सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा ओवी १०१ ते १२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

101-7
ते उपरतीचां वांवीं सेलत । सोहंभावाचेनि थावें पेलत । मग निघाले अनकळित । निवृत्तितटीं ॥1॥
हात टाकीत ‘अहंब्रह्म ‘ या भावाच्या बळावर पोहून निवृत्तिरूपी तटावर निर्विघ्नपणे निघतात.
102-7
येणें उपायें मज भजले । ते हे माझी माया तरले । परी ऐसे भक्त विपाइले । बहुवस नाहीं ॥2॥
या उपायाने जे मला भजतात, तेच या मायारुप नदीतून तरून जातात; परंतू असे भक्त अगदी विरळा. फार नाहीत.
चतुर्विधा भजन्ते मां जना: सुकृतिनोऽर्जुन ।
आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ ॥7.16॥
तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते ।
प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रिय: । । 7.17॥

103-7
जे बहुतां एकां अवांतर । अहंकाराचा भूतसंचार । जाहला म्हणोनि विसर । आत्मबोधाचा ॥103॥
कारण, त्या एकाशिवाय इतर सर्व प्राण्यांना अहंकाररूप भूताचा संचार झाल्यामुळे आत्मस्वरुपाचा विसर पडतो.
104-7
ते वेळीं नियमाचें वस्त्र नाठवें । पुढीले अधोगतीची लाज नेणवे । आणि करितात जें न करावें । वेदु म्हणे ॥104॥
त्या वेळी त्यांस नियमरूपी वस्त्राचे भान रहात नाही, अधोगतीची लाज नाहींशी होते, आणि ते वेदबाह्य वर्तणूक करितात.
105-7
पाहें पां शरीराचिया गांवा । जयालागीं आले पांडवा । तो कार्यार्थु आघवा । सांडूनियां ॥105॥
अर्जुना, असे पहा की, या शरीररुप गांवांत ज्या कार्याकरिता आले, तो सर्व कार्यभाग सोडुन,


106-7
इंद्रियग्रामींचां राजबिदीं । अहंममतेचिया जल्पवादीं । विकारांतरांची मांदी । मेळवूनिया ॥106॥
या इंद्रियसमुदायरूप राजमार्गावर अहंममतेची बडबड करण्याकरिता कामक्रोधादिक विकारांचा समुदाय गोळा करितात;
107-7
दु:खशोकाचां घार्इं । मारिलीयाची सेचि नाहीं । हें सांगावया कारण काई । जे ग्रासिले माया ॥107॥
आणि दुःख व शोक यांचे घाव पडत असतांही त्यांना त्यांची आठवण सुद्धा नसते. हे सांगावयाचे कारण काय म्हणशील, तर ते मायेने ग्रासलेले असतात.
108-7
म्हणोनि ते मातें चुकले । आइकां चतुर्विध मज भजले । जिहीं आत्महित केलें । वाढतें गा ॥108॥
म्हणून ते मला मुकतात; परंतु फक्त चौघांनीच, ज्यांनी माझे भजन केले त्यांनी आत्महीत वृद्धिंगत केले.
109-7
तो पहिला आर्तु म्हणिजे । दुसरा जिज्ञासू बोलिजे । तिजा अर्थार्थी जाणिजे । ज्ञानिया चौथा ॥109॥
त्या चौघांपैकी पहिल्याला आर्त, दुसऱ्याला जिज्ञासु, तिसऱ्याला अर्थार्थी, व चौथ्याला ज्ञानी असे म्हणतात.
110-7
तेथ आर्तु तो आर्तीचेनिव्याजें । जिज्ञासु तोजाणावयाचिलागीं भजे । तिजेनि तेणें इच्छिजे । अर्थसिद्धि ॥110॥
आर्त हा दुःखनिवारणासाठी मला भजतो, जिज्ञासु ज्ञानप्राप्तीकरतां भजतो, आणि तिसरा जो अर्थार्थी तो द्रव्यप्राप्तीचे इच्छेनें मला भजतो.


111-7
मग चौथियाचां ठायीं । कांहींचि करणें नाहीं । म्हणोनि भक्तु एकु पाहीं । ज्ञानिया जो ॥111॥
परंतु चौथा जो असतो, त्याला कांहीच कर्तव्य नसतांही तो मला भजतो, म्हणून तो एक ज्ञानी पुरुषच माझा भक्त होय हे ध्यानांत ठेव.
112-7
जें तया ज्ञानाचेनि प्रकाशें । फिटलें भेदाभेदाचें कडवसें । मग मीचि जाहला समरसें । आणि भक्तुही तेविंचि ॥112॥
कारण, त्याच्या ज्ञानाच्या प्रकाशाने भेदाभेदरूप अहंकार नाहींसा होतो, व मग त्याचें माझ्याशी ऐक्य होऊन तो मद्रूप होऊन बसतो, व त्याची भक्तीही तशीच कायम असते.
113-7
परी आणिकांचिये दिठी नावेक । जैसा स्फटिकुचि आभासे उदक । तैसा ज्ञानी नव्हे कौतुक । सांगतां तो ॥113॥
परंतु स्फटिक मणि जसा उदकमय दिसतो, तसा हा ज्ञानी पुरुष इतरांच्या दृष्टीला दिसतो तसा नव्हे; त्याचे वर्णन करताना कौतुक वाटते.
114-7
जैसा वारा कां गगनीं विरे । मग वारेपण वेगळें नुरे । तेविं भक्त हे पैज न सरे । जरी ऐक्या आला ॥114॥
ज्याप्रमाणे वारा हा गगनांत शांत झाल्यावर मग त्याचे वारेपण वेगळे उरत नाही, त्याप्रमाणे हा जरी मद्रूप झाला, तरी त्याचा भक्ताचा बाणा जात नाही.
115-7
जरी पवन हालवूनि पाहिजे । तरी गगनावेगळा देखिजे । येऱ्हवीं गगन तो सहजें । असे जैसें ॥115॥
जर वारा हालवून पाहिला तर तो गगनाहून वेगळा भासतो, येऱ्हवी गगन आणि तो ज्याप्रमाणे एकच,


116-7
तैसें शरीरें हन कर्में । तो भक्त ऐसा गमे । परी अंतरें प्रतीतिधर्में । मीचि जाहला ॥116॥
त्याचप्रमाणे शरीरासंबंधी सर्व कर्माच्या आचरणाने तो माझा भक्त वाटतो; परंतु स्वानुभवाच्या योगाने तो मद्रूपच असतो
117-7
आणि ज्ञानाचेनि उजिडलेंपणें । मी आत्मा ऐसें तो जाणे । म्हणऊनि मीही तैसेंचि म्हणें । उचंबळला सांता ॥117॥
आणि ज्ञानप्राप्तीच्या उजेडाने मीच त्याचा आत्मा आहे असे तो जाणतो, म्हणून मीही संतोष पावून त्याला आपला आत्मा असे म्हणतो.
118-7
हां गा जीवापैलीकडिलिये खुणें । जो पावोनि वावरोंही जाणे । तो देहाचेनि वेगळेपणें । काय वेगळा होय ॥118॥
जो जीवपणाच्या पलीकडील खुण समजून घेऊन व्यवहारांत वागतो, तो देह धारण केल्यामुळे माझ्यापासून वेगळा होईल का पहा बरे!
उदारा: सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् ।
आस्थित: स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् ॥7.18॥

119-7
म्हणोनि आपुलालिया हिताचेनि लोभें । मज आवडे तोहि भक्त झोंबे । परी मीचि करीं वालभें । ऐसा ज्ञानिया एकु ॥119॥
म्हणून आपल्या हिताकरितां हवा तो मनुष्य माझी भक्ति करतो, परंतु मी ज्याच्यावर प्रीति करतो असा एक भक्त ज्ञानीच होय.
120-7
पाहें पां दुभतेयाचिया आशा । जगचि धेनूसि करिताहे फांसा । परी दोरेंवीण कैंसा । वत्साचा बळी ॥120॥
हे पहा की, दुधाच्या आशेने सर्व लोक गाईला भाला घालतात, परंतु आपल्या वासराला भाल्याशिवाय ती कसे दूध पाजते?


121-7
कां जें तनुमनुप्राणें । तें आणिक कांहींचि नेणें । देखे तयातें म्हणे । हे माय माझी ॥121॥
का तर, त्याला दुसरी कांही एक गोष्ट माहीत नसून आपल्या तनमनप्राणानें ते आईलाच ओळखत असतें; आणि जी वस्तु पाहील ती माझी आई आहे असे समजते,
122-7
तें येणें मानें अनन्यगती । म्हणूनि धेनूहि तैसीचि प्रीती । यालागीं लक्ष्मीपति । बोलिले साच ॥122॥
अशा प्रकारे तें वासरूं अनन्य भक्त असते म्हणून त्याच्यावर गायही तशीच प्रीति करते. यास्तव लक्ष्मीपति (कृष्ण) जे बोलले ते खरें.
123-7
हें असो मग म्हणितलें । जे कां तुज सांगितलें । तेही भक्त भले । पढियंते आम्हां ॥123॥
हे असो. मग म्हणतात :- ज्ञान्याशिवाय जे तुला इतर भक्त सांगितले, तेही माझे आवडते आहेत.
124-7
परी जाणोनियां मातें । जे पाहों विसरला माघौतें । जैसें सागरा येऊनि सरिते । मुरडावें ठेलें ॥124॥
त्यांना माझे ज्ञान झाले म्हणजे मग ते परत फिरणे विसरतात. ज्याप्रमाणे नदी सागराला मिळाल्यावर तिचे माघारी फिरणे खुंटते,
125-7
तैसी अंत:करणकुहरीं जन्मली । जयाची प्रतीतिगंगा मज मीनली । तो मी हें काय बोलीं । फार करूं? ॥125॥
त्याचप्रमाणे ज्यांच्या अंतःकरणरूपी दरींतून अनुभवरूप गंगा निघून मला मिळाली तो मद्रूप झाला. हे वर्णन किती करूं?

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *