सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ४७६ ते ५०० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

476-11
जेव्हां तुवां देखिले । हे माझिया वदनीं पडिले । तेव्हांचि यांचें आयुष्य सरलें । आतां रितीं सोपें ॥476॥
जेव्हा तूं हे सर्व माझ्या तोंडांत पाहिलेस, तेव्क्षांच त्याचे आयुष्य संपलें. ही आतां रिकामी सोपटी आहे.
477-11
म्हणौनि वहिला उठीं । मियां मारिले तूं निवटीं । न रिगे शोकसंकटीं । नाथिलिया ॥477॥
म्हणून लवकर उठ. मी मारलेल्यांना तूं नाहीसें कर आणि व्यर्थ शोकसंकटांत पडूं नकोस.
478-11
आपणचि आडखिळा कीजे । तो कौतुकें जैसा विंधोनि पाडिजे । तैसें देखें गा तुझें । निमित्त आहे ॥478॥
आपणच एखादे निशान उभे करावें आणि कौतुकाने त्याला बाण मारून पाडावें, त्याप्रमाणे यांच्या नाशाला तुझें नुसते निमित्त आहे, पहा !
479-11
बापा विरुद्ध जें जाहलें । तें उपजतांचि वाघें नेलें । आतां राज्येंशीं संचलें । यश तूं भोगीं ॥479॥
बा अर्जुना!जे तुझे वैरी जन्मास आले, ते जन्मल्याबरोबर वाघाने नेले (असे समज) आतां राज्यांसह मिळविलेल्या यशाचा तूं उपभोग घे.
480-11
सावियाचि उतत होते दायाद । आणि बळिये जगीं दुर्मद । ते वधिले विशद । सायासु न लागतां ॥480॥
खरोखरच, हे तुझे भाऊबंद अत्यंत उन्मत्त, मदांध व जगामध्यें जे बलवान झाले आहेत, ते तूं कांही श्रम न पडतां सहज मारलेस.


481-11
ऐसिया इया गोष्टी । विश्वाच्या वाक्पटीं । लिहूनि घाली किरीटी । जगामाजीं ॥481॥
अशा प्रकारच्या गोष्टी जगामध्यें सर्व लोकांच्या मुखरूपी पटावर, अर्जुना! तूं लिहून ठेव-म्हणजे सर्व लोकांच्या तोंडी होऊ दे व विजयी हो.
संजय उवाच
। एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी॥नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीतभीतः प्रणम्य॥11.35॥
अर्थ. संजय म्हणाला, श्रीकृष्णाचे हे भाषण ऐकून भयाने कापत असलेला व हात जोडलेला अर्जुन भयभीत होत्साता साष्टांग नमस्कार घालून पुन्हा श्रीकृष्णाला सगद्गदित वाणीने म्हणाला॥-35॥
482-11
ऐसी आघवीचि हे कथा । तया अपूर्ण मनोरथा । संजयो सांगे कुरुनाथा । ज्ञानदेवो म्हणे ॥482॥
श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हें संपूर्ण वर्तमान ज्याचे मनोरथ पूर्ण झाले नाहीत, अशा कुरुराज धृतराष्ट्राला संजय सांगूं लागला.
483-11
मग सत्यलोकौनि गंगाजळ । सुटलिया वाजत खळाळ । तैशी वाचा विशाळ । बोलतां तया ॥483॥
मग ज्याप्रमाणे सत्यलोकापासून उगम पावलेल्या गंगाजळाचा खळाळ वाजतो, तशी अर्जुनाशीं बोलतांना भगवंताची वाणी गंभीर होती.
484-11
नातरी महामेघांचे उमाळे । घडघडीत एके वेळे । कां घुमघुमिला मंदराचळें । क्षीराब्धी जैसा ॥484॥
किंवा आकाशांत महामेघाचे उमाळे उठले असतां एकदम घडघड असा अवाज होतो किंवा क्षीरसमुद्राच्या मंथनाचे वेळीं मंदराचलाच्या मंथनाचा आवाज घुमुं लागला.
485-11
तैसें गंभीरें महानादें । हें वाक्य विश्वकंदें । बोलिलें अगाधें । अनंतरूपें ॥485॥
त्याप्रमाणे विश्वरूप धारण करणार्‍या व विश्वांचे कारण असणार्‍या अगाध भगवंताने गंभीर व थोर नाद करणार्‍या वाणीने हें वाक्य उच्चारिलें.


486-11
तें अर्जुनें मोटकें ऐकिलें । आणि सुख कीं भय दुणावलें । हें नेणों परि कांपिन्नलें । सर्वांग तयाचें ॥486॥
तें वाक्य अर्जुनाने केवळ ऐकलें मात्र आणि त्याच्या मनांत सुख झालें की भीति दुप्पट वाढली. हे आम्ही जाणत नाही; पण त्याचे सर्वांग मात्र कापू लागलें.
487-11
सखोलपणें वळली मोट । आणि तैसेचि जोडले करसंपुट । वेळोवेळां ललाट । चरणीं ठेवी ॥487॥
त्याचा शब्द खोल जाऊन मुरकुंडी वळली व तशा स्थितींतच त्याने हात जोडले व वारंवार चरणावर मस्तक ठेऊं लागला.
488-11
तेवींचि कांहीं बोलों जाये । तंव गळा बुजालाचि ठाये । हें सुख कीं भय होये । हें विचारा तुम्हीं ॥488॥
त्याचप्रमाणे कांही बोलण्याचा प्रयत्न करूं लागता त्याचा कंठ भरून येई. हें सुखाचे लक्षण आहे की भीतिचें लक्षण होय याचा तुम्हीच विचार करा.
489-11
परि तेव्हां देवाचेनि बोलें । अर्जुना हें ऐसें जाहलें । मियां पदांवरूनि देखिलें । श्लोकींचिया ॥489॥
पण तेव्हा देवाच्या बोलण्याने अर्जुनाची अशी स्थिती झाली की श्लोकांतील पदांवरून मी जाणली आहे.
490-11
मग तैसाचि भेणभेण । पुढती जोहारूनि चरण । मग म्हणे जी आपण । ऐसें बोलिलेती ॥490॥
मग तसाच भीत भीत पुनः भगवंताच्या चरणांना नमस्कार करून अर्जुन म्हणतो,अहो जी भगवंता!आपण असे बोललात.
अर्जुन उवाच
। स्थाने हृषीकेश तव प्रकीर्त्याजगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च॥
रक्षांसि भीतानि दिशो द्रव्ये सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंघाः॥11.36॥
अर्थ हे हृषीकेशा, तुझ्या महात्म्याने जग हर्ष व प्रेम पावते हे योग्यच आहे. भयभीत राक्षस दशदिशा पळत आहेत. सर्व सिद्धांचे समुदाय तुला वंदन करत आहेत.॥11-36॥

491-11
ना तरी अर्जुना मी काळु । आणि ग्रासिजे तो माझा खेळु । हा बोलु तुझा कीर अढळु । मानूं आम्ही ॥491॥
नाही तरी अर्जुना!मी काळ आहे आणि सृष्टिचा संहार करणें हा माझा खेळ आहे, असे जे भगवंता!तूं बोललास, ते निश्चयाने आम्ही खरें मानतो.
492-11
परि तुवां जी काळें । आजि स्थितीचिये वेळे । ग्रासिजे हें न मिळे । विचारासी ॥492॥
पण देवा!तूं काळ असलास तरी आज जगताचे पालन करण्याचा समय असतांना, काळरूपी त्वां सर्व जगताचा संहार करावा, हे विचार करून पाहतां विसंगत दिसतें.
493-11
कैसेनि आंगींचें तारुण्य काढावें? । कैचें नव्हे तें वार्धक्य आणावें? । म्हणौनि करूं म्हणसी तें नव्हे । बहुतकरुनी 493॥
तारूण्यपणांत आंगचे तारूण्य काढून, नसलेले वार्धक्य कसे आणतां येईल? म्हणून तूं जो संहार करूं म्हणतोस, तो बहुतकरून होऊं नये.
494-11
हां जी चौपाहारी न भरतां । कोणेही वेळे श्रीअनंता । काय माध्यान्हीं सविता । मावळतु आहे? ॥494॥
अहो जी देवा! दिवसाचे चार प्रहर न संपतांच, कोणतेहि वेळीं माध्यान्हकाळींच सूर्य मावळतो काय?
495-11
पैं तुज अखंडिता काळा । तिन्ही आहाती जी वेळा । त्या तिन्ही परी सबळा । आपुलालिया समयीं ॥495॥
तूं जरी अखंड काळस्वरूप असलास, तरी तुला तीन वेळा आहेत. त्या तिन्ही आपआपल्या काळी बलवान असतात.


496-11
जे वेळीं हों लागे उत्पत्ती । ते वेळीं स्थिति प्रळयो हारपती । आणि स्थितिकाळीं न मिरविती । उत्पत्ति प्रळयो ॥496॥
जेव्हा विश्वाची उत्पत्ति होऊ लागते, तेव्हा स्थिती व प्रलय राहत नाहीत आणि स्थिती काळी उत्पत्ति प्रलय दिसत नाहीत.
467-11
पाठीं प्रळयाचिये वेळे । उत्पत्ति स्थिति मावळे । हें कायसेनही न ढळे । अनादि ऐसें ॥497॥
नंतर प्रलयाचे वेळीं उत्पत्ति स्थिति नसतात. हा प्रवाह अनादि असून, तो कधींहि बदलत नाही.
498-11
म्हणौनि आजि तंव भरें भोगें । स्थिति वर्तिजत आहे जगें । एथ ग्रसिसी तूं हें न लगे । माझ्या जीवीं ॥498॥
म्हणून आज हें सर्व भोगाने संपन्न असलेलें जग स्थिति अवस्थेत आहे. अशा स्थितीत तूं ग्रासतोस हें म्हणणे माझ्या मनाला पटत नाही.
499-11
तंव संकेतें देव बोले । अगा या दोन्ही सैन्यांसीचि मरण पुरलें । तें प्रत्यक्षचि तुज दाविलें । येर यथाकाळें जाण ॥499॥
तेव्हा भगवान म्हणाले बा अर्जुना ! संकेतदृष्टिने पाहतां या दोन्ही सैन्याचा माझा पालनकाल संपला आहे हें तुला मी प्रत्यक्षच दाखवीलें. बाकी प्रत्यक्ष संहार कालानुसारच होणार, हें जाण.
500-11
हा संकेतु जंव अनंता । वेळु लागला बोलतां । तंव अर्जुनें लोकु मागुता । देखिला यथास्थिति ॥500॥
हा संकेत सांगत असतांना जो थोडा वेळ लागला, तितक्या वेळांत, पूर्वी लोक जशा स्थितींत होते तशा स्थितींतच, अर्जुनाने सर्व लोक पाहिले.

, ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading