सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी २६ ते ५० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

26-13
पैं सत्यलोकनाथा । वदनें आलीं बळार्था । तरी तो सर्वथा । जाणेचिना ॥26॥
बुद्धीचे सामर्थ्य वाढवून क्षेत्रक्षेत्रज्ञाचा विचार करण्याकरिता ब्रह्मदेवाला चार तोंडे प्राप्त झाली, तरी त्याला क्षेत्राचा निर्णय करता आला नाही.
ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् ।
ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः ॥13.4॥

अर्थ हे (क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे ज्ञान) ऋषींनी आणि छंदोबद्ध ग्रंथांनी अनेक प्रकारांनी वर्णन केले आहे. वेदातील बृहत्सामसूत्रांनी (ब्रह्मसूत्रांनी) व हेतुमान पंडितांनी हे चांगले निश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे.॥14॥
(जीववादी लोकांचे मत)
27-13
एक म्हणती हे स्थळ । जीवाचेंचि समूळ । मग प्राण हें कूळ । तयाचैं एथ । । 27॥
एक म्हणतात क्षेत्र हे स्थळ जीवाच्याच मालकीचे आहे आणि प्राण हा जीवरूपी मालकाची शेती वाहणारे कूळ आहे.
ज्याप्रमाणे जमिनीचा मालक माझी जमीन म्हणतो, म्हणून तो मालक होतो आणि जमिनीची वाही कूळ करते, त्याप्रमाणे जीव माझा देह म्हणतो, म्हणून येथे जीवाला देहाचा मालक म्हटले आहे आणि प्राण आहे तोपर्यंत देहाचे व्यापार चालतात, म्हणून प्राणाला कूळ म्हटले आहे.
हे स्थळ जीवाचेच समूळ – म्हणजे जीव हा क्षेत्राचा भोक्ता आहे. (कर्ता – म्हणजे कर्म करून कर्माप्रमाणे शरीर प्राप्त करून घेणारा व भोक्ता – म्हणजे कर्माप्रमाणे त्या शरीराचे द्वारा सुखदुःखाचा भोग भोगणारा.)
याप्रमाणे वस्तुतः असंग असलेल्या क्षेत्राज्ञाला कर्ता-भोक्ता मानून त्याच्याशी जडविनाशी क्षेत्राचा कधी नाहीसा न होणारा संबंध, मिमांसा दर्शनाने स्विकारला आहे.
28-13
जया प्राणाचां घरी । अंगे राबती भाऊ चारी । आणि मना ऐसा आवरी । कुळवाडीकर ॥28॥
ज्या प्राणाचे, अपान, व्यान, उदान, समान हे चार भाऊ अंगाने घरीच राबतात आणि येथे जीव, या मालकाच्या तर्फे शेतीची देखरेख करून शेती करणारे मन, हे वहिवाटदार आवारी आहे.
29-13
तयातें इंद्रियबैलांची पेटी । न म्हणे अवसीं पहाटीं । विषयक्षेत्री आटी । काढी भली ॥29॥
त्याच्या(मनाचे)जवळ ज्ञानेंद्रियरूप व कर्मेंद्रियरूप बैलाच्या जोड्या असून त्यांच्या सहाय्याने रात्र व दिवस न पाहता शब्दस्पर्शादि विषयरूप शेतात खूप श्रम करतो.
30-13
मग विधीची वाफ चुकवी । आणि अन्यायाचें बीज वाफवी । कुकर्माचा करवी । राबु जरी ॥30॥
शास्त्रोक्तकर्मरूपी बीजाला ऊब न देता निषिध्दकर्मरूपी बीजालाच ऊब देऊन वाढविले व अशा रीतीने इंद्रियांकडून कुकर्म करण्याचे जर श्रम करविले,


