सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा ओवी १०१ ते १२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

101-10
ऐसें मी एकचि पहिलें । मग मी तें मनातें व्यालें । तेथ सप्तऋषि जाहाले । आणि चारी मनु ॥101॥
याप्रमाणे सृष्टीच्या पूर्वी मीच एक असतो. मग त्या माझ्यापासून मनाची उत्पत्ती होते व त्या मनापासून सप्तर्षी व चार मनु उत्पन्न होतात.
102-10
इहीं लोकपाळ केले । लोकपाळीं विविध लोक सृजिले । लोकांपासूनि निपजले । प्रजाजात ॥102॥
मग लोकपालांना उत्पन्न करतात लोकपाल तेथील जनांना उत्पन्न करतात. अशा प्रकारे लोकांपासून अनेक प्रकारची प्रजा निर्माण होते.
103-10
ऐसेनि हें विश्व येथें । मीचि प्रसवला ना निरुतें । परी भावाचेनि हातें । माने जया ॥103॥
याप्रमाणे येथें हें जग म्हणजे मीच खरोखर विस्तारलो आहे, पण हैं, माझ्या वचनावर दृढ विश्वास असल्यामुळे ज्याला पटेल, त्यालाच कळेल.
एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः ।
सोऽविकंपेन योगेन युज्यते नात्र संशयः॥10.7॥

104-10
यालागीं सुभद्रापती । हे भाव इया माझिया विभूती । आणि यांचिया व्याप्ती । व्यापिलें विश्व ॥104॥
म्हणून सुभद्रापते अर्जुना ! हे सर्व अस्तित्वात आलेले कार्यपदार्थ माझ्या विभूती आहेत व त्यांच्या योगानेच सर्व जग व्यापिलें आहे.
105-10
म्हणोनि गा यापरी । ब्रह्मादिपिपीलिकावरी । मीवांचूनि दुसरी । गोठी नाहीं ॥105॥
म्हणून बा अर्जुना ! याप्रमाणे ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत माझ्यावांचून दुसर्‍या वस्तूची गोष्ट देखील नाही.

106-10
ऐसें जाणे जो साचें । तया चेइरें जाहालें ज्ञानाचें । म्हणोनि उत्तम मध्यम भेदाचें । दुःस्वप्न तयां ॥106॥
जड-विनाशीभाव जाऊन ज्याला सर्व सच्चिदानंदस्वरूप दिसतें त्याला शुध्द ब्रह्मज्ञान झालें असे समज, म्हणून तो उत्तम, मध्यम, कनिष्ठ या भावांचे स्वप्न पाहत नाही.
107-10
मी माझिया विभूती । विभूतीं अधिष्ठिलिया व्यक्ती । हें आघवें योगप्रतीती । एकचि मानी ॥107॥
मी, माझ्या विभूती व त्या विभूतीला अधिष्ठानभूत व्यक्ति ह्या सर्वांचे माझ्याशी ऐक्य आहे, या अनुभवाने तो सर्व मद्रूपच मानतो.
108-10
म्हणोनि निःशंकें येणें महायोगें । मज मीनला मनाचेनि आंगें । एथ संशय करणें न लगे । तो त्रिशुद्धी जाहला ॥108॥
म्हणून अशा या अद्वैतदृष्टिरूप श्रेष्ठ योगाने जो माझ्याशीं मनाने ऐक्य पावला तो मद्रूप होतो, हे मी त्रिवार प्रतिज्ञा करून सांगतों. येथे संशय घेण्याचे कारणच नाही.
109-10
कां जे ऐसें किरीटी । मातें भजे जो अभेदा दिठी । तयाचिये भजनाचिये नाटीं । सूती मज ॥109॥
कारण अर्जुना ! जो अभेददृष्टीने माझे याप्रमाणे भजन करतो, तो त्याच्या भजनाचे व्यवहारात एक मलाच घेतलेंले असतें.
110-10
म्हणऊनि अभेदें जो भक्तियोगु । तेथ शंका नाहीं नये खंगु । करितां ठेला तरी चांगु । तें सांगितलें षष्ठीं ॥110॥
म्हणून अभेदाने होणारा जो भक्तियोग, त्यांत पूर्णब्रह्मस्थिती प्राप्त होईल किंवा नाही, ही शंका घेण्याचे कारणच राहत नाही व तो खंडितही होत नाही आणि खंड पडला तरी ते कल्याणाचें असतें, कारण तो भगवंताच्या कृपेने पुनः सुरूं होतो, हे सहाव्या अध्यायांत सांगितलेंच आहे.

111-10
तोचि अभेदु कैसा । हें जाणावया मानसा । साद जाली तरी परियेसा । बोलिजेल ॥111॥
ज्या अभेदाने भक्ति केली जाते म्हणून मी सांगितले, तो अभेद कसा आहे हे जाणावें असा जर तुझ्या मनांत ध्वनि उमटला असेल, तर सांगतों, ऐक.
अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते ।
इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः॥10.8॥

112-10
तरि मीचि एक सर्वां । या जगा जन्म पांडवा । आणि मजचिपासूनि आघवा । निर्वाहो यांचा ॥112॥
तरी या सर्व जगाला अर्जुना ! मीच एक जन्म देणारा आहे आणि या सर्व जगाची स्थितिहि मज पासूनच होते.
113-10
कल्लोळमाळा अनेगा । जन्म जळींचि पैं गा । आणि तयां जळचि आश्रयो तरंगा । जीवनही जळ ॥113॥
लाटांच्या माळा म्हणजे लाटापाठीं लाटा, अशा अनेक लाटा असल्या, तरी त्या सर्वांचा जन्म एका पाण्यापासूनच होतो. ते पाणीच त्यांना आधार असते व त्यांतही केवळ पाणीच असते.
114-10
ऐसें आघवांचि ठायीं । तया जळचि जेविं पाहीं । तैसा मीवांचूनि नाहीं । विश्वीं इये ॥114॥
ज्याप्रमाणे त्या लाटांच्या सर्व ठिकाणी पाणीच असतें, दुसरें कांहीच नसतें, त्याप्रमाणे या जगांत माझ्यावांचून दुसरे लवमात्र कांही नाही. संपूर्ण मीच आहे.
115-10
ऐसिया व्यापका मातें । मानूनि जे भजती भलतेथें । परि साचोकारें उदितें । प्रेमभावें ॥115॥
एकदेशीय सगुण साकार स्वरूपाने मी दिसत असलों तरी आता सांगितल्याप्रमाणे मीच व्यापकहि आहे असें जाणून जे प्रगट झालेल्या निष्कपट प्रेमाने माझे कोठेहि भजन करतात.

116-10
देशकाळवर्तमान । आघवें मजसीं करूनि अभिन्न । जैसा वायु होऊन गगन । गगनींचि विचरे ॥116॥
ज्याप्रमाणे वायु आकाशाशी एकरूप होऊन आकाशांतच संचार करतो, त्याप्रमाणे देश, काळ व वर्तमान हे सर्व माझ्याशीं अभिन्न करून म्हणजे भगवत्स्वरूपच आहेत असे समजून.
117-10
ऐसेनि जे निजज्ञानी । खेळत सुखें त्रिभुवनीं । जगद्रूपा मनीं । सांठऊनि मातें ॥117॥
त्याप्रमाणे आत्मस्वरूपालाहि जाणून व जगद्रूप असा जो मी. त्या मला अंतःकरणांत सांठवून जे आनंदाने त्रिभुवनांत भक्तिप्रेमलीला करतात.
118-10
जें जें भेटे भूत । तें तें मानिजे भगवंत । हा भक्तियोगु निश्चित । जाण माझा ॥118॥
जो जो प्राणी समोर येईल तो तो प्राणी साक्षात् भगवंत आहे, असे मानणें हाच, अर्जुना ! माझा भक्तियोग होय असे निश्चित जाण.
मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परम् ।
कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च॥10.9॥

119-10
चित्तें मीचि जाहाले । मियांचि प्राणें धाले । जीवों मरों विसरले । बोधाचिया भुली ॥119॥
जे चित्ताने मद्रूप झालें, जे मलाच आपला प्राण समजून तृप्त असतात, जे माझें सगुणस्वरूपहि पूर्ण ब्रह्म आहे या ज्ञानांत तल्लीन राहत असल्यामुळे जन्ममरणाचाहि त्यांना विसर पडतो.
120-10
मग तया बोधाचेनि माजे । नाचती संवादसुखाचीं भोजें । आतां एकमेकां घेपे दीजे । बोधचि वरी ॥120॥
मग माझ्या स्वरूपाच्या ज्ञानाने उन्मत्त होऊन संवादाने उत्पन्न होणार्‍या सुखाच्या मूर्ती होऊन नाचतात आणि परस्पर एकमेकांस माझ्या स्वरूपाचाच बोध घेतात व देतात.

121-10
जैशीं जवळिकेंचीं सरोवरें । उचंबळलिया कालवती परस्परें । मग तरंगासि धवळारें । तरंगचि होती ॥121॥
ज्याप्रमाणे अत्यंत जवळ असलेल्या दोन सरोवरांतील पाणी उचंबळून आलें असतां दोन्ही सरोवरे परस्परांत मिसळतांत व तरंगच तरंगाची घरें होतात.
122-10
तैसी येरयेरांचिये मिळणी । पडत आनंदकल्लोळांची वेणी । तेथ बोध बोधाचीं लेणीं । बोधेंचि मिरवी ॥122॥
त्याप्रमाणे ज्ञानीभक्त, परस्परांना भेटले असतां ब्रह्मानंदाचे कल्लोळ उठून त्यांची वेणीच गुंतली जाते आणि तेथे बोधबोधांचे अलंकार बोधांनीच घातले जातात.
123-10
जैसें सूर्यें सूर्यातें वोंवाळिलें । कीं चंद्रें चंद्रम्या क्षेम दिधलें । ना तरी सरिसेनि पाडें मीनले । दोनी वोघ ॥123॥
ज्याप्रमाणे एका सूर्याने दुसर्‍या सूर्याला ओवाळावें किंवा एका चंद्राने दुसर्‍या चंद्राला अलिंगन द्यावे. अथवा दोन ओघ सारखे एकमेकांत मिसळावे.
124-10
तैसें प्रयाग होत सामरस्याचें । वरी वोसाण तरत सात्त्विकाचें । ते संवादचतुष्पथींचे । गणेश जाहले ॥124॥
त्याप्रमाणे दोन भक्तांच्या प्रेमसंवादांत दोन प्रेमळ भक्तांचे प्रेम व परमेश्वररूप भगवान या तिघांच्या प्रेमाचा संगम होऊन ते एक समरस प्रेमाचे प्रयाग झाले व त्या प्रेमाच्या संगमावर अष्टसात्विकभावरूपी जाणीवेचा केरकचरा वर तरंगत राहून, भक्त त्या संवादरूपी चव्हाट्यावर गणेश होऊन राहतात.
125-10
तेव्हां तया महासुखाचेनि भरें । धांवोनि देहाचिये गांवाबाहेरें । मियां धाले तेणें उद्गारें । लागती गाजों ॥125॥
तेव्हा त्या भगवत्प्रेमाच्या अत्यंत सुखामुळे ते देहगांवाच्या बाहेर धांवतात आणि माझ्या प्रेमाने आकंठ तृप्त होऊन तृप्तीमुळे येणार्‍या ढेंकराने गाजूं लागतात.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *