सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा ओवी १७६ ते २०० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

176-7
तया तो प्रयत्नुचि एके वेळे । मग समग्रें परब्रह्में फळे । जया पिकलेला रसु गळे । पूर्णतेचा ॥176॥
त्यांना त्याचा तो प्रयत्न फलद्रूप होऊन ब्रह्मप्राप्ती होते, व पिकलेल्या फळांच्या रसाप्रमाणे ते पूर्णतेस पावतात.
177-7
ते वेळीं कृतकृत्यता जग भरे । तेथ अध्यात्माचें नवलपण पुरे । कर्माचें काम सरे । विरमे मन ॥177॥
त्या वेळी,आम्ही धन्य आहो, असे त्यांना वाटून सर्व जगभर आनंद भरलेला दिसतो,
178-7
ऐसा अध्यात्मलाभ तया । होय गा धनंजया । भांडवल जया । उद्यमीं मी ॥178 ॥
नंतर आत्मज्ञानाची हौस पुरी होऊन व कर्मे जागच्या जागी राहून त्याचे मन शांत होते.
179-7
तयातें साम्याचिये वाढी । ऐक्याची सांदे कुळवाडी । तेथ भेदाचिया दुबळवाडी । नेणिजे तया ॥179 ॥
हे धनंजया, अशा रीतीने त्यांना आत्मज्ञानाचा लाभ होतो; कारण त्यांच्या या परमार्थरूप व्यापारांत भांडवल मीच आहे. त्यांना समदृष्टी हेंच व्याज मिळून ऐक्यरूप संपत्तीची समृद्धि होते, यामुळे भेदरूप दैन्याची ओळखही रहात नाही.
साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदु: ।
प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतस: ॥7.30॥
॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः ॥
श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ।

180-7
जिहीं साधिभूता मातें । प्रतीतीचेनि हातें । धरूनि अधिदैवातें । शिवतलें गा ॥180॥
ज्यांनी अनुभवाच्या हातांनी मायावश जीवाला धरुन पांचभौतिकासह मला स्पर्श केला.


181-7
जया जाणिवेचेनि वेगें । मी अधियज्ञु दृष्टी रिगें । ते तनूचेनि वियोगें । विरहे नव्हती ॥181॥
ज्यांनी अनुभवाच्या हातांनी मायावश जीवाला धरुन पांचभौतिकासह मला स्पर्श केला, ज्यांच्या ज्ञानाच्या वेगाने मला अधियज्ञ या दृष्टीने पाहिले, त्यांना शरीराच्या वियोगाने (मरणसमयी) दुःख होत नाही
182-7
ये-हवीं आयुष्याचें सूत्र विघडतां । भूतांची उमटे खडाडता । काय न मरतयाहि चित्ता । युगांतु नोहे ॥182॥
येऱ्हवी, आयुष्याची दोरी तुटावयाचे बतांत आली असता प्राण्यांची जी खळबळ उडून जाते, ती पाहून, न मरणारांच्या चित्ताला सुद्धा युगांत ओढवल्यासारखे नाही का होत?
183-7
परी नेणों कैसें पैं गा । जे जडोनि गेले माजिया आंगा । ते प्रयाणींचिया लगबगा । न सांडितीच मातें ॥183 ।
परंतु जे मद्रूप झाले, ते प्राणांतीही मला सोडीत नाहीत. हे कसे होते ते मला सांगता येत नाही.
184-7
ये-हवीं तरी जाण । ऐसे जे निपुण । तेचि अंत:करण- । युक्त योगी ॥184 ॥
येऱ्हवी असे पक्के समज की, जे अशा प्रकारे पूर्ण ज्ञानी आहेत, तेच अंतःकरणापासून माझे ऐक्य पावले आहेत.
185-7
तंव इये शब्दकुपिकेतळीं । नोडवेचि अवधानाची अंजुळी । जे नावेक अर्जुन तये वेळीं । मागांचि होता ॥185॥
हे तत्व सांगते वेळी श्रीकृष्णाच्या मुखातील शब्दरूप कुपीच्या खाली अर्जुनाची अवधानरूप ओंजळ नव्हती. कारण त्याचें लक्ष क्षणभर दुसरीकडे होते.


186-7
जेथ तद्ब्रह्मवाक्यफळें । जियें नानार्थरसें रसाळें । बहुकाते आहाति परिमळें । भावाचेनि ॥186॥
त्या ठिकाणी ती ब्रह्मप्रतिपादक वाक्ये हींच फले पुष्कळ अर्थरूपी रसाने भरलेली होती, व त्यांचा भक्तिरूप सुवास चोहींकडे पसरला होता.
187-7
सहज कृपामंदानिळें । कृष्णद्रुमाचीं वचनफळें । अर्जुनश्रवणाचिये खोळे । अवचित पडिली ॥187॥
त्या वेळी कृष्णकृपारूप मंद वाऱ्याच्या योगानें, श्रीकृष्णरूप वृक्षापासुन वचनरूप फळे अर्जुनाच्या श्रवणरूप ओटीत सहज येऊन पडली !
188-7
तियें प्रमेयाचींच हो कां वळलीं । कीं ब्रह्मरसाचां सागरीं चुबुकळिलीं । मग तैसींच कां घोळिलीं । परमानंदें ॥188॥
ती फळे वेदांतसिद्धांतांचीच बनलेली, ब्रह्मरसाच्या सागरांत बुचकळलेली, व तशीत परमानंदरूप साखरेत घोळलेली होती.
189-7
तेणें बरवेपणें निर्मळें । अर्जुना उन्मेषाचे डोहळे । घेताति गळाळे । विस्मयामृताचे ॥189॥
अशा रीतीने बनलेली जी निर्मळ फळे, त्याच्या अर्थरूपी गर्भाचा लाभ व्हावा अशी अर्जुनास इच्छा उत्पन्न होऊन तो विस्मयरूप अमृताचे घोट घेऊ लागला.
190-7
तिया सुखसंपत्ती जोडलिया । मग स्वर्गा वाती वांकुलिया । हृदयाचां जीवीं गुतकुलिया । होत आहाती ॥190॥
अशा रीतीचे सुख झाल्यावर तो स्वर्गसुखाला वेडावून दाखवूं लागला व त्याच्या अंतःकरणांत गुदगुल्या होऊ लागल्या.


191-7
ऐसें वरचिलीचि बरवा । सुख जावों लागलें फावा । तंवरसस्वादाचिया हांवा । लाहो केला ॥191॥
याप्रमाणे त्या फळांचे बाहेरील स्वरुप पाहुन त्याचा आनंद वाढूं लागला. त्या वेळेस त्या फळांची चव घेण्याची जिभेला इच्छा उत्पन्न झाली.
192-7
झाकरी अनुमानाचेनि करतळें । घेऊनि तियें वाक्यफळें । प्रतीतिमुखीं एके वेळे । घालूं पाहिलीं ॥192॥
म्हणून लवकर अनुमानरूप हस्तावर ती श्रीकृष्णवाक्यरूप फले घेऊन ती तो अनुभवरूप मुखांत एकदम घालूं लागला.
193-7
तंव विचाराचिया रसना न दाटती । परी हेतूचांही दशनीं न फुटती । ऐसें जाणोनि सुभद्रापती । चुंबीचिना ॥193 ॥
त्या वेळी विचाररूप जिभेने ती घेता येईनात, व हेतूरूप दातांनी फुटेनात असे जाणून, सुभद्रापती जो अर्जुन तो त्यांना तोंड लावीना.
194-7
मग चमत्कारला म्हणे । इयें जळींचीं मा तारांगणें । कैसा झकविलों असलगपणें । अक्षरांचेनि ॥194 ॥
मग चमत्कार वाटून असे म्हणतो की, ” अहो, पाण्यांत दिसणाऱ्या नक्षत्रांप्रमाणे या अक्षरांच्या सुदरपणाने अक्षरांना फळ समजुन मी कसा फसलो!
195-7
मगइयें पदें नव्हती फुडिया । गगनाचियाचि घडिया । येथ आमुची मती बुडलिया । थाव न निघे ॥195 ।
ही अक्षरांची पदे नसुन केवळ आकाशाच्या घड्या आहेत व यांत आमच्या बुद्धीने कीती जरी बुड्या मारल्या, तरी कांही थांग लागावयाचा नाही.”


196-7
वांचूनि जाणावयाची कें गोठी । ऐसें जीवीं कल्पूनि किरीटी । तिये पुनरपि केली दृष्टी । यादवेंद्रा ॥196 ।
(तेव्हां ही फले घेता येत नाहीत तर) मग ती जाणतां कशी येतील? असे अर्जुनाने मनांत आणून पुनः यादवेंद्र श्रीकृष्णाकडे पाहिले.
197-7
मग विनविलें सुभटें । हां हो जी यें एकवाटे । सातही पदें अनुच्छिष्टें । नवलें आहाती ॥197॥
मग अर्जुनाने देवास विनंति केली की,” देवा, ही जी एकवटलेली सात पदे, त्यांचा कधीही कोणी स्वाद घेतला नाही, हे मोठे आश्चर्य आहे.
198-7
ये-हवीं अवधानाचेनि वहिलेपणें । नाना प्रमेयांचेउगाणे कायl श्रवणाचेनि आंगणें । बोलोंलाहाति ॥198॥
एरवी, लक्षपूर्वक ऐकत नसतां, केवळ श्रवणाच्या जोरावर (लक्ष नसतां श्रवण केले तर) अनेक (साधारण) सिद्धांतांचे तात्पर्यार्थ तरी बोलून दाखवितां येतील का? (नाही.)
199-7
परी तैसें हें नोहेचि देवा । देखिला अक्षरांचा मेळावा । आणि विस्मयाचिया जीवा । विस्मयो जाला ॥199॥
आणि त्यांतूनही, देवा, आपले हे बोलणे कांही साधारण नव्हे. ही अक्षरे नुसती पाहिल्यावर विस्मयाला देखील मोठे आश्चर्य वाटले.
200-7
कानाचेनि गवाक्षद्वारें । बोलाचें रश्मी अभ्यंतरें । पाहेना तंव चमत्कारें । अवधान ठकलें ॥200॥
कानाच्या झरोक्यांतुन बोलरुपी किरण आंत शिरले नाहीत, तोंच चमत्कार वाटुन माझे लक्ष खुंटले (मति चालेना).

, ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading