176-10
एथ आपुलें वाडपण जैसें । आपणचि जाणिजे आकाशें । कां मी येतुली घनवट ऐसें । पृथ्वीचि जाणे ॥176॥
ज्याप्रमाणे आकाशाचे मोठेपण आकाशालाच समजते, किंवा पृथ्वीचे वजन पृथ्वीलाच समजते,
177-10
तैसा आपुलिये सर्वशक्ती । तुज तूंचि जाणूं लक्ष्मीपती । येर वेदादिक मती । मिरवती वायां ॥177॥
त्याप्रमाणे हे लक्ष्मीपती, तुमची सर्व शक्ती तुम्हीच जाणतां. एरव्ही तुमची आम्हांला कळली, असा वेदादिक व्यर्थ गर्व वाहतात.
178-10
हां गा मनातें मागां सांडावें । पवनातें वावीं मवावें । आदिशून्य उतरोनि जावें । केउतें बाहीं ॥178॥
अहो, मनाच्या गतीला कसे मागे टाकावे? वार्याला कवेत कसे धरावे? आणि बाहुंनी माया कशी तरून जावी?
179-10
तैसें हें तुझें जाणणें आहे । म्हणोनि कोणाही ठाकतें नोहे । आतां तुझें ज्ञान होये । तुजचिजोगें ॥179॥
त्याप्रमाणे, तुमचे ज्ञान होणे फार दुस्तर आहे, म्हणून ते कोणाला होत नाही, तर तुमचे तुम्हालाच समजते.
180-10
जी आपणपयातें तूंचि जाणसी । आणिकातें सांगावयाही तूं समर्थ होसी । तरी आतां एक वेळ घाम पुसीं । आर्तीचिये निडळींचा ॥180॥
तुमचे ज्ञान तुम्हालाच आहे, व ते आपण दुसर्यांनाही समजून देण्यास समर्थ आहात, तर एकदा आमच्या हौसेच्या कपाळाचा घाम पुसून टाका बरे !
181-10
हें आइकिलें की भूत भावना । त्रिभुवनगजपंचाना । सकळदेवदेवतार्चना । जगन्नायका ॥181॥
हे प्राणिमात्राला उत्पन्न करणार्या ! हे संसाररूपी हत्तींचा नाश करणार्या ! हे सकळ देवांना पूज्य असणार्या ! हे जगताचे स्वामी असणार्या ! माझें हें बोलणें ऐकलेंस काय?
182-10
जरी थोरी तुझी पाहात आहों । तरी पासीं उभे ठाकावयाही योग्य नोहों । या शोच्यता जरी विनवूं बिहों । तरी आन उपायो नाहीं ॥182॥
अनुभविलेल्या तुझ्या थोरवीकडे लक्ष दिले असतां, तुझ्यापाशीं उभे राहण्यापुरती देखील आमची योग्यता नाही. या अपात्रतेचे वाईट वाटून जरीं तुम्हाला विनंति करायला भ्यालों तरीपण त्यांवाचून दुसरा उपायहि नाही.
183-10
भरले समुद्र सरिता चहूंकडे । परि ते बापियासि कोरडे । कां जैं मेघौनि थेंबुटा पडे । तैं पाणी कीं तया ॥183॥
चहूंकडे समुद्र, नद्या, इत्यादि जलाशय जरी भरले, तरी त्या बापड्या चातकाच्या दृष्टीने मात्र ते सर्व कोरडेच होत, कारण जेव्हा मेघांतून पाण्याचा थेंब पडतो, तेव्हाच तो तें पाणी पीत असतो.
184-10
तैसे गुरु जी सर्वत्र आथी । परि कृष्णा आम्हां तूंचि गती । हें असो मजप्रती । विभूती सांगें ॥184॥
त्या प्रमाणे उपदेश करणारे श्रीगुरु सर्वत्र असले तरी श्रीकृष्णा ! आम्हाला मात्र शरण जाऊन विचारण्याला तूंच एक गति आहेस. हे असो. मला आतां आपल्या विभूति सांग.
वक्तुमर्हस्यशेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः । याभिर्विभूतिर्लोकानिमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि ॥10.16॥
185-10
जी तुझिया विभूती आघविया । परि व्यापिती शक्ति दिव्या जिया । तिया आपुलिया दावाविया । आपण मज ॥185॥
देवा ! दिव्यशक्तीने व्यापून असलेल्या ज्या तुझ्या संपूर्ण विभूती आहेत, त्या आपल्या आपण मला दाखवाव्यात.
186-10
जिहीं विभूतीं ययां समस्तां । लोकांतें व्यापूनि आहाती अनंता । तिया प्रधाना नामांकिता । प्रगटा करीं ॥186॥
हे अनंथा, ज्या तुझ्या विभूती तिन्ही लोकांना व्यापून आहेत. त्यातील मुख्य मुख्य नावाजलेल्या असतील त्या सांगा.
कथं विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिन्तयन् ।
केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया ॥10.17॥
187-10
जी कैसें मियां तूंतें जाणावें । काय जाणोनि सदा चिंतावें । जरी तूंचि म्हणों आघवें । तरि चिंतनचि न घडे ॥187॥
महाराज, मी तुम्हाला कसे जाणावें? जर सर्व तुम्हिच आहात असे म्हणावे तर माझ्या हातून तुमचे चिंतन होणार नाही.
188-10
म्हणोनि मागां भाव जैसे । आपुले सांगितले तुवां उद्देशें । आतां विस्तारोनि तैसे । एक वेळ बोलें ॥188॥
म्हणून पूर्वी (4/5/6 श्र्लोकांत) ज्या संक्षेपाने आपल्या विभूती सांगितल्या त्यांचा विस्तार करून एक वेळ पुन्हा एकदा सांगा
189-10
जयां जयां भावाचां ठायीं । तूंतें चिंतितां मज सायासु नाहीं । तो विवळ करूनि देईं । योगु आपुला ॥189॥
ज्या ज्या विभूतीच्या ठिकाणीं तुम्ही आहात असे समजून चिंतन केले असता, मला श्रम पडणार नाहीत, असा तुमच्या प्राप्तीचा तो उपाय स्पष्ट करून सांगा.
विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन ।
भूयः कथय तृप्तिर्हि श्रृण्वतो नास्ति मेऽमृतम्॥10.18॥
190-10
आणि पुसलिया जिया विभूती । त्याही बोलाविया भूतपती । येथ म्हणसी जरी पुढती । काय सांगों ॥190॥
हे भूपती, मी ज्या विभूती बद्दल विचारले आहे त्या सांगा, त्याच त्या पुन्हा पुन्हा काय सांगावयाचे आहेत असे जर कदाचित म्हणाल, तर
191-10
तरी हा भाव मना । झणें जाय हो जनार्दना । पैं प्राकृताही अमृतपाना । ना न म्हणवे जी ॥191॥
देवा जनार्दना ! अशी तुझ्या मनांत कदाचित् कल्पना येईल, पण प्रकृतिजन्यहि अमृत प्यायला मिळालें असतां जसें कोणाच्याने नको म्हणवत नाही.
192-10
जे काळकूटाचें सहोदर । जें मृत्यूभेणें प्याले अमर । तरि दिहाचे पुरंदर । चौदा जाती ॥192॥
जें अमृत काळकूटाचा भाऊ होय, मृत्यु येऊ नये म्हणून तें इंद्रादि प्यालें, तरी ब्रह्मदेवाच्या एका दिवसांत चौदा इंद्र होतात.
193-10
ऐसा कवण एक क्षीराब्धीचा रसु । जया वायांचि अमृतपणाचा आभासु । तयाचाही मीठांशु । जे पुरे म्हणों नेदी ॥193॥
असा कोणी एक क्षीरसमुद्रांतून निघालेला जो रस, त्याचे ठिकाणी व्यर्थच अमरपणाचा भास आहे, पण त्याचीहि गोडी, ‘पुरे’ असे म्हणूं देत नाही.
194-10
तया पाबळेयाही येतुलेवरी । गोडियेचि आथि थोरी । मग हें तंव अवधारीं । परमामृत साचें ॥194॥
अशा त्या क्षुद्र पदार्थाच्या गोडीची एवढी थोरवी आहे. मग पहा, हें तर खरोखर परमामृतच आहे.
195-10
जें मंदराचळु न ढाळितां । क्षीरसागरु.न डहुळितां । अनादि स्वभावता । आइतें आहे ॥195॥
या परमामृताकरितां मंदाराचलाला फिरवावें लागलें नाही, क्षीरसागराला डहुळावें लागले नाही, हे अनादि, स्वाभाविक व सिध्द आहे.
196-10
जें द्रव ना नव्हे बद्ध । जेथ नेणिजती रस गंध । जें भलतयांही सिद्ध । आठवलेंचि फावे ॥196॥
जे पातळ नाही, घट्ट नाही, ज्याचे ठिकाणीं रसगंधादि गुणहि नाहीत व जें स्मरण झाल्याबरोबर आपल्या ठिकाणीं मूळचेच आहे असा कोणालाहि अनुभव येतो.
197-10
जयाची गोठीचि ऐकतखेंवो । आघवा संसारु होय वावो । बळिया नित्यता लागे येवों । आपणपेंया ॥197॥
या परमामृताचे नुसतें वर्णन ऐकतांच सर्व संसार खोटा ठरतो व आपला विनाशीपणा जाऊन, बळेंच आपल्याठिकाणी नित्यता धर्म येतो.
198-10
जन्ममृत्यूची भाख । हारपोनि जाय निःशेख । आंत बाहेरी महासुख । वाढोंचि लागे ॥198॥
जन्ममरणाची भाषा निःशेष निहीशी होते व आंतबाहेर परमसुख वाढूं लागतें.
199-10
मग दैवगत्या जरी सेविजे । तरी तें आपणचि होऊनि ठाकिजे । तें तुज देतां चित्त माझें । पुरें म्हणों न शके ॥199॥
सुदैवाने या परमामृताचें सेवन झालें असतां, तें आपणच होऊन राहतें, असें हें परमामृत तूं मला पाजीत असतांना माझें चित्त पुरें म्हणूं शकत नाही.
200-10
तवं तुझें नामचि आम्हां आवडे । वरि भेटी होय आणि जवळिक जोडे । पाठीं गोठी सांगसी सुरवाडें । आनंदाचेनी ॥200॥
भगवंता ! तुझें नांवच तर आम्हाला अत्यंत प्रिय वाटतें. त्यांतहि पुनः तुझें दर्शन होऊन नित्य सान्निध्य आहे. त्यांत पुनः प्रेमाने गोड गोड गोष्टी सांगतोस.
