सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ३५१ ते ३७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

351-11
ज्या मज संहाररुद्र वासिपे । ज्या मजभेणें मृत्यु लपे । तो मी एथें अहाळबाहळीं कांपें । ऐसें तुवां केलें ॥351॥
ज्या मला सृष्टीचा संहार करणारा रूद्र भितो, ज्या मला भिऊन मृत्युदेखील तोंड लपवितो. त्या मलाही अत्यंत थरकाप सुटावा, असा विश्वरूप तूं झाला आहेस.
352-11
परि नवल बापा हे महामारी । इया नाम विश्वरूप जरी । हे भ्यासुरपणें हारी । भयासि आणी ॥352॥
पण याला विश्वरूप हें जरी नाव आहे, तरी भगवंता ! ही विलक्षण महामारी आहे. हें विश्वरूप, आपल्या भयंकर विक्राळ स्वरूपामूळे साक्षात भयालाही हार खायला लावणारें आहे.
नभःस्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् ।
दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो॥11.24॥

अर्थ हे विष्णो, गगनाला स्पर्श करणारा, दीप्रिमान, अनेक रंगांनी युक्त, जबडा पसरलेला, दीप्तिमान व विशाल नेत्र असलेला, अशा तुला पाहून ज्याचा अंतरात्मा व्याकूळ झाला आहे असा मी धैर्य धारण करू शकत नाही व शांति देखील धरू शकत नाही.॥11-24॥
353-11
ठेलीं महाकाळेंसि हटेंतटें । तैसी किती{ए}कें मुखें रागिटें । इहीं वाढोनियां धाकुटें । आकाश केलें ॥353॥
तुझीं कित्येक क्रुध्द मुखें, जणुंकाय महाकाळाशीं पैज मारून आहेत, तशु रागीट आहेत, त्यांनी आपल्या विस्तृतपणाने आकाशालाहि लहान केले आहे.
354-11
गगनाचेंनि वाडपणें नाकळे । त्रिभुवनींचियाही वारिया न वेंटाळे ययाचेनि वाफा आगी जळे । कैसें धडाडीत असे ॥354॥
ही अफाट वाढलेली मुखें एवढ्या विस्तीर्ण आकाशांतहि सामावत नाहीत. त्रिभुवनांत वाहणारा वारादेखील त्यांना वेटाळूं शकत नाही. त्यांच्या वाफेने अग्निदेखील जळूं शकेल, अशी प्रज्वलित आहेत.
355-11
तेवींचि एकसारिखें एक नोहे । एथ वर्णावर्णाचा भेदु आहे । हो कां जें प्रळयीं सावावो लाहे । वन्ह्ं ययाचा ॥355॥
त्याचप्रमाणे सर्व मुखे एकसारखीं नसून त्यांचे वर्णहि भिन्न भिन्न आहेत, जणुं काय प्रलकालीं आग्नीला याचेच सहाय्य मिळते.


356-11
जयाचिये आंगींची दीप्ती येवढी । जे त्रैलोक्य कीजे राखोंडी । कीं तयाही तोंडें आणि तोंडीं । दांत दाढा ॥356॥
ज्यांच्या अंगाचे तेज एवढें भयंकर आहे की, जें त्रैलोक्याची राखरांगोळी करील. त्यांतहि आणखी तोंडे असून, त्या तोंडांत भयंकर दाढा दांत आहेत.
357-11
कैसा वारया धनुर्वात चढला । समुद्र कीं महापुरीं पडिला । विषाग्नि मारा प्रवर्तला । वडवानळासी ॥357॥
जणुं काय वार्‍याला धनुर्वात झाला किंवा समुद्र महापुरांत पडला अथवा विषरूपी अग्नि, समुद्रात असलेल्या वडवाग्नीला मिळून, मारण्याला प्रवृत्त झाला.
358-11
हळाहळ आगी पियालें । नवल मरण मारा प्रवर्तलें । तैसें संहारतेजा या जाहलें । वदन देखा ॥358॥
किंवा अग्नीने हलाहल विष प्राशन केलें किंवा स्वतः मरणच मारायला प्रवृत्त झालें. त्याप्रमाणे या सृष्टिचा संहार करणार्‍या या अंगाच्या तेजाला, तुझीं मुखें आणखी सहाय्यभूत झाली आहेत.
359-11
परी कोणें मानें विशाळ । जैसें तुटलिया अंतराळ । आकाशासि कव्हळ । पडोनि ठेलें ॥359॥
पण हीं तुझीं मुखें कशाप्रमाणे अशी विशाल पसरलेली आहेत, असे म्हणशील, तर ज्याप्रमाणे अंतराळ तुटून आकाशांत जणुं काय भगदाड पडलें आहे.
360-11
नातरी काखे सूनि वसुंधरी । जैं हिरण्याक्षु रिगाला विवरीं । तैं उघडले हाटकेश्वरीं । जेवीं पाताळकुह र॥360॥
किंवा जेंव्हा हिरण्याक्ष राक्षस, पृथ्वी खाकेत मारून पाताळांत जाण्यांकरितां समुद्राच्या विवराने शिरला, तेव्हा, ज्याप्रमाणे पाताळांतील हिटकेश्वराने पाताळाचें विवर खुलें केलें


361-11
तैसा वक्त्रांचा विकाशु । माजीं जिव्हांचा आगळाचि आवेशु । विश्व न पुरे म्हणौनि घांसु । न भरीचि कोंडें ॥361॥
त्याप्रमाने तोंडे पसरलेली आहेत व त्यामधे जिभांचे अधिकच जोर दिसून येत आहेत. त्यांचा घासास विश्वानेही पूर्तता येणार नाही. म्हणून हे विश्वरूप या विश्वाच्या लीलेने घास घेत नाही.
362-11
आणि पाताळव्याळांचिया फूत्कारीं । गरळज्वाळा लागती अंबरीं । तैसी पसरलिये वदनदरी । माजीं हे जिव्हा ॥362॥
आणि ज्याप्रमाणे पाताळातील सर्पांच्या फुत्काराने त्यांच्या विषाच्या ज्वाला आकाशात पसराव्यात, त्या ज्वालांप्रमाणे जिव्हा ही (प्रत्येक) वदनरूपी दरीत पसरली आहे.
363-11
काढूनि प्रळयविजूंचीं जुंबाडें । जैसें पन्नासिलें गगनाचे हुडे । तैसेआवाळुवांवरी आंकडे । धगधगीत दाढांचे ॥363॥
प्रलयकाळाच्या विजांचे समुदाय काढून जसे आकाशाचे बुरुज शृंगारावेत, तशी ओठाबाहेर तीक्ष्ण अशा दाढांची टोके दिसत आहेत.
364-11
आणि ललाटपटाचिये खोळे । कैसें भयातें भेडविताती डोळे । हो कां जे महामृत्यूचे उमाळे । कडवसां राहिले ॥364॥
आणि ललाटारूप वस्त्रांच्या खोळीत असलेले डोळे, हे जसे भयासच भेडसावित आहेत, अथवा ते डोळे, महामृत्यूचे लोटच असून (भिवयांच्या) अंधारात राहिले आहेत.
365-11
ऐसें वाऊनि भयाचें भोज । एथ काय निपजवूं पाहातोसि काज । तें नेणों परी मज । मरणभय आलें ॥365॥
असे हे महाभयाचे (मृत्यूचे) कौतुक धारण करून (म्हणजे आपल्या स्वरूपी दाखवून) या ठिकाणी तू काय कार्यसिद्धी करू पहातोस ते मला कळत नाही. परंतु मला मात्र मृत्यूचे भय वाटू लागले आहे.


366-11
देवा विश्वरूप पहावयाचे डोहळे । केले तिये पावलों प्रतिफळें । बापा देखिलासि आतां डोळे । निवावे तैसे निवाले ॥366॥
अहो देवा, विश्वरूप पहाण्याचे डोहाळे झाले होते, त्याची पूर्ण फलप्राप्ती होऊन बापा, तुमचे विश्वरूप पाहिल्याने डोळे शांत व्हावे तसे झाले आहे.
367-11
अहो देहो पार्थिव कीर जाये । ययाची काकुळती कवणा आहे । परि आतां चैतन्य माझें विपायें । वांचे कीं न वांचे ॥367॥
अहो देवा, हा देह पृथ्वीचा बनला असल्याने तो तर निश्चयेकरून नाश पावणारच. त्याची काळजी कोणी केली आहे? परंतु आता माझे चैतन्यच कदाचित वाचेल की नाही असे मला वाटू लागले आहे.
368-11
एऱ्हवीं भयास्तव आंग कांपे । नावेक आगळें तरी मन तापे । अथवा बुद्धिही वासिपे । अभिमानु विसरिजे ॥368॥
भयामुळे खरोखर अंग कापावयास लागते आणि तेच भय क्षणभर अधिक वाढले की मनाला ताप होतो अथवा बुद्धि दचकते आणि अभिमान विगलित होतो.
369-11
परी येतुलियाही वेगळा केवळ आनंदैककळा । तया अंतरात्मयाही निश्चळा । शियारी आली ॥369॥। जो
परंतु या सर्वांहून वेगळा, जो केवळ आनंदाचा अंश आहे असा जो अंतरात्मा, त्या शांत अंतरात्म्याला देखील भयाने शहारे आले.
370-11
बाप साक्षात्काराचा वेधु । कैसा देशधडी केला बोधु । हा गुरुशिष्यसंबंधु । विपायें नांदे ॥370॥
काय आश्चर्य आहे? विश्वरूपाच्या प्रत्यक्ष दर्शनाचा काय छंद लागला होता? त्या दर्शनाने माझे ज्ञान देशोधडी केले. असा गुरुशिष्यसंबंध क्वचितच असेल.


371-11
देवा तुझ्या ये दर्शनीं । जें वैकल्य उपजलें आहे अंतःकरणीं । तें सावरावयालागीं गंवसणी । धैर्याची करितसें ॥371॥
देवा ! या तुझ्या विश्वरूप दर्शनाने माझ्या मनांत जी कांही व्याकुळतां उत्पन्न झाली, ती सावरण्याकरितां मी धैर्याची खोळ करण्याचा प्रयत्न करीत आहे.
372-11
तंव माझेनि नामें धैर्य हारपलें । कीं तयाहीवरी विश्वरूपदर्शन जाहलें । हें असो परि मज भलें आतुडविलें । उपदेशा इया ॥372॥
तेव्हा माझ्या ‘अर्जुन’ या नावाचे धैर्य नाहीसें झालें; कारण विश्वरूपाचे दर्शन धैर्याच्या मर्यादांपेक्षाही श्रेष्ठ झाले हें असो, पण तुम्ही मला या उपदेशाने-म्हणजे विश्वरूप दर्शनाने-बरें संकटांत टाकलें.
373-11
जीव विसंवावयाचिया चाडा । सैंघ धांवाधांवी करितसे बापुडा । परि सोयही कवणेंकडां । न लभे एथ ॥373॥
बापडा माझा जीव निर्धास्त होऊन विश्रांती मिळावी म्हणून सर्वत्र धावाधाव करीत आहे; पण या विश्वरूपांत तशी सोय कोठेहि प्राप्त होत नाही.
374-11
ऐसें विश्वरूपाचिया महामारी । जीवित्व गेलें आहें चराचरीं । जी न बोलें तरि काय करीं । कैसेनि राहें? ॥374॥
याप्रमाणे या विश्वरूपाच्या महामारींत सर्व स्थावरजंगम जीवांचे जीवित्व नाहिसे झालें आहे. देवा!हें बोलूं नये, पण काय करूं बोलण्यावांचून राहवत नाही.
दंष्ट्राकरालानि च ते मुखानि दृष्ट्वैव कालानलसन्निभानि ।
दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास॥11.25॥

अर्थ दाढांच्या योगाने विक्राळ आणि प्रलयकाळच्या अग्नीप्रमाणे (दिसणारी) तुझी मुखे पाहून (मी इतका गर्भगळित झालो आहे की) मला दिशाभूल झाली आहे, मला काही समाधान वाटत नाही, हे देवाधिदेवा, जगन्निवासा, (आता) प्रसन्न हो.॥11-25॥
375-11
पैं अखंड डोळ्यांपुढें । फुटलें जैसें महाभयाचें भांडें । तैशीं तुझीं मुखें वितंडें । पसरलीं देखें ॥375॥
महाभय सांठविलेलें भांडे फुटल्याप्रमाणे तुझीं विक्राळ मुखें मी अखंड डोळ्यांसमोर पसरलेली पाहत आहे.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *