सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी १०१ ते १२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

101-13
कर्मेंद्रियें म्हणिपती । तीं इयें जाणिजती । आइकें कैवल्यपती । सांगतसे ॥101॥
कैवल्य देणारे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. अर्जुना! ऐक. ज्यांना कर्मेंद्रिंय म्हणतात, ती ही जाण.
102-13
पैं प्राणाची अंतौरी । क्रियाशक्ति जे शरीरीं । तियेचि रिगिनिगी द्वारीं । पांचे इहीं ॥102॥
प्राणाची पत्नी म्हणून जी क्रियाशक्ती या शरीराचे ठिकाणी आहे. जिचे आत येणे व बाहेर जाणे या पाच कर्मेंद्रियांच्या द्वारा होत असते.
103-13
एवं दाहाही करणें । सांगितलीं देवो म्हणे । परिस आतां फुडेपणें । मन तें ऐसें ॥103॥
देव म्हणतात, याप्रमाणे तुला दहा इंद्रिये कोणती ती सांगितली. आता मन स्पष्टपणे असे आहे, ते ऐक.
104-13
जें इंद्रियां आणि बुद्धि । माझारिलिये संधीं । रजोगुणाच्या खांदीं । तरळत असे ॥104॥
जे मन इंद्रिये आणि बुद्धि यांच्या मधील जागेत रजोगुणाच्या खांद्यावर (आश्रयावर) चंचलपणे असते,
105-13
नीळिमा अंबरीं । कां मृगतृष्णालहरी । तैसें वायांचि फरारी । वावो जाहलें ॥105॥
आकाशात जसा निळा रंग किंवा मृगाला तहानेमुळे भासणारी जशी जलाची लहरी, त्याप्रमाणे वायूचे जे व्यर्थ स्फुरण झाले (त्यालाच मन हे नाव आहे.)


106-13
आणि शुक्रशोणिताचा सांधा । मिळतां पांचांचा बांधा । वायुतत्त्व दशधा । एकचि जाहलें ॥106॥
आणि पुरुषाचे रेत व स्रियांचे शोणित यांचे मिश्रण होऊन पाच महाभूतांचा बांधा जे शरीर ते उत्पन्न झाले असता एकच वायूतत्व दहा प्रकारचे होते.
107-13
मग तिहीं दाहे भागीं । देहधर्माच्या खैवंगीं । अधिष्ठिलें आंगीं । आपुलाल्या ॥107॥
मग त्या दहा भागांनी आपापल्या अंगाचा, देहधर्माच्या सामर्थ्याला आश्रय दिला.
108-13
तेथ चांचल्य निखळ । एकलें ठेलें निढाळ । म्हणौनि रजाचें बळ । धरिलें तेणें ॥108॥
तेथे त्या मनाचे ठिकाणी एक निव्वळ चंचलताच राहिली, म्हणून ते एकटेच राहिले त्याने रजोगुणाचेच बळ धरले.
109-13
तें बुद्धीसि बाहेरी । अहंकाराच्या उरावरी । ऐसां ठायीं माझारीं । बळियावलें ॥109॥
ते बुध्दीच्या नंतर व अहंकाराच्या पूर्वी असे मध्यसंधीत बळकट झाले आहे. (ते बुद्धीसि बाहेरी । अहंकाराच्या उरावरी । – कल्पना करणारे मन बुध्दीच्या ज्ञानाने जाणले जाऊन बुध्दीचा विषय होते, म्हणून ते बुध्दीच्या बाहेर आणि कल्पनारूप मन स्फुरल्यानंतर त्याचा अहंकार धरला जातो, म्हणून उरावर अहंकाराच्या पूर्वी, असे बुध्दीच्या आणि अहंकाराच्या संधीत मनाची शक्ती बळकट होते, असे सांगितले आहे.)
110-13
वायां मन हें नांव । एऱ्हवीं कल्पनाचि सावेव । जयाचेनि संगें जीव- । दशा वस्तु ॥110॥
त्याला मन हे व्यर्थच नाव आहे. खरोखर मन म्हणजे कल्पनाच होय. ज्याच्या संगतीने परब्रह्मवस्तूला जीवदशा प्राप्त झाली.


111-13
जें प्रवृत्तीसि मूळ । कामा जयाचे बळ । जें अखंड सूये छळ । अहंकारासी ॥111॥
जे सर्व कर्मप्रवृत्तीचे कारण आहे, ज्याच्यामुळे कामवासना ही बलवान होते आणि जी अहंकाराला नेहमी उसळविते,
112-13
जें इच्छेतें वाढवी । आशेतें चढवी । जें पाठी पुरवी । भयासि गा ॥112॥
जे इच्छा वाढविते, आशेची वृध्दी करते, जे भयाला वाढविते,
113-13
द्वैत जेथें उठी । अविद्या जेणें लाठी । जें इंद्रियांतें लोटी । विषयांमजी ॥113॥
केवळ ज्याच्या योगाने द्वैत भासते, ज्याच्या योगाने आत्मविस्मृतिरूप अविद्या दृढ होते, जे इंद्रियांना विषयात घालते,
114-13
संकल्पें सृष्टी घडी । सवेंचि विकल्पूनि मोडी । मनोरथांच्या उतरंडी । उतरी रची ॥114॥
जे नुसत्या संकल्पाने म्हणजे ‘आहे’ या कल्पनेने- सृष्टी उत्पन्न करते व लगेच नाही अशी कल्पना करून सृष्टी नाहीशी करते, याप्रमाणे नानाप्रकारच्या मनोरथांच्या उतरंडी रचते व खाली करते,
115-13
जें भुलीचें कुहर । वायुतत्त्वाचें अंतर । बुद्धीचें द्वार । झाकविलें जेणें ॥115॥
जे भ्रमाचे कोठार असून वायुतत्वाचे आतील अंग आहे आणि बुध्दीचे आत्मज्ञानरूपी द्वारे ज्याने झाकले आहे,


116-13
तें गा किरीटी मन । या बोला नाहीं आन । आतां विषयाभिधान । भेदू आइकें ॥116॥
अर्जुना, ते मन होय. यात अन्यथा नाही. आता विषयांची वेगवेगळी नावे ऐक.
117-13
तरी स्पर्शु आणि शब्दु । रूप रसु गंधु । हा विषयो पंचविधु । ज्ञानेंद्रियांचा॥117॥(विषय 117 पासून)
तर शब्द आणि स्पर्श, रूप, रस व गंध हे पाच ज्ञानेद्रिंयांचे पाच प्रकारचे विषय आहेत.
118-13
इहीं पांचैं द्वारीं । ज्ञानासि धांव बाहेरी । जैसा कां हिरवे चारीं । भांबावे पशु । । 118॥
या पाच द्वारांनीच ज्ञान बाहेर धावते, ते कसे? तर जसे हिरवेगार गवत उगवलेल्या कुरणामधे जनावरे भांबावतात (तसे ज्ञान भांबावते).
119-13
मग स्वर वर्ण विसर्गु । अथवा स्वीकार त्यागु । संक्रमण उत्सर्गु । विण्मूत्राचा ॥119॥
मग तोंडाने स्वर आणि अक्षरे व विसर्ग यांचा उच्चार करणे, अथवा हाताने घेण्याची व टाकण्याची क्रिया करणे, पायाने चालणे, उपस्थाने मूत्राचा त्याग करणे व गुदाने मलाचा त्याग करणे
120-13
हे कर्मेंद्रियांचे पांच । विषय गा साच । जे बांधोनियां माच । क्रिया धांवे ॥120॥
हे पाच कर्मेद्रिंयांचे पाच प्रकारचे विषय खरे आहेत व यांचा पहाड बांधून त्यावरून क्रियेचा व्यवहार चालू रहातो.
(याप्रमाणे हे दहा विषय या देहामधे आहेत. इच्छा = 121-पासून)


121-13
ऐसे हे दाही । विषय गा इये देहीं । आतां इच्छा तेही । सांगिजैल ॥121॥
याप्रमाणे हे दहा विषय या देहामधे आहेत. व आता इच्छा काय, तेही सांगण्यात येईल.
122-13
तरि भूतलें आठवे । कां बोलें कान झांकवे । ऐसियावरि चेतवे । जेगा वृत्ती ॥122॥
तर मागील भोगलेल्या गोष्टीच्या आठवणीने अथवा दुसर्‍याच्या मुखातून ऐकलेल्या शब्दांनी कान झाकावेसे वाटतात, अशाने जी वृत्ती जागी होते
123-13
इंद्रियाविषयांचिये भेटी । सरसीच जे गा उठी । कामाची बाहुटी । धरूनियां ॥123॥
इंद्रिये व विषय यांची भेट होताक्षणीच कामाचा हात धरून जी वृत्ती वेगाने उठते
124-13
जियेचेनि उठिलेपणें । मना सैंघ धावणें । न रिगावें तेथ करणें । तोंडें सुती ॥124॥
जी वृत्ती उठली असता मन एकसारखे धावावयास लागते व जेथे प्रवेश करू नये तेथे इंद्रिये तोंडे खुपसतात,
125-13
जिये वृत्तीचिया आवडी । बुद्धी होय वेडी । विषयां जिया गोडी । ते गा इच्छा ॥125॥
ज्या वृत्तीच्या प्रेमामुळे बुद्धी वेडी होते व ज्या वृत्तीला विषयांची गोडी असते, अरे अर्जुना, ती इच्छा (असे तू समज).

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *