सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी १५१ ते १७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

151-14
म्हणे भाग्य ना माझें? । आजि सुखियें नाहीं दुजें । विकाराष्टकें फुंजे । सात्त्विकाचेनि ॥151॥
आणि म्हणतो, “माझे भाग्य उत्तम नाही काय? आज माझ्यासारखा दुसरा कोणी सुखी नाही” असा अष्टसात्विक भावांनी गर्वाला चढतो किंवा फुलुन जातो.
152-14
आणि येणेंही न सरे । लांकण लागे दुसरें । जें विद्वत्तेचें भरे । भूत आंगीं ॥14-152॥
आणि एवढ्याने सरत नाही तर त्याच्या मागे दुसरे बंधन लागते ते हे की त्याच्या अंगात विद्वत्तारूपी भूताचा संचार होतो.
153-14
आपणचि ज्ञानस्वरूप आहे । तें गेलें हें दुःख न वाहे । कीं विषयज्ञानें होये । गगनायेवढा ॥153॥
आपण स्वत: ज्ञानरूप आहोत ते आपले ज्ञानरूपत्व गेले, त्याचे दु:ख मानत नाही तर उलट विषयज्ञानाने आकाशाएवढा होतो. आपणास अत्यंत श्रेष्ठ मानतो.
154-14
रावो जैसा स्वप्नीं । रंकपणें रिघे धानीं । तो दों दाणां मानी । इंद्रु ना मी?॥154॥
जसा एखादा राजा स्वप्नात आपणा भिकारी आहोत असे समजून नगरात प्रवेश करतो व त्यास भिक्षा मागून दोन दाणे मिळाले की मी इंद्र नाही काय असे मानतो.
155-14
तैसें गा देहातीता । जालेया देहवंता । हों लागे पंडुसुता । बाह्यज्ञानें ॥155॥
अर्जुना, देहातीत जो आत्मा, तो देहवंत झाल्यावर (म्हणजे त्याने देहाशी तादात्म्य केल्यावर) त्याला बाह्यज्ञानाने तसे होऊ लागते,

156-14
प्रवृत्तिशास्त्र बुझे । यज्ञविद्या उमजे । किंबहुना सुझे । स्वर्गवरी ॥156॥
संसारसंबंधी शास्रे तो जाणतो, यज्ञाविद्या त्यास समजते, फार काय सांगावे? त्यास स्वर्गापर्यंत सर्व समजते.
157-14
आणि म्हणे आजि आन । मीवांचूनि नाहीं सज्ञान । चातुर्यचंद्रा गगन । चित्त माझें ॥157॥
या जगात माझ्याव्यतिरीक्त दुसरा कोणी ज्ञानी नाही. आणि माझे चित्त हे चातुर्यरूपी चंद्राचे आकाश आहे असे तो म्हणतो.
158-14
ऐसें सत्त्व सुखज्ञानीं । जीवासि लावूनि कानी । बैलाची करी वानी । पांगुळाचिया ॥158॥
याप्रमाणे सत्वगुण हा जीवाला सुख व ज्ञानरूपी दावे लावून पांगुळाच्या बैलासारखी म्हणजे नंदीबैलासारखी त्याची स्थिती करतो.
159-14
आतां हाचि शरीरीं । रजें जियापरी । बांधिजे तें अवधारीं । सांगिजैल ॥159॥
आता हाच आत्मा देहामध्ये ज्या प्रकाराने रजोगुणाने बांधला जातो तो प्रकार सांगण्यात येईल. तरी ते तु ऐक श्रवण कर.
रजो रागात्मकं विद्धि तृष्णासंगसमुद्भवम् ।
तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम् ॥14.7॥

श्र्लोकार्थ- रजोगुण हा अभिलाषरूप असून तृष्णा व आसक्ती यापासून उत्पन्न होतात असे समज. हे कौंतेया, तो कर्मसंगतीने प्राण्याला बद्ध करतो म्हणजे मी अमूक करीन, मी तमूक करीन अशा इच्छांनी बद्ध करतो.
60-14
हें रज याचिकारणें । जीवातें रंजऊं जाणे । हें अभिलाखाचें तरुणें । सदाचि गा ॥160॥
रजोगुणाला रज हे नाव याच कारणाकरता आहे की तो रजोगुण हा जीवाला विषयात रंजवण्याची कला जाणतो व रजोगुण हा अभिलाषेचे, लोभाचे कधीही कमी न होणारे तारुण्य आहे.

161-14
हें जीवीं मोटकें रिगे । आणि कामाच्या मदीं लागे । मग वारया वळघे । तृष्णेचिया ॥161॥
या रजोगुणाने जीवात (अंत:करणात) थोडासा प्रवेश केल्याबरोबर तो जीव कामाच्या मस्तीत येतो आणि मग तो विषयांच्या चिंतनरूपी वार्‍यावर स्वार होतो.
162-14
घृतें आंबुखूनि आगियाळें । वज्राग्नीचें सादुकलें । आतां बहु थेंकुलें । आहे तेथ? ॥162॥
पेटलेल्या अग्निकुंडातल्या अग्नीवर तूप शिंपडले असता.जया वज्राग्नी भडकला जातो. व त्यात कोणतीही लहान मोठी वस्तु आहे याचे त्यास भान रहात नाही.त्यातील सर्व वस्तुंचा तो नाश करुन टाकतो,
163-14
तैसी खवळें चाड । होय दुःखासकट गोड । इंद्रश्रीहि सांकड । गमों लागे ॥163॥
त्याप्रमाणे विषयाची इच्छा ज्याप्रमाने खवळते व त्यावेळी विषयसुखात दुःख असुनही विषयप्राप्तीच्या तीव्र इच्छेमुळे त्यामध्ये असलेले दु:ख सुद्धा गोड वाटु लागते. आणि त्यास इंद्रलोक जरी प्राप्त झाला,तरी त्याची भुक कमी होत नाही.
164-14
तैसी तृष्णा वाढिनलिया । मेरुही हाता आलिया । तऱ्ही म्हणे एखादिया । दारुणा वळघो ॥16॥
अशा प्रकारे विषयवासनेची चक्रे वाढल्यावर मग जरी मेरुपर्वत हाती आला तरी असे म्हणतो की याही पेक्षा भयंकर श्रमाने मिळणारे एखादे काम असेल तर तेही मिळवण्याचे प्रयत्न तो करु लागतो.
165-14
जीविताचि कुरोंडी । वोवाळूं लागे कवडी । मानी तृणाचिये जोडी । कृतकृत्यता ॥165॥
एका कवडीसाठी तो आपले जीवन ओवाळुन टाकण्यास तो तयार असतो. आणि गवताच्या काडी इतकी जरी एखादी वस्तु त्यास प्राप्त झाली,तरी तो आपणास कृतकृत्य मानतो.

166-14
आजि असतें वेंचिजेल । परी पाहे काय कीजेल । ऐसा पांगीं वडील । व्यवसाय मांडी ॥166॥
आज आपणाजवळील धन पैसा खर्च केले,तर उद्दा काय करणार,अशा काळजीमुळे तो धन मिळवण्यासाठी मोठमोठ्या उद्दोगधंद्यास सुरुवात करतो.
167-14
म्हणे स्वर्गा हन जावें । तरी काय तेथें खावें । इयालागीं धांवें । याग करूं ॥167॥
आणि म्हणतो की आपणास स्वर्गाची प्राप्ती झाली असता. तेथे काय खावे असे म्हणतो व याकरता यज्ञ करण्यास धावतो.
168-14
व्रतापाठीं व्रतें । आचरें इष्टापूर्तें । काम्यावांचूनि हातें । शिवणें नाहीं ॥168॥
व्रतामागे व्रते आचरण करतो, इष्ट व पूर्त कर्मे करतो,जगाात वाहवा होण्याकरिता धर्मशाळा,बागा,विहिरी अशी समाज निगडीत कामे करतो.आणि काम्यकर्मावाचून दुसर्‍या कोणत्याही कर्मास हाताने स्पर्श करत नाही.
169-14
पैं ग्रीष्मांतींचा वारा । विसांवो नेणें वीरा । तैसा न म्हणे व्यापारा । रात्र दिवस ॥169॥
हे अर्जुना, जसा ग्रीष्म ऋतूचा शेवटी वाहनारा वारा एक क्षणभर विश्रांती घेणे जाणत नाही, त्याप्रमाणे हा रजोगुणी पुरुष व्यापार करीत असता दिवस अथवा रात्र म्हणत नाही.
170-14
काय चंचळु मासा । कामिनीकटाक्षु जैसा । लवलाहो तैसा । विजूही नाहीं ॥170॥
अशा रजोगुणी माणसापुढे मासा कसला चंचल आहे? जसा एखादी कामिनी स्त्रीचा नेत्रकटाक्ष जितका चंचल, इतका तो चंचल असतो तसाअशा मनुष्यास काम करण्याची जितकी घाई असते, चांचल्य असते,तेवढे विजेतदेखील नाही.

171-14
तेतुलेनि गा वेगें । स्वर्गसंसारपांगें । आगीमाजीं रिगे । क्रियांचिये ॥171॥
तितक्या वेगाने स्वर्ग व संसार यांच्या प्राप्तीकरता कर्मरूपी अग्नीमधे उडी टाकण्यास तो कोणत्याही अडचनीस सामोरे जाण्यास मागेपुढे पाहत नाही.
172-14
ऐसा देहीं देहावेगळा । ले तृष्णेचिया सांखळा । खटाटोपु वाहे गळां । व्यापाराचा ॥172॥
देहापासून जीवात्मा वेगळा असता तो देहामधे असतो तेव्हा तृष्णेची बेडी (आपल्या पायामधे) अडकवून याप्रमाणे व्यापाराचा खटाटोपाचे लोढणे आपल्या गळ्यात अडकवून घेतो.
173-14
हें रजोगुणाचें दारुण । देहीं देहियासी बंधन । परिस आतां विंदाण । तमाचें तें ॥173॥
देहधारी जो आत्मा त्यास देहामधे असताना हे रजोगुणाचे भयंकर बंधन असते, आता तमोगुणाचे कौशल्य ऐक.
तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनाम् ।
प्रमादालस्यनिद्राभिस्तन्निबध्नाति भारत ॥14.8॥

श्लोकार्थ -: -: :- तमोगुण अज्ञानापासून उत्पन्न होतो व म्हणून तो सर्व जिवानां मोहात पाडतो असे जाण. हे भारता, प्रमाद, आळस व निद्रा या तीन पाशांनी तो देहाला बंधनात अडकवितो.
(तमोगुण प्राण्याला कसा बद्ध करतो? तमोगुणी माणसाचे शब्दचित्र)
174-14
व्यवहाराचेहि डोळे । मंद जेणें पडळें । मोहरात्रीचें काळें । मेहुडें जें ॥174॥
व्यवहाराचीही दृष्टी ज्या पडद्याने मंदावते, असा तमोगुण हा पडदा आहे व जो तमोगुण मोहरूपी रात्रीतील काळा ढग आहे.
175-14
अज्ञानाचें जियालें । जया एका लागलें । जेणें विश्व भुललें । नाचत असे ॥175॥
त्या तमोगुणाला केवळ अज्ञानाचा जिव्हाळा (प्रेम)आहे व ज्या तमोगुणाच्या योगाने सर्व जीव भ्रमिष्ट होऊन वाटेल तसे कर्म करतात.

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 14th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay ChaudavaSampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *