176-14
अविवेक महामंत्र । जें मौढ्यमद्याचें पात्र । हें असो, मोहनास्त्र । जीवांसि जें ॥176॥
अविचार हाच या तमोगुणाचा महामंत्र आहे व तो तमोगुण मूर्खपणारूपी दारूचे भांडे आहे. हे राहू दे. फार काय सांगावे? जो तमोगुण जीवाला मोहनास्त्र (भूल पाडणारे अस्त्र) आहे.
177-14
पार्था तें गा तम । रचूनि ऐसें वर्म । चौखुरी देहात्म- । मानियातें ॥177॥
अर्जुना या लक्षणास तमोगुण असे म्हणतात. व जे या शरिरालाच आत्मा समजु लागतात. त्यांना हा तमोगुण चारही बाजुनीं विळखा टाकतो.
178-14
हें एकचि कीर शरीरीं । माजों लागे चराचरीं । आणि तेथ दुसरी । गोठी नाहीं ॥178॥
आणि चराचरात कोणत्याही शरीरामधे हा खरोखर एकच माजू लागला की मग ह्या अवस्थेत तमोगुणाशिवाय दुसर्या कोणत्याच गोष्टचा शिरकाव होत नाही.
179-14
सर्वेंद्रिया जाड्य । मनामाजीं मौढ्य । माल्हाती जे दार्ढ्य । आलस्याचें ॥179॥
हा तमोगुण सर्व इंद्रियांचे ठिकाणी जडपणा आणतो,आणि मनामधे मूर्खपणा उत्पन्न करतो व ते दोघे (मन आणि इंद्रिये) आळसाच्या दृढपणाचा आश्रय करतात.
180-14
आंगें आंग मोडामोडी । कार्यजातीं अनावडी । नुसती परवडी । जांभयांची ॥180॥
तमोगुणी असलेला मनुष्य सतत शरिराला आळे-पिळे देतो. किंवा कोणतेही काम करण्याविषयी त्याला कंटाळा असतो व एकापाठीमागून एक अशा एकसारख्या नुसत्या जांभया देत असतो.
181-14
उघडियाची दिठी । देखणें नाहीं किरीटी । नाळवितांचि उठी । वो म्हणौनि ॥181॥
अर्जुना त्याचे डोळे जरी उघडे असले तरी त्याला दिसत नाही व कोणी हाक मारली नसता ‘ओ’ म्हणून उठतो.
182-14
पडलिये धोंडी । नेणे कानी मुरडी । तयाचि परी मुरकुंडी । उकलूं नेणें ॥182॥
जमिनीवर पडलेल्या धोंड्याला जसे एका बाजूहून दुसर्या बाजूला फिरणे माहीत नसते, त्याप्रमाणे तो मारलेली मुरकुंडी केव्हाही सोडीत नाही.
183-14
पृथ्वी पाताळीं जांवो । कां आकाशही वरी येवो । परी उठणें हा भावो । उपजों नेणें ॥183॥
पृथ्वी पाताळात जावो अथवा आकाश अंगावर कोसळून पडो, परंतु ‘उठावे’ हा विचार उत्पन्न होण्याचे त्याला माहीत नसते
184-14
उचितानुचित आघवें । झांसुरता नाठवे जीवें । जेथींचा तेथ लोळावें । ऐसी मेधा ॥184॥
आळसाने स्वस्थ निश्चेष्ट पडले असता योग्य काय किंवा अयोग्य काय हे सर्व अंत:करणात आठवत नाही व जेथेच्या तेथे (जेथे पडला असेल तेथे) लोळावे अशी त्याची बुद्धी असते.
185-14
उभऊनि करतळें । पडिघाये कपोळें । पायाचें शिरियाळें । मांडूं लागे ॥185॥
दोन्ही तळहात वर करून गाल धरतो आणि दोन्ही गुडघ्यात डोके घालतो.
186-14
आणि निद्रेविषयीं चांगु । जीवीं आथि लागु । झोंपीं जातां स्वर्गु । वावो म्हणे ॥186॥
आणि निद्रेविषयी अंत:करणात चांगली आवड असते आणि झोप यावयास लागली म्हणजे स्वर्गसुखही तुच्छ आहे असे म्हणतो.
187-14
ब्रह्मायु होईजे । मा निजलेयाचि असिजे । हें वांचूनि दुजें । व्यसन नाहीं ॥187॥
ब्रह्मदेवाच्या आयुष्याचे व्हावे आणि मग निजूनच रहावे यावाचून दुसरा नाद नाही.
188-14
कां वाटें जातां वोघें । कल्हातांही डोळा लागे । अमृतही परी नेघे । जरी नीद आली ॥188॥
सहज वाटेने जात असता कलंडून पडला तरी त्याचा डोळा लागतो आणि जर त्यास झोप आली तर तो अमृतसुद्धा घेत नाही.
189-14
तेवींचि आक्रोशबळें । व्यापारे कोणे एके वेळे । निगालें तरी आंधळें । रोषें जैसें ॥189॥
जसा एखादा आंधळा रागावून कामाला निघाला म्हणजे तो कोणीकडे जाईल व कोठे पडेल याचा नेमच नाही, त्याप्रमाणे हा तमोगुणी मनुष्य त्वेषाच्या आवेशाने कोणत्या एखाद्या वेळी कामास निघाला असता काय करील याचा नेम नाही.
190-14
केधवां कैसे राहाटावें । कोणेसीं काय बोलावें । हें ठाकतें कीं नागवें । हेंही नेणें ॥190॥
केव्हा कसे वागावे, कोणाशी काय बोलावे, अमूक एक गोष्ट साध्य आहे की असाध्य आहे हेही त्यास कळत नाही.
191-14
वणवा मियां आघवा । पांखें पुसोनि घेयावा । पतंगु पां हांवा । घाली जेवीं ॥191॥
अरे ज्याप्रमाणे पतंग हा सर्व वणवा मी आपल्या पंखानेच पुसून घ्यावा या उत्कट इच्छेने वणव्यात उडी घालतो.
192-14
तैसा वळघे साहसा । अकरणींच धिंवसा । किंबहुना ऐसा । प्रमादु रुचे ॥192॥
त्या पतंगाप्रमाणे हा तमोगुणी पुरुष एखाद्या धोक्याच्या कामाकडे वळतो व जे काम करू नये ते करण्याची त्याला प्रबल इच्छा असते. फार काय सांगावे? याप्रमाणे त्यास प्रमाद (भलतेच करणे) आवडतो.
193-14
एवं निद्रालस्यप्रमादीं । तम इया त्रिबंधीं । बांधे निरुपाधी । चोखटातें ॥193॥
याप्रमाणे तमोगुण हा निद्रा, आळस व प्रमाद या तीन प्रकारांनी निरुपाधिक व शुद्ध आत्म्याला बांधतो.
194-14
जैसा वन्ही काष्ठीं भरे । तैं दिसे काष्ठाकारें । व्योम घटें आवरे । तें घटाकाश ॥194॥
ज्याप्रमाने अग्नीने लाकूड व्यापले असता, अग्नी हा लाकडाच्या आकाराचा दिसतो त्याप्रमाणे पोकळी घटात सापडली असता तिला घटाकाश म्हणतात.
195-14
नाना सरोवर भरलें । तैं चंद्रत्व तेथें बिंबलें । तैसें गुणाभासीं बांधलें । आत्मत्व गमे ॥195॥
अथवा ज्यावेळी सरोवर पाण्याने भरले असते तेव्हा त्यात चंद्र प्रतिबिंबित होतो व त्यामुळे चंद्र सरोवरात बांधला गेल्यासारखा दिसतो, तसे आत्मत्व हे गुणात भासल्यामुळे आत्मा हा गुणांनी बांधल्यासारखा वाटतो.
सत्त्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत ।
ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत ॥14.9॥
श्लोकार्थ -: -: हे भारता, सत्वगुण सुखाचे ठिकाणी व रजोगुण कर्माचे ठिकाणी आसक्ती उत्पन्न करतो. आणि तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमादाचे ठिकाणी आसक्ती उत्पन्न करतो.
(त्रिगुणांचे कार्य)
रजस्तमश्चाभिभूय सत्त्वं भवति भारत ।
रजः सत्त्वं तमश्चैव तमः सत्त्वं रजस्तथा ॥14.10॥
श्लोकार्थ -: -: हे भरतकुलोत्पन्ना, रज व तम यांना जिंकून सत्व प्रगट होतो, रज व सत्व यांना जिंकून तम प्रगट होतो व तम व सत्व यांना जिंकून रज प्रगट होतो.
तीन गुणांची वृद्धी कशी होते.
196-14
पैं हरूनि कफवात । जैं देही आटोपे पित्त । तैं करी संतप्त । देह जेवीं ॥196॥
परंतु कफ व वात यांना मागे सारून जेव्हा पित्त देहात व्यापते, तेव्हा ते पित्त देहाला जसे संतप्त करते,
197-14
कां वरिष आतप जैसें । जिणौनि शीतचि दिसे । तेव्हां होय हिंव ऐसें । आकाश हें ॥197॥
अथवा पावसाळा व उन्हाळा यास जिंकून (हे गेल्यानंतर) जेव्हा थंडीच दिसते तेव्हा आकाश थंडगार असे होते.
198-14
नाना स्वप्न जागृती । लोपूनि ये सुषुप्ती । तैं क्षणु एक चित्तवृत्ती । तेचि होय ॥198॥
अथवा जागृत अवस्था व स्वप्नावस्था नाहीशी होऊन जेव्हा गाढ निद्रेची अवस्था प्राप्त होते, तेव्हा क्षणभर चित्तवृत्ती सुषुप्तीच (जडमूढ) होते.
199-14
तैसीं रजतमें हारवी । जैं सत्त्व माजु मिरवी । तैं जीवाकरवीं म्हणवी । सुखिया ना मी? ॥199॥
त्याप्रमाणेच रजोगुण व तमोगुण नाहीसे करून तो सत्वगुण जीवाकडून ‘मी सुखी आहे ना?’ असे म्हणवतो.
200-14
तैसेंचि सत्त्व रज । लोपूनि तमाचें भोज । वळघें तैं सहज । प्रमादीं होय ॥200॥
त्याचप्रमाणे सत्वगुण व रजोगुण हे नाहीसे करून जेव्हा तमोगुणाची वृद्धी होते तेव्हा आत्मा हा सहजच प्रमादी (चुका करणारा) होतो.
Sartha Dnyaneshwari Chapter 14th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay ChaudavaSampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा संपूर्ण