31-13
तरी तयाचिसारिखें । असंभड पाप पिके । मग जन्मकोटी दुःखें । भोगी जीवु ॥31॥
तर त्या कुकर्मानुसार पापाचेच अपार पीक येऊन कोटीजन्मपर्यंत जीव दुःखच भोगित राहील.
32-13
नातरी विधीचिये वाफे । सत्क्रिया बीज आरोपे । तरी जन्मशताचीं मापें । सुखचि मवीजे ॥32॥
किंवा शास्रानुसार आचरणरूपी उचित सत्क्रियारूप बीज पेरले, तर शेकडो जन्माच्या मापाने जीव सुखच मोजित राहील.
33-13
तंव आणिक म्हणती हें नव्हे । हें जिवाचेंचि न म्हणावें । आमुतें पुसा आघवें । क्षेत्राचें या ॥33॥
हे ऐकून दुसरे कित्येक म्हणतात, हे तुमचे म्हणणे बरोबर नाही. हे शरीर जीवाच्या मालकीचे आहे, असे म्हणू नका. या क्षेत्राविषयी जे काय विचारायचे आहे ते सर्व आम्हाला विचारा.
34-13
अहो जीवु एथ उखिता । वस्तीकरु वाटे जातां । आणि प्राणु हा बलौता । म्हणौनि जागे ॥34॥
अहो ! जीव हा वाटेने जात असता या शरीराचे ठिकाणी घटकाभर वस्ती करणारा वाटसरू आहे आणि प्राण हा वतनदार असल्यामुळे क्षेत्रात जागल्याचे काम करतो. (जीव हा मुळात प्रकृतीहून निराळा असा असंग आहे; पण तो अविवेकाने प्रकृतीशी ऐक्य पावून जन्ममरणाच्या वाटेने जाताना क्षेत्राचा आश्रय करतो, हे “वाटे जाता” पदाने सुचविले आहे.
उखिता वस्तीकार – विवेकज्ञान उत्पन्न होईपर्यंतच त्याचा (जीवाचा) व देहाचा संबंध असतो हे “उखिता वस्तीकार” या पदाने सांगितले आहे.
35-13
अनादि जे प्रकृती । सांख्य जियेतें गाती । क्षेत्र हे वृत्ती । तियेची जाणा ॥35॥
सांख्य जिला प्रकृती म्हणतात ती अनादि असून क्षेत्र हे तिचे राहण्याचे ठिकाण आहे.
(सांख्यशास्राप्रमाणे मूळप्रकृती अनादि व अव्यक्त असल्यामुळे ती आपल्या मूळ अव्यक्त अवस्थेत गोचर होऊ शकत नाही. क्षेत्ररूप कार्यरूपानेच ती गोचर होते- म्हणजे प्रकृतिच क्षेत्ररूपाने प्रकट होते.)


36-13
आणि इयेतेंचि आघवा । आथी घरमेळावा । म्हणौनि ते वाहिवा । घरीं वाहे ॥36॥
आणि तिचे काम करण्याचा सर्व मेळावा घरचाच आहे; म्हणून ती घरीच सर्व वाहित करते.
37-13
वाह्याचिये रहाटी । जे कां मुद्दल तिघे इये सृष्टीं । ते इयेच्याचि पोटीं । जहाले गुण ॥37॥
क्षेत्राची वाही करण्याच्या कामामध्ये मूलभूत जे या सृष्टीत तीन गुण आहेत, ते या प्रकृतीच्या पोटी उत्पन्न झाले आहेत.
38-13
रजोगुण पेरी । तेतुलें सत्त्व सोंकरी । मग एकलें तम करी । संवगणी ॥38॥
रजोगुण, कर्मरूपी बीजाची पेरणी करतो, सत्वगुण, जितकी पेरणी झाली तितक्याचे रक्षण करतो आणि मग यथाकाळी तमोगुण हा त्याची कापणी करतो. (प्रकृती ही आपल्या सत्व, रज, तम या तीन गुणांच्या द्वारा क्षेत्राची उत्पत्ती, स्थिती, लय करते, असा अर्थ)
39-13
रचूनि महत्तत्त्वाचें खळें । मळी एके काळुगेनि पोळें । तेथ अव्यक्ताची मिळे । सांज भली ॥39॥
पुढे त्यापासून महत् तत्वाचे म्हणजे समष्टिबुध्दीचे खळे निर्माण होते आणि काळरूपी एकट्या बैलाने त्याची मळणी केली जाते. हे करीत असताना शेवटी अव्यक्तरूपी संध्याकाळ होते. (ज्याप्रमाणे खळ्यात धान्य एकत्र करून व त्याची मळणी करून धान्य व भूस निराळे केले जातात, त्याप्रमाणे बुद्धीच्या सहाय्याने बरे-वाईट, पुण्य-पाप अशी कर्माची विभागणी करून त्यांचे सृष्टीत कालांतराने सुखदुःखरूप फळ, प्रकृती पुरुषाला प्राप्त करून देते, असे होत होत शेवटी सर्व सृष्टी अव्यक्त प्रकृतीत लीन होते. या सांख्यमतांत पुरुष चेतन व असंग आहे. तो कर्म करीत नाही ! पण त्याच्या सान्निध्याने प्रकृतीकर्म करते व त्याच्या ठिकाणी अविवेक आहे, तोपर्यंत क्षेत्रान्तर्गतसुखदुःखाचा संबंध व विवेक झाल्यानंतर सुखाचा संबंध मानला असल्यामुळे त्याच्या(पुरुषाच्या) असंगत्वाला बाधा येते; म्हणून वेदान्त दृष्टीने पाहता, या मतातही क्षेत्रक्षेत्रज्ञाचा निवाडा योग्य झाला नाही, असे माऊलिंचे म्हणणे आहे.)
40-13
तंव एकीं मतिवंतीं । याबोलाचिया खंतीं । म्हणितलेंया ज्ञप्ती । अर्वाचीना ॥40॥
हे सांख्यांचे मत ऐकून व त्या प्रतिपादनाची खंत वाटून बुद्धीमान योगी म्हणतात, अहो!हे सर्व तुमचे ज्ञान अलीकडील आहे.(येथून आता माऊलि योगशास्त्राचे मत सांगत आहेत.)


41-13
हां हो परतत्त्वाआंतु । कें प्रकृतीची मातु । हा क्षेत्र वृत्तांतु । उगेंचि आइका ॥41॥
अहो; परतत्व म्हणजे प्रकृतीच्या पलीकडे असलेल्या असंग अशा पुरुषाचे ठिकाणी संबंध कसा राहील? ह्या क्षेत्राच्या उत्पत्तीचा वृत्तांत निवान्तपणे ऐका.
42-13
शून्यसेजेशालिये । सुलीनतेचिये तुळिये । निद्रा केली होती बळियें । संकल्पें येणें ॥42॥
शून्यसेजशालिये म्हणजे शून्यमय अव्यक्तदशेच्या शय्यागृहात भगवंताच्या सृष्टी निर्माण करणार्‍या इच्छारूप संकल्पाने लीनतेच्या गादीवर निद्रा केली होती.
(संसारतप्त जीवांचा, ज्ञानोपदेशद्वारा उध्दार करण्याकरिता आवश्यक असलेलीं शास्त्रे व बुद्धी, मन, इंद्रिये इत्यादि कार्यसृष्टीचा संहार होऊन पुनः ती निर्माण व्हावी म्हणून भगवान “शुध्दसत्वात्मिकचित्त मी ग्रहण करीन” असा संकल्प करतात व सृष्टीचा संहार होऊन त्या सृष्टी बरोबर भगवंताचा संकल्पही प्रकृतीच्या साम्यभावाला प्राप्त होतो- म्हणजे प्रकृतीत लीन होतो नंतर ज्याप्रमाणे एखादा मनुष्य मी सकाळी चार वाजता उठून अमुक काम करीन असा संकल्प करून निजतो व त्या संकल्पानुसार तो जागा होऊन ठरलेले काम करतो, त्याप्रमाणे प्रलयाचा अवधी संपल्यावर प्रकृतीत लीन असलेला हा भगवंताचा संकल्प अद्भूत होऊन भगवान सर्व सृष्टी निर्माण करतात.)
43-13
तो अवसांत चेइला । उद्यमीं सदैव भला । म्हणौनि ठेवा जोडला । इच्छावशें ॥43॥
तो सर्गारंभी अकस्मात् जागा झाला आणि प्रयत्न करण्यात तो सदा तत्पर असल्यामुळे त्याने क्षेत्राचा ठेवा इच्छेने प्राप्त करून घेतला.
44-13
निरालंबींची वाडी । होती त्रिभुवनायेवढी । हे तयाचिये जोडी । रूपा आली ॥44॥
ही अव्यक्तदशेची वाडी त्रिभुवनाएवढीच असल्यामुळे संकल्पाच्या सहाय्याने ती त्रिभुवनरूप कार्यरूपाने व्यक्त झाली.
45-13
मग महाभूतांचें एकवाट । सैरा वेंटाळूनि भाट । भूतग्रामांचे आघाट । चिरिले चारी ॥45॥
मग पंचमहाभूतरूप पडीत जमीन संपूर्ण एकत्र करून जीवांचे चार भाग निर्माण केले.


46-13
यावरी आदी । पांचभूतिकांची मांदी । बांधली प्रभेदीं । पंचभूतिकीं ॥46॥
यानंतर आधीं पांचभौतिकांचा समुदाय पांचभौतिकरूपानेच निरनिराळ्या भेदाने विभागला गेला.
47-13
कर्माकर्माचे गुंडे । बांध घातले दोहींकडे । नपुंसकें बरडें । रानें केलीं ॥47॥
मनुष्यशरीररूपी क्षेत्राच्या दोहो बाजूला कर्म-अकर्मरूपी दगडांचे बांध घातले आणि ‘नपूंसकें’ – म्हणजे मनुष्याव्यतिरिक्त प्राणी नापीक जमीन बनविली.
(कर्माकर्माचे गुंडे । बांध घातले दोहींकडे ।
कर्माकर्म म्हणजे विधिनिषेध. हे कर्माकर्म मनुष्यप्राण्यांकरिताच सांगितले आहेत. मनुष्य, विहित कर्माप्रमाणे आचरण करून त्या पुण्याचे उत्कर्षरूप पीक प्राप्त करून घेतो व अकर्माचे आचरण करून पापजन्य दुर्गतिरूप पीक घेतो
नपुंसकें बरडें । रानें केलीं ॥नपूंसकें- म्हणजे मानवयोनी नाहीत अशा वृक्षादियोनी
बरडें रानें केलीं -म्हणजे ज्यात क्रियमाण कर्म उत्पन्न होत नाही, अशा केल्या
मानवयोनिव्यतिरिक्त इतर पशुपक्ष्यादि योनीतील जीवांना, शास्त्राने कर्माकर्माचे किंवा धर्माधर्माचे विधान लागू केले नसल्यामुळे त्या योनीतील जीवांकडून पुण्यपापरूप क्रियमाण कर्म होत नाही; म्हणून त्या योनीतील कर्माने सूखदुःखरूप फळही मिळत नाही. केवळ प्रारब्धरूप झालेल्या पूर्वीच्या पापकर्मांचे सुखदुःखरूप फळ भोगणार्‍या त्या योनी आहेत, असा अर्थ.
48-13
तेथ येरझारेलागीं । जन्ममृत्यूची सुरंगी । सुहाविली निलागी । संकल्पें येणें ॥48॥
मग जेथे लाग नाही त्या स्थितीत पुनः पुनः जन्ममरणाची येरझार करण्याकरिता या संकल्पाने जन्ममृत्यूंचे भुयार तयार केले.
49-13
मग अहंकारासि एकलाधी । करूनि जीवितावधी । वहाविलें बुद्धि । चराचर ॥49॥
मग आयुष्य आहे तोपर्यंत हा संकल्प अहंकाराशी ऐक्य करून बुद्धीकडून चराचराची वहिवाट करवितो-म्हणजे क्षेत्रज्ञाला कर्माच्या कर्तृत्वाचा व त्या कर्मानुसार सुखदुःखरूप फळाच्या भोगाचा अनुभव घ्यायला लावतो.
50-13
यापरी निराळीं । वाढे संकल्पाची डाहाळी । म्हणौनि तो मुळीं । प्रपंचा यया 50॥
याप्रमाणे शून्यरूपी अव्यक्तदशेत संकल्पाची डहाळी वाढली; म्हणून प्रपंचाला संकल्प मूळ कारण आहे.
(याप्रमाणे योगमतांत सत्वगुण, इच्छा, संकल्प, सृष्टी इत्यादि पदार्थ सत्य मानून त्यांचा क्षेत्रज्ञाशी संबंध मानला आहे; पण वेदान्तदर्शनाने क्षेत्रज्ञाला अद्वैतस्वरूप ठरवून तद्व्यतिरिक्त सर्वच मिथ्या मानले आहे. म्हणून वेदान्तदृष्टीने पाहता योगमतांतही क्षेत्रक्षेत्रज्ञाचा निवाडा बरोबर झाला असे दिसत नाही.)

, ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading