सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ७६ ते १०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

76-13
तरी पृथ्वी आप तेज । वायु व्योम इयें तुज । सांगितलीं बुझ । महाभूतें पांचें ॥76॥
तरी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही तुला सांगितलेली पाच महाभूते होत, असे समज.
77-13
आणि जागतिये दशे । स्वप्न लपालें असे । नातरी अंवसे । चंद्र गूढु ॥77॥
आणि ज्याप्रमाणे जागृतीअवस्थेत स्वप्न लपलेले असते किंवा अमावास्येला चंद्र गुप्त असतो,
78-13
नाना अप्रौढबाळकीं । तारुण्य राहे थोकीं । कां न फुलतां कळिकीं । आमोदु जैसा ॥78॥
अथवा प्रौढ दशेला न आलेल्या मुलाचे ठिकाणी तारूण्य दडलेले असते किंवा न फुललेल्या कळीचे ठिकाणी सुगंध जसा गुप्त असतो.
79-13
किंबहुना काष्ठीं । वन्हि जेवीं किरीटी तेवीं प्रकृतिचिया पोटीं । गोप्यु जो असे ॥79॥
एवढेच नाही, तर लाकडांचे ठिकाणी, अर्जुना अग्नी गुप्त असतो, त्याप्रमाणे मूळ प्रकृतीच्या ठिकाणी जो गुप्त असतो,
80-13
जैसा ज्वरु धातुगतु । अपथ्याचें मिष पहातु । मग जालिया आंतु । बाहेरी व्यापी ॥80॥
ज्याप्रमाणे धातूगत ज्वर केवळ कुपथ्याचे निमित्त पाहत असतो आणि मग कुपथ्य झाल्याबरोबर शरीराच्या आत-बाहेर तो व्यापतो


81-13
तैसी पांचांही गांठीं पडे । जैं देहाकारु उघडे । तैं नाचवी चहूंकडे । तो अहंकारु गा ॥81॥
त्याप्रमाणे पाचही भूतांची एकत्र गाठ पडून, जेव्हा देहाचा आकार व्यक्त होतो, तेव्हा जो जीवाला चहूकडून नाचवितो, तोच अहंकार होय
82-13
नवल अहंकाराची गोठी । विशेषें न लगे अज्ञानापाठीं । सज्ञानाचे झोंबे कंठीं । नाना संकटीं नाचवी ॥82॥
या अहंकाराची अशी गंमत आहे की तो विशेषतः अज्ञान्याच्या पाठीस लागत नाही; पण तो सज्ञान्याच्या कंठास झोंबून नाना संकटात पाडतो.
83-13
आतां बुद्धि जे म्हणिजे । ते ऐशियां चिन्हीं जाणिजे । बोलिलें यदुराजें । तें आइकें सांगों ॥83॥
आता जिला बुद्धी म्हणतात, ती अशा लक्षणावरून जाणावी, असे भगवान श्रीकृष्णांनी म्हटले, तेच आता सांगतो, ऐक.
84-13
तरी कंदर्पाचेनि बळें । इंद्रियवृत्तीचेनि मेळें । विभांडूनि येती पाळे । विषयांचे ॥84॥
प्रबळ झालेल्या कामवासनेने इंद्रिये, वृत्तीच्या सहाय्याने विषयांचे समुदाय जिंकून येतात म्हणजे विषयांचा भोग घेऊन येतात.
85-13
तो सुखदुःखांचा नागोवा । जेथ उगाणों लागे जीवा । तेथ दोहींसी बरवा । पाडु जे धरी ॥85॥
जीवाला ज्या सुखदुःखांच्या लुटीचा अनुभव येतो, त्या दोघांचा जी अगदी बरोबर भेद दाखविते,


86-13
हें सुख हें दुःख । हें पुण्य हें दोष । कां हें मैळ हें चोख । ऐसें जे निवडी ॥86॥
हे सुख, हे दुःख, हे पुण्य, हे पाप, हे मलीन, हे शुध्द अशी जी निवड करते,
87-13
जिथे अधमोत्तम सुझे । जिये सानें थोर बुझे । जिया दिठी पारखिजे । विषो जीवें ॥87॥
जिला उत्तम, कनिष्ठ हे समजते, जिला लहान, मोठे समजते, अशा रीतीने जिच्या दृष्टीच्या सहाय्याने जीव विषयाची परीक्षा करतो,
88-13
जे तेजतत्त्वांची आदी । जे सत्त्वगुणाची वृद्धी । जे आत्मया जीवाची संधी । वसवीत असे जे ॥88॥
जी ज्ञानेंद्रियांचे कारण आहे, जी सत्वगुणाचा उत्कर्ष होय आणि जी आत्मा व जीव यांच्या संधीत राहते, (जीवाच्या ठिकाणी जी जाणीवरूप ज्ञानवृत्ती स्फुरते, ती बुध्दी होय, असे येथे बुध्दीचे लक्षण केले आहे. या बुध्दीत सत्वगुणाचा उत्कर्ष असल्यामुळे मी मुळात निर्मळ आहे. म्हणूनच तिच्यात ज्ञानरूप आत्मा प्रतिबिंबित होतो. त्या ज्ञानप्रकाशाने युक्त असलेली बुद्धीवृत्ती आपल्या पलीकडे असलेल्या शुद्ध आत्मस्थितीला व अलीकडे असलेल्या जीवस्थितीला जाणत असते, म्हणूनच ती आत्मा व जीव यांच्या संधीत असते, असे म्हटले आहे.)
89-13
अर्जुना ते गा जाण । बुद्धि तूं संपूर्ण । आतां आइकें वोळखण । अव्यक्ताची ॥89॥
अर्जुना! ही सर्व बुध्दी आहे, असे जाण. आता अव्यक्ताची ओळख ऐक.
90-13
पैं सांख्यांचिया सिद्धांतीं । प्रकृती जे महामती । तेचि एथें प्रस्तुतीं । अव्यक्त गा ॥90॥
हे बुद्धीमान अर्जुना! सांख्यवाद्यांनी आपल्या सिद्धांतात जडविनाशी क्षेत्राचे कारण म्हणून जी प्रकृती मानली आहे, तीच येथे प्रस्तुत ‘अव्यक्त’ या शब्दाने सांगितली आहे.


91-13
आणि सांख्ययोगमतें । प्रकृती परिसविली तूंतें । ऐसी दोहीं परीं जेथें । विवंचिली ॥91॥
सांख्य व योग यांच्या मताप्रमाणे प्रकृतीचे स्वरूप तुला ऐकविलेच आहे आणि तेथे, ती दोन प्रकारची आहे, हेही सांगितले गेले.
92-13
तेथ दुजी जे जीवदशा । तिये नांव वीरेशा । येथ अव्यक्त ऐसा । पर्यावो हा ॥92॥
तेथे दुसरी जी जीवदशा म्हणून पराप्रकृती सांगितली, तिलाच हे वीरश्रेष्ठा ! येथे ‘अव्यक्त’ हा पर्यायी शब्द आहे.
93-13
तऱ्ही पाहालया रजनी । तारा लोपती गगनीं । कां हारपें अस्तमानीं । भूतक्रिया ॥93॥
रात्र संपून उजाडल्यावर आकाशात तारे नाहीसे होतात किंवा सूर्यास्त झाल्यावर प्राण्यांचे व्यापार बंद पडतात.
94-13
नातरी देहो गेलिया पाठीं । देहादिक किरीटी । उपाधि लपे पोटीं । कृतकर्माच्या ॥94॥
किंवा हे अर्जुना! देह नाहीसा झाला की, पूर्वी केलेल्या कर्माच्या पोटातच देहादिक उपाधी लीन होतात,
95-13
कां बीजमुद्रेआंतु । थोके तरु समस्तु । कां वस्त्रपणे तंतु । दशे राहे ॥95॥
किंवा बीजाच्या आकारातच संपूर्ण वृक्ष गुप्त असतो किंवा सुताच्या दशेत वस्त्रपण गुप्त राहते,


96-13
तैसे सांडोनियां स्थूळधर्म । महाभूतें भूतग्राम । लया जाती सूक्ष्म । होऊनि जेथे ॥96॥
त्याप्रमाणे संपूर्ण पंचमहाभूते व सर्व प्राणी आपले स्थूल धर्म सोडून देऊन व सूक्ष्म होऊन जेथे लय पावतात,
97-13
अर्जुना तया नांवें । अव्यक्त हें जाणावें । आतां आइकें आघवें । इंद्रियभेद ॥97॥
अर्जुना! त्या स्थितीला ‘अव्यक्त’ या नावाने जाण. आता इंद्रियांचे संपूर्ण भेद ऐक.
98-13
तरी श्रवण नयन । त्वचा घ्राण रसन । इयें जाणें ज्ञान- । करणें पांचें ॥98॥
तरी कान, डोळे, त्वचा, घ्राण, जिह्वा, ही पाच ज्ञानेंद्रिय आहेत असे जाण.
99-13
इये तत्त्वमेळापंकीं । सुखदुःखांची उखिविखी । बुद्धि करिते मुखीं । पांचें इहीं ॥99॥
या छत्तीस तत्वांच्या समुदायरूपी चिखलात या पाच ज्ञानेंद्रियरूप मुखांच्या द्वारा बुद्धी सुखदुःखाचा निवाडा करते.
100-13
मग वाचा आणि कर । चरण आणि अधोद्वार । पायु हे प्रकार । पांच आणिक ॥100॥
मग वाणी, हात, पाय, गुदद्वार, उपस्थ असे आणखी पाच प्रकार आहेत,

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *