सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी ४७६ ते ५०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

476-9
जेथ अखंड वसिजे यागीं । जे वेदांची वज्रांगी । जयाचिये दिठीचां उत्संगीं । मंगळ वाढे ॥476॥
जे पृथ्वीवरील देवच; जे तपश्चर्येचे मूर्तिमंत अवतार; ज्यांच्या योगाने सर्व तीर्थाचे दैव उदय पावले आहे;
477-9
जे पृथ्वीतळींचे देव । जे तपोवतार सावयव । सकळ तीर्थांसी दैव । उदयलें जे ॥477॥
ज्यांच्या ठिकाणीं यज्ञाचा अखंड वास, जे वेदांची बळकट कवचे, व ज्यांच्या दृष्टींच्या संबंधाने सर्व ठिकाणीं मंगलाची वृद्धि होते
478-9
जयाचिये आस्थेचिये वोले । सत्कर्म पाल्हाळीं गेलें । संकल्पें सत्य जियालें । जयांचेनि ॥478॥
ज्यांच्या आस्तारूप ओलाव्याने सत्कर्माचा प्रसार झाला, व ज्यांच्या निश्चयाने सत्य कायम राहिले;
479-9
जयांचेनि गा बोलें । अग्नीसि आयुष्या जाहालें । म्हणोनि समुद्रें पाणी आपुलें । दिधलें यांचिया प्रीती ॥479॥
ज्यांच्या आशीर्वादाने अग्नीचें आयुष्य वाढले म्हणून त्यांच्या प्रीतीस्तव अग्नीला समुद्राने आपल्या ठिकाणीं आश्रय दिला.
480-9
मियां लक्ष्मी डावलोनि केली परौती । फेडोनि कौस्तुभ घेतला हातीं । मग वोढविली वक्षस्थळाची वाखती । चरणरजां ॥480॥
मी लक्ष्मीला ढकलून पलीकडे केली, व कौस्तुभ मणि गळ्यातून काढून हातांत घेतला;

481-9
आझूनि पाउलांची मुद्रा । मी हृदयीं वाहें गा सुभद्रा । जे आपुलिया दैवसमुद्रा । जतनेलागीं ॥481॥
आणि मग ज्यांच्या चरणरजांच्या प्राप्तीकरिता मी आपल्या उराची खळगी म्हणजे छाती पुढे केली;; हे नरेंद्रा, माझा शांतपणाचा लौकीक कायम राहण्याकरितां ज्यांच्या पावलाची खूण मी अजून आपल्या ह्रदयावर बाळगली आहे
482-9
जयांचा कोप सुभटा । काळाग्निरुद्राचा वसौटा । जयांचां प्रसादीं फुकटा । जोडती सिद्धी ॥482॥
ज्यांचा कोप म्हणजे काळ, अग्नी व रुद्र यांचे वसतिस्थान होय, व जे प्रसन्न झाले असतां फुकट सिद्धि प्राप्त होतात,
483-9
ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण । आणि माझां ठायीं आर्तिंनिपुण । आतां मातें पावती हें कवण । समर्थणें ॥483॥
असे पुण्यपुज्य जे ब्राह्मण, आणि त्यांतून माझे ठिकाणीं पूर्ण भक्ति करितात, ते मद्रूप होतात, यांत सिद्ध ते काय करावयाचे आहे?
484-9
पाहें पां चंदनाचेनि अंगानिळें । शिवतिले निंब होते जे जवळे । तिंहीं निर्जिवींही देवांची निडळें । बैसणीं केलीं ॥484॥
हे पहा, चंदनाच्या अंगवायूने स्पर्श केलेल्या जवळच्या कमी किंमतीच्या लिंबासही जर देवाच्या मस्तकावर स्थान मिळते
485-9
मग तो चंदनु तेथ न पवे । ऐसें मनीं कैसेनि धरावें । अथवा पातला हें समर्थावें । तेव्हां कायि साच ॥485॥
तर मग चंदनाचे वास्तव्य तेथें घडणार नाही, अशी मनांत शंका कशी धरावी? अथवा, त्या ठिकाणीं त्याचे वास्तव्य घडले असे सांगितल्यावर खरे वाटावे,

486-9
जेथ निववील ऐसिया आशा । हरें चंद्रमा आधा ऐसा । वाहिजत असे शिरसा । निरंतर ॥486॥
नाही तर खोटे का होईल?विष प्राशन केल्याने त्यापासून होणाऱ्या दाहाचे शमन होईल अशा आशेने, शंकरांनी मस्तकावर निरंतर अर्धचंद्रधारण केला,
487-9
तेथ निवविता आणि सगळा । परिमळें चंद्राहूनि आगळा । तो चंदनु केविं अवलीळा । सर्वांगी न बैसे ॥487॥
तर दाहाचे शमन करणारा, व पुर्ण आणि चंद्राहून सुवासाने अधिक असा जो चंदन, तो सर्वांगावर सहजचकां धारण केला जाणार नाही?
488-9
कां रथ्योदकें जियेचिये कासे । लागलिया समुद्र जालीं अनायासें । तिये गंगेसि काय अनारिसें । गत्यंतर असे ॥488॥
किंवा रस्त्यावरील उदक जिच्यांत मिळाल्यामुळे समुद्रात सहज जाऊन मिळतात त्या गंगेला समुद्राशिवाय दुसरीगति आहे काय?
489-9
म्हणोनि राजर्षि कां ब्राह्मण । जयां गती मती मीचि शरण । तयां त्रिशुद्धी मीच निर्वाण । स्थितिही मीचि ॥489॥
म्हणून ज्यांना गति व ज्ञान देणारा आणी ज्यांचे रक्षण करनारा मीच आहे, त्या राजर्षीना व ब्राह्मणांना भुक्ति व मुक्ति खरोखर मीच आहे.
490-9
यालागीं शतजर्जरे नावे । रिगोनि केविं निश्चिंत होआवें । कैसेनि उघडिया असावें । शस्त्रवर्षीं ॥490॥
यास्तव शतावधि छिद्रांच्या नावेत बसून आपण बुडनार नाही अशा भरवशाने निष्काळजी कसे राहावे? तसेच शस्त्रांचा वर्षाव चालला असता आपल्याला दुखापत होणार नाही अशा भरंवशाने उधड्या अंगाने कसे फिरावे?

491-9
अंगावरी पडतां पाषाण । न सुवावें केविं वोडण । रोगें दाटलिया आणि उदासपण । वोखदेंसीं ॥491॥
अंगावर दगड पडत असता ढाल का न पुढे करावी? रोगाने त्रस्त असतां औषध घेण्याविषयी कसे उदासीन असावे?
492-9
जेथ चहूंकडे जळत वणवा । तेथूनि न निगिजे केविं पांडवा । तेविं लोका येऊनिया सोपद्रवा । केविं न भजिजे मातें ॥492॥
हे अर्जुना चोहोकडुन वणवा लागल्यावर तेथुन बाहेर कसे पंडु नये? त्याचप्रमाणे उपद्रवासहीत असलेला जो मृत्युलोक त्यांत जन्मल्यावर माझे भजन कां न करावे?
493-9
अगा मातें न भजावयालागीं । कवण बळ पां आपुलां आंगीं । काइ घरीं कीं भोगीं । निश्चिंती केली ॥493॥
अरे, मला न भजण्याविषयी मनुष्यांच्या अंगी असे कोणते सामर्थ्य आहे? त्यांच्या घरी सर्व भोग्य वस्तुंची समृद्धि असल्यामुळे ते निष्काळजी झाले काय?
494-9
नातरी विद्या कीं वयसा । यां प्राणियांसि हा ऐसा । मज न भजतां भरवसां । सुखाचा कोण ॥494॥
का, मला न भजतां विद्या, तारूण्य यांपासुन सुखप्राप्ति होईल असा प्राण्यांना भरवंसा आहे?
495-9
तरी भोग्यजात जेतुलें । तें एका देहाचिया निकिया लागलें । आणि येथ देह तंव असे पडिलें । काळाचां तोंडीं ॥495॥
तर बाबारे, जितक्या म्हणून भोग्य वस्तू आहेत तितक्या एका देहाच्या सुखाकरीता उत्पन्न केलेल्या आहेत, आणि पांहू गेलेअसता ह्या मृत्युलोकी देह काळाच्या तोंडात पडलेला आहे!

496-9
बाप दुःखाचें केणें सुटलें । जेथ मरणाचे भरे लोटले । तिये मृत्युलोकींचियेशेवटिले । येणें जाहालें हाटवेळे ॥496॥
या मृत्युलोकाच्या बाजारांत दुःखरूपी माल भरलेलाअसून मरणरूपी माप चालले आहे त्या ठिकाणी बाजार उठण्याचे समयी मनुष्यरूपाने येणे झाले आहे.
497-9
आतां सुखेंसि जीविता । कैची ग्राहिकी कीजेल पांडुसुता । काय राखोंडी फुंकिता । दीपु लागे ॥497॥
तर हे पंडूसुता, अशा वेळी जीवाला सुख होईल अशी कोनती खरेदी करता येईल? हे पहा (विस्तव विझून गेल्यावर राहीलेली) राख फुंकून दिवा लागेल का?
498-9
अगा विषाचे कांदे वाटुनी । जो रसु घेइजे पिळुनी । तया नाम अमृत ठेउनी । जैसें अमर होणें ॥498॥
ज्याप्रमाणे विषाचे कांदे वाटून त्याचा रस काढावा व त्याला अमृत हे नाव देऊन तो प्यावा आणि अमर होण्याची इच्छा करावी.
499-9
तेविं विषयांचें जें सुख । तें केवळ परम दुःख । परि काय कीजे मूर्ख । न सेवितां न सरे ॥499॥
त्याप्रमाणे विषयापासून होणारें जें सुख नव्हे,ते परमदुःख होय, पण काय करावें, मूर्ख लोक विषयसुख भोगल्यावाचून राहत नाहीत.
500-9
कां शीस खांडूनि आपुलें । पायींचां खतीं बांधिलें । तैसें मृत्युलोकींचें भलें । आहे आघवें ॥500॥
किंवा आपलें मस्तक तोडून ते जसे पायाला झालेल्या क्षतावर बांधावे, त्या प्रमाणे या मृत्युलोकांतील सर्व विषयसुख आहे.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *