51-13
यापरी मत्तमुगुतकीं । तेथ पडिघायिलें आणिकीं । म्हणती हां हो विवेकीं । कैसें तुम्ही ॥51॥
याप्रमाणे निराधार मतांची मौक्तिके मुखातून बाहेर काढणार्यावर दुसर्यांनी प्रहार केले. ते म्हणतात, “अहो ! तुम्ही कसा विचार करता?”
52-13
परतत्त्वाचिया गांवीं । संकल्पसेज देखावी । तरी कां पां न मनावी । प्रकृति तयाची? ॥52॥
प्रकृतीच्या पलीकडे असणार्या तत्वांच्या ठिकाणी तुम्ही जर संकल्पशय्या पाहता तर मग त्याची प्रकृतीच का मानू नये?
53-13
परि असो हें नव्हे । तुम्ही या न लगावें । आतांचि हें आघवें । सांगिजैल॥53॥
पण असो. तुमचे म्हणणे बरोबर नाही. तुम्ही या मताचे भ्रांतीत पडू नये हे सर्व आता आम्ही सांगतो.
54-13
तरी आकाशीं कवणें । केलीं मेघाचीं भरणें । अंतरिक्ष तारांगणें । धरी कवण? ॥54॥
आकाशामध्ये मेघांचा भरणा कोण करतो?अंतरिक्षात नक्षत्रे कोण धारण करतो?
55-13
गगनाचा तडावा । कोणें वेढिला केधवां । पवनु हिंडतु असावा । हें कवणाचें मत? ॥55॥
हे आकाशाचे छत कोणी केव्हा ताणून लावले? वार्याने वाहत असावे ही कोणाची आज्ञा होय?
56-13
रोमां कवण पेरी । सिंधू कवण भरी । पर्जन्याचिया करी । धारा कवण ॥56॥
शरीराचे ठिकाणी रोमरंध्रे कोण करतो? समुद्र कोण भरतो? पावसाच्या धारा कोण करतो?
57-13
तैसें क्षेत्र हें स्वभावें । हे वृत्ती कवणाची नव्हे । हें वाहे तया फावे । येरां तुटे ॥57॥
याप्रमाणे क्षेत्र हे स्वभावतः कोणाच्या मालकीचे नसताना त्याची जो मालकी वागवितो, त्याला ते प्राप्त होते, जो मालकी वागवित नाही त्याचा संबंध तुटतो.
(“ईश्वरः कारणं पुरुषकर्माफल्यदर्शनात्” न्या. सू. 19-4-1 पुरुषाचे प्रयत्नरूप कर्म निष्फळ होताना दिसत असल्यामुळे ईश्वर निमित्तकारण आहे
न्यायमतांत परमेश्वर सृष्टीचे निमित्तकारण आहे व त्याच्या इच्छामात्रेकरून चतुर्विध भूतांच्या परमाणूंचा संयोग होऊन द्रव्याणुकादि क्रमाने सृष्टी उत्पन्न होते, असे मानले जाते.
याही मतांत शरीरादिक क्षेत्र सत्य असून त्याचा असंग अशा क्षेत्रज्ञाशी संबंध होतो व क्षेत्रज्ञाचे ठिकाणी इच्छा, द्वेष, प्रयत्न, सुख, दुःख हे धर्म मानले असल्यामुळे या मतांतही क्षेत्रक्षेत्रज्ञाचा योग्य विवेक झाला नाही.)
यानंतर माउलि क्षेत्राविषयी वैशेषिकांचे मत सांगत आहेत.
58-13
तंव आणिकें एकें । क्षोभें म्हणितलें निकें । तरी भोगिजे एकें । काळें केवीं हें ? ॥58॥
तेव्हा हे ऐकून, दुसरे कित्येक क्षुब्ध होऊन म्हणतात, तुमचे म्हणणे जर खरे मानले, तर ते क्षेत्र एका काळाचेच स्वाधीन का दिसून येते?
59-13
तरी ययाचा मारु । देखताति अनिवारु । परी स्वमतीं भरु । अभिमानियां॥59॥
या काळाचा सर्वांवर अचूक घाला पडतो; पण ते अभिमानाने आपल्या मतांवरच भर देतात.
60-13
हें जाणों मृत्यु रागिटा । सिंहाडयाचा दरकुटा । परी काय वांजटा । पूरिजत असे ॥60॥
शरीर हे मृत्यूरूपी क्रुध्द सिंहाच्या राहण्याची दरी आहे, हे आपण सर्व जाणतो, पण काय करावे? व्यर्थ बडबड करणार्याशी कधी पुरे पडता येते काय?
61-13
महाकल्पापरौतीं । कव घालूनि अवचितीं । सत्यलोकभद्रजाती । आंगीं वाजे ॥61॥
या मृत्यूरूपी काळाने महाकल्पाच्या पलिकडेही अकस्मात मिठी मारून ब्रह्मलोकरूपी जो हत्ती त्याच्या ठिकाणीही तो प्राप्त झाला आहे.
62-13
लोकपाळ नित्य नवे । दिग्गजांचे मेळावे । स्वर्गींचिये आडवे । रिगोनि मोडी ॥62॥
स्वर्गरूपी अरण्यात शिरून नवे लोकपाळ व दिग्गजांचे समुदाय नाहीसे करतो.
63-13
येर ययाचेनि अंगवातें । जन्ममृत्यूचिये गर्तें । निर्जिवें होऊनि भ्रमतें । जीवमृगें ॥63॥
बाकीचे जीवरूपी पशु यांच्या अंगच्या वार्यानेच निर्जीव होऊन जन्ममृत्यूच्या खोड्यात भ्रमत राहतात.
64-13
न्याहाळीं पां केव्हडा । पसरलासे चवडा । जो करूनियां माजिवडा । आकारगजु ॥64॥
कालरूपी सिंहाने संपूर्ण आकाररूपी हत्ती आत साठवून केवढा मोठा चवडा पसरला आहे, पहा !
65-13
म्हणौनि काळाची सत्ता । हाचि बोलु निरुता । ऐसे वाद पंडुसुता । क्षेत्रालागीं ॥65॥
म्हणून या क्षेत्रावर काळाचीच सत्ता आहे, हेच म्हणणे योग्य आहे. अर्जुना ! या प्रमाणे क्षेत्राविषयी मते आहेत.
66-13
हे बहु उखिविखी । ऋषीं केली नैमिषीं । पुराणें इयेविषीं । मतपत्रिका ॥66॥
असा हा पुष्कळ प्रकारचा वादविवाद ऋषींनी नैमिषारण्यात केला असून पुराणेही, या विषयीची मते दर्शविणार्या पत्रिका आहेत- म्हणजे पुराणांतूनही ही भिन्न भिन्न मते दर्शविली आहेत.
67-13
अनुष्टुभादि छंदें । प्रबंधीं जें विविधें । ते पत्रावलंबन मदें । करिती अझुनी॥67॥
(पुराणादि) प्रबंधांतून अनुष्टुभादि अनेक छंदांनी ह्या ज्या मतपत्रिका ग्रंथित केलेल्या आहेत, त्यांचे लोक आग्रहाने अवलंब करतात.
68-13
वेदींचें बृहत्सामसूत्र । जें देखणेपणें पवित्र । परी तयाही हें क्षेत्र । नेणवेचि॥68॥
(ज्यांत इंद्रादिकांचे परमेश्वररूपाने वर्णन आले तें.) सामवेदांतील बृहत्सामसूत्र ईश्वराला अनुलक्षून स्तवन करणारे असल्यामुळे सर्व धर्मांपेक्षा ते अत्यंत पवित्र करणारे आहे, हे खरे; पण त्यालाही या क्षेत्रक्षेत्रज्ञाचा निवाडा बरोबर समजला नाही.
69-13
आणीक आणीकींही बहुतीं । महाकवीं हेतुमंतीं । ययालागीं मती । वेंचिलिया ॥69॥
आणखी उपपत्तिपूर्वक प्रतिपादन करणार्या पुष्कळ महान् कवींनी या क्षेत्राचा ऊहापोह करण्यात आपली बुद्धी चालविली आहे.
70-13
परी ऐसें हें एवढें । कीं अमुकेयाचेंचि फुडें । हें कोणाही वरपडें । होयचिना ॥70॥
पण क्षेत्र हे असे आहे, एवढे आहे किंवा अमक्याचे आहे, हे कोणालाही निःसंशय कळून आले नाही.
71-13
आतां यावरी जैसें । क्षेत्र हें असे । तुज सांगों तैसें । साद्यंतु गा ॥71॥
अर्जुना ! आता यानंतर हे क्षेत्र जसे आहे तसे तुला संपूर्ण सांगतो.
महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च ।
इन्द्रियाणि दशैकं च पञ्च चेन्द्रियगोचराः ॥13.5॥
इच्छा द्वेषः सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः ।
एतत्क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम् ॥13.6॥
अर्थ पाच महाभूते, अहंकार, बुद्धी, अव्यक्त (मूलप्रकृती) दहा इंद्रिये व अकरावे मन आणि इंद्रियांना गोचर असे शब्दादि दहा विषय,॥13-5॥
अर्थ इच्छा, द्वेष, सुख, दु:ख, चेतना, धैर्य आणि संघात हे विकारांसह क्षेत्र आहे असे संक्षेपाने सांगितले आहे.॥13-6॥
(क्षेत्राची सामान्य माहिती, छत्तीस तत्वांनी क्षेत्र बनले आहे)
72-13
तरि महाभूतपंचकु । आणि अहंकारु एकु । बुद्धि अव्यक्त दशकु । इंद्रियांचा ॥72॥
तरी पाच सूक्ष्म महाभूते आणि एक अहंकार, बुद्धी, अव्यक्त व दहा इंद्रिये,
73-13
मन आणीकही एकु । विषयांचा दशकु । सुख दुःख द्वेषु । संघात इच्छा ॥73॥
आणखी एक मन दहा इंद्रियांचे दहा विषय, द्वेष, सुख, दुःख, संघात, इच्छा,
74-13
आणि चेतना धृती । एवं क्षेत्रव्यक्ती । सांगितली तुजप्रती । आघवीची ॥74॥
चेतना व धृती याप्रमाणे क्षेत्राचे संपूर्ण स्वरूप सांगितले.
75-13
आतां महाभूतें कवणें । कवण विषयो कैसीं करणे । हें वेगळालेपणें । एकैक सांगों ॥75॥
आता महाभूते कोणती, विषय कोणते व इंद्रिये कशी आहेत हे तुला एक एक वेगवेगळेपणाने सांगतो.