लाज मला नाही का?
87-12
जन्ममृत्यूचिया लाटीं । झळंबती इया सृष्टी । तें देखोनियां पोटीं । ऐसें जाहलें ॥87॥
माझे भक्त या सृष्टीत जन्ममृत्यूच्या लाटात बुडत आहेत असे पाहून माझ्या मनात असे आले.
88-12
भवसिंधूचेनि माजें । कवणासि धाकु नुपजे । तेथ जरी कीं माझे । बिहिती हन ॥88॥
की, भवसागराच्या लाटांची कोणाला भीती वाटत नाही? अर्थात त्यांची माझ्या भक्तांनाही भीती वाटतेच.
89-12
म्हणौनि गा पांडवा । मूर्तीचा मेळावा । करूनि त्यांचिया गांवा । धांवतु आलों ॥89॥
म्हणून अर्जुना, राम कृष्णादि अवतार घेऊन या मृत्यूलोकी त्यांच्या गावी मी धाव घेतली.
90-12
नामाचिया सहस्रवरी । नावा इया अवधारीं । सजूनियां संसारीं । तारू जाहलों ॥90॥
माझ्या सहस्त्रनाम रूपी नावा तयार करून या संसाररूप सागरात मी त्यांना तारले आहे, असे समज.


91-12
सडे जे देखिले । ते ध्यानकासे लाविले । परीग्रहीं घातले । तरियावरी ॥91॥
एकटे जे असतील त्यांना मी ध्यानमार्गाची कास लावली आणि जे गृहस्थाश्रमी आहेत त्यांना नामरूपी नावेवर बसविले.
92-12
प्रेमाची पेटी । बांधली एकाचिया पोटीं । मग आणिले तटीं । सायुज्याचिया ॥92॥
मी आपल्या प्रेमाची पेटी एकाच्या पोटात बांधली आणि मग सर्वांना सायुज्याच्या तटी आणले – म्हणजे संसार समुद्राचे परतीर जे सगुणस्वरूप, त्या सगुण स्वरूपाशी त्यांचे ऐक्य केले.
93-12
परी भक्तांचेनि नांवें । चतुष्पदादि आघवे । वैकुंठींचिये राणिवे । योग्य केले ॥93॥
इतकेच नव्हे तर, ‘भक्त’ या नावास पात्र झालेल्या पश्वादि प्राण्यांना देखील वैकुंठाच्या राज्यावर बसण्यास योग्य केले.
94-12
म्हणौनि गा भक्तां । नाहीं एकही चिंता । तयांतें समुद्धर्ता । आथि मी सदा ॥94॥
म्हणून हे अर्जुना ! भक्तांना कशाचीही चिंता नसते. त्यांना सर्व संकटातून मुक्त करण्याकरिता मी सर्वदा सज्ज असतो.
95-12
आणि जेव्हांचि कां भक्तीं । दीधली आपुली चित्तवृत्ती । तेव्हांचि मज सूति । त्यांचिये नाटीं ॥95॥
आणि ज्या क्षणी भक्त आपली चित्तवृत्ती मला निःशेष समर्पण करतात, त्या क्षणी ते मला आपल्या सर्व व्यवहारात घालतात—म्हणजे त्या क्षणापासून त्यांचा सर्व व्यवहार मीच करीत असतो.


96-12
याकारणें गा भक्तराया । हा मंत्र तुवां धनंजया । शिकिजे जे यया । मार्गा भजिजे ॥96॥
म्हणूनच भक्तश्रेष्ठ अर्जुना, तू किंवा सर्वच जीवांनी माझ्या या भक्तीमार्गाचाच आश्रय करावा, हाच माझा गूढ उपदेश आहे, हे पक्के जाणून घे.
मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय ।
निवसिष्यसि मय्येव अत उर्ध्वं न संशयः ॥12.8॥

अर्थ माझ्या ठिकाणी मन वृत्तिवंत करून घाल, माझ्या ठिकाणी बुद्धी स्थिर कर. (म्हणजे) या पुढे तू माझ्या ठिकाणी निवास करशील (मद्रूप होशील) यात शंका नाही.
97-12
अगा मानस हें एक । माझ्या स्वरूपीं वृत्तिक । करूनि घालीं निष्टंक । बुद्धि निश्चयेंसीं ॥97॥
आपले मन माझ्या ठिकाणी स्थिर कर. आपली बुध्दी माझ्या ठिकाणी प्रविष्ट कर. असे झाल्यानंतर तू माझ्या ठिकाणीच राहशील— म्हणजे माझ्याशी अखंड ऐक्य पावशील— यात संशय नाही.
98-12
इयें दोनीं सरिसीं । मजमाजीं प्रेमेसीं । रिगालीं तरी पावसी । मातें तूं गा ॥98॥
बा अर्जुना ! तू आपले संपूर्ण वृत्तीसह एक हे मन व तसेच निश्चयव्यापारासह बुध्दी माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी दृढ लावून घाल.
99-12
जे मन बुद्धि इहीं । घर केलें माझ्यां ठायीं । तरी सांगें मग काइ । मी तू ऐसें उरे? ॥99॥
बुध्दी आणि मन ही दोन्ही माझ्या ठिकाणी अखंड वस्ती केली असता “मी-तू” असा भेद जो दिसतो, तो मागे राहील काय? हे सांग.
100-12
म्हणौनि दीप पालवे । सवेंचि तेज मालवे । कां रविबिंबासवें । प्रकाशु जाय ॥100॥
म्हणून ज्याप्रमाणे दिव्याला फडक्याने वारा घातल्या बरोबर दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो किंवा ज्याप्रमाणे सूर्यबिंब अस्तास गेले असता, त्याचा प्रकाशही जातो..

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